वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ८८. सर्वांना नैवेद्य-प्रसादाचा लाभ

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088147 · अभंग क्र. ८८

88.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठाऐंशींवा ॥
सर्वांना नैवेद्य-प्रसादाचा लाभ -

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंताची प्रार्थना :

पूर्वप्रसंगी हनुमंते । विनविले श्रीरामाते ।
सारोनि पारणाविधीतें । प्रसाद आमुतें द्यावा स्वामी ॥१॥
सौमित्र आणि भरत । जानकीमातेसमवेत ।
पारणे सारोनि निश्चित । करावे तृप्त सकळांसी ॥२॥
ब्रह्मादि सुरपंक्ती । प्रसादाची वाट पाहती ।
निजसेनेचे सेनापती । आकांक्षिती सुमंतादिक ॥३॥
बिभीषणसुग्रीवादि जाण । अंगद युवराजा आपण ।
नळनीळादि कपिगण । प्रसाद पूर्ण वांछिती ॥४॥
जांबवंत सुषेण दधिमुख । श्रीरामप्रसादा सकळिक ।
अवघे असती साकांक्ष । त्यांसी आवश्यक सुखावीं ॥५॥
म्हणोनि घातले लोटांगण । ते देखोनि सकळ जन ।
स्वये झाले सुखैकघन । हनुमंते विंदान साधिले ॥६॥

सर्वाकडून हनुमंताला धन्यवाद :

आम्ही म्हणो श्रीरामचंद्र । वस्त्रे भूषणे अलंकार ।
देवोनि बोळविले सत्वर । निजशेष सादर न देचि ॥७॥
ते आमची सकळ चिंता । भली निरसिली हनुमंता ।
प्रसन्न करोनि रघुनाथा । शेष तत्वता मागितले ॥८॥
म्हणोनि हरिखेले समग्र । आनंदें करोनि जयजयकार ।
नामे गर्जिन्नले अपार । चराचर दुमदुमिले ॥९॥
देखोनि सकळांचा उत्सावो । संतोषला रामरावो ।
सकळा शेषीं आदर पहा हो । सुरसमुदावो ब्रह्मादि ॥१०॥

सर्व भक्तांना भोजनप्रसाद देण्याचा रामांचा निश्चय :

वानरे तरी आळुंकी । लुलु करित प्रसादाविखीं ।
त्यांसी न करिता पै सुखी । अत्यंत दुःखी होतील ॥११॥
लौकिक अपवाद गहन । श्रीरामकार्यालागीं जाण ।
जीवित्व तुच्छ करोनि पूर्ण । निजप्राण वेंचिलें ॥१२॥
त्यांसी मुके तळमळित । प्रसाद नेदी रघुनाथ ।
बोळविले निजभक्त । हीनवृत्त धरोनिया ॥१३॥
ऐसे लोकांचे अपवाद । माथा बैसती अगाध ।
विचार करोनिया शुद्ध । भक्तवृंद सुखावू ॥१४॥
ऐसे करोनि निश्चित । माता कौसल्या त्वरित ।
बोलावोनि रघुनाथ । विचार करित तियेसी ॥१५॥
मिनले सुरवरांचे भार । लोकपाळादि समग्र ।
ब्रह्मा आणि पै शंकर । सिद्ध चारण गंधर्व ॥१६॥
चित्ते वित्ते जीवितें । अनुसरोनि निश्चिते ।
वानरी आम्हा केले सरते । निजविजयातें देउनी ॥१७॥

कौसल्या मातेला स्वयंपाक तयार करण्यास रामांनी सांगितले :

त्रैलोक्यांत माझी ख्याती । व्हावया कारण मुख्य जुत्पती ।
त्यांसी द्यावया निजतृप्ती । पाकनिष्पत्ती करावी ॥१८॥
ऐसे सांगता रघुपती । माता सुखावली निश्चिती ।
जे म्या धरिले होते चित्ती । तेचि रघुपती योजिले ॥१९॥
ब्रह्मा शिव सुरगणा । लोकपाळेसीं पाकशासना ।
पाहुणेर रघुनंदना । निजानंदें जाण करावा ॥२०॥
श्रीरामाचे आवडते । वानर जीवाहून पढियंते ।
साह्य झाले श्रीरामाते । आवडी त्याते वाढीन ॥२१॥
भोंवत्या सुरवरांच्या पंक्ती । मुनि सिद्ध ऋषि निश्चिती ।
मध्ये माझा रघुपती । जेंवी उडुगणपति आकाशी ॥२२॥
वृत्रवधीं इंद्रपूजा । सुरवर करिती जैशा वोजा ।
तेंवी भोजनी रघुराजा । निजवोजा पूजीन ॥२३॥
हेंचि माझे निजपूजन । षड्रस निपजवीन सदन्न ।
ऐक तयांचे लक्षण । निजविंवचन सांगेन ॥२४॥

