वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ५६. ययातीची कथा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088327 · अभंग क्र. ५६

56.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय छपन्नावा ॥
ययातीची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वसिष्ठनिमिचें कथन । ऐकोनिया लक्ष्मण ।
पुढे कैसे शापमोचन । झाले जी रघुनंदना ॥१॥
श्रीराम म्हणे गा सौमित्रा । पुढील अपूर्व रसाळ कथा ।
ते सांगेन सावधान श्रोता । दृढ चित्ता देइजे ॥२॥
वसिष्ठनिमींचें आख्यान । अतिहास पुरातन ।
वरुणवीर्य अति दारुण । घटामाजी निक्षेपिले ॥३॥
दिवसेंदिवस वाढोन । तयाचा झाला मैत्रावरुण ।
तयासि अगस्ति ऐसे अभिधान । कुंभोद्भव म्हणती पंडित ॥४॥
आता निमिरायाची स्थिती । सावधान ऐके उर्मिलापती ।
शाप झाला कैसा मागुती । उःशापातें पावला ॥५॥
वसिष्ठाचे शापेंकरुन । निमीनें देह न सांडितां जाण ।
आणिक देही प्रवेशोन । नयनी प्राण ठेविले ॥६॥
वंशाचें करावया हित । काय करी प्रतापवंत ।
यज्ञ करोनि समस्त । सकळ देवा पूजिलें ॥७॥
षोडशोपचारी पूजा । वस्त्रे नानापरींचीं देवोनि वोजा ।
ब्राह्मण तोषले महाराजा । आशीर्वाद देते झाले ॥८॥
समस्त ब्राह्मण मिळोन । रायासि झाले सुप्रसन्न ।
म्हणती मागसी ते देऊं दान । सत्य जाण राजेंद्रा ॥९॥

देवांचे डोळ्यांचे पाते न हालण्याचे कारण :

ऐसे देवद्विजांचे वचन । ऐकोनि संतोषला राजा जाण ।
म्हणे प्रसन्न झालेति मी नेत्री राहीन । तुम्हा समस्ता जनाचें ॥१०॥
देव म्हणती महा बरवे । तुवा नेत्री असावे ।
वायुरुप हेवोनि विचरावें । दोही डोळ्यांभीतरी ॥११॥
समस्त देवांचे नेत्रांअंतीं । राहिला तो निमिभूपती ।
तेणे पातिया पातीं न हालती । हेचि खूण तयांची ॥१२॥
यज्ञींचे देव स्वर्गाप्रती । सुखस्वानंदे वर देवोनि जाती ।
मागे ऋषीश्वर काय स्थिती । करिते झाले राजदेहातें ॥१३॥
निमिरायाचे देहमथन । करिते झाले ऋषिब्राह्मण ।
यज्ञींच्या अरणी आणोन । आयास थोर मांडिला ॥१४॥
मथिता रायाचे शरीर । झाले मिथिलानामें नगर ।
तदंशे जन्मला जो नृपवर । तयासि जनक बोलिजे ॥१५॥
पूर्वी देही नव्हता । म्हणोनि विदेही तत्वता ।
ऐसी लक्ष्मणा झाली कथा । मिथिलेशा जनकाची ॥१६॥
ऐसे रघुनाथाचें शब्दरत्न । ऐकोनि सुमित्रानंदन ।
थोर विस्मय पावोन । सुखसंपन्न पै झाला ॥१७॥
लक्ष्मण म्हणे श्रीरामासी । भार्गवजेत्या कथा सुरासी ।
ऐकोनि आश्चर्य वाटे मानसी । पुनरपि तयांचें जन्म अद्भुत ॥१८॥
राजा ऋषि दोघे अशांत । परस्परें शापून पावले अंत ।
पुनरपि श्रवण करावे । अति विपरीत पै झाले ॥१९॥
पुढील कथेचे अनुसंधान । ते मज सांगावे कृपा करुन ।
लक्ष्मणाचे आर्त देखोन । रघुनंदन बोलता झाला ॥२०॥

ययातीची कथा :

पूर्वी नहुषराजा सूर्यवंशी । तयाचा पुत्र ययाति नामेंसीं ।
प्रजापाळणीं संतोष ज्यासी । गोब्राह्मणांसी कृपा करित ॥२१॥
दोघी स्त्रिया त्यालागून । अति प्रसिद्धा रुपे गुणेंकरुन ।
तयांचीं नामे सौमित्रा जाण । सावकाशीं अवधारी ॥२२॥
शर्मिष्ठा नामे ज्येष्ठ पत्नी । वृषपर्व्याची नंदिनी ।
कनिष्ठ जे देवयानी । दैत्यगुरुची कन्या होय ॥२३॥
ज्येष्ठ शर्मिष्ठेसि झाला पुत्र । पूरु नामे सुंदर गुणवंत ।
देवयानीस एक सुत । यदुनामें पै झाला ॥२४॥
दोघी असती समत्सर । ययातीस शर्मिष्ठा प्रियकर ।
तिचे दोघे आवडती कुमर । देवयानी नावडे पुत्रेंसीं ॥२५॥
ऐसे यदूनें जाणोन । मातेचा केला अपमान ।
देवयानीप्रति कर जोडून । यदुपुत्र बोलता झाला ॥२६॥
म्हणे माते अवधारी । पिता तुझा माझा अपमान करी ।
तरी मी वांचेनां संसारी । जीव देईन आपुला ॥२७॥
मी करीन विषपान । अथवा अग्निकाष्ठें भक्षीन ।
सर्वथा प्राण सांडीन । हे दुःख माझेनि न देखवे ॥२८॥

