वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ४२. सुंदरकांड समाप्त

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088257 · अभंग क्र. ४२

42.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय बेचाळिसावा ॥
अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।
प्रधान सेना अति उव्दिग्न । लंकाजन सकंपित ॥१॥
चाकाटला रावण । तंव भेरी लावोनि निशाण ।
स्वये आला रघुनंदन । वानरसैन्यसंभारी ॥२॥

लंकेत सर्वत्र हाहाकार व रावणावर दोषारोप :

शंख भेरी टाळ घोळ । काहळा वाजती चिनकाहळ ।
ढोळ पटह मांदळ । ध्वनि आगला बुरूंगें ॥३॥
धडैधडै विख्यात वाही । निशाणां लागली एक घाई ।
विराणीं वाजती दोही बाही । गिडबिड ठायी गर्जती ॥४॥
ऐसा वाजंत्रांचा गजर । घेवोनि कपिकुळसंभार ।
लंके आला श्रीरघुवीर । केला भुभुःकार वानरी ॥५॥
देखोनि श्रीरामाचा यावा । कल्पांत रावणाच्या जीवा ।
कायसा प्रधानाचा केवा । दुःखकालोवा राक्षसा ॥६॥
श्रीराम आला वानरभारी । अति आकांत लंकापुरीं ।
शंख करिती घरोघरी । नर नारी कळकळिती ॥७॥
वानरदळ देखोनि गाढे । एक चाले एकापुढें ।
एक एकामागे दडे । कोणीकडे दडावें ॥८॥
पळावया वाट नाही पुढे । वानरी बळकाविलें हुडे ।
रावणाचे कर्म कुडे । मरण रोकडे सर्वांसीं ॥९॥
रावणअपराधासाठीं । मरती राक्षसांच्या कोटी ।
घरोघरी बोंब उठी । वानर दृष्टी देखोनी ॥१०॥

रावणाने प्रधानांचा केलेला धिक्कार व उपहास :

पापबुद्धि लंकानाथा । चोरोनि श्रीरामाची कांता ।
करविलें लंकेच्या घाता । उपाव आता चालेना ॥११॥
पूर्वी सूचवी बिभीषण । सीता देवोनि रिघावे शरण ।
पापी नायके आपण । आले मरण राक्षसा ॥१२॥
आला देखोनि रघुनंदन । अति क्षोभला दशानन ।
पाचारोनिया प्रधान । बोले आपण तयांसी ॥१३॥
घेवोनिया वानरसैन्य । लंके आला रघुनंदन ।
तरी तुम्हांसी नाही ज्ञान । मदें मैथुनविषयांध ॥१४॥
समुद्री तारोनि पाषाण । सेतु बांधिला संपूर्ण ।
तरी तुम्हांस नाही ज्ञान । मदे मैथुनें विषयांध ॥१५॥
श्रीराम येवोनि सहपरिवारी । वानर ठाकिले उरावरी ।
तुम्ही सुषुप्तींत स्त्रियाजानूंवरीं । विषयसंचारीं विषयांध ॥१६॥
सहलक्ष्मण वानरभारी । श्रीराम आला लंकेवरी ।
तुम्ही विषयांध निदसुरी । आदळे वैरी तुम्ही नेणां ॥१७॥
मद्द्यमैथुनीं तत्पर । नाही जवळी हेर चार ।
वैरिये घेतलें घर । तुम्ही पामर ते नेणां ॥१८॥
पंचविषय पंचभूत । तुम्हांस लागले निश्चित ।
लंके आला श्रीरघुनाथ । तुम्ही सभ्रांत नेणांची ॥१९॥
पूर्वल तुमचा बडिवार । म्हणा बापुडे ते वानर ।
वनचर पालेखाइर । आम्हांसमोर केंवी येती ॥२०॥
तेचि वानर महावीर । सेतु बांधोनि समग्र ।
लंके आले अति दुर्धर । देती भुभुःकार श्रीरामनामें ॥२१॥
काळकृतांत दशानन । त्यांते करोनि तृणासमान ।
सेतु बांधोनि वानरगण । युद्ध दारूण करू आले ॥२२॥
उपेक्षोनि वीर समस्त । मजचि लक्षोनि निश्चित ।
वानर युद्धासी उद्द्यत । अति समर्थ रणयोद्धें ॥२३॥
रोकडें मांडलें असे रण । तुम्ही करिता कपिहेळण ।
अवश्य तुमचा घेतील प्राण । कपि विचक्षण रणयोद्धें ॥२४॥
तुमचिया असावधानता । लंके येणे श्रीरघुनाथा ।
वानरी सेतुबंधनता । नेणो सर्वथा अति गर्वें ॥२५॥

