॥ श्रीएकनाथमहाराजकृत
6.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय सहावा ॥
मंदोदरीची जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सीतेची देहस्थिती :
श्रीरामाची निजभक्ती । भजनें दाटुगी सीता गती ।
तृण पाषाण नामे गर्जती । नामे त्रिजगती कोंदली ॥१॥
श्रीरामाची परम भक्ती । स्वये जाणे सीता सती ।
तिचे भजनाची देहस्थिती । भजती युक्ती अवधारा ॥२॥
काया - वाचा - मनाने भजनभक्ती :
ह्रदयी आत्मा श्रीरघुपती । पाहता वेदशास्त्रव्युत्पत्ती ।
ऐसी जे का निजप्रतीती । भजनभक्ति ते नांव ॥३॥
तेचि भक्ति धरिता चित्ती । श्रीराम दिसे सर्वांभूतीं ।
हे दृष्टीची भजनस्थिती । केला वेदांती निश्चय ॥४॥
याचि स्थितीं वचनोच्चार । हेंचि वाचिक वजन निर्धार ।
श्रीराम अक्षरीं अक्षर । नामोच्चार श्रीराम ॥५॥
श्रीराम जय राम अक्षरे । क्षराक्षरातीत परें ।
भवनीसी शंकरे । अत्यादरें सांगितली ॥६॥
याचि स्थिती करिता श्रवण । अक्षरार्थ श्रीराम पूर्ण ।
सांगता झाला श्रीरघुनंदन । हे निजभजन श्रवणाचें ॥७॥
रसांसी श्रीराम स्वादता । रसने राम रसज्ञता ।
ऐसेनि रसभोग भोगितां । श्रीरघुनाथा निजभजन ॥८॥
याचिपरी गंधघ्राण । सुगंधासी श्रीराम जीवन ।
तोचि अवघ्राणीं सर्वज्ञ । हे निजभजन घ्राणांचें ॥९॥
त्वचेचें करिता स्पर्शन । त्वचेची त्वचा रघुनंदन ।
स्पर्शा सबाह्य श्रीराम पूर्ण । हे निजभजन त्वचेचें ॥१०॥
श्रीराम मनाचे निजमन । श्रीराम चित्ताचें चैतन्यघन ।
श्रीराम बुद्धीचे समाधान । विवेके सज्ञान श्रीराम ॥११॥
अनन्यता :
अहसोहंकोहंपरता । श्रीराम वसे स्वभावतां ।
ऐसेऐशिया अनन्यता । भजे श्रीरघुनाथा जानकी ॥१२॥
श्रीरामगतीची ही गती । श्रीराम सीतेची निजशक्ती ।
श्रीराम सबाह्य सर्वा भूती । तयाची स्थिती जानकी ॥१३॥
ऐशिया श्रीरामभजनापुढें । रावणभय ते बापुडे ।
येवो न शके सीतेपुढे । सीताही रडे लटिकेंचि ॥१४॥
राम सीतेची अनन्यता । श्रीरामावेगळी नव्हे सीता ।
सीतेवेगळें श्रीरघुनाथा । नाही सर्वथा दूरी जाणे ॥१५॥
याप्रमाणे मारूतीला सीता दिसली, त्याचे कारण :
ऐशापरी भजे सीता । समूळ कळले हनुमंता ।
भक्तरक्षणें श्रीरघुनाथा । तेंही मज आता कळो आले ॥१६॥
मंदोदरी मानोनि सीता । हे का रतली लंकानाथा ।
कोपे करिता दोहींच्या घाता । रामे अनर्था चुकविलें ॥१७॥
मी तंव वानर उन्मत्त । समूळ विचार न करित ।
दोघांचा करित होतो घात । रामे अनर्थ चुकविला ॥१८॥
मंदोदरी हीच सीता असा हनुमंताला भास का झाला :
मंदोदरी हेचि सीता । कैसे मानले हनुमंता ।
मंदोदरी विष्णुसंभूता । समूळ कथा अवधारा ॥१९॥
रावणाची माता कैकसी । पंचधान्याचें पिष्टांसी ।