षड्रसयुक्त अन्नाचे लक्षण :

लेह्य पेय चोष्य खाद्य । याचे नांव चतुर्विध ।
भक्ष्य भोज्य जे विविध । जाण षड्‌विध येणेंसीं ॥२५॥
चाटूनि घेइजे पूर्ण । तया नांव लेह्य जाण ।
प्राशन कीजे घटघडून । पेय संपूर्ण त्या नांव ॥२६॥
चोखून घेइजे रस । थुंकून सांडिजे बाकस ।
तया नांव बोलिजे चोष्य । खाद्यविलास तो ऐका ॥२७॥
कंडनपेषणादि समस्त । पाक न करिता निश्चित ।
जे खावयास उपयुक्त । खाद्य बोलत तयासी ॥२८॥
विचित्र कोरकियांची परी । रोटी पोळी आदि उखरी ।
यातें बोलिजे चतुरी । निजनिर्धारी पै भक्ष्य ॥२९॥
क्षिप्रा आणि ओदन । भोज्य म्हणती विचक्षण ।
एव षड्रसाचे चिन्ह । निजविंवचन सांगितले ॥३०॥
त्या रसांचे पाकविधान । करिती राममाता सर्वज्ञ ।
ऐक तयाचे लक्षण । निजविवंचन अवधारी ॥३१॥

भोजनप्रसाद स्वीकारण्यासाठी पंगतीला कोण कोण होते त्यांची नामावली :

पैकी बैसल्या भूचर । जळचर यक्ष किन्नर ।
सिद्ध चारण मुनीश्वर । सुरवर आदिकरोनी ॥३२॥
खेचर भूचर जळचर । दानव मानव विखार ३ ।
राहिले होते समग्र । श्री रामचंद्रशेषासी ॥३३॥
ब्रह्माआदि ईशान । लोकपाळ सकळ जन ।
श्रीरामषेशालागून । प्रीति करोन राहिले ॥३४॥
निजप्रधानासी बिभीषण । सुग्रीवासहित वानरगण ।
पंक्ती बैसविल्या सावधान । मध्ये रघुनंदन शोभत ॥३५॥
नभीं तारांगणांची पंक्ती । मध्ये शोभे निशापती ।
तेंवी सुरखेचरपंक्ती । मध्ये रघुपति शोभत ॥३६॥
मध्ये श्रीराम केवळ । आवरणपंक्ती लोकपाळ ।
प्रकाशे दीप प्रबळ । राम घननीळ चिज्ज्योति ॥३७॥
कौसल्येचे भाग्य गहन । जिचा पुत्र रघुनंदन ।
जेणे त्रैलोक्य पावन । निजजीवन विश्राचे ॥३८॥

खाद्यपदार्थाचे बहुविध प्रकार :