बिभीषणाच्या सूचनेची आठवण :

वानरवीर स्वये समस्त । कडकडाटे सेतु बांधित ।
ते तुम्ही नेणा गर्वोन्मत्त । मद्द्याभिभूत स्त्रीकामी ॥२६॥
धनोन्मत्त मदोन्मत्त । स्त्रीकामें कामोन्मत्त ।
गर्वोन्मत्त बळोन्मत्त । पंचोन्मत्त तुम्ही सर्व ॥२७॥
पंचोन्मत्त उन्मत्त पूर्ण । चोर हेर पाठविले कोण ।
माझ्या कार्याची आठवण । तुम्हांसी विस्मरण उन्मादें ॥२८॥
सर्वदा रायाचे हित विचारी । यालागी त्यासी म्हणिजे मंत्री ।
ते कार्य नाही तुम्हांमाझारी । विषयसंचारी विषयाचे ॥२९॥
सकळ कार्य प्रधानाहातीं । ऐसी अनादि राजनीती ।
तुम्ही माझे विश्वासघाती । ठकिले निश्चिती निजस्वार्था ॥३०॥
तुम्हांस मज विश्वासता । तुम्ही पेटलेति माझ्या घाता ।
लंके आणिले श्रीरघुनाथा । कुळक्षयार्था समूळी ॥३१॥
बिभीषण माझा धर्ममूर्तीं । तो बोलिला सत्य युक्ती ।
प्रधान तुझे विश्वासघाती । हेही प्रतीति मज आली ॥३२॥

इंद्रजिताचे आश्वासन :

उन्मादें मदोन्मत्त प्रधान । अविश्वासीं यांचें वदन ।
ऐसे बोलिला बिभीषण । प्रत्यक्ष प्रमाण मज आले ॥३३॥
माझा बिभीषण येथे असता । तो सेतुचि बांधों न देता ।
येवो न देता रघुनाथा । माझ्या निजहिता कृतोपकारी ॥३४॥
तुमच्या वचना विश्वासोन । सखा दवडिला बिभीषण ।
आंगी आदळला रघुनंदन । कपटी प्रधान मज माझे ॥३५॥
लंके आला रघुनंदन । सकोप रावणाचे वदन ।
ऐकोनि सेना प्रधान । लज्जायमान जाहले ॥३६॥
गजरें आला रघुनंदन । आंगी आदळले विघ्न ।
लज्जायुक्त प्रधान । कंपायमान भयभीत ॥३७॥
आला देखोनि रघुनाथ । रावण कोपे जाला कृतांत ।
प्रधानराक्षसेंसीं आकांत । प्राणावर्त सर्वांसी ॥३८॥
अधोवदनें अवघे स्तब्ध । कांही न बोलती शब्द ।
तया काळी मेघनाद । करी अनुवाद जनकासी ॥३९॥
आला देखोनि श्रीरघुनाथा । तू का व्यर्थ भीसी ताता ।
कायसी रामलक्ष्मणांची कथा । कपि समस्त कोण गणी ॥४०॥
इंद्र आणिला बांधोन । बंदीं घातले सुरगण ।
रामलक्ष्मण ते कोण । वानरगण कोण गणी ॥४१॥
वानर स्वये पालेखाइर । रामलक्ष्मण मनुष्यमात्र ।
ते तंव आमचा नित्य आहार । भय दुर्धर तुज कैंचें ॥४२॥
स्वामीनें राहावे सुखें स्वस्थ । तूंही जाणसी माझा पुरूषार्थ ।
जे जे आले आहेत येथ । ते मी समस्त मारीन ॥४३॥
विकट बाण वीर श्रेणी । रामलक्ष्मण पाहीन रणी ।
अंगद सुग्रीव राजे दोनी । रणी शोधोनी मारीन ॥४४॥
ज्याचे पवाडे अद्‍भुत । कंदन केले लंकेआंत ।
तो मी मारीन हनुमंत । जांबवंत दूसरा ॥४५॥
नळ नीळ गंधमादन । तरस तरळ पनस सुषेण ।
एकैक वानर ससैन्य । निर्दळीन बाणाग्रें ॥४६॥
माझ्या बाणांची झडाडी । रामलक्ष्मणां प्रेतपरवडी ।
मारीन वानरांच्या कोडी । ती बापुडीं मर्कटें ॥४७॥

प्रहस्ताचे भाषण :