पंचवक्त्र भाऊनि त्यासी । करी पूजेसी शिवलिंगा ॥२०॥
पंचधान्य ते पंचवदन । ऐसी भावना भावून ।
पूजा करी अनुदिन । सावधान कैकसी ॥२१॥
पंचधान्यांचा पंचवक्त्र । पूजितां अक्षय दशवक्त्र ।
अक्षया होती माझे पुत्र । हे निजसूत्र पूजेचे ॥२२॥
शिवरात्रीला ती ध्यानस्थ बसली असता इंद्राने शिवलिंग समुद्रात टाकले :
शिवरात्रीचें दिवशी । येवोनि समुद्रतीरासी ।
निर्मोनियां शिवलिंगासी । करी कैकसी महापूजा ॥२३॥
षोडशोपचारी पूजा जाहली । त्यावरी बेलाची लाखोली ।
तपानीं शिवनामीं वाहिली । पूजा केली अनुपम्य ॥२४॥
तिपानी बेलाचें पत्र । एक एक शिवनामें स्वतंत्र ।
भावे पूजिला श्रीशंकर । मनोहर ती पूजा ॥२५॥
ऐसे करोनिया पूजन । लावोनियां दोनी नयन ।
कैकसी बैसतां धरोनि ध्यान । आनेंआन तेथे जाहलें ॥२६॥
राक्षसद्वेषी इंद्र येऊन । लिंग समुद्री करोनिया मग्न ।
सागर न करीच भग्न । स्थापी सर्वज्ञ हाटकेश्वरीं ॥२७॥
त्या लिंगाची हाटकेश्वरी । पूजा होतसे अध्यापवरी ।
बिल्वप्रवाह गोमतीसागरी । देखती शिवरात्रीं सर्वलोक ॥२८॥
कैकसी जंव उघडी नयन । तंव पूजालिंगा पडले खाण ।
पुत्र पौत्र निमे संतान । ते अति विघ्न लिंगहानी ॥२९॥
कैकसी दीर्घ रूदन करी । माझी देवपूजा नेली चोरीं ।
जळों रावणाची राज्यथोरी । काय संसारी नांदत ॥३०॥
रावणाचे आश्वासन :
ऐकता मातेचे रूदन । रावण आला स्वये धांवोन ।
येरी म्हणे लिंगा पडले खाण । काय वदन दाविसी ॥३१॥
न करिता विसर्जन । जे लिंगासी होय विघ्न ।
ते संताना निःसंतान । शिववचन शैवगामीं ॥३२॥
येरू म्हणे माते अवधारी । उतरले साही सूत्री ।
रत्नलिंग आहे घरी । पूजा करी तू तयाची ॥३३॥
कैकसीचे त्याने समाधान :
अनेकपरी लिंगाची थोरी । बोलिली आहे आगमशास्त्रीं ।
कैकसी त्या लिंगातें हाती न धरी । अनाचारीं केंवी रिघो ॥३४॥
माझे लिंग न येता हाता । आणिक मी न घे सर्वथा ।
शैवदीक्षेची हे अवस्था । लिंग न येंता प्राणत्याग ॥३५॥
अद्यापवरी शैवमार्गीं । दुजिया लिंगाची सांडोनि मागी ।
पूजन करिती लिंगालागीं । प्राणत्यागीं निजनेटें ॥३६॥
आत्मलिंगासाठी रावण कैलासाला जातो :
रावण विनवी मातेसी । तू का व्यर्थ प्राण देसी ।
मी जाईन शिवापासीं । तुझ्या लिंगासी आणीन ॥३७॥
शिव स्वामी माझे माथा । तू तंव जाणसी तत्वता ।
प्रसन्न करोनि विश्वनाथा । लिंग मी आता आणीन ॥३८॥
कैकसी सांगे रावणासी । नारदे सांगितले मजपासीं ।
आत्मलिंग शिवापासीं । ते आणिसी तै धन्य ॥३९॥
ऐकोनि मातेचे वचन । सवेग निघाला दशानन ।
शिवापासीं स्वये येऊन । करी नमन साष्टांगी ॥४०॥
शंकराचे दुर्लक्ष :
जवळी आलिया रावणासी । शंकर न पुसे तू का आलासी ।
