सुख सुखा विरजण झाले
2716.
सुख सुखा विरजण झाले । ते मथिले नवनीत ॥१॥
हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥धृपद॥
प्रबळ तो नारायण । गुणे गुण वाढला ॥२॥
तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
अर्थ :
निर्गुण सुखामध्ये सगुण सुखाचे विरजन घातले व त्याचे मंथन केले व नंतर भक्तीसुखाचे नवनीत बाहेर आले. निर्गुण सुखाने आपली काया म्हणजे शरीर आनंदाने डोलू लागते आणि सगुण रुपाच्या दर्शनाने डोळे तर सगुण रुपाला पाहुन, बाहू आलिंगन दिल्याने निवतात म्हणजे शांत होतात. सगुण आणि निर्गुण या दोन्हीही स्थितीमध्ये नारायण प्रबळ असतो व त्याच्या गुणामुळेच दोन्हीही स्थितीमध्ये आनंद वाढला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा की तो आनंद आपल्या ह्दयात उत्पन्न झाला तर तो ह्दयामध्ये शीग लागेपर्यंत भरला जातो मग तो बाहेर यायला सुरवात होते म्हणजेच तो आनंद बाहेर ओसंडून वाहतो, म्हणजेच लोकांना आपोआप आपण उपदेश करतो.
