॥ श्रीएकनाथमहाराजकृत
2.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय दुसरा ॥
सीतेचा शोध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
नगरशोध केल्यानंतर राजवस्तीत हनुमंत जातो :
हनुमंत महावीरें । लंका शोधिली घरोघरें ।
हाट चोहाटें चौबारें । गुप्त ओवरें स्त्रियांचीं ॥१॥
ऐसे शोधिता नगरांत । न लभेचि सीताशुद्धर्थ ।
राजवर्गाच्या गृहांत । सीता हनुमंत पाहो रिघे ॥२॥
विचक्रमे गृहान् वेगात् प्रहस्तस्य निवेशनम् ।
ततो न देवीति गृहं महापार्श्वस्य वीर्यवान् ॥१॥
महोदरस्य च तथा महाकायस्य चैव हि ।
विद्युज्जिव्हस्य भुवनं जंबुमालेस्तथैव च ॥२॥
वज्रदंष्ट्रस्य तथा शुकसारणयोरपि ।
विद्युन्माले सुमालेश्च विकटस्याप्यतुर्बले ॥३॥
बहुशत्रोः सूर्यशत्रोः कुमित्रामित्रयोस्तथा ।
चित्रकस्य च विचित्रस्य अतिगर्विष्ठमित्रयोः ॥४॥
ताम्राक्षस्य च धूम्रस्य मकराक्षमृगाक्षयो ।
लंबजिव्ह विरूपाक्ष आदिनां च महाबलः ॥५॥
मारूती उड्डाण करून प्रहस्त प्रधानादिकांची घरे शोधितो :
करोनि उड्डाणाची थोरी । हनुमंत रिघे प्रहस्तमंदिरी ।
शोधिलीं घरे ओवरींओवरीं । स्त्रियांमाझारी जानकी नाही ॥३॥
तेथे न लभेचि जाण । मग करोनिया उड्डाण ।
प्रहस्त महाबळिया प्रधान । त्याचेंहि भुवन शोधिलें ॥४॥
तेथोनि उडोनि झडकरी । शोधावया सीता सुंदरी ।
रिघोनि महापार्श्वाचे घरी । अंत : पुरी शोधित ॥५॥
तेथे न लभेचि सीताशुद्धर्थ । तेथूनि उडाला हनुमंत ।
महोदराच्या घराआंत । असे पाहत जानकी ॥६॥
अतिकाय महाकाय । यांची घरे शोधित जाय ।
अखया कुमराचें ठाय । शोधोनि पाहे वैदेही ॥७॥
वज्रदंष्ट्र आणि जंबुमाळी । तेथे शोधिली जनकबाळी ।
विद्धुज्जिव्ह महाबळी । तेथे घरधांडोळी घेतली ॥८॥
रावणाचा आप्त पूर्ण । शुक आणि तो सारण ।
त्या दोघांची घरे जाण । पाहे आपण हनुमंत ॥९॥
विद्धुन्माळी आणि सुमाळी । विकटशत्रु आतुर्बळी ।
यांचे घरी जनकबाळी । घेता धांडोळी न लभेचि ॥१०॥
बहुशत्र आणि सूर्यशत्र । अमित्र कुमित शठमित्र ।
अति गर्वी चित्रविचित्र । पवनपुत्र घरे शोधी ॥११॥
धूम्राक्ष आणि ताम्राक्ष । विरूपाक्ष आणि मकराक्ष ।
शोधावया मृगशावाक्ष । परम अतिदक्ष कपि शोधी ॥१२॥
घस प्रघस महघस । शोधावया मृगशावाक्ष ।
परम सावकाश । ध्यावया घस रावणासी ॥१३॥
शठ निशठ महाशठ । भट उद्भट महाभट ।
ही ही घरे शोधूनि स्पष्ट । निघें मर्कट पुढारा ॥१४॥
युद्धोन्मत्त महोन्मत्त । वीर वाटीव अति उन्मत्त ।
घरे शोधोनि समस्त । निघे हनुमंत पुढारा ॥१५॥
भीम महाभीम सभीम । तिघांची रूपे अतिदुर्गम ।