ऐका कौसल्येची परी । पारणाविधी श्रीरामचंद्री ।
वाढीत कौसल्या सुंदरी । निजनिर्धारी परिसेयीं ॥३९॥
चैतन्यतेजें अति चोखटे । समभावें सुवर्णताटें ।
आनंदरसें पूर्ण वाटे । अपूर्ण कोठे असेना ॥४०॥
प्रथम शाखांचिया परी । वाढी कौसल्या सुंदरी ।
पंक्ती बैसल्या एकसरी । निजनिर्धारी निजयुक्त ॥४१॥
एकी शाखा त्या खंडिवा । एकी केवळ खुडिवा ।
एकी सदेठी तोडिवा । एकी सोलिंवा सुवास ॥४२॥
एका कहुवटा खणुवाळी । एकी अति तिखट तोंडाळी ।
एक सलंब पै सरळी । एक वाटोळी गडबडती ॥४३॥
एक हिरवी करकरित । एकी जारसी कचकचित ।
एकी बहुवीज बुचबुचित । एकी हसहसित कोरडी ॥४४॥
एकी अत्यंत आंबट । एकी सबाह्य तिखट ।
एकी सर्वांगी कडुवट । एक तुरट समसमित ॥४५॥
एक वाढोनि जारठलीं । एक मुरडी खुरटली ।
एक सुपुष्पें सारठली । एकी तुटली अनुवायें ॥४६॥
ऐशा फळवल्लीफळभारें । केले समरस सांबारे ।
अवघ्या वाघारु वाघारें । निजथारें श्रीरामे ॥४७॥
ऐशा नानापरींच्या शाकदि । परवडी केल्या रघुकुळटिळका ।
एकेचि स्वादें जेवित देखा । अति नेटका जेवणारा ॥४८॥
एके परपाकें उतटलीं । एक स्नेहदेंठीहून सुटली ।
वनिताहातींहूनि निसटलीं । स्वादा आली शिखरणी ॥१४६॥
झाडीं पिकलें देंठकेणें । तरी आंबे आम्लपणें ।
शेजे मुराल्या एकांतपणे । न चाखता घाणे चवी फांके ॥५ ० ॥
रूप दृष्टीतें बुझावी । वासें घाणातें समजावी ।
वाचा श्रवणें बाप म्हणवी । स्पर्शे निववी त्वचेतें ॥५१॥
रसना सेविता रसमात्र । गोडिया विनवी अंतर ।
सेविता श्रीरामचरित्र । सबाह्याभ्यंतर सुखरूप ॥५२॥
एकले एक च्यूतफळ । निववी इंद्रियें सकळ ।
श्रीरामपंक्ती अच्युतफळ । जग जे सकळ सुखरूप ॥५३॥
वैराग्यतापें तापलिया । त्याचि संतापकाचरिया ।
अनुतापतैलें तळिलिया । चवी आलिया श्रीरामे ॥५४॥
एक भोजनी अविचारितें । सेविती निंदेचे रायते ।
चवी चाखता कुसमुसितें । कपाळ हातें पीटित ॥५५॥
नकि तोंडी धूर उठी । तळमळोनि कपाळ पिटी ।
श्रीराम त्याते न पाहे दृष्टी । परवडी खोटी भोजनाची ॥५६॥
लोणची वाढिन्नलीं अनेगें । रंगली भक्तिप्रेमरंगें ।
एक सलवण सर्वांगें । स्वाद श्रीरंगें सेवावा ॥५७॥
अहं कहुवट कुहिरी । सोहंलोणचीं रंगलीं खारीं ।
वैराग्यभोकरें खारली खारी । त्याहीमाझारीं मुरले मिरघोंस ॥५८॥
स्वबोधभोकरीवेलेसीं आंवळा । जेविता चवीनें अति आगळा ।
मुळीच्या मूळीं गोडिया आला । स्वये सेविला श्रीरामे ॥५९॥
त्रिगुणगुणांचे निजत्रिकूट । निजनिर्गुणें भरिलें बोट ।
मघमघीत अति उद्‌भट । अति स्वादिष्ट श्रीरामे ॥६०॥
ऐसी लोणची नेणो किती । मुख्य स्मरण आले नेणती ।
तो स्वाद जाणे रघुपती । बैसले पंक्ती ते धन्य ॥६१॥
सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडू नेदिता सगळिया ।
क्षीरसाकरेशीं आळलिया । स्वये सेविल्या श्रीरामे ॥६२॥