ऐकोनि इंद्रजिताचे वचन । प्रहस्त बोले अति गर्जोन ।
राया तुझे शत्रुदमन । मी करीन एकला ॥४८॥
माझ्या मुसळघायापुढें । रामलक्ष्मण बापुडे ।
कायसे वानर बळियाडे । रणी रोकडें मारीन ॥४९॥
मुसळ साधन चक्राकार । अष्टांगी विषम मार ।
प्रहस्त दावी महावीर । दशशिर अनुलक्षी ॥५०॥
राया तुझा शत्रुसंभार । म्या मारिला मानी साचार ।
सेवोनि पद्मिनीकामसेजार । भोगी विचित्र स्वये भोग ॥५१॥

तसेच धूम्राक्षाची दर्पोक्ती :

ऐकोनि प्रहस्तनव्हाळी । धूम्राक्ष गर्जोनि वचन बोली ।
वानरसेना लंकामूळीं । आतुर्बळीं आदळली ॥५२॥
सन्नद्ध आम्ही अवघे जण । रात्रीं जावोनि आपण ।
निजले असतांचि जाण । वानरगण निर्दळूं ॥५३॥
सौमित्र आणि रघुपती । सुग्रीव अंगदादि जुत्पती ।
जावोनि मारू रातोराती । रणसमाप्तीं शत्रूसी ॥५४॥
ऐसी करोनिया ख्याती । यश देऊं लंकापती ।
हेंचि आवडे माझे चित्ती । वीरांप्रती सांगत ॥५५॥
ऐसी धूम्राक्षाचीं उत्तरें । निर्भत्सिलीं महोदरें ।
श्रीरामे नित्य रक्षिली वानरे । सहपरिवारें सुग्रीवे ॥५६॥

महोदर धूम्राक्षाचा धिक्कार करितो :

निजल्या वानरा करावा घात । हा कोण तुझा पुरूषार्थ ।
धूम्राक्षाची सभेआंत । निर्भर्त्सित महोदर ॥५७॥
श्रीराम नित्य सावधान । स्वये रणी वानरगण ।
सुग्रीव राजा आपण । करी रक्षण अहोरात्र ॥५८॥
श्रीराम नित्य सावधान । छळितां मारीच पावला मरण ।
शूर्पणखा आपण । करिता छळण विटंबिली ॥५९॥
तेथे वानरांच्या निजघातीं । तुम्हांसीं जाता रातोराती ।
श्रीरामबाणाच्या संपातीं । मराल निश्चिती एकैक ॥६०॥
श्रीराम नित्य देखणा जाण । परी त्याचिया भात्याचे बाण ।
आंधारी देखणे पूर्ण । घेती प्राण गिवसगिवसूं ॥६१॥
देखोनि श्रीरामदर्भशिखा । पाठी लागोन काका ।
हिंडवोनि तिही लोका । शेखी वामनेत्र देखा घेतला ॥६२॥
ऐसिया श्रीरामापुढें । घाला घालणें केंवी घडे ।
तुम्ही राक्षस उन्मत्त वेडे । मराल रोकडे श्रीरामबाणीं ॥६३॥
तुम्ही ऐका अवघे सावध । वानर आले अति उन्नद्ध ।
दुर्ग कर सन्नद्धबद्ध । दुर्गबळें युद्ध करू त्यांसी ॥६४॥
हुडे अटाळें पौळी पागरें । ठायी ठायी जडा यंत्रें ।
सन्नद्धबद्ध वीरानुवीरें । दुर्गव्दारें रक्षावीं ॥६५॥
दुर्धर या वानरांचे बळा । कपाटी घाला रे अर्गळा ।
दृढ देखोनिया सांखळा । दळ समेळ संरक्षा ॥६६॥

अतिकायाची स्पष्टोक्ती :

ऐकोनि महोदराची मात । अतिकाय गदगदा हांसत ।
जो जो बोलिला पुरूषार्थ । तो तो व्यर्थ दिसताहे ॥६७॥
वानरांच्या उड्डाणापुढें । लंकादुर्ग ते बापुडे ।
अर्गळा सांखळा कवाडे । कोणीकडे आंवरती ॥६८॥
त्रिकूटाच्या शिखरांवरी । उडों शकिजेल वानरी ।
तेथे तुमच्या दुर्गांची थोरी । तृणावारी गणीना ॥६९॥
स्वहित सांगता बिभीषण । त्यासी केले नगरनिर्यापण ।
मजही बोलता स्वधर्म पूर्ण । अवघे जण क्षोभाल ॥७०॥
क्षमा कराल अवघे जण । तरी मी यथार्थ सांगेन ।
सत्यसंकल्प रघुनंदन । वृथा वल्गन प्रधानां ॥७१॥
इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू । पुरूषार्थ बोलतो असंबद्धू ।
करिता कपीसी युद्धसंबंद्धू । तेणे सुबद्धू गांजिला ॥७२॥
तोचि इंद्रजित आता । लाजेना वाटव बोलता ।
मिथ्या बोले रायादेखतां । अतिपुरूषार्था वल्गोनी ॥७३॥
मारीन लक्ष्मण रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।
मारीन म्हणता हनुमंत । सभेआंत लाजेना ॥७४॥
तैसाचि प्रहस्त प्रधान । जंबुमाळीं मारिल्या जाण ।
पुत्रशोकें करी शंखस्फुरण । हनुमंती रण न करीचि ॥७५॥
हनुमंतेंसी रण न करवे । तो प्रहस्त मुसळेंसीं धांवे ।
सुग्रीवादि कपि आघवे । मारीन लाघवें हे मृषा जल्प ॥७६॥
धूम्राक्ष महाबळवंत । निजल्या वानर समस्त ।
यांचा म्हणे मी करीन घात । थोर पुरूषार्थ हा त्याचा ॥७७॥
ऐसे मिथ्यावादी प्रधान । वृथा मिरविती आंगवण ।
त्यांसी विश्वासतां रावण । दुःख दारूण पावेल ॥७८॥

त्याची रावणाला विनंती :

तेचि समयी वीराधि राजे । उभवोनियां दक्षिण भु्जे ।
अतिकाय स्वधर्म गर्जे । अवधारिजे राजेंद्रा ॥७९॥
राये रक्षावे गोब्राह्मण । निर्भय प्रजांसी संरक्षण ।
करावे दुष्टांचें निर्दळण । परिपाळण साधूंचें ॥८०॥
ऐशिया स्वधर्मनीती । ज्या रायांच्या वर्तती स्थिती ।
ते राजे सदा सुखी असती । धरा भोगिती निर्भये ॥८१॥
हित सांगता बिभीषण । लत्ताघातें नगरनिर्यापण ।
मजही बोलता स्वधर्म पूर्ण । दुष्ट दुर्जन न म्हणावें ॥८२॥
सुबुद्धि बिभीषण पवित्रु । दवडिला तुम्ही करोनि शत्रु ।
तू पिता मी निजपुत्रु । धर्मविचारू अवधारी ॥८३॥
जिकडे नित्य पापाचें आचरण । अकीर्ति अपेश अकल्याण ।
अति निंद्द्यत्वे पावे मरण । सत्य जाण लंकेशा ॥८४॥
जेथे नित्य धर्माचरण । यश कीर्ति कृतकल्याण ।
त्रैलोक्यी विजयी होय आपण । सत्य जाण लंकेशा ॥८५॥
श्रीराम धर्मात्मा अति शुद्धू । तुझा न करिता अपराधु ।
तुवा का चोरिली त्याची वधू । पापी सुबुद्धू जालासी ॥८६॥
सीता पतिव्रता संपूर्ण । करिता परदारहरण ।
खतेला पापी तू पूर्ण । कुळनिर्दळण अति पापें ॥८७॥
सीता आनिता लंकेआंत । तैंहूनि उठिले अति उत्पात ।
अखयादि वीर समस्त । केला अति घात हनुमंते ॥८८॥
परदारपापसंकटीं । वानरांसी देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठी । सैन्यकोटी मारवूनी ॥८९॥
परदारादिहरण । ते पाप अति दारूण ।
वानरे गांजिला रावण । लंकाभुवन जाळोनी ॥९०॥
ऐसी देखता प्रतीती । वृथा माना बलोन्मत्ती ।
गर्वे निमसील लंकापती । सैन्यसंपत्ती समूळ ॥९१॥
साष्टांग नमन रावणासी । दुसरे नमन इंद्रजितासी ।
तिसरे नमन प्रधानांसी । निजहितासी अवधारा ॥९२॥
माझे आवडीची कथा । श्रीरामासी अर्पोनि सीता ।
वांचवावे लंकानाथा । आणि समस्ता राक्षसा ॥९३॥
श्रीरामासी रिघोनि शरण । सीता अर्पिता आपण ।
अक्षय कुमर आणि रावण । सत्य वचन हे माझे ॥९४॥
सैन्य सेना आणि प्रधान । अक्षय राक्षसलंकाभुवन ।
भुक्तिमुक्ति अक्षय पूर्ण । त्रिसत्य वचन हे माझे ॥९५॥
सीता अर्पोनि आपण । श्रीराम रिघतां शरण ।
स्वप्नीं नाही जन्ममरण । परम कल्याण अति कीर्ति ॥९६॥
ऐसे स्वहिताचे उत्तर । स्वये न मानी दशशिर ।
प्रधान न मानिती कुमर । मरणातुर उन्मादें ॥९७॥
मद्द्योन्मत्त धनोन्मत्त । बळोन्मत्त राज्योन्मत्त ।
अति गर्वे गर्वोन्मत्त । पंचोन्मत्त मरणार्थी ॥९८॥
पतंग दीपाते झडपिती । जळोनि स्नेही बुडती ।
तरी मागील झडप देती । मरणोन्मत्तीं उन्मत्त ॥९९॥
अभिलाषिता सीता सती । विरोधितां श्रीरघुपती ।
रावणा मरसी गर्वोन्मत्तीं । सैन्यसंपत्तीसमवेत ॥१००॥
रावणा देखता लंकेआंत । कपीनें केला अति आकांत ।
तेंही न माना तुम्ही समस्त । गर्वोन्मत्त मरणार्थीं ॥१०१॥
भीड सांडोनि बोलिलो कठिण । यालागी माझे लोटांगण ।
क्षमा करावे संपूर्ण । बाळभाषण हे माझे ॥१०२॥
स्वहित नायके दशानन । अतिकायासी आले रूदन ।
अश्रुपूर्ण जाले नयन । धरोनि मौन राहिला ॥१०३॥
दुःख पावेल निजमाता । ऐशिया बोलाची कथा ।
येवो नेदीच वाक्पथा । अतिमौनता राहिला ॥१०४॥