देखता काळास पडे भ्रम । सुखे प्लवंग तेथही शोधी ॥१६॥
वीरजिव्ह वीर उद्धट । जिव्हा व्रजपाय तिखट ।
जिव्हाघायें पर्वत पीठ । करी शतकूट गिरिवरां ॥१७॥
जिव्हा लांब योजन एक । सुरवरपन्नगांसी धाक ।
तींही घरे एक एक । शोधी निःशंक मारूती ॥१८॥
विद्धुज्जिव्ह नाम देख । जिव्हा विद्दुत्तेजें देख ।
विजू कडकडी तैसी हाक । लोकानुलोक कांपती ॥१९॥
ऐसे हे वीर विख्यात । त्यांचे त्यांचे घराआंत ।
हनुमान घरधांडोळी घेत । सीताशुद्ध्यर्थ साधावया ॥२०॥
विकर्ण नामे वीर निधडा । कर्णस्थानीं विकट दाढा ।
वृक्षपर्वतां करी रगडा । मुखापुढा कोण राहे ॥२१॥
याचे दाढेचे भयोपण । वारा वाजों न शके पूर्ण ।
हनुमान तेथे रिघोनि आपण । सीता शोधोन स्वये पाहे ॥२२॥
जैसी शुकाचीं चुचुवाडें । तैसे तिखट नाक गाढे ।
शुकनासिक नांव पडे । नाके रगडीं गिरिकूट ॥२३॥
लागता नाकाचा आघात । दैत्य दानव चळीं कांपत ।
हनुमंत रिघोनिया तेथ । असे पाहत जानकी ॥२४॥
अश्वमुख गजमुख । तरसतगरव्याघ्रमुख ।
त्यांचे घरी हनुमान देख । शोधी सम्यक जानकी ॥२५॥
कराळाक्ष विकराळक्ष । शोणिताक्ष भीमाक्ष ।
हनुमान शोधोनि अति दक्ष । एकैक सुखें घरे शोधिलीं ॥२६॥
सुर्यरथाचें जेवढें चाक । तेवढें एकैकाचें मुख ।
यालागी त्यांते चक्रमुख । नाम निर्दोख तयांसी ॥२७॥
मुख पसरिल्या रणाआंत । तिही लोकी अति आकांत ।
गिळो शकेल मेरू पर्वत । विरविख्यात चक्रमुख ॥२८॥
वाफ निघतां वदनींहूनीं । सूर्यबिंब आच्छादूनी ।
धुई दाटती ह्या गगनी । तैंपासोनि अद्यापि ॥२९॥
ही सर्व घरे पाहात असता दृष्टीसमोर आलेले घरातील एकांत प्रसंग, त्यामुळे उद्विग्न :
ऐसी घरे समस्त । हनुमान साक्षेपे शोधित ।
स्त्रीपुरूषांचा एकांत सुरतरत स्वये देखे ॥३०॥
स्त्रीपुरूषांची एकांती । नानापरींची देखोनि रती ।
हनुमान उद्वेगला चित्ती । ते श्लोकोक्ती स्वये बोले ॥३१॥
हनुमंत म्हणे निजचित्तीं । श्रमतां सीतेचे शुद्ध्यर्थी ।
हे मुख्यत्वें ग्रहगती । आली उपहती ब्रह्मचर्या ॥३२॥
नाही परदारदर्शन । नाही परदारसंभाषण ।
त्या मज स्त्रीपुरूषमैथुन । योनिदर्शन ये काळी ॥३३॥
घरोघरी सीता सती । पाहता स्त्रीपुरूष एकांती ।
देखिल्या नानापरींच्या रती । आली उपहती ब्रह्मचर्या ॥३४॥
देखे जो स्त्रीपुरूषमैथुन । हे ब्रह्मचर्या मुख्य विघ्न ।
त्या स्त्रियांचे अति मैथुन । अन्योन्य देखिले ॥३५॥
श्रीरामसेवा अति प्रीती । लंघोनि आलो अपापंती ।
येथे शोधिता सीता सती । अधोगति मज आली ॥३६॥
नग्न स्त्रियांचे दर्शन । तेंचि ब्रह्मचर्या नागवण ।
तेथे देखोनि मैथुन । अधःपतन मज आले ॥३७॥