आजि का झालासी उदासी । रावणासी पुसेना ॥४१॥
बाण आणि रावण । हेचि शिवाचें पढियंते पूर्ण ।
त्यांचे वचन अणुप्रमाण । शिव आपण नुल्लंघी ॥४२॥
त्याचि रावणासी आता । शिव न पुसे सर्वथा ।
परम चिंता लंकानाथा । यासी मी आता काय करू ॥४३॥
जया भक्तासी निष्काममावो । तया संमुख सदाशिवो ।
तोचि सकाम होता पहाहो । शिव स्वये पुसेना ॥४४॥
रावणे देखिली शिवाची कांता । जे का पार्वती जगन्माता ।
हे मी शिवासी मागेन आता । सकामता दुसरी ॥४५॥
शृंगीच्या झणत्कारात शिव तल्लीन :
रावण उभा दोन प्रहर । सदाशिव नव्हेचि सादर ।
कोठे गुंतला श्रीशंकर । पाहे अंतरी रावण ॥४६॥
शृंगीच्या झणत्कारीं । शिव गुंतला नादांतरी ।
ऐसे जाणोनि निर्धारी । रावण करी ते ऐका ॥४७॥
रावणाचे मस्तक समर्पण व गायन :
उतरोनियां निजमाथां । शिर लावोनियां युक्ता ।
रावणे केला वीणा हाता । होय वाजविता अति युक्ती ॥४८॥
रावणहस्ताचा पै स्वर । मधुर मंजुळ आणि अरूवार ।
तेणे सुखावला श्रीशंकर । गौरिहर तुष्टला ॥४९॥
त्यामुळे प्रसन्न होऊन शंकरांचे वरदान :
रावणासी माग म्हणता । मागतां नये मोडिला माथा ।
कृपा उपजली विश्वनाथा । वर देता स्वये झाला ॥५०॥
तुवा मोडोनियां निजशिर । मज सुखी केले अपार ।
तू होशील दशशिर । वीर शूर तिही लोकी ॥५१॥
रावणाला दहा शिरे, वीस भुजा व अमृतकुपीचा लाभ :
शिरा काढोनि हातींच्या सत्वर । तंतु लाविले साचार ।
एकएकाचें दहादहा कर । भुजाभार विंशति पै ॥५२॥
वर देता वृषभध्वज । रावणा दहा शिरे वीस भुजा ।
अमृतकुपी देवोनि ओजा । बळसमाजी आतुर्बळी ॥५३॥
शंकर रावणाचे इच्छित देण्यास तयार :
शिव म्हणे लंकानाथा । जे जे आवडे तुझे चित्ता ।
ते ते देईन मी आता । प्रसन्नता गर्जत ॥५४॥
सदाशिव स्वये भोळा । तो नेणे राक्षसाची कळा ।
दुष्ट बुद्धि त्याचे डोळा । मागती कळा ते ऐका ॥५५॥
पार्वती व आत्मलिंग रावण मागतो :
पार्वती लावण्याची राशी । ते मज द्यावी निजभोगासी ।
आत्मलिंग निजपूजेसीं । कैकसीसी ते द्यावे ॥५६॥
रावण मागणें ऐकता । गेली उदारवरउल्लासता ।
सुत मातेसी रति मागता । परम क्षोभता शिवासी ॥५७॥
शंकरांना आश्चर्य ! शब्द देऊन बसल्यामुळे दोनही वर देतात :
परम क्षोभ शिवाचे चित्ता । यासी वरदान न देता ।
असत्यता माझिया माथा । नेदी म्हणता म्हणवेना ॥५८॥
माता सुत जवळी उल्लासतां । सुते मातेसी रति मागतां ।
प्राणांत क्षोभे माता । शिवाचे चित्ता तैसे जाहालें ॥५९॥
गुरूपत्नी ते शिष्यमाता । तिचा अभिलाष करिता ।
आली रावणा गुरूतल्पगता । कैसेनी आता वांचेल ॥६०॥
पार्वती देता रावणाहातीं । हिचेनि तुम्हा सर्वशांती ।
न कळोनि ते वचनोक्ति । लंकापति उल्लासे ॥६१॥
