भागलो मी आता आपुल्या
3010.
भागलो मी आता आपुल्या स्वभावे । कृपा करोनि देवे आश्वासीजे ॥१॥
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरे । अंगे ही दातारे निववावी ॥धृपद॥
अमृताची दृष्टी घालूनिया वरी । शीतळ हा करी जीव माझा ॥२॥
घेई उचलूनि पुसे तानभूक । पुसी माझे मुख पीतांबरे ॥३॥
बुझावोनि माझी धरी हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडी ॥४॥
तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आता कृपा करा ऐसी काही ॥५॥
अर्थ :
देवा मी आतापर्यंत संसारातील अनेक कर्मे करुन खूपच त्रासलो आहे कृपा करुन तुम्ही मला आश्वासन दयावे. हे दातारा देवा तुम्ही मला आलिंगन देऊन माझे अंग शीतल करावे. अहो देवा तुमची अमृताची दृष्टी माझ्यावर तुम्ही घाला आणि माझा जीव शांत करा. देवा तू मला उचलून घेऊन माझ्या तहान भूकेविषयी मला विचारपूस कर आणि पितांबराने मुख पुस. देवा तुम्ही माझ्याजवळ बसून माझी हनुवटी धरुन माझी दृष्ट काढण्यासाठी माझ्यावरुन लिंबलोण उतरवून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, अहो माझ्या बापा विश्वंभरा आता अशीच काहीतरी कृपा तुम्ही माझ्यावर करा.