सीता शोधिता संकटी । ब्रह्मचर्या होईल तुटी ।
न शोधिता उठा उठी । श्रीराम जगजेंठी क्षोभेल ॥३८॥
क्षोभलिया रघूत्तम । वृथा जन्म वृथा कर्म ।
वृथा गेला भजनकर्म । अति दुर्गम मज आले ॥३९॥
शुद्धिकरितां न फिरतां । अपेश येईल माझे माथा ।
काय करू श्रीरघुनाथा । बुद्धिदाता मज होईं ॥४०॥
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि । हे प्रतिज्ञा तुझी आगमनिगमीं ।
माझे संकटसंभ्रमी । कृपानुधर्मी पावावें ॥४१॥
न मे भक्त : प्रणश्यति । ब्रीदें तुझी गा श्रीरघुपती ।
सीताशुद्धीचे आकांती । कृपामूर्ति पावावें ॥४२॥
ही रतिप्रसंगांची दृश्ये ब्रह्मचर्याविघातक म्हणून मारूतीचा उद्वेग :
हनुमंताची अति चिंता । कळो सरली श्रीरघुनाथा ।
प्रकटला ह्रदया आतौतां । भक्त साह्यार्थी श्रीरामा ॥४३॥
मुखी श्रीरामनाममुद्रा । ह्रदयीं स्मरता श्रीरामचंद्रा ।
उल्लास जाला त्या कपींद्रा । श्रीरामभार्या शोधावया ॥४४॥
करिता श्रीरामांचे स्मरण । ह्रदयीं आली आठवण ।
देखता परदारमैथुन । बाधकपण मज नाही ॥४५॥
देखातां परदार नग्न । देखोनि परदारमैथुन ।
मज नाही कामकमान । श्रीरामचरणप्रसादें ॥४६॥
देखता परदाररती । अल्पही कामाची स्फूर्ती ।
बाधीना ज्ञानियांचे चित्ती । श्रीरघुपतिप्रसादे ॥४७॥
चित्तामाजी कामाची वस्ती । तेणेंचि ते करिता श्रीरामभक्ती ।
चित्त पावलिया चैतन्यस्थिती । कामानिवृत्ति सहजेंचिं ॥४८॥
जेंवी अंधारिया रातीं । खद्ध्योत नक्षत्रे लखलखिती ।
तेथे उगवल्या गभस्ती । अस्त पावती अवघींहीं ॥४९॥
तेंवी काम क्रोध लोभ चित्ती । तेणे चित्ते करिता भक्ती ।
राम प्रगटिलिया सर्वा भूतीं । अस्त पावती काम क्रोध ॥५०॥
इंद्रियां प्रवर्तक मन । मनाचे पोटी स्त्रीपुरूषभान ।
सकळ कामासी कारण । मनचि जाण बाधक ॥५१॥
जेंवी समुद्रजळी लवणकण । विरोन समुद्र होय आपण ।
तेंवी करिता श्रीरामस्मरण । मनचि परिपूर्ण परब्रह्म ॥५२॥
मनाची मावळली मनोवृत्ती । स्त्रीपुरूषांचे एकांती ।
शोधिता सीता सती । बाध चित्ती मज नाही ॥५३॥
मन मावळतांचि पाही । मी देहींच जालो विदेही ।
आता नग्न स्त्रियांच्या ठायी । शोधीन वैदेही विदेहत्वे ॥५४॥
नग्न देखता सूकर श्वान । पुरूषास नव्हे कामकामन ।
तेंवी देखता स्त्रीपुरूषमैथुन । बाधकपण मज नाही ॥५५॥
शस्त्र घालिता दळाआंत । पुरूष नव्हे कामासक्त ।
तेंवी रिघतां योनींआंत । कामकामार्थ मज नाही ॥५६॥
माशीवरी बैसल्या माशी । काम नुपजे कोणासी ।
तेंवी देखता मैथुनासी । शंका मानसी मज नाही ॥५७॥
पाविजे सद्गुरूचा वचनार्थ । तैंच कामाचा समूळ घात ।
