॥ श्रीएकनाथमहाराजकृत
68.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय अडुसष्टावा ॥
लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला :
गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसे असे निरुपण ।
भरत शत्रुघ्नासी बांधोन । कुशें जाण युद्ध केले ॥१॥
उरल्या सैन्या करोनि मार । विजयी दोघे राजकुमर ।
भरतशत्रुघ्न बांधोनि वीर । अश्वापासीं राखिलें ॥२॥
येरीकडे रणी पडिले । ते सावध होवोनि बैसले ।
मागे पुढे पाहात ठेले । तंव कोणी नाही युद्ध करित ॥३॥
ऐसे देखोनि घायाळ वीरी । कण्हत कुंथत साकेतपुरीं ।
प्रवेशता मार्गीं एके पुरी । करिती गजरीं महाशब्द ॥४॥
एकांचें फुटलें शिर । एकांचे उखळले कर ।
एक सर्वांगें जर्जर । एक अशुद्धे डवरिले ॥५॥
एक रडत पडत । एक कटिभंगें येती लोळत ।
एकांची लोंबती अंतें । घायीं शस्त्र अडकले ॥६॥
एकांचें धाके फुटलें पोट । एकांचा घरघरा वाजे कंठ ।
एकांचे कान नाक सपाट । एक चटपटें दुःख करिती ॥७॥
एक हृदयी भेदले । एकांचे कंठ भंगले ।
एक भयें वोसणलें । म्हणती मारू नको कुशा वीरा ॥८॥
ऐसियापरी घायाळ वीरी । प्रवेशिजे ती अयोध्यापुरी ।
तंव भद्रासनीं दूषणारी । तयासमोर पै आले ॥९॥
सिंहासनी जनक जामात । बैसला जैसा काय अब्धिसुत ।
सभोंवतें तारागणें तैसे प्रधान समस्त । अनुज सौमित्र बैसला ॥१०॥
राजवर्ग सभानायक । भोवतीं राजे मांडलिक ।
वसिष्ठविश्वामित्रादि ऋषी सम्यक । सेना सैनिक शोभत ॥११॥
तंव घायाळ पुढे देखिले । तयांसि लक्ष्मणे पुसों आदरिलें ।
कोण कोठे युद्धें झाले । कोणे गांजिलें तुम्हांसी ॥१२॥
तंव घायाळ म्हणती शुक्रारिअरी । दोघे कुमर वनांतरी ।
द्वदशवर्षाचिये वीरी । सेना सैनिक मारिले ॥१३॥
तिही दोघीं पराक्रम । करोनि साधिला संग्राम ।
तयांमधील कनिष्ठ परम । तेणे युद्ध पूर्वी केले ॥१४॥
शत्रुघ्ने तयासि जिंतिले । धरोनि रथी बांधिलें ।
तयाचे सोडवणें ज्येष्ठें पुत्र केले । ते राजेंद्रा अभिनव ॥१५॥
वाल्मीकाचिया आश्रमी । दोघे कुमर पराक्रमी ।
गौर श्याम एका सादृश्य श्रीरामी । जानकीसारिखा एक असे ॥१६॥
दोघे दोघांसारिखे । करी शर आणि चाप काखे ।
धनुर्विद्येंचें अति नेटके । युद्ध न ठाके तयांसी ॥१७॥
एके तुमचा वारु धरिला । सैन्यें शत्रुघ्नेंसीं झगटला ।
पराक्रम थोर केला । तो धरोनि आणिला भरतानुजें ॥१८॥
तयाचे सोडविण्याकारणे । ज्येष्ठा झाले युद्धा येणे ।
युद्धी वीरां केले ठेंगणें । आकाश बाणी व्यापिले ॥१९॥
तेणे घालोनि मोहनशास्त्र । धरोनि नेले दोघे राजकुमर ।
आम्हा वाटतें ते वीर । अयोध्येचे राज्य घेतील ॥२०॥