आत्मलिंगासंबंधाने शंकरांचा इशारा :
शिव म्हणे रावणासी । आत्मलिंग देता तुजपासी ।
शुचित्व पाहिजे अहर्निंशीं । ठेविल्या भूमीसीं नये हाता ॥६२॥
आकर्षोनि चैतन्यज्योती । तेज मुसावोनि आत्मक्तीं ।
ते आत्मलिंग उमापतीं । नित्य पूजिती नेमेंसी ॥६३॥
ते लिंग देता रावणाहातीं । लिंग जाईल हातोहाती ।
तृतीयनेत्रीं क्षोभेल शक्ती । लावील ख्याति रावणा ॥६४॥
दोन्ही घेऊन रावण जातो :
रावणे घेवोनि पार्वती । आत्मलिंग घेवोनि हाती ।
उल्लासें सुचित्तवृत्ती । लंकेप्रती निघाला ॥६५॥
रावणासी देखता जाण । उमा जाली हीन दीन ।
चिंतातुर अति गहन । दीनवदन ते जाली ॥६६॥
उमा विष्णूचा धावा करतें :
शिवे दिधले रावणापासी । माझी सुटका होय कैसी ।
उमा चिंती श्रीविष्णूसी । पावें वेगेंसीं कृपाळुवा ॥६७॥
ग्रहें गिळितां गजेंद्रासी । त्या उद्धरिले अति वेगेंसीं ।
रावणग्रस्तां मज दीनासी । शीघ्र पावावें ॥६८॥
राम उच्चारिल्यासाठी । कुंटिणी वाहिली वैकुंठीं ।
तैसिया गा कृपादृष्टी । पावे जगजेठी कृपाळुवा ॥६९॥
महापातकांची राशी । नामे उद्धार अजामिळासी ।
मी तंव तुझी निजदासी । पावें वेगेंसी कृपाळुवा ॥७०॥
शिवासी छळितां भस्मासुरें । तुवा तारिले कृपाकरें ।
ऐकोनि उमेचि उत्तरें । हरि सत्वरें धांविन्नला ॥७१॥
शिवाची जे निजकांता । ते तंव माझी सखी माता ।
तिचा अभिलोष करिता । लंकानाथ, गांजीन ॥७२॥
पार्वतीची सुटका करण्यात गणेश व कुमार यांची सहायता :
पार्वती सोडवितां एकाएक । गणेशस्वामी कार्तिका अटक ।
शिववरदान होता लटिक । शिव सम्यक कोपेल ॥७३॥
रावणाच्या पाडोनि दांतां । निमेषे सोडवीन माता ।
शिववरदान मिथ्या होता । आमचे घात शिव करील ॥७४॥
विष्णूची न या दोघांची भेट :
सोडवावया पार्वतीसी । धांवण्या येता श्रीविष्णूसी ।
दोघे भेटले तयासी । वृत्तांत त्यांसी सांगोनि ॥७५॥
पूर्ण छळावया रावण । विष्णूनें मांडिलें विंदान ।
द्विजगौचें रक्षण । सांगे आपण गणेशा ॥७६॥
विष्णू धर्मऋषी, कुमार शिष्य व गणेश गोपाल होतात :
आपण जाला धर्मऋषी । शिष्य केले गुहकांसी ।
उल्लासे येता रावणापांसीं । सन्मुख त्यासी भेटला ॥७७॥
ऐसा उल्लास लंकापती । शिवे दिधली पार्वती ।
आत्मलिंग कृपामूर्ती । तेंही मजप्रती ओपिले ॥७८॥
शिष्य-रावण यांचा संवाद :
शिष्य रावणासी सांगती । आत्मलिंगसत्यप्राप्ती ।
परी हे नव्हे गा पार्वती । शिवे तुजप्रती ठकविले ॥७९॥
शिव देईल निजकांता । हे तंव न घडे गा सर्वथा ।
ठकिले ठकिले लंकानाथा । पाहे तू आता पार्वती ॥८०॥
उमेची विकृती व रावणाचा उद्वेग :
जंव पाहे न दशानन । तंव उमा न दिसे शोभायमान ।
निंद्द कुत्सित हीन दीन । देखे उद्विग्न मुख तिचे ॥८१॥
