आवरीं आवरीं आपुला हर
101.
आवरीं आवरीं आपुला हरी । दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णे ठेविली नाही ॥१॥
गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी । अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हा दिधला ॥२॥
कवाड भ्रांतीचे उघडिले कुलुप मायेचे मोडिले । शिंके अविद्येचे तोडिलें । बाई तुझिया कृष्णे ॥३॥
होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥
डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥
अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णे ॥६॥
संचित हे शिळें लोणी । याचि केली धूळीधाणी । संकल्प विकल्प दुधाणीं । तीही फोडिली कृष्णें ॥७॥
प्रारब्ध हे शिळें दही । माझे खादले गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखी वोतिली ॥८॥
द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होते कामाचें ते पाळें । तेंहि फोडिलें कृष्णे ॥९॥
सुचित दुश्चित घृत घागरी । लोभे भरल्या अहोत्या घरी । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥
कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णे ॥११॥
पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाही ॥१२॥
ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आले पुढे । होते द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेले ॥१३॥
आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनी केले । बाई नवल चोज ॥१४॥
