॥ श्रीएकनाथमहाराजकृत
20.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय विसावा ॥
रावणाचे नर्मदातीरावर आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
तदनंतरे श्रावणारिनंदन । अगस्तीप्रति कर जोडून ।
म्हणता झाला स्वामीनें निरुपण । रावणाचे सांगितले ॥१॥
दशानन विचरत क्षिती । पृथ्वीचे भूप शरण येती ।
तयांतें जिंकोनि लंकापती । पुढारा चाले जिंतित ॥२॥
ऐसे जिंतिले भूमंडळ । राजे जिंतिले ज्यांचा पराक्रम प्रबळ ।
ऐसा दशानन अति सबळ । कोठे नाही पराभविला ॥३॥
निर्वीर होती तै सृष्टी । ऐसे गमतें माझे पोटी ।
यदर्थी आशंका थोर मोठी । माझे जीवी वाटतसे ॥४॥
बलाढ्य राजे अवनी नव्हते । ऐसे वाटतें माझेनि मतें ।
तै पाशुपतादिक होती शस्त्रे । त्याचे काही न चलेचि ॥५॥
ऐसे श्रीरामाचे वचन । ऐकोनिया हास्यवदन ।
बोलता झाला तू ब्रह्म पूर्ण । जाणोनि प्रश्न आम्हा करिसी ॥६॥
तू ये सृष्टीचा कर्ता । तुझा कुमर विधाता ।
मायेस तुझेनि प्रबळता । त्रैलोक्यातें मोहावया ॥७॥
तू ईश्वराचा ईश्वर । तुझा योगियां न फळे पार ।
तू स्वलीलेनें हा अवतार । घेतला कार्याकारणें ॥८॥
तो तू श्रीरामा आम्हांप्रती । कथा पुससी अति निगुती ।
हे आश्चर्य वाटे आमुचे चित्ती । कृपामूर्तिं कृपाळुवा ॥९॥
आमुचा वाढवोनियां मान । आम्हांसि देतोसि भूषण ।
तरी तुझिये कृपेनें जाण । पुढील निरुपण सांगतसें ॥१०॥
रावणे अनरण्य भूपती । जिंतोनि चालिला विचरत क्षिती ।
तदनंतरे श्रीरामा नगरी माहिष्मती । अपूर्व पुढे देखिली ॥११॥
सहस्त्रार्जुनाच्या माहिष्पतीनगरीला रावणाचे ससैन्य आगमन :
महिष्मतीनामे नगरी । तिची सरी न पवे स्वर्गपुरी ।
तोरणे पताका घरोघरी । अति साजिरी अनुपम्य ॥१२॥
तिये नगरीसमीप । येवोनि पौलस्तिकुळदीप ।
सवे प्रधान ज्यांचा अगणित प्रताप । ऐसे तेथे येते झाले ॥१३॥
रावणे पृथ्वीपति जिंतिले । थोर थोर भूपां दुःख दिधले ।
ऐसे करिता पुढे देखिले । नगर राया अर्जुनाचें ॥१४॥
तया नगरीचा भूपती । प्रजापतेजें अद्भुतकीर्ती ।
अग्नीसारिखी दिसे दीप्ती । नामे अर्जुन विख्यात ॥१५॥
सहस्त्रार्जुन त्या वेळी स्त्रियांसह नर्मदेवर क्रीडेसाठी गेलेला होता :
तो सहस्त्रार्जुन ते दिवशी । स्त्रियांसहित नर्मदेसीं ।
गेला असता जळक्रीडेसीं । मागे रावण पै आला ॥१६॥
सवे प्रधान थोर थोर । ऐसा आला दशशिर ।
अर्जुनाच्या प्रधानांसी उत्तर । बोलता झाला रावण ॥१७॥
अगा ये मंत्री हो तुमचा नृपती । कोठे आहे तो सांगा निश्चिती ।
मी आलो असे त्यासी युद्धार्थी । वेगी भूपती पाचारा ॥१८॥