पोकळे वळवेटी सरळी । एक वाटोळी लांबोळीं ।
सेवेमाजी अवघी आली । ठायी पावलीं श्रीरामा ॥६३॥
परम स्वादाची साखर । पंचरस पंचधार ।
मृत वाढिलें सर्वसार । स्वादें श्रीरामचंद्र डुल्लत ॥६४॥
अनुतापे सद्यस्तप्त । निजसाराचें सारांश घृत ।
अखंड थारा स्वये वाढित । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥६५॥
शास्त्रपडिपाडें पापड । नानायुक्ती अति तडफड ।
जळजळेचे आले फोड । तेणे कडकड मोडती ॥६६॥
यालागी होते मागे । ते ओढोनि भजनमार्गे ।
निरवोनियां सर्वांगें । श्रीरामभोगें स्वादिष्ट ॥६७॥
मीतूंपण सांडणे ठायी । तेचि शुद्ध सांडयी ।
श्रीराम ठायां येता पाही । सांडीं मांडी नाही सर्वथा ॥६८॥
स्वये तप्ततैलीं कुरवडी । स्वये नुगवेचि बापुडी ।
शांतिदांतीं केली कुडकुडी । आली रोकडी राममुखा ॥६९॥
विषयलालसेचे लाडू । विवेके वाढिले फोडफोडूं ।
तेणे पडिपाडें तिळव्या जाडु । स्वाद गोडू श्रीरामे ॥७०॥
वैराग्यकढें कढली कढी । तीमाजी माया मुगवडी ।
विरोनि आली स्वादा गाढी । तिची गोडी राम जाणे ॥७१॥
त्यामाजी जिरे मिरे कापुरा । तेणे सुवास चढे अंबरा ।
रस सेविती फरफरां । श्रीराम चंद्राचेनि धर्मे ॥७२॥
भजनभावाच्या इडुरिया । क्षीरसागरींच्या क्षीरघारिया ।
सबाह्य गोड गुळवरिया । पूर्ण पुरिया परिपूर्ण ॥७३॥
भजनभेदें सफेत केणी । प्रेमशर्करा भरली भरणी ।
अमृतफळाते लाजवोनी । वाढिलें आयणी आंबवडे ॥७४॥
नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढली ।
चंद्रबिंबीची काढिली । घडी मांडिली मांडियांची ॥७५॥
मांडियांची नवलपरी । चतुर्वेद घडिया चारी ।
कर्मकानवटी उत्तरी । श्रीरामचंद्री निजस्वाद ॥७६॥
विवेकसांडणी अति सोज्ज्वळ । उभयभागीं निजतेजाळ ।
तांदुळ वेळिले भावबळ । अति सोज्ज्वळे अरुवार ॥७७॥
सोहं ओगराळे सनाथ । अलिप्तपणें भरिला भात ।
ठायी वाढिला न फुटत । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥७८॥
अन्नीं वरान्नश्रेष्ठता । सबाह्य कोंडा झाडिला परता ।
चढला मध्यनायकाच्या माथा । प्रिय रघुनाथा यालागी ॥७९॥
सर्व स्वादांचें कारण । स्वये श्रीराम आपण ।
यालागी वरी वाढिलें कवण । अपूर्ण ते पूर्ण श्रीराम करी ॥८०॥
श्रीरामपंक्ती रसपीयूख । ज्यासी श्रद्धेची असे भूक ।
ग्रासोग्रासी चढतें सुख । हे परवडी देख त्यालागीं ॥८१॥
न्यूनन नाही श्रीरामपंक्ती । जेवितां जेविते चवी जाणती ।
रुचलेपणें जाण वाढिती । अति सुमति कौसल्या ॥८२॥
राममाता सावधान । जाणे तृषिताचे लक्षण ।
सबाह्य निववीत संपूर्ण । जीवा जीवन देतसे ॥८३॥
कौसल्या स्वये खुणाविती । चारी मुक्ती तेथे राबती ।
जे जे ज्याचे मनोगतीं । ते ते देती त्या ठायी ॥८४॥
पहिलें नवजणी वाढत्या । चौघीजणी पूर्ण कर्त्या ।
जे पंक्ती श्रीराम भोक्ता । अतृप्तता तेथे कैंची ॥८५॥

