जैसा निर्मळ गंगाओघ ।
2715.
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरी ॥१॥
प्रेम वाढे ग्रासोग्रासी । ब्रम्हरसी भोजन ॥धृपद॥
तृप्तीवरी आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥२॥
तुका म्हणे पाख मन । नारायण ते भोगी ॥३॥
अर्थ :
जसा गंगेचा निर्मळ ओघ आहे त्याप्रमाणे अन्न वाढणार्या दात्याने जेवणार्याला अन्नाचे प्रकार वाढावेत. त्याप्रमाणे हे देवा तू मला ब्रम्हरसाचे भोजन वाढ त्याने प्रत्येक घासाघासाला माझे प्रेम वाढत जाईल. आपली कितीही तृप्ती झाली तरी ज्या पदार्थाविषयी आपली आवड शिल्लक राहाते असे अन्नाचे प्रकार चांगले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे मन पवित्र व शुध्द आहे तेच नारायणाच्या ब्रम्हरसाचा भोग घेऊ शकतात.