तो मज तुष्टला श्रीरघुनाथ । कामकार्यार्थ मज नाही ॥५८॥
स्त्री चुकली सीता सती । ते शोधावी स्त्रियांप्रती ।
त्या स्त्रियांची देखता रती । कामस्फूर्ती मज नाही ॥५९॥
स्त्री चुकली सीता सुंदरी । ते शोधावी स्त्रियांमाझारी ।
वांचून शोधिता श्वानशूकरीं । श्रीरामनारी तेथे कैंची ॥६०॥
सीता चुकलियासाठीं । वना धांवोनि उठाउठी ।
शोधू जाता मृगांची थाटी । मूर्खदृष्टी शोधक ॥६१॥
ते मज नाही मूर्खपण । सीताशुद्ध्यर्थ मी सज्ञान ।
शोधीन मी समस्त भुवन । गुह्यस्थानें स्त्रियांची ॥६२॥
जे का अत्यंत विषम स्थान । तेथे रिघतां संकट गहन ।
तेथे तेथे मी प्रवेशोन । सीता शोधीन साक्षेप ॥६३॥
मागे शोधिलें भुवनोभुवन । आंता शोधीन दुर्गम स्थान ।
ऐसी धरोन आंगवण । उडे आपण हनुमंत ॥६४॥
इंद्रजिताच्या भुवनात, भुवनवर्णन :
हनुमान उडों पाहे आपण । तंव देखिले इंद्रजितभुवन ।
अनर्घ्य रत्नीं विराजमान । तेजे गगन लखलखित ॥६५॥
घरावरी घरकुसरी । उपरीवरी उपरी ।
आटाळिका थोर थोरी । त्यांहीवरी चौबारें ॥६६॥
रावणाचे घराहूनी । शोभा इंद्रजिताचे भुवनीं ।
कनककळस जडितरत्नीं । लागले गगनी लखलखित ॥६७॥
श्वेत पीत आरक्त भारीं । पताका झळकती अंबरी ।
जागेल घालिजे महा असुरीं । हारोहारीं दीपिका ॥६८॥
हाकोनियां उपराउपरी । घरटी घालिजे महावीरी ।
वायूसी रीघ नाही भीतरी । पाहे चौफेरीं हनुमंत ॥६९॥
तीन खणे चारी खण पांच खणें । सप्तखणें आणि नवखणें ।
त्यांमाजी आहे महादुखणें । नित्य कुंथणे वाटिवा ॥७०॥
आंत दुखण्याचें छेदन । करील लक्ष्मणाचा बाण ।
युद्धचर्या सांडील पूर्ण । पाडील खण गर्वाचें ॥७१॥
देखोनि इंद्रजितभवन । हनुमान खवळला आपण ।
भीतरी रिघावया जाण । अणुप्रमाण स्वये जाला ॥७२॥
रिघोनियां गवाक्षद्वारीं । वेगे पाहिलीं घरे चारी ।
शोधोनियां ओवरीं ओवरीं । उपर्याउपरीं धांडोळी ॥७३॥
सुलोचनादर्शन :
अट्टालिकांहिमाझारी । हनुमान पाहे सीता सुंदरी ।
तंव देखिली नवलपरी । सहित अंतुरी इंद्रजित ॥७४॥
मरकतमंचक सुंदर । त्यावरी त्राहाटिले मयूर ।
शेज रचिली सुकुमार । सुमनें अरूवार सुगंधें ॥७५॥
मुक्तघोंसीं युक्त वितान । घवघवीत शोभायमान ।
कर्पूरवाती तेज गहन । पीकदानें रत्नाची ॥७६॥
अति सुगंधा सुवर्णभिंती । पाचुनिबद्ध अवघी क्षिती ।
सुलोचना महा सती । विडिया देत इंद्रजिता ॥७७॥
सीतेचा भास आणि संताप :
सुलोचना पतिव्रता । कदा नुल्लंघी पतिवचनार्था ।
तीसी देखोनि हनुमंत । म्हणे हे सीता निश्चित होय ॥७८॥
नागकन्या सुलोचना । ते तंव पद्मिनी पद्मनयना ।