भरत शत्रुघ्न पाडऊ झाले । दोघे रथासी बांधिले ।
आम्हांसी मारोनि निघाले । वाल्मीकाच्या आश्रमा ॥२१॥
करोनिया श्रीरामस्मरण । तेणे आमुचे वांचले प्राण ।
सांगता लज्जा दारुण । वाटतसे हो राजेंद्रा ॥२२॥
सैनिकांचे ऐकोनि वचन । हांसोनि बोले रघुनंदन ।
आश्चर्य करी उर्मिलारमण । म्हणती नवल वर्तले ॥२३॥
विनोदें बोले रघुनंदन । ते धाकुटें वय सामान्य ।
तिही कैसे मारिले सैन्य । मुख्य नायक धरिले कैसे ॥२४॥
तंव श्रीगुरु म्हणे रावणारी । युद्धी सामान्य न म्हणावे अरी ।
त्यांचा पुरुषार्थ नृपकेसरी । आम्हा विदित पै आहे ॥२५॥
कोणी एका क्षत्रियाचे कुमर । विद्या शिकवी वाल्मीक ऋषीश्वर ।
ते महा बळियाढे वीर । अपूर्व कांही न मानावे ॥२६॥
यावरी बोले उर्मिलारमण । मज आज्ञा दीजे कृपा करुन ।
जीत दोघे आणीन धरुन । निजबम्धु सोडवून श्रीरामा ॥२७॥
त्या कुमारांना पकडून आणण्याचा विडा उचलून लक्ष्मण युद्धाला निघाला :
श्रीरामे पैजेचा देवोनि विडा । मग तो लक्ष्मण धनुर्वाडा ।
निजपुरुषार्थाचा पवाडा । अग्रजासमोर बोलतसे ॥२८॥
दोघे बंधु सोडवीन । ते दोघे बंधु जीत धरीन ।
तरीच तुमचा सेवक जाण । विजयी होईन तिही लोकी ॥२९॥
म्हणे रथ पालाणा रे पालाणा । सन्नद्ध करा चतुरंग सेना ।
घाव घातला निशाणां । केली गर्जना महावीरी ॥३०॥
वीर चढले अश्वांवरी । एक बैसले रथावरी ।
एक आरुढले कुंजरी । एक पायी निघाले ॥३१॥
सवे जुत्पाती निघाले । नळ नीळ जाबवंत पातले ।
गंधमादन अंगद आले । वायुसुत येता झाला ॥३२॥
संवत्सरलक्ष नृपवर । पुराणसंख्यापद्म वानर ।
सप्त दशकांवरी दोन कोटि वीर । गोळांगूळें चालली ॥३३॥
साकेतपुराबाहेरी । निघाले आपुलाले भारीं ।
पल्लव छत्रे शृंगारीं । मयूरपत्रे झळकती ॥३४॥
रामानुज वीररावो । रिपुदळणीं महाबाहो ।
फुटों पाहे ब्रह्मकटाहो । सेना अगणित चालली ॥३५॥
लागली वाजंत्रांचीं एक घाई । कांनीं पडले नायकवें कांही ।
मुक्तामाळा वारुवां पाही । टके पताका नीळवर्ण ॥३६॥
निशाणावरी श्रीरामनाम । ढाला पताका नामांकित परम ।
देखता रिपूचा पराक्रम । ठेंगणा होय संग्रामी ॥३७॥
लक्ष्मणसैन्याला अपशकुन, त्यामुळे साशंक :
ऐसे मार्गी चालले । तंव अपशकुन झाले ।
कागपक्षी डावेच गले । आपुलिये भारेंसी ॥३८॥
सवेंचि पुढे निर्नासिक । केस सुटले उघडा मस्तक ।
समोर द्विज आला एक । तेणे वीर थरारिले ॥३९॥
म्हणती झाला अपशकुन । मागे फिरतां हांसती जन ।
पुढे होता जीवदान । न उरती निश्चयेसी ॥४०॥
एक म्हणती सरा मागे । एक म्हणती रहा उगे ।
धैर्य धरोनि लक्ष्मण वेगे । पुढे सेना चालविली ॥४१॥
ऐसे चालिले महावीर । मनी धाक परम थोर ।
म्हणती काय करील श्रीशंकर । ते न चुके कल्पांती ॥४२॥
ऐसे न मानितां चालिले । ऋषिआश्रमासि पातले ।
भार रचोनि राहिले । म्हणती कुमर पै दोघे ॥४३॥
उभयतां वीरांच्या युद्धाकरणें । स्वर्गी देवा उत्साह मनें ।
पहावया दाटलीं विमाने । विबुध वरोनि पाहती ॥४४॥
नारद खांदीं घेवोनि वीणा । पाहू आला युद्धरचना ।
उल्हासें करतसे गर्जना । श्रीराम नारायण म्हणोनी ॥४५॥
हांसे नाचे नारद । पाहोनि सूर्यवंशींच्या वीरांचे युद्ध ।
शेंदी तडतडी राम गोविंद । मुखे नाम उच्चारी ॥४६॥
लवकुशांचे सीतेला अभयवचन :
येरीकडे लहु कुश वीरे । सेना देखिली उल्हासें थोरे ।
म्हणती कृपा केली शाड्.र्गधरें । मातेसि आज्ञा पुसताती ॥४७।
कर जोडोनि दोघे वीर । उभे राहिले जानकीसमोर ।
म्हणती माते आज्ञा सत्वर । अनुग्रह करोनि पै द्यावी ॥४८॥
जनकजा पाहे दुरोन । तंव देखे सुमित्रानंदन ।
म्हणे आले रावणारिसैन्य । आता काय करु माये ॥४९॥
जानकी म्हणे आज दिवसवरी । पडले दुःखाच्या सागरी ।
दोघीं बाळके वनींचीं सोयरीं । यांसि संकट मांडले ॥५०॥
आता काय करावे । किंवा धरणीमध्ये जावे ।
किंवा कुमर पळवावे । आणखिया वनांतरा ॥५१॥
तंव कुमर म्हणती अवो माये । चिंता करु नको जननीये ।
सेना अवघी मारीन पाहे । सैनिक राजे जीत धरीन ॥५२॥
रणी नाचवीन रणधेंडा । ओंवाळणीं वीरांच्या मुंडा ।
तृप्त करोनि चामुंडा । रुधिरे सडा घालीन ॥५३॥
तृप्त करोनि भूतगण । मारीन राघवाचे सैन्य ।
तीच तुझे कुशींचा जाण । तरीच शिष्य वाल्मीकीचा ॥५४॥
त्रिसत्य सत्य मम भाषण । हा माझा गुरुसीं अभिमान ।
हे मन पूर्वजां निजभूषण । नाही तरी पाषाण जन्मलो दोघे ॥५५॥
ऐसे ऐकोनि पुत्राचें वचन । जानकीचे निवालें मन ।
हर्षे दिधले चुंबन । ध धान्य ओंवाळोनि सांडी ॥५६॥
दशरथस्नुषा बोले वचन । अवघे आणावे धरुन ।
कोणाचा न घ्यावा जीव प्राण । बंधन करुन राखावे ॥५७॥
मातेला वंदन, लवाकडून अंगदास बंधन :
करोनि मातेसि नमन । दोघीं केल्या प्रदक्षिण ।
नमस्कारोनि गुरुचरण । धनुष्यबाण घेतले ॥५८॥
दोघे जैसे दोनी पर्वत । चालिले पुढे सैन्य लक्षित ।
माथा तुकावोनि धनुष्यी सीत । चढविते झाले ते समयी ॥५९॥
ऐसे चालिले रणमेदिनी । पुढे अंगद देखिला नयनी ।
तया कुशें हाटकोनि । युद्धालागीं पाचारिलें ॥६०॥
अरे मर्कटसुता महावीरा । धावूं नको सैरावैरा ।
राघवारीचे मंडपाचे बारा । खांब आणिले तैसे नव्हे ॥६१॥
लहुवा राहे साहें म्हणत । तंव अंगदे टाकिला पर्वत ।
येरु शरधारें तोडित । मग म्हणत तारातनयातें ॥६२॥
ते येथे न चले आम्हांसी । आता साहें माझ्या बाणासी ।
म्हणोनि विंधिले अंगदासी । रणी मूर्च्छेसीं पाडिला ॥६३॥