मी लंकेश दशानन । आलो रायासीं युद्धालागून ।
सांग तयाप्रति त्वरेंकरुन । युद्धा रावण पाचारी ॥१९॥
रावणाचे आव्हान ऐकून राजाचे प्रधान भयभीत :
ऐकोन राक्षसाचे वचन । प्रधान झाले कंपायमान ।
म्हणती राक्षसाधिपा जाण । राजा नाही नगरीमध्यें ॥२०॥
ऐकोनि नगरवासियांची मात । पुढे चालिला लंकानाथ ।
तंव देखिला विंध्य पर्वत । अति उन्नत गगनामपम ॥२१॥
सहस्त्र शिखरें पर्वतासीं । सिंह शार्दूळ तया वनप्रदेशीं ।
सरितातोय गर्जें खळाळेंसी । तेणे नादें अंबर गर्जे ॥२२॥
देव दानव गंधर्व । किन्नर अप्सरा मानव ।
आणि ऋषींचे समुदाव । आनंदें स्वयमेव क्रीडा करिती ॥२३॥
जैसे देव अमरावरी । संतोषें क्रीडा करिती ।
तैसे त्या विंध्यपर्वतीं । आनंदें वसती सुर सिद्ध ॥२४॥
रावण नर्मदातीरावर आला :
उल्कावंत दरीवंत । हिमवंतासमान तो पर्वत ।
देखोनिया लंकानाथ । नर्मदातीराप्रति आला ॥२५॥
तया पर्वताचे शिरी । नर्मदा नांवे नदी निर्धारी ।
जिचेनि दर्शने पातका उरी । नुरे ऐसा जिचा महिमा ॥२६॥
तिये नर्मदेच्या दक्षिणभागीं सागर । जजो सकळ नदींचा ईश्वर ।
तयाप्रति ते चतुर । हर्षे निर्भर मीनली पै ॥२७॥
नर्मदा नदीचे वर्णन :
तिये रेवेचिया तीरीं । श्वानदें पक्षी नानापरी ।
वसती तेणे साजिरी । वनस्थळी शोभत ॥२८॥
रानगाई सिंह शार्दूळ । उन्मत्त गज विशाळ ।
म्हैसे उष्ट्र व्याघ्र सायाळ । प्राशावया जळ वास तीरीं ॥२९॥
मृगामृगींचें थवे । चितळे इत्यादिक सेवोनि रेवे ।
आणिक श्वापदें तीर बरवे । वनफळे सेवोनि वसताती ॥३०॥
चक्रवाके हंस अनेक । तळकुक्कुट सारसमयुरादिक ।
कोकिळा कूजती तेणे तटाक । अति रमणीय शोभले ॥३१॥
नानापरींच्या वृक्षयाती । अनेक प्रकारच्या कुसुमजाती ।
भ्रमरसंघ रुणझुण करिती । पांथिकां विश्रांती व्हावया ॥३२॥
शनैः शनैः मलयानिळ । तेणे मार्गस्थां सुखकल्लोळ ।
घालिती आनंदाचा गोंधळ । सुखी सकळ म्हणोनी ॥३३॥
तदनंतरे तिये तीरीं । नर्मदा अक्षोभ अमूप वारी ।
शोभती झाली ते अवधारी । श्रीरामचंद्रा दयाळुवा ॥३४॥
कुमुदे विकासली सुमनीं । तेचि माथा शोभे वेणी ।
चक्रवाकें कुच दोनी । वनिता म्हणोनी वर्णिजे ॥३५॥
विस्तीर्ण वाळुवंट सुंदर । तोचि माज सुकुमार ।
हंसावळी मेखळा साचार । लहरी ते मुक्ताफळ शोभे नाकीं ॥३६॥
पुष्पें तीरींची ते चंदन उटी । कुमुदे तेचि शोभे धटी ।
जळप्रवाह त्वचा गोमटी । उत्पल जे तेंचि नयन ॥३७॥
तीर अत्यंत विशाळ । माजि मीन मगरांचा उल्लाळ ।
तेचि गळा मुक्तामाळ । सुंदर वेल्हाळ शोभली ॥३८॥
ऐसे देखोनि नर्मदारत्न । पुष्पकींहून उतरला दशानन ।
करावया अवगाहन । तिये ठायी ते काळी ॥३९॥
त्या नर्मदेच्या रम्यतीरीं । रम्य पुष्पवाटिका साजिरी ।
मंत्रियांसहित वैश्रवणारी । सुख तेथे बैसला ॥४०॥
उदक भरोनि हेमपात्रीं । करचरण प्रक्षाळी भूपती ।
आचमन करोनि मस्तकी गात्रीं । शिंपी पुण्य तोय म्हणोनी ॥४१॥
रावणाचे स्वमहिमान व नर्मदेचे महत्त्व :
लाहोनि नर्मदादर्शन । संतोषला दशानन ।
शुकसारणांप्रति मधुर वचन । बोलता झाला ते काळी ॥४२॥
रावण म्हणे सुरारि हो । ज्याचा अरि केतिराहो ।
तो मध्यान्हीं आला पहा हो । मद्भयें शीतळ किरणे केली ॥४३॥
ज्याचे सहस्त्र रश्मींकरुन । जग धवळिलें दिसे कांचन ।
तीक्ष्ण उष्णें तपतसे भान । मध्यान्हकाळीं विश्व पीडी ॥४४॥
तो सूर्य माझेनि भयेसीं । शशीसारिखे शीतळतेसीं ।
तपता झाला आजींच्या दिवसीं । त्यावरी नर्मदासुंगधोदके ॥४५॥
श्रमहरिता अनिळु । तोही वाहतो हळुहळु ।
विशेष हे नर्मदाजळु । मद्भयें शीतळे पै झाले ॥४६॥
जैसी योषिता लावण्यकरीं । अवयव आच्छादी सलज्ज भारी ।
तैसी ही नर्मदा नारी । मीन लहरीनें झांकितसे ॥४७॥
रावण म्हणे मंत्रिया-प्रती । वैरियांचे शस्त्रास्त्रीं ।
रुधिरोक्षित सर्व गात्रीं । रायांसी युद्ध करिता हो ॥४८॥
जैसे अहिप्रियलेपन । सर्वांगी लाविती सभाग्य जन ।
तैसी तुमची वपु शोणितेंकरुन । अत्यंत आरक्त पै झाली ॥४९॥
रावणाचा प्रधानादिकांना नर्मदास्नानाचा आदेश :
ते तुम्ही सर्व प्रधान । करा नर्मदेचे स्नान ।
तेणे व्हाल पुण्यपावन । दोष दारुण नासती ॥५०॥
जैसी दंडकारण्यीं गोदावरी । प्राणिमात्राते पुनीत करी ।
तैसी ही नर्मदा स्नानानें उद्धरी । तापत्रयापासूनी ॥५१॥
पाहता गंगा भरत-खंडीं । प्राणियांच्या दोषा दंडी ।
तैसे तुम्ही मुंडीमुंडी । मज्जनें पापावेगळें होईजे ॥५२॥
आणीक तुम्ही सकळ जन । पुष्पें आणा रे संपूर्ण ।
येथे पूजूं उमारमण । सुख संपन्न भोगावया ॥५३॥
प्रेमसिंधु गिरिजापती । पूजिलिया होय भुक्ती मुक्ती ।
तयाचे पूजेलागीं पुष्पयाती । आणावी तुम्ही सकळिकीं ॥५४॥
ऐकोनि रावणाचे वचन । समस्त प्रधान मिळोन ।
ते कोण कोण म्हणाल नामाभिधान । सावधान अवधारी ॥५५॥
शुक सारण महोदर । धूम्राक्ष प्रहस्त अंकपन वीर ।
आणीकही थोर थोर । अनेक नामे तयांची ॥५६॥
सर्वांनी स्नान करुन शिवपूजेसाठी रावणाला फुले आणून दिली :
उतरोनि नदीभीतरीं । स्नान करिता महावीरी ।
उदक चढे दोही तीरी । पूर आल्यासारखें ॥५७॥
उन्मत्त गज रिघोनि जळीं । बुडे फिरे दे आरोळी ।
तैसे राक्षस मिळोनि सकळी । जळक्रीडा पै केली ॥५८॥