त्याचा रावणादिकांवर झालेला परिणाम :

ऐकोनि अतिकायाचें वचन । जीवी खोंचला दशानन ।
इंद्रजित आणि खोंचले प्रधान । प्रतिवचन न देती ॥१०५॥

सुंदरकांड संपूर्ण झाले :

एकाजनार्दना शरण । श्रोत्या वक्त्या पडले मौन ।
सुंदरकांड जाले संपूर्ण । श्रीजनार्दननिजकृपा ॥१०६॥
घेवोनि वाळिचें बळबंड । सुग्रीवा राज्य दिधले प्रचंड ।
कपिसैन्य आणोनि उदंडा । सुंदरकांड संपविले ॥१०७॥
सीताशुद्धीचियें चाडा । वानरे वनी देवोनि झगडा ।
हेमविवरी घेवोनि झाडा । सुंदरकांडा संपविले ॥१०८॥
देवोनि समुद्री गडाडा । वानरी प्राण देता पुढा ।
संपाती भेटोनि रोकडा । सुंदरकांडा संपविले ॥१०९॥
सीता शोधोनि धडफुडां । समुद्र उल्लंघोनि हनुमान गाढा ।
करोनि अशोकवना उपाडा । सुंदरकांडा संपविले ॥११०॥
मिष करोनि वनउपाडा । वनी राक्षस करोनि रगडा ।
इंद्रजित गांजोनि गाढा । सुंदरकांड संपविले ॥१११॥
किंकरवनकरांचा तोडा । अखया उपटोनियां दुर्गापुढां ।
लंका जाळोनि भडभडा । सुंदरकांडा संपविले ॥११२॥
शुद्धि सांगोनि रामापुढा । गेला सिंधूसीं स्वये रोकडा ।
झाडोनि समुद्राचा पादाडा । सुंदरकांडा संपविले ॥११३॥
दशयोजनें रूंद येवढा । दशयोजनें सेतु गाढा ।
राम आणोनिया लंकापुढां । सुंदरकांडा संपविले ॥११४॥
संपवोनि सुंदरकांडा । पुढे युद्धकांडाचा झगडा ।
श्रीराम करील राक्षसरगडा । प्रतापवाडा अवधारा ॥११५॥
एकाजनार्दना शरण । सुंदरकांड संपवून ।
पुढे युद्धकांड निरूपण । गोड रामायण अवधारा ॥११६॥

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
रावणसेनासंवादे अतीकायरावणप्रबोधः श्रीरामलंकागमनं च नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४२॥
॥ ओव्या ११६ ॥ श्लोक २२ ॥ एवं संख्या १३८ ॥

*** सुंदरकांड समाप्तम् ***

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग