खिस्तीचा उदीम उदिमां
3042.
खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगी ॥१॥
वेवसाव करिता पर्वत मांगापासी । ते पै विटाळासी न मानिती ॥धृपद॥
मांगिणीशी नित्य करीतसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥२॥
आशा माया रांडा नांव हे कागदी । आठवीना कधी नारायण ॥३॥
तुका म्हणे देह झाले पराधीन । पांडुरंगाविण गति नाही ॥४॥
अर्थ :
व्याज बट्टयाचा व्यापार सर्व व्यापारामध्ये हीन आहे तरी देखील कलियुगामध्ये काही ब्राम्हण हा व्यापार करतात. एखादया पर्वत्या नावाच्या मांगाशी व्याज बट्टयाचा व्यापार हे ब्राम्हण लोक करतात, परंतू त्यावेळी त्याचा विटाळ हे मानत नाहीत. मांगीणीशी व्याज बट्टेचा व्यवसाय नित्य करताना हा त्याचा लेखा ठेवतो आणि त्या मांगीणीशी बोलत असतो व ती मांगीण त्याच्याशी बोलत असताना तिचा थुंका देखील त्याच्या तोंडावर उडतो. व्याज बट्टेचा व्यवसाय करताना हा ब्राम्हण आशा माया अशा रांडेंचे नांव कागदावर लिहून घेतो परंतू नारायणाला कधीही आठवित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या ब्राम्हणांचे देह हे नीच जातीच्या आधीन झाले आहेत त्यांना पाडूरंगावाचून गतीच नाही.