समस्त राक्षस मिळोन । करिते झाले नर्मदास्नान ।
सवेंचि नाना जातींची पुष्पें तोडून । अचळ केला तयांचा ॥५९॥
पुष्पें देखोनिया दृष्टी । रावणा हर्ष न माये पोटी ।
स्नान करोनि उठाउठी । विध्यक्त संध्या सारिली ॥६०॥
पितृतर्पण ब्रह्मयज्ञ । जप होम अनुष्ठान ।
तदनंतर हात जोडून । प्रधानां म्हणे गायन करा ॥६१॥
रावणाची ऐकोनि विनंती । प्रधान सुस्वरें गायन करिती ।
एक टाळ मृदंग वाहती । एक धरिती सुरातें ॥६२॥
एक नृत्य पै करित । एक थैथैकार दावित ।
एक वीणा वाजवित । एक आळवित उपराग ॥६३॥
जेथे नामाचा उच्चार । तेथे सदाशिव निरंतर ।
ऐसे जणोनि राक्षसेश्वर । पूजा करावया बैसला ॥६४॥
रावणाची शिवपूजा :
सुवर्णमय रत्नजडित । शिवलिंगातें वागवित ।
पृथ्वी विचरता लंकानाथ । असे सतत लिंग सवे ॥६५॥
तया नर्मदेचिया तीरीं । शिवपूजेचा आरंभ करी ।
बिल्वदळांचिया राशि थोरी । पूजेलागी आणिल्या ॥६६॥
कुसुमांचा झाला पर्वत । सुवर्णपात्रीं पंचमृत ।
मधाच्या कावडी भरोनि तेथ । संख्येरहित जळकुंभ ॥६७॥
क्षीरकुंभां नाही मिती । धूप दीप पंचारती ।
नानापरींच्या आरत्या नेणे किती । वाद्यें वाजती विचित्र ॥६८॥
श्वेत पीत आरक्त । नानापरींचीं वस्त्रे पूजार्थ ।
नामे शिवाचीं अष्टोत्तरशत । घेता झाला रावण ॥६९॥
अभिषेकपात्र धरोनि करी । स्तवन करिता झाला सुरारी ।
पंचमृत घालोनि वरी । पूर्णाभिषेक पै केला ॥७०॥
तदनंतर लंकापती । वस्त्रे अर्पोन शीघ्रगती ।
वाळुवंटींच्या वेदिकेप्रती । लिंगस्थापना पै केली ॥७१॥
भोळा पार्वतीरमण । झालासे भक्ताधीन ।
जो मनोभावें करील पूजन । त्यासि सर्वस्व देतसे ॥७२॥
जे अर्चिती महेशातें । ते पावती सकळ कल्याणातें ।
जे अवगणितील शिवाचें । मृत्यु त्याते सोडिना ॥७३॥
ज्ञानी पंडित बुध जन । विधियुक्त करिती कर्माचरण ।
रावण महामूढधी जाण । विधिविधान पै नेणे ॥७४॥
वाळुवंटींच्या ओट्यावरी । तेथे स्थापिला त्रिपुरारी ।
करी घेवोनि सर्व सामग्री । सदाशिवासी वाहिली ॥७५॥
तदनंतर दशशिर । पूजोनियां चंद्रशेखर ।
मग साष्टांगी नमस्कार । भुजा पसरोनि घातला ॥७६॥
पुढिले प्रसंगीं श्रीरघुपती । रावणा अर्जुना युद्धप्राप्ती ।
होईल ते कथा सावध श्रोती । श्रवणद्वारे ऐकिजे ॥७७॥
एका जनर्दना शरण । रावणा सहस्त्रार्जुना युद्ध दारुण ।
बोलिला वाल्मीक ऋषि सुजाण । सावधान अवधारिजे ॥७८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणरेवातीरगमनं नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥ ओंव्या ॥७८॥