डोळे पिचके वाहे पाणी । वदनी माशांची गोंगाणी ।
श्लेष्मा बिडिबिडित घ्राणी । मुखी पोहाणी घाणत ॥८२॥
ती देखताचि वक्रा । रावणा आला अति ओकारा ।
विष्णु लाघवी खरा । दशशिरा छळियलें ॥८३॥
रावण म्हणे ऋषींप्रती । माझेनि भाग्ये भेटलेती ।
आता जावोनि शिवाप्रती । मुख्य पार्वती मागेन ॥८४॥
शिव राखोनि निजदशा । तुज दिधली अवदसा ।
त्रिसत्य सत्य मानी गा लंकेशा । भोळा महेश मानूं नको ॥८५॥
उमा लपवी उमापती । ते खूण सांगेन तुजप्रती ।
आसनाखालें लखलखिती । ते पार्वती तू मागे ॥८६॥
रावणाची शंकरांकडे धाव :
ऐकोनि रावण अति आवेशी । धांविन्नला शिवापासीं ।
विष्णू तेथे लघुलाघवेंसी । मंदोदरीसी निर्मिलें ॥८७॥
विष्णूने केलेली मंदोदरीची उत्पत्ती :
केशराची अति गोमटी । रमेनें दिधली उटी ।
उदरी आढलतां मळवटी । केली गोरटी मंदोदरी ॥८८॥
निर्मावया सुंदर पुतळी । कांही नातुडे हातातळी ।
उदरी गौर चंदनाची मळी । त्याची निर्मिली मंदोदरी ॥८९॥
श्रीविष्णूचे उदरोदरीं । सुंगंधचंदनकरी ।
विष्णुमध्यांगीं जन्मली नारी । मंदोदरी त्या हेतू ॥९०॥
माज समावे मुष्टिमाझारीं । यालागी म्हणती मंदोदरी ।
विषयतृष्णा नाही उदरी । मंदोदरी तेणे नांवे ॥९१॥
जे जन्मली विष्णूचे करी । संकल्प विकल्प नाही उदरी ।
यालागी म्हणती मंदोदरी । शोभा सुंदरी शोभत ॥९२॥
विष्णू ती पुतळी शिवाच्या आसनाखाली घालतात :
नयन वदन श्रवण घ्राण । रूपरेखा ठाण माण ।
गुणगांभीर्य वदनभान । श्रीसमान करी विष्णु ॥९३॥
विष्णु लाघवी तत्काळी । ऐसी निर्मोनी पुतळी ।
घातली शिवासनाचे तळी । तेजे वेल्हाळीं शोभत ॥९४॥
रावणाचा क्रोध व अधिक्षेप व शिवाची प्रतिक्रिया :
रावण म्हणे शिवाप्रती । तुवा लपवोनि पार्वती ।
ते अवदासा दिधली माजे हाती । धन्य अवदसेची प्राप्ती ॥९५॥
शिव विचारी निजचित्तीं । येणे अभिलाषिली पार्वती ।
ते अवदसेची प्राप्ती । छळिला निश्चिती जगदंबा ॥९६॥
तीस विष्णु जाहला साह्य । तेणे रावणा आला अपाय ।
तेथे न चलती उपाय । यासी म्या काय करावे ॥९७॥
रावण पाठींचा माझा गण । उमाभिलाषी पूर्ण ।
गुरूतल्पगदोष दारूण । अचुक मरण या आले ॥९८॥
जेचि उमा तेचि सीता । जिचेनि अभिलाषे तत्वता ।
मरण आले लंकानाथा । पेटला घाता श्रीविष्णु ॥९९॥
रावण पेटला अति आवेशा । म्हातारपणी लोभ कैसां ।
तुज वाढला गा महेशा । मज अवदसा दिधली ॥१००॥
तथास्तु म्हणानि सदाशिवु । बहु अवदसा भोगील जीवु ।
रावण विषयांध बहु । त्यावरी गर्व वरदानाचा ॥१०१॥
रावण म्हणे शिवाजवळी । उमा लपविली आसनातळी ।
मज दिसताहे सोज्ज्वळी । किती चंद्रमौळी चाळविसी ॥१०२॥
आसनी देखोनि सुंदर कांता । अति विस्मयो लंकानाथा ।