देवयानीने बापाकडे तक्रार केली :

ऐकोनि पुत्राचे वचन । देवयानी झाली उद्विग्न ।
तैसीच पितृगृहा येऊन । काय करिती पै झाली ॥२९॥
ते दैत्यगुरुची नंदिनी । प्रवेशली पितृभवनीं ।
संमुख पित्यासी देखोनि । साष्टांग नमन पै केले ॥३०॥
अति दीन चिंतातुर । म्लानवदन कृशशरीर ।
ऐसे देखोनिया शुक्र । कन्येप्रति बोलिला ॥३१॥
आजि तुझे मुख कोमाइले । चिंतेचे भरिते हृदयी दाटले ।
शरीर अत्यंत कृश झाले । काय कारणे कन्यके ॥३२॥
कोणे केला अपमान । ते सांगावे मज विस्तारोन ।
ऐकोनि पितयाचे वचन । देवयानी बोलिली ॥३३॥
अहो जी ताता अवधारी । माझा न करीच अंगीकार ।
सवतीही चालवी मत्सर ।
ऐसे दुःख देवोनि अपार । आम्हा बाहेर घातले ॥३५॥

शुक्राचार्याने ययातीस वृद्ध होशील असा शाप दिला :

ऐकोनि कन्येचें वचन । भार्गव झाल क्रोधायमान ।
म्हणे माझ्या कन्येचा अपमान । करोनि शर्मिष्ठा भोगित ॥३६॥
तेचि क्षणी दैत्यगुरु । कोपे कोपला जैसा रुद्रू ।
म्हणे सृष्टीचा संहार करु । की समुद्र शोषूं सातही ॥३७॥
क्रोधे थरथरा कांपत । जेथे होता जामात ।
तेथे शुक्र येवोनि त्वरित । शाप तत्काळ दीधला ॥३८॥
अगा ययाति महावीरा । राज्यमदे उन्मत्त झालसि खरा ।
विषयबुद्धीं भ्रमलासी पुरा । तारुण्येकरोनि मातलासी ॥३९॥
नेणसी तू आपपर । न करसी स्वहिताचा विचार ।
ऐसा तू पावसि जरा शीघ्र । आजिंचिये काळी ॥४०॥
माझ्या कन्येचा करोनि अपमान । ज्येष्ठस्त्रीभोगीं आसक्त मन ।
तुझ्या तारुण्या होईल हान । सत्य जाण ये काळी ॥४१॥
ऐसे शापोनि जामातासी । शुक्र निघाला स्वभवनासी ।
आश्वासोनि दौहित्रासी । तये काळी लक्ष्मणा ॥४२॥
रावणारीचे ऐसे वचन । ऐकोनि सुमित्रानंदन ।
म्हणे स्वामी भार्गवे शापून । निजधामा गमन केले ॥४३॥
तदनंतरे श्रीरघुपती । शाप पावोनि ययाती ।
पुढे काय करिता झाला ते मजप्रती । सविस्तरें सांगावे ॥४४॥
श्रीराम म्हणे गा लक्ष्मण । पुढील ऐक पा कथन ।
ययाति जरा पावोन । थोर कष्ट पावला ॥४५॥

यदूला वृद्धत्व स्वीकारण्याची बापाची विनंती; त्याचा नकार :

पाचोरोनि पुत्रा यदूसी । ययाति म्हणे पुत्रा परियेसीं ।
जरेनें मी होतो बहुत क्लेशी । ते जरा तू अंगीकारीं ॥४६॥
मजसंतोषार्थ हे जरा । तू अंगीकारीं गा कुमरा ।
धर्मिष्ठ सज्ञान चतुरा । यया कर्या शीघ्र करावे ॥४७॥
जरेकरोनि जर्जरीभूत । परी माझे भोगी आसक्त चित्त ।
याकारणें तू गुणवंत । अवश्य जरा अंगीकारीं ॥४८॥
ययातीचें करुणावचन । ऐकोनि यदु कोपायमान ।
काय बोलिला ते सावधान । श्रोती सादरें श्रवण कीजे ॥४९॥
राया तुझ्या आवडता पुरू । तया देई जराभारु ।
तयासि यदर्थी अधिककारु । ज्येष्ठ म्हणोनि राजेंद्रा ॥५०॥
जयावीण न करिसी भोजन । जयावीण न करिसी उदकपान ।
तो जरा अंगीकारील जाण । जयासि राज्याचा अधिकार ॥५१॥
विशेषही आवडता । प्राणाहूनि पढियंता ।
तयासि जरा देईजे ताता । काही विचारा करु नको ॥५२॥
मी कनिष्ठ नावडता पुत्र । मज अधिकार नाही येथ ।
ऐकोनि यदूचा वचनार्थ । थोर क्रोध पावला ॥५३॥

पुरूने ययातीच्या विनंतीचा स्वीकार केला :

मग पाचारोनि ज्येष्ठ पुत्र । पूरूनामें गुणवंत ।
तयासि राजा बोलत । सावचित्त करोनी ॥५४॥
अगा पूरो महाबहो वीरा । मजप्रीत्यर्थ अंगीकारीं जरा ।
तिचेनि धाके सुरवरा । थोर हडबड होतसे ॥५५॥
माझे विषयभोगीं मन आसक्त । वियोग होता दुःखी होत ।
याकारणें तुवा त्वरित । जरा माझी अंगीकारावी ॥५६॥
ऐकोनि पितयाचे वचन । कर जोडोन पूरु करी विनवण ।
म्हणे स्वामी भाग्य गहन । मजवरी तुष्टलेती ॥५७॥
म्हणे आजि मी धन्य भाग्याचा । अवश्य करीन अंगीकार जरेचा ।
पूरुवचन ऐकोनि पुत्र नहुषाचा । काय करिता पै झाला ॥५८॥
आपुले शरीराची जरा । पुत्रास दिधली ते अवसरां ।
आपण नूतन झाला सौमित्रा । विषयभोगाकारणें ॥५९॥
नूतन झाला राजा ययाती । नानापरींचे याग विप्रांहातीं ।
करवीतसे तो नृपती । स्वधर्मे पाळी क्षितीतें ॥६०॥
राज्य करी स्वधर्मता । नगरी नाही अधर्मवार्ता ।
ऐशीं सहस्त्र वर्षे क्रमिली असता । पुढे अनुताप उपजला ॥६१॥

पुनः ययातीने पूरुकडे ’जरा’ मागितली :

विषयी उदास झाले चित्त । मग पाचारोनि पूरु सुत ।
तयासि बोले नृपनाथ । माझी जरा मज देईजे ॥६२॥
अगा ये पुत्रा गुणवंता । माझी जरा मज दीजे आता ।
ते मी अंगीकारीन हितार्था । आपुलियाकारणे ॥६३॥
विषयी उदास झाले चित्त । माझी जरा मज दीजे शीघ्रवत ।
पितृवचन ऐकोनी पूरु सुत । जरा जनकास देता झाला ॥६४॥

यदूला शाप :

राज अति संतोषला । पुत्रासि राज्याभिषेक केला ।
कनिष्ठाचा शाप दिधला । देवयानीच्या आत्मजा ॥६५॥
माझे वचन अपमानोन । तू राक्षसी क्षत्रिय होसी दुर्जन ।
प्रजेचे तुझेनि पाळण । सर्वथा नव्हे पापिष्ठा ॥६६॥
मी तुझा पिता गुरुसमान । तुवा माझा केला अपमान ।
तुझे पोटी यातुधान । कर्कश दारुण जन्मती ॥६७॥
ऐसा कनिष्ठ पुत्रा शाप देवोन । ज्येष्ठासी राज्यीं स्थापून ।
आपण तपश्चर्येलागीं जाण । वनप्रयाण पै केले ॥६८॥
वना जावोनी राजऋषी । सवेंचि त्यजोनि देहासी ।
विमानी आरुढोनी स्वर्गासी । जाता झाला ययाति ॥६९॥
मागे पुरु धर्मनीतीं । प्रजापाळणीं परम प्रीती ।
प्रतिष्ठान नामे नगराप्रती । राज्य करिता पै झाला ॥७०॥
वाराणसीचे पूर्वदिशे । प्रतिष्ठान नामे नगर असे ।
तेथील राज्य सुखसंतोषें । करिता झाला ययतिपुत्र ॥७१॥
पुढे कनिष्ठ यदूचे कथन । जो भार्गवात्मजेचा नंदन ।
पितयाचे शापेंकरुन । अति चिंतातुर पै झाला ॥७२॥
शाप झाला दौहित्रासी । ऐसे ऋषीनें जाणोनी मानसी ।
शापापासोनि नातवासी । क्षणमात्रें मुक्त केले ॥७३॥
क्रौंचवनादि नाना वनी । यदु क्रीडा करी स्व-इच्छेंकरोनी ।
पुढे काय वर्तले ते वाल्मीकमुनी । कथा अनुपम्य सांगेल ॥७४॥
यालागी लक्ष्मणा परम । राजाने न सांडावा राजधर्म ।
न करिता नृगा शाप दारुण परम । ऋषिशापें सरड झाला ॥७५॥
एका जनार्दना शरण । ययातीस झाले स्वर्गगमन ।
पूरूसि देवोनि राज्यसन । पुढे श्रवण करावे ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
ययातिकथनं नाम षट् पंचाशत्तमोऽध्यायः ॥५६॥ ओंव्या ॥७६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग