(भुपाळ्यांवरील अभंग)
3471.
(भुपाळ्यांवरील अभंग)
बोलोनिया दाऊं का तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥
पागुळले मन काही नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवी धरूनि राहिलो ॥धृपद॥
त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥२॥
तुका म्हणे माता बाळा चुकलिया वनी । न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥
अर्थ :
देवा मला काय हवे असे आहे काय नको आहे ते तुम्हाला समजत नाही काय माझ्या अंत:करणातील इच्छा ओळखत नाहीत काय, बर ठीक आहे परंतू मी पण असे ठरवले आहे की तुम्ही मला जसे ठेवाल ज्या ठिकाणी ठेवाल मी त्या ठिकाणी आहे तश्या प्रकारे राहीन. देवा अहो माझे मन पागळे झाले आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणताही उपाय सापडत नाहीये त्यामुळे मी तुमचे पाय माझ्या चित्तात दृढ आणि श्रध्दापूर्वक धरुन राहिलो आहे. कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, कोणत्या गोष्टीचा भोग घ्यावा, कोणत्या गोष्टीविषयी दु:ख मानावे, काय टाकून दयावे, काय घ्यावे याची शंका माझ्या जीवाने मोठया प्रमाणात घेतली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आईची आणि बाळाची एखादया वनामधे चुकामूक झाली आणि त्या बाळाला त्याची आई लवकर सापडली नाही तर त्याला किती दु:ख होते तशा प्रकारचे दु:ख मला होत आहे तुमच्या भेटीवाचून मलाही तसेच दु:ख सध्या होत आहे.