जेवणारांनी तृप्तीची ढेकर दिला :

एवं तृप्तीचा ढेंकर । देती स्वानंदे उद्गार ।
स्वादें कोंदलें जेवणार । श्रीरामचंद्र निजपंक्ती ॥८६॥
कौसल्या सावधान वाढी । सुरवर खेचर परवडी ।
ब्राह्मणतृप्ति झाली गाढी । धोत्रे बुडी ढिलावती ॥८७॥
ऐसी सकळा आनंदतृप्ती । झाली असे श्रीरामपंक्ती ।
ज्यालागीं योजिले रघुपती । अभिनव कीर्ति सांगणे असे ॥८८॥
अति प्रेमाचिये प्रीती । हनुमान आवडता रघुपती ।
त्याकारणें कौसल्यैहातीं । पाकनिष्पत्ती करविली ॥८९॥
ताट विस्तारोनि परिकरे । हनुमंतासी अति आदरे ।
बोलोवोनि रघुवीरे । मधुर उत्तरें अनुवादे ॥९०॥

श्रीरामांची हनुमंताला पंक्तीला भोजनास बसण्याची विनंती :

हनुमंत सर्वज्ञा । तुवा पूर्वी केली आज्ञा ।
सारूनि विधिपारणा । अपेक्षा मना शेषाची ॥९१॥
तेणे अन्वये कौसल्या जननी । षड्रसपाकांची मांडणी ।
संपादिली तुजलागूनी । ताटे विस्तारोनी तिष्ठत ॥९२॥
तुम्ही आम्ही झडकरी । सवे जनकजा सुंदरी ।
भरत शत्रुघ्न आदरी । प्रीति थोरी सौमित्रा ॥९३॥
सकळ बैसोनि सांगाते । संपादू पारणाविधीतें ।
आज्ञापितां श्रीरघुनाथे । येरु निश्चिते अति कुशल ॥९४॥
आज्ञापितां रघुनाथ । माथा वंदोनि वचनार्थ ।
युक्तायुक्त न विचारीत । बैसे त्वरित सांगाते ॥९५॥
राम सुरवरा वर । नीच आपण वनचर ।
ऐसा करिता विचार । शेष सत्वर न ये हाता ॥९६॥
सवे बैसावया सम्यक । आणिक उपाय असे एक ।
होतो अंगस्थ बाळक । श्रीरामशेख तै लाभे ॥९७॥
श्रीराम कृपाळू जननी । भक्ती प्रीति बाळाहूनी ।
भक्तापरी रघुनंदनी । नाही त्रिभुवनी आवडते ॥९८॥

रामाज्ञेप्रमाणे हनुमंत पंक्तीला येऊन बसल्यावर
सर्वांनी रामनामाच्या जयघोषात आपोशने घेतली :

ऐसे जाणोनि निश्चित । सवे बैसला हनुमंत ।
श्रीराम सकळा वेगे म्हणत । घ्याव्या निश्चित प्राणाहुति ॥९९॥
सुरनरादि खेचर । सिद्ध चारण मुनीश्वर ।
नाग यक्ष पै किन्नर । घ्या हो समग्र प्राणाहुति ॥१००॥
दानव मानव समग्र । वसिष्ठादि ऋषीश्वर ।
सुग्रीवादि वानरभार । राक्षसभार बिभीषणादि ॥१०१॥
आज्ञापितां रघुनंदन । रामनामे गडगर्जन ।
सकळीं जयजयकार करोन । आपोशनें घेतलीं ॥१०२॥

श्रीराम प्रेमाने मारुतीच्या मुखात घास घालू लागले.
परंतु मारुतीचा सर्वांआधी घास घेण्यास नकार :

अति प्रीती रामराणा । कवळ उचलोनि जाणा ।
देता आला वायुनंदना । येरु चरणा लागला ॥१०३॥
स्वामी कृपाळु रघुपती । भक्तप्रीति तुझ्या चित्ती ।
ग्रास घालिसी मुखाप्रती । निजस्फूर्ती विसरोनी ॥१०४॥
परंतु एक विज्ञापन । कृपापूर्वक रघुनंदन ।
स्वामी परिसावे आपण । तरी मी वचन बोलेन ॥१०५॥
म्हणोनि चरणी ठेविला माथा । तेणे संतोष रघुनाथा ।
स्वये आज्ञापी हनुमंता । आवडे चित्ता ते सांग ॥१०६॥
ऐकोनिया ते वचन । हनुमान जाला सुखैकघन ।
विनविला रघुनंदन । आधी आपण ग्रास घेणे ॥१०७॥
सवेंचि घेईल लक्ष्मण । पाठी भरत शत्रुघ्न ।
जनकनंदिनी ग्रास घेऊन । अधिकार पूर्ण मग माझा ॥१०८॥
ऐसे विनविता हनुमंता । झाले आश्चर्य रघुनाथा ।
हनुमान नाटोपे सर्वथा । विचार आता काय करू ॥१०९॥
ग्रास न घेता आपण । हनुमान सर्वथा न घे जाण ।
शेष दुसरिया ग्रासेंकरून । घेऊ छळून हनुम्याचे ॥११०॥

श्रीराम-सीता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी घास घेतल्यावर मारुतीला घास घेण्याची विनंती :

ऐसा करोनि निर्धार । ग्रास घेत रघुवीर ।
विनविलां सीता सौमित्र । घेई सत्वर कवळाते ॥१११॥
श्रीरामाचे अनुमते । सीतेनें घेतलें कवळातें ।
सौमित्रही प्रेमे बहुते । घेत कवळाते मर्यादा ॥११२॥
भरत शत्रुघ्न दोघे जण । तिही कवळ घेता पूर्ण ।
हनुमान विनवी रघुनंदन । ग्रास आपण सवे ध्यावा ॥११३॥
ऐसे सांगता रामासी । हनुमान लागोनि चरणांसी ।
श्रीरामासहित सकळांसी । पुसे भोजनासी पै आज्ञा ॥११४॥
निरोप आहे जी आम्हांसी । क्षोभ न यावा कोणासी ।
कृपा असेल मानसी । तरी वेगेंसी आज्ञापिजे ॥११५॥
ऐकोनि हनुम्याचे वचन । हांसिन्नले सकळ जन ।
रामे देतो आज्ञापन । विषाद कोण मानील ॥११६॥
श्रीरामआज्ञा उल्लंघन । करी ऐसा पापी आहे कोण ।
त्यासी जाण पा अधःपतन । नरक दारुण पै होती ॥११७॥
सवे सांगे रघुनंदन । म्या देतो आज्ञापन ।
विषाद मानूं शके कोण । ग्रास आपण सवे घ्यावा ॥११८॥
सकळ तुजलागीं तटस्थ । बैसले असती वाट पाहत ।
विलंब न करावा निश्चित । घ्यावे त्वरित कवळातें ॥११९॥

परंतु मारुतीने घास न घेता श्रीरामांच्या प्रसादाचे ताट उचलून उड्डाण केले :

आज्ञापिता रघुनंदन । येरें घालोनि लोटांगण ।
ताट उचलोनि जाण । केले उडाण आकार्शी ॥१२०॥
देखोनि तयाचे लाधव । स्वये हांसतसे राघव ।
कैसा साधिला अभिप्राव । अन्य गौरव हनुम्याचे ॥१२१॥
आम्ही ठकवोनि घेवो पाहो शेष । तंव येणेंचि ठकविलें आम्हांस ।
ऐसे विचारोनि राघवेश । हनुमंतास पूसत ॥१२२॥
काय केले वायुनंदना । तीक्ष्णबुद्धि विचक्षणा ।
तुझ्या शेषालागी जाणा । आम्ही संगातें बैसलो ॥१२३॥
तंव त्वा विंदान साधिले । सकळ आसावले सांडिलें ।
अवघे ताट उचलोनिया नेलें । वेडाविलें आम्हांसी ॥१२४॥
ऐसे पुसतां रामरावो । येरु हांसोनि लवलाहो ।
लोटांगण घालोनि पहाहो । स्वयमेवो विनवित ॥१२५॥

भक्ताचे उच्छिष्ट देवाने भक्षू नये म्हणून मी ताटासह उड्डाण केले असे मारुतीचे स्पष्टीकरण :

ऐक स्वामी रघुनंदना । तू कृपाळू दीनजनां ।
तुझ्या शेषालागीं जाणा । भक्तजनां अति प्रीति ॥१२६॥
नाना व्रतें यज्ञ दान । पुनश्चरणें अतिकठिण ।
तुझ्या प्रसादालागून । भक्तजन करिताती ॥१२७॥
योग योग पै दारुण । पर्वतपात करिता पूर्ण ।
तुझा प्रसाद न ये जाण । तो मजलागून पावला ॥१२८॥
ऐसे उफराटे घडे केंवी । जे भक्तशेष श्रीरामसेवी ।
ऐसे न मानावे गोसावी । मिठी सुटावी की भक्ताची ॥१२९॥
निजभक्ताचें निजशेख । स्वये सेवी रघुकुळटिळक ।
ते विपरीत झाले देख । ऐसे निःशेखघडेना ॥१३०॥
चंद्र निजकळा विसरोन । चंद्रामृतालागीं पूर्ण ।
चकोराचे परी जाण । साकांक्षण अमृता ॥१३१॥
सूर्य निजतेजा भुलला । प्रकाशातें शोधूं गेला ।
दरांदरकुटीं रिघाला । कोठडिया लपाला अंधारी ॥१३२॥
महासिंधू तृषित जाहला । क्षुद्र नदिये मागो गेला ।
तेंवी भक्त शेषालागी वहिला । राम भुकेला काय सांगों ॥१३३॥

मस्तीची आनंदातिरेकाने मर्कट लीला :

म्हणोनि मांडिल्या मर्कटचेष्टा । घांस घेतसे घटघटां ।
मिटक्या देतसे मटमटा । सुरश्रेष्ठां विटावोनी ॥१३४॥
वांकुल्या दावी सौमित्रासी । भरता देखोनि खाजवी कुसी ।
डोळे घुलकावी सीतेसी । शत्रुघ्नासी दावी अंगुष्ठ ॥१३५॥
देखोनिया बिभीषणा । काखा खाजवीत जाणा ।
अंगद सुग्रीवा दोघांजणा । पृच्छेकरोनि जाणा हेळसी ॥१३६॥
शेषें मातला वानर । दृष्टि नाणी सुरासुर ।
दावित मर्कटविचार । अपपर नाठवे ॥१३७॥
प्रेम न सरे माकडा । लोळतसे गडबडा ।
पृच्छ नाचवी रामापुढा । वसिष्ठापुढां कोल्हाटे ॥१३८॥!

मारुतीची लीला पाहून सर्वजण हंसतात :

देखोनि हनुम्याचे विकार । वसिष्ठादि ऋषीश्वर ।
ब्रह्मादिक पै सुरवर । श्रीरघुवीर हांसत ॥१३९॥
सौमित्र भरत शत्रुघ्न । हांसतसे सीता ते देखोन ।
वसिष्ठादि ऋषिगण । सिद्धचारण हांसती ॥१४०॥
ब्रह्मादि सुरपंक्ती । बिभीषण लंकापती ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । हांसताती विस्मये ॥१४१॥
ऐसा करिता गदारोळ । श्रीरामपंक्ती सकळ ।
तृप्ति पावले बहळ । आनंदकल्लोळ श्रीरामे ॥१४२॥
सकळिकांसी झाली तृप्ती । श्रीरामपंक्ती विश्रांती ।
हनुम्याचे प्रत्युपकारार्थीं । कांही युक्ती स्फुरेना ॥१४३॥
आता एक विचार । प्रार्धून हनुमान वीर ।
काय अपेक्षिततुझे अंतर । तो वर मागावा ॥१४४॥!
त्रैलोक्या दुर्धर पाही । मागतां अटक जे कांही ।
ते ते देईन सर्वही । माग लवलाही मारुती ॥१४५॥
हनुम्याचे भजनें भुलला । राम वरा उदित झाला ।
कृपेचा मेघ वोळला । भाग्ये आथिला हनुमत ॥१४६॥
चातकाचें आळवणासाठीं । जगतीतळी पहा होय वृष्टी ।
स्वसुकाळें कोंदे सृष्टी । क्षुधा उठउठी पै निरसे ॥१४७॥
तेंवी मारुतीचेनि भजनें । कृपा वोळोनि रघुनंदने ।
जग निववी वरदाने । हीन जनें उद्धरती ॥१४८॥
देखोनि वत्साचे क्षुधेतें । धेनु दुभे घरापुरते ।
तेवी हनुम्याचे वरदार्थे । निववी जगाते श्रीराम ॥१४९॥
ऐसा अपूर्व प्रस्तावो । कृपा वोळोनि रामरावो ।
पुढिले प्रसंगी वदेल पहा हो । अभिनव भावो तेथींचा ॥१५०॥
एका जनार्दना शरण । कृपा वोळला रघुनंदन ।
हनुमंतासी वरदान । स्वये आपण देतसे ॥१५१॥
ते वदावया वरदान । श्रोते साधु संत सज्जन ।
कृपापूर्वक पसायदान । प्रीति करोन मज द्यावे ॥१५२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामशेषहनुमत्प्राप्तिनिरूपणं नाम अष्टाशीतितमोऽध्यायः ॥८८॥
ओंव्या ॥१५२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग