परियेसी रुक्माई जैसा
1316.
परियेसी रुक्माई जैसा बैसला पाटी | दैन्य मे न सोडी काय करू ॥१॥
सदैवाच्या स्त्रिया अलंकारमंडित | मजवरी नाही प्रीत काय करू ॥२॥
दरिद्र विश्रांति घातली वो कैसी | सांगो कोणापाशी माउलिये ॥३॥
एकी दिव्य वस्त्रे नेसल्या परिकर | मज खंडे जर्जर मिळालेसे ॥४॥
मोडके खोपट वारा येतो भराभराट बहु होती कष्ट कोणा सांगो ॥५॥
कंची कुसुमसेज कंचे पटकुळ | फाटकी वाकळ अंथरूणा ॥६॥
कन्या आणि पुत्र जाली उपवरी | अजोनि न धरी घर प्राणनाथ ॥७॥
जनलोकांमाजी केले येणे हासे | म्हणती लागले पिसे नामयासी ॥८॥
जन्मी न देखे उपाय येणे केले अपाये | कोणा सांगो माये सुखदुःख ॥९॥
'आमुच्या वडिला शस्त्र सुई आणि कातरी हा बाण आणि सुरी वागवितसे ॥१०॥
एकांते भाकिले रुदना करि त्याची नारी | वाहियेली सुरी नागनाथी ॥११॥
लज्जेचा हा गांव सांडियेला येणे | शिकवावे कोणे माउलिये ॥१२॥
संसाराचा येणे सांडिला पसारा कणव स्त्री बाळा न कैसी ॥१३॥
नसता विठोबा नसता पंढरी तरी हा सुख घरी नांदता की ॥१४॥
होणार होऊन गेले शिकवू आता काई | विनविते राजाई रखुमाईसी ॥१५॥