देखोनि हनुमान म्हणे जाण । रामांगना हे होये ॥७९॥
पद्मिनी स्त्रियेचा विचार । पाउली पाउली भ्रमतीं भ्रमर ।
अंगसुवास मनोहर । सीता सुंदर हे होय ॥८०॥
माझ्या स्वामीची हे कांता । अनुसरली रावणसुता ।
दोहींच्या करीन मी घाता । कोप हनुमंता पै आला ॥८१॥
डोळे आरक्त क्रोधे कडाडी । वळिली पुच्छाची पै वेटोळीं ।
दोघांची मुरडावया नरडी । शेंडी तडतडी हनुमंताची ॥८२॥
अधर्मी रतलीसे सीता । उभयवर्गा मारीन आता ।
कोप आलिया श्रीरघुनाथा । दोघांचे प्रेतां दावीन ॥८३॥
अथवा निजपुच्छी बांधोनी । जीत धरोनि नेईन दोनी ।
रागे घुलकावितो गगनी । उडी घालोनी मारावया ॥८४॥
सुलोचना - इंद्रजित यांचा संवाद :
तंव सुलोचना ते पतिव्रता । पतीचे चरणी ठेविला माथा ।
कांहींएक पुसेन मी आता । प्राणनाथा क्षमा कीजे ॥८५॥
यावज्जन्म तुम्हांप्रती । नाही केली म्या विनंती ।
हा घात देखोनि लंकापती । काकुलती पुसतसें ॥८६॥
राखों जाता अशोकवन । तुम्ही पावाल अति अपमान ।
अखया कुमरा आले मरण । कुळनिर्दळण राक्षसा ॥८७॥
तंव इंद्रजित पुसे प्रियेप्रती । ऎंसे होय कैशा रीती ।
रावणे आणिली सीतासती । कुळसमाप्ती राक्षसा ॥८८॥
वनी छळोनि जनकबाळीं । आणि छळला श्रीरामबळी ।
तेणे तो करील लंकेची होळी । राक्षसकुळी आकांत ॥८९॥
तुम्हांवरी ओखटें चिन्ह । देखोनि धाके माझे मन ।
प्रार्थुनी दशानन । बुद्धि आपण सांगावी ॥९०॥
तू तंव त्याचा ज्येष्ठ कुमर । तुझा विश्वास त्यास थोर ।
सीता देवोनि सुंदर । श्रीरामचंद्र करी सखा ॥९१॥
सखा केलिया श्रीरघुनाथ । राक्षसकुळ होईल स्वस्थ ।
तुम्ही अक्षयी समस्त । यशवंत तिही लोकी ॥९२॥
इंद्रजित सांगे अति एकांत । रावणासीं सीतासन्निपात ।
जो जो सांगेल हितस्वार्थ । त्याचा घात करू धांवे ॥९३॥
सख्य करोन श्रीरघुनाथा । सीता सोडी मज म्हणता ।
माझ्याच करू धांवेल घाता । बैसेल माथा पितृदोह ॥९४॥
ऐके प्रिये सावधान । चुकविलिया न चुके मरण ।
होणार ते होईल जाण । बुद्धि आपण न सांगावी ॥९५॥
हनुमंताची खात्री :
ऐसी दोघांची एकांतकथा । ऐकोनि हनुमंता ।
सुलोचना नव्हे सीता । ऐसे तत्वता मानले ॥९६॥
इंद्रजित सुलोचना एकांती । कोणे ठायी सीता सती ।
राखिली आहे लंकापती । ते मारूती नायकेचि ॥९७॥
लंकेमाजी आहे सीता । शुद्धी लागली हनुमंता ।
तिसी शोधावया तत्वता । होय निघता तेथोनि ॥९८॥
कुंभकर्ण भुवन :
मेघाहूनि उंच शिखर । मेघवर्ण दीर्घ शिखर ।
तेथे शोधावया सीता सुंदर । उडे सत्वर मारूती ॥९९॥
सादरें शोधिता घर । हनुमान दचकला थोर ।
कुंभकर्ण महाथोर । निशाचर पहुडला ॥१००॥
दीर्घ करिता महाघोर । नादें कोंदले अंबर ।
शंखा केलियाहि समोर । कानी उत्तर पडेना ॥१०१॥
श्वासोच्छ्वासाच्या आवर्तीं । शतानुशत पडले हस्ती ।
निर्गमू नाही तळमळती । म्हैसे आरडती त्यामाजीं ॥१०२॥
दोन्ही नासापटरंध्री । सगळे कळप रिघती करी ।
त्यांचा निर्गमू नाही बाहेरी । प्राणी मारिती प्राण्यांतें ॥१०३॥
गाई म्हैशी बैल घोडीं । श्वासोच्छ्वासीं घुंगरडी ।
निदसुरीया नाक रगडी । मारती किडी प्राण्यांच्या ॥१०४॥
हनुमान म्हणे आपुल्या चित्ती । जै रचिली याची मूर्तीं ।
तै आळस नाही प्रजापती । अमूप माती रचियेली ॥१०५॥
बाबरझोट्यां अति विशाळ । जैसे भाले अणियाळ ।
अंगींचीं रोमें जैसी शूळ । दांत विक्राळ खतेले ॥१०६॥
शेवाळले दिसती दशन । कदा न करी दांतवण ।
देखोनिया त्याचे वदन । आले वमन हनुमंता ॥१०७॥
येथे आलिया श्रीरघुनंदन । याची पहावी आंगवण ।
प्रथम यांसी माझे रण । केला पण हनुमंते ॥१०८॥
देखोनि त्याची देहस्थिती । कंटाळला स्वये मारूती ।
येथे कैंची सीता सती । म्हणोनि चित्ती त्रासला ॥१०९॥
अति त्रासें उद्वेगला । अत्यंत खेदें खिन्न झाला ।
ब्राह्मणजन्म हा पावला । व्यर्थ गेला निद्रेनें ॥११०॥
निद्रेचा प्रभाव :
अर्धे आयुष्य हातोहाती । बळेंचि हिरोन नेले रातीं ।
जागा जालिया स्त्रियेंसीं रती । कामासक्ति कामाची ॥१११॥
कुटुंबचिंतां बैसली चित्ती । ते तंव न सोडी कल्पांती ।
आयुष्य गेले याचि रीती । द्रव्यासक्ती अति तृष्णा ॥११२॥
भोजनशयनद्रव्यासक्ती । जन नागवले याच रीती ।
कुंभकर्ण नागविला सुषुप्तीं । सीता सती येथ कैंची ॥११३॥
बिभीषणाचे घर :
तेथोनि करोनि उड्डाण । देखिले बिभीषणाचे भुवन ।
टके पताका वृंदावन । हरिकीर्तन रामाचे ॥११४॥
टाळघोषमृदंगमेळीं । नैराश्ये निधडा वैष्णव बळी ।
नामासरसीं वाजवी टाळी । सुखसमेळी डुल्लत ॥११५॥
कीर्तनसुखें सुखावले । आपाआपणिया विसरले ।
परमानंदे तृप्त जाले । गाऊ लागले रामगुण ॥११६॥
निरपेक्षी विचक्षण । श्रुती उपरमे सावधान ।
श्रीराम सगुणी निर्गुण । करिती कीर्तन ते ऐका ॥११७॥
श्रीरामे धरणी अति पावन । राम जीवन राम दहन ।
राम तपन राम गगन । राम परिपूर्ण परब्रह्म ॥११८॥
राम मनाचे उन्मन । राम चित्ताचें चैतन्य घन ।
राम बुद्धिचें सज्ञान । राम परिपूर्ण परब्रह्म ॥११९॥
राम जंगमीं स्थावरी । राम सबाह्य अभ्यंतरी ।
राम परमात्मा श्रीहरी । जगदुद्धारी श्रीराम ॥१२०॥
देखोनि कीर्तनाची गोडी । हनुमंता अत्यंत आवडी ।
रंगी घालोनिया वेगे उडी । गुप्त गडबडीं नाचत ॥१२१॥
रंगी नाचतां हनुमंत । रंगी ओसंडला परमार्थ ।
तेणे बिभीषण मूर्छित । परम भक्त परमार्थी ॥१२२॥
हनुमंता स्वये दर्शन । नाठवे देह विदेहभान ।
बिभीषण मूर्च्छापन्न । आपणा आपण विसरला ॥१२३॥
दोघांसी ओळखी नसतां । दोघा भेटी गोष्टी न होता ।
दोघा झाली एकात्मता । श्रीरामकथाकीर्तनें ॥१२४॥
हरिकीर्तन ते स्वकर्म । हरिकिर्तन तो स्वधर्म ।
हरिकीर्तन प्रेम परम । जे परब्रह्म प्रापक ॥१२५॥
बिभीषणाचे भुजेप्रती । दिग्विजयी श्रीराममूर्ती ।
ते देखोनिया मारूती । परम प्रीती सुखावे ॥१२६॥
बिभीषणा श्रीरामभक्त । हनुमान आनंदें नाचत ।
भावे भजता श्रीरघुनाथ । नित्य मुक्त बिभीषण ॥१२७॥
राक्षसा श्रीरामाची भक्ती । हरिखें उपरमें मारूती ।
रामे रावणाची केलिया शांती । राज्यप्राप्ति बिभीषणा ॥१२८॥
माझ्या श्रीरामाची भक्ती । राज्य करिता नित्यमुक्तीं ।
असता स्त्रीपुत्रसंतती । भुक्ति मुक्ति भंगेना ॥१२९॥
हनुमंते केला पण । रामे मर्दिलिया रावण ।
लंकापती बिभीषण । हे शुभ चिन्ह सत्य माझे ॥१३०॥
जेथे श्रीरामाची भक्ती । तेथे आहे श्रीरामशक्ती ।
रामराज्य लंकेप्रती । सीता सती येतांचि देख ॥१३१॥
जेथे रिघाली रामशक्ती । तेथेंचि भुक्ति तेथेंचि मुक्ती ।
रामराज्याची ऐशी स्थिती । केला मारुती निश्चयो ॥१३२॥
सीता आगमन लंकेप्रती । रावणासी मरणमुक्ती ।
बिभीषणा राज्यप्राप्ती । केला मारुती निश्चयो ॥१३३॥
मागील श्रम खेद उपहती । येथे आलिया झाली शांती ।
धन्य वैष्णवाची संगती । महिमा किती मी वानू ॥१३४॥
संतसंगे निरसे भ्रांती । संतसंगे जड उद्धरती ।
संतसंगे ब्रह्मप्राप्ती । नित्य मुक्ति सत्संगें ॥१३५॥
संतचरणींचे रज : कण । हनुमान वंदी पै आपण ।
चरणरजीं घाली लोटांगण । परम पावन पदरज ॥१३६॥
चरणरजस्नानापुढें । तीर्थमात्र ते बापुडे ।
चरणरजें मुक्ति जोडे । ब्रह्म आतुडे पदरजें ॥१३७॥
बिभीषणाच्या भवनाप्रती । हनुमान पावला सुखविश्रांती ।
भगवद्भक्त जेथे भेटती । भ्रमनिवृत्ति आकल्प ॥१३८॥
अर्थी स्वार्थी परमार्थी । गेलिया भक्तभवनाप्रती ।
त्याचेनि संगे सुखप्राप्ती । भ्रमनिवृत्ति आकल्प ॥१३९॥
एकाजनार्दना शरण । दुरोनि देखिल्या भक्तभवन ।
हनुमान झाला सुखसंपन्न । समाधान जीवशीवा ॥१४०॥
प्रत्यक्ष झालिया भक्तभेटीं । त्यासी पुसता गुह्य गोष्टीं ।
परमानंदी पडली मिठी । धन्य सृष्टी हरिभक्त ॥१४१॥
एकाजनार्दना विनंती । शोधूं जाता सीता सती ।
बिभीषणाच्या भवनाप्रती । सुखसंपत्ती मारूतीसी ॥१४२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताशोधनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥
॥ ओव्या १४२ ॥ श्लोक ५ ॥ एवं संख्या १४७ ॥