उमा सांडोनि जगन्माता । दिधली लंकानाथा मंदोदरी ॥१०३॥
रावण बोलिला कोपेंकरी । म्हातारपणी स्त्रीलोभ भारीं ।
माझी प्रिया जगदात्मा तारी । अभिलाषें उरी उरो नेदी ॥१०४॥
असो याउपरी लंकापती । रावणे सांडोनि पार्वती ।
मंदोदरी अति प्रीती । घेवोनि चित्ती निघाला ॥१०५॥
रावणाचे प्रयाण व मार्गात लघवीची बाधा :
स्कंधीं घेवोनि मंदोदरी । आत्मलिंग घेवोनि करी ।
रावण निघतां झडकरीं । नानापरी छळी विष्णु ॥१०६॥
रावण पावून हरिखा । अनुलक्षोनियां लंका ।
जाता लागली लघुशंका । पाऊल देखा नुल्लंघवे ॥१०७॥
लिंग देंऊ कोणाचे हाती । कैसेनि करू शंकानिवृत्ती ।
रावण थोर पडला गुंतीं । पुढती गति खुंटली ॥१०८॥
अभिलाषितां शिवाची नारीं । रावण अशुचि चराचरी ।
मृत्तिकाजळें शौच करी । शुचित्व तरी उमजेना ॥१०९॥
मृत्तिकाजळें शुद्ध करिती गुद । तैसे ह्रदय ना करिती शुद्ध ।
शौचाचार तो अबद्ध । कर्ममंद कर्मठ ॥११०॥
गणेशाला लिंग स्वीकारण्याची विनंती, त्याच्या अटी व संमती :
लिंग द्दावे कोणापासी । रावण पाहे चौपासी ।
तंव देखिले गणेशासी । द्विजगोंसी संरक्षी ॥१११॥
दर्भ पवित्र यज्ञोपवीत । टिळे द्वादश नामांकित ।
गणेशा देखे लंकानाथ । लिंग द्दावया प्रार्थित ॥११२॥
जंव मी करी शंकानिवृत्ती । तंववरी लिंग धरावे हाती ।
गणेश म्हणे गाई जाती । वासरें पिती धेनूंसी ॥११३॥
गाई पाजलियावरी । द्विज कोपतील भारी ।
तुझे लिंग मी नांगीकारीं । पाय धरी रावण ॥११४॥
गणेश त्यासी नेम करी । तुज न येता झडकरी ।
लिंग ठेवीन भूमीवरी । निजनिर्धारी नेम माझा ॥११५॥
त्रिवार गर्जनेंसी । प्रतिज्ञा नेमू जाण ऐसी ।
तुज न येता त्वरेसीं । लिंग भूमीसी ठेवीन ॥११६॥
ऐसी निगुती करोनि देखा । करू गेला लघुशंका ।
मुतीं गुंतविले दशमुखा । काही आवाकां चालेना ॥११७॥
रावणाचा मुत्रातिरेक, गणेशाची हाक व लिंग भूमीवर ठेवले :
कष्टी मूत मोकळे होत । तंव ते झाले अत्यद्भुत ।
धारावर्तीं प्रवाहत । मूतीं लंकानाथ गुंतला ॥११८॥
गणेश करी गर्जनेसी । रावण गुंतला मुतापासी ।
लिंग ठेवोनि भूमीसीं । घेवोनि गाईंसी तो गेला ॥११९॥
रावणाचा उद्वेग व भूमीवरील शिवलिंग उचलण्याची असमर्थता :
रावण करूनि शौचचारी । वेगे येता झडकरी ।
लिंग देखोनि भूमीवरी । श्रद्धेकरां घेऊ गेला ॥१२०॥
एक हातें दोही हातें । उचलितां रावण कुंथे ।
नुचलेचि विंशति हाते । म्हणे लिंगातें महाबळ ॥१२१॥
अहाच दिसे भूमीवरी । परी ते सबळ आहे भारी ।
उचलिता विशंति करी । तिळभरी उचलेना ॥१२२॥
सर्व शक्ति अति प्रबळ । रावणे वेंचता सर्व बळ ।
लिंग उचलेना अळुमाळ । महाबळ ते लिंग ॥१२३॥
रावणे आपुल्या निजकरीं । आंदोळिला कैलासगिरी ।
