आवडी धरोनी आलेती आका
3009.
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥
ते मी तुझे नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥धृपद॥
वर्म धरावे हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासी ॥२॥
वेगळ्या विचारे वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाही ॥३॥
तुका म्हणे घालू इच्छेचिये पोटी । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवे ॥४॥
अर्थ :
देवा तुम्ही ज्याची आवड धरुन आकाराला आलात आणि ज्याच्यासाठी तुम्ही पसारा केला आहे, असे ते तुझे नाम मी आवडीने गायील त्या नामाला एक क्षणभर देखील मी विसरणार नाही. देवा तुझे नाम घेणे हेच तुझ्या प्राप्तीचे वर्म मुख्य आहे व सर्वधर्म सार देखील तेच आहे आणि सर्व प्रकार देखील तुझ्या नामाच्या पोटातच आहे. एका हरीचे नाम घेतले की, त्या हरीच्या नामानेच हरीची प्राप्ती होते आणि त्याकरता वेगळे विचार आणि वेगवेगळे भक्तीभाव धरण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाच्या छोटयाशा मूर्तीला देखील प्रेमाने मिठी घालू आणि ती मूर्ती आम्ही नामाच्या बळाने आमच्या इच्छेच्या पोटात साठवून ठेवू.
