ज्ञानपर
30.
ज्ञानपर
अवधिया डोळा पाहू गेलिये । तंव अवघाचि जालिये ॥ १ ॥
काय सांगो गो माये अवधाचि आहे । अवधेनसी पाहे वटेश्वरीं ॥ २ ॥
अवधेपणाची मज पडिली भ्रांती । अवधाचि मी संता सांडवलीं ॥ ३ ॥
वटेश्वर चांगा अवधाचि आहे । अवधेनसी पाहे वटेश्वरी ॥ ४ ॥
31.
आकार पूजितां निराकार जालें । शून्यीं बुडाले बाईयांनो ॥ १ ॥
शून्याचा अंकुर शून्य फळले । व्योमाकार जालें मन तेथें ॥ २ ॥
तेथें फळ ना डाळ जाति ना कुळ । वटेश्वर चांगा जाला निर्मूळ ॥ ३ ॥
32.
प्रकृतीचें पूजन प्रकृतीच्या ठायी । असता तोही परि चोजवेना ॥ १ ॥
जळामाजीं भानु बिंबला दिसे । तैसा देही दिसे परमात्मा ॥ २ ॥
पुष्पामाजीं परिमळ राहिला निश्चळ । तैसा तो अकळ लक्षा नये ॥ ३ ॥
हें बोलणें सिद्धांतींचें शेवटी वेदांतीं । चांगया वेदांती कथन केले ॥ ४ ॥
33.
आनंदवनी भातार होता । उरूक उडाला कैउता ॥ १ ॥
नाम नाही रूप नाही । पाहो गेलों तो कांहींच नाही ॥ २ ॥
ऋषी राहिला शब्द निघाला । वटेश्वर चांगा विस्मित झाला ॥ ३ ॥
34.
पतिव्रते पुंश्चलीसंगात जाला । दोहींते भेटला एक देखणा ॥ १ ॥
दोहींचा गुण एक जाला । निर्गुण दादुला सोहंकारु ॥ २ ॥
आपुला मांडिला परावा मांडिला । घराचार नासला काय सांगो ॥ ३ ॥
वटेश्वरीं व्यभिचार जाला । परपुरुष भुंजला शून्ये तेथें ॥ ४ ॥
35.
एकाविससहस्रशास्त्रे उच्छ्वासीं । तो योगियां अभ्यासी स्थिर स्थिर ॥ १ ॥
गमना गमन नाही संसार पै नाही । वटेश्वरीं सोय सांगितली ॥ २ ॥
वटेश्वर चांगी जिव्हाळा । सोहं शब्दीं राहिला वटेश्वरी ॥ ३ ॥
36.
पतिव्रता नारी व्यभिचार केला । परपुरुष पूजिला बाईयो वो ॥ १ ॥
पतिव्रता नारी ऐसे म्हणावें । नाम पै ठेवावे अव्यक्तासी ॥ २ ॥
चांगा द्वैत होता तो अद्वैत जाला । सोहंशब्दी राहिला वटेश्वरीं ॥ ३ ॥
37.
निरंजन वनी केशव फुलला । डोंगर शोभला ब्रह्मागिरी ॥ १ ॥
तेथे सुमन झाडीन अनुहातें । शिष्य अनुभवी बुद्धि तोचि जाला ॥ २ ॥
चांगा वटेश्वर केशव फुलला । भ्रमर जाला रस ध्यावया ॥ ३ ॥
38.
सहजसमाधीं बैसला योगी । सुषुम्नामार्गीं निरोधोनिया ॥ १ ॥
गोल्हाटमंडळ भेटोनियां जाय । नाही ते पाहे डोळेमरी ॥ २ ॥
चांगा वटेश्वर सोहं जाला । अवधाचि गिळियेला बाईये वो ॥ ३ ॥
39.
सोहं न बुद्धि पै वेगळें । अहं सांडविलें बाईयांनो ॥ १ ॥
अहं मथिता सोहं आले । अविद्यामध्ये व्यापियलें ॥ २ ॥
अहंकार सांडि बोध पै जाला । चांगया मोहिला चांगेदेव ॥ ३ ॥
40.
कुडी हे नोवरी आत्मा हा नोवरा । दोघे पणे जाती निरंतरा ॥ १ ॥
पांचही प्राण सर्वही वऱ्हाडी । आशा तृष्णा दोन्ही देशधडी ॥ २ ॥
शांति निवृत्ति दोघी सुवासिनी । भक्ति करवली सखी बहिणी ॥ ३ ॥
वटेश्वर चांगा वरधंवा । तुम्ही नेऊनि मध्ये बैसवा ॥ ४ ॥
41.
वऱ्हाडी आले संसारनगरा । चांगा नोवरा केळवला ॥ १ ॥
हाती कांकण उभा वटेश्वरी । शांति हे नोवरी पणावया ॥ २ ॥
पणिली शांति बैसली पाटी । मुक्ताई करवली हळदुली वाटी ॥ ३ ॥
42.
आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी । लिंबलोण करी वोहरासी ॥ १ ॥
सोहळा जाला नोवरा गांवा गेला । वेगी आइती करा नोवरी बोलावा ॥ २ ॥
न्हाणिली धुणिली गजस्कंधीं मिरविली । बोळवीत गेली चौघेजण ॥ ३ ॥
ज्याची नोवरी त्या हाती लाविली । चांगा म्हणे आतां निश्चित झाली ॥ ४ ॥