महाबळ लिंग हे भारी । तिळभरी नुचलेचि ॥१२४॥
लिंग भूमीवरी ठेवोनि गेला । रावणे गणेशा दिधला टोला ।
अद्दापि असे उभा केला । रावण क्षोभला निभ्रंशें ॥१२५॥
रावणाचा शोक :
आत्मलिंग नये हातासी । उपाय न चले कांही त्यासी ।
रावण स्फुंदे उकसा बुकसी । कैकसीसी काय सांगू ॥१२६॥
लिंग गेले अति मुततां । काही न केलिया नये हाता ।
नगरां जाता क्षोभेल माता । भयें उभयतां अपावो ॥१२७॥
नाही देव ना पितर । उभयता अपवित्र ।
विष्णूने छळिले अपार । दशकंधर तळमळी ॥१२८॥
लिंगबंधनी उभय मुद्रा । शिवे लावि शिवदोरा ।
रावणे सांडितां अर्हापर्हा । पंच मुद्रा पंचलिंग ॥१२९॥
मुरडोनिया सारितां वस्त्र । तेथे जाला मुरडेश्वर ।
मुद्रिका टाकितां पवित्र । गुप्तेश्वर तेथे जाला ॥१३०॥
रागे टाकितां शिवदोर । तेथे जाला गणकेश्वर ।
कानडे म्हणती धनेश्वर । लोकव्यवहार पै ऐसा ॥१३१॥
शिवसेज टाकिता साचार । तेथे जाला शेजेश्वर
ऐशियावरी पंचवक्त्र । श्रीशंकर नांदत ॥१३२॥
गोकर्ण हे तंव अनादि क्षेत्र । तेथे महाबळेश्वर ।
यालागी गोकर्णमहाबळेश्वर । लोकव्यवहार प्रसिद्ध ॥१३३॥
गोकर्णमहाबळेश्वर व ब्रह्मा निर्मित महाबळेश्वर भिन्न :
गौतमपर्वत समुद्रतीर । तेथे गोकर्णमहाबळेश्वर ।
वाईचा महाबळविचार । भिन्न परिचार ब्रह्मयागी ॥१३४॥
ब्रह्मयाने याग करिता प्रबळ । प्रगटला ते ठायी महाबळ ।
दोहीचें भिन्न भिन्न स्थळ । लोक सकळ जाणती ॥१३५॥
असो तीर्थींची हे वार्ता । संख्या करिता असंख्याता ।
कैसेनि हे कथा । मूळसंमता अवधारा ॥१३६॥
या कथेचा आधार ब्रह्मोत्तर खंड आहे :
मंदोदरीसमान हे सीता । केंवी मानली हनुमंता ।
ब्रह्मोत्तरखंडींची हे कथा । विष्णुसंभूता मंदोदरी ॥१३७॥
मारूतीला वाटलेले सीता मंदोदरीतील साम्य :
मंदोदरी सुंदर कांता । स्वये विष्णु तिसी निर्मिता ।
तिसी सीतेसी साम्यता । स्वभवता पै आली ॥१३८॥
विष्णु करी अवलोकन । ते तंव होय श्रीसमान ।
मंदोदरी विष्णुनिर्माण । सीतेसमान मानी कपि ॥१३९॥
दोघी अयोनिजा तत्वता । दोघी जणी पतिव्रता ।
मंदोदरीसमान सीता । हनुमंता मानली ॥१४०॥
रावणाचे अति एकांता । मंदोदरीची ऐकोनि कथा ।
अशोकवनी हनुमंता । भेटेल सीता ते ऐका ॥१४१॥
अशोकवनामाजी मारूती । नमस्कारोनि सीतासती ।
श्रीरामाच्या कथानुवर्तीं । सुखानुभूति दोहींसी ॥१४२॥
एकाजनार्दना शरण । हनुमान लाघवी आपण ।
करील वनविदारण । राक्षसकंदन ते ऐका ॥१४३॥
॥ इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
मंदोदरीजन्मकथनं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
॥ ओव्या १४३ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १४३ ॥
