का हो वाढविता देवा ।
2818.
का हो वाढविता देवा । मज घरी समजावा । केवढा हो गोवा । फार केले थोड्याचे ॥१॥
ठेविन पायावरी डोई । यासी तुमचे वेचे काई । झालो उतराई । जाणा एकएकाचे ॥धृपद॥
निवाड आपणियांपाशी । असोनका व्हावे अपेसी । होती गाठी तैसी । सोडूनिया ठेविली ॥२॥
तुका म्हणे गोड । होते झालिया निवाड । दर्शने ही चाड । आवडीच वाढेल ॥३॥
अर्थ :
देवा आपल्या दोघामध्ये कोण लबाड आहे याचा चारचौघांमध्ये निवाडा करायचा एवढे वाढवण्यापेक्षा मला घरच्या घरीच समजवा. अहो देवा गोष्ट किती थोडी होती परंतू तुम्ही त्याला फारच मोठी केली. मी माझे मस्तक तुमच्या पायावर ठेवीन मग त्यामध्ये तुमचे काही नुकसान आहे काय ? देवा अहो मी तुमच्या पायावर माझे मस्तक ठेवीन आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा मग आपण दोघेही एकमेकांच्या ऋणातून मुक्त होऊ सोपी गोष्ट आहे. देवा हे पाहा आपल्या दोघाच्याहीमध्ये जो वाद आहे त्याचा निवाडा देखील आपल्याजवळच आहे मग चारचौघांमध्ये आपला वाद घेऊन आपला अपयश का दाखवायचे. देवा जे काही माझ्या पदरामध्ये माझे म्हणणे होते मी सर्व तुमच्यापाशी ते सोडून मोकळे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या दोघाच्यामध्ये असणारा वादाचा निवाडा जर घरच्या घरी झाला तरच ते गोड ठरेल. देवा मला तुमच्या दर्शनाची आवड आहे आणि तुम्ही मला जर दर्शन दिले तर मला तुमची आवड अधिकच वाढेल.