मग सावध करोनि वालिसुत । लहुवा तयासि बांधित ।
जेथे होते शत्रुघ्न भरत । तेथे नेवोनि घातला ॥६४॥
अंगदा ऐसी दशा देखोन । मग बोलिला भास्करनंदन ।
यासी युद्ध करिता दारुण । अनर्थ दिसे वानर हो ॥६५॥
इहीं वालिसुत नेला धरोन । आमुचा झाला मुळींच अपमान ।
आता काय काज वांचोन । स्वर्गी देव हांसती ॥६६॥
म्हणोनि कपिपति चालिला । म्हणे राहे साहे बाळा ।
तुझे माथेचा जार नाही वाळला । काय युद्ध करसील ॥६७॥
सुग्रीव म्हणे तुमची जननी । विसंबली कैसी तुम्हांलागूनी ।
मातेचे लाडके दोनी । कैसे युद्धा आलेति ॥६८॥
कुशाकडून सुग्रीवाची अवहेलना व अस्त्रप्रहाराने रामसैन्याची दाणादाण :
ऐकोनि कुशा आले हांसें । म्हणे तू पालेखाइरें पिसे ।
उडावें वृक्षावरी जैसे तैसे । फळे खावयालागूनी ॥६९॥
तुम्हांसी संग्रामा करु काय । म्हणती वानर मारिले पाहे ।
तेणे माझी कीर्ती न होय । न वाखाणिजे वीरमुखीं ॥७०॥
ऐसे बोलोनि कुशें जाण । पुन्हा बोलता झाला वचन ।
म्हणे तू नपुंसक दारुण । श्रीरामा शरण गेलासी ॥७१॥
ज्येष्ठ बंधूने हरिली कांता । तियेचे दुःखे वनी वसतां ।
भाग्ये भेटलासि रघुनाथा । दोघे सारिखे मिळालेति ॥७२॥
कपटें करोनि वालिवध । तुजही दिधले राज्यपद ।
तो तू करु आलासि युद्ध । हे मज अपूर्व वाटतसे ॥७३॥
आता करी मजसी रण । म्हनोनि कुशें श्रीगुरु स्मरोन ।
सीतीं बाण चढवोन । बीजाक्षरें जपता झाला ॥७४॥
जपोनिया बीजाक्षर । शक्ति टाकिली महाघोर ।
तेणे कडकडाटे अंबर । पडों पाहे अवनीवरी ॥७५॥
महा धुंधाट सुटला । वानरा प्रळय आरंभिला ।
म्हणती रघुनाथ कोपला । संहार झाला सकळांचा ॥७६॥
शर लागती झणाझणा । कपि सोडूं पाहती प्राणां ।
म्हणती रक्षी रक्षी सुमित्रानंदना । म्हणोनि पाठी रीघती ॥७७॥
नभीं भोंवतीं पिसारे । आवर्ती पडली वनचरे ।
निघती आतें तयाचे भारे । हाहाकार प्रवर्तला ॥७८॥
सुधापानीं भयातुर गगनी । विमाने पडती खचोनी ।
देव पळाले तेथूनी । बाण लागती म्हणोनिया ॥७९॥
एक शाखामृग म्हणती । कोपिन्नला श्रीरघुपती ।
सादृश्य पुढा देखती । जाणो दुसरा श्रीराम ॥८०॥
एक श्याम राजीवलोचन । दुसरा शोभे गौरवर्ण ।
म्हणती हाचि रघुनंदन । तटस्थ होवोनि पडियेले ॥८१॥
पडिले अष्टादृश जुत्पती । मूर्च्छिर पडिले नाही शक्ती ।
मग लहुवें बांधिलें निगुतीं । तयांची नामे अवधारा ॥८२॥
नळ नीळ जांबवंत । सुग्रीव सुषेण दधिमुख वीर्यवंत ।
द्विविद कुमुद तारासुत । गंधमादन दहावा ॥८३॥
तार तरश हेमकूट । पनस केसरी सुभट ।
गज गवाक्ष धीट । अठरा जुत्पती ऐसे हे ॥८४॥
जेथे होते रामनुज । तेथे नेला कपिसमाज ।
बांधोनि पुन्हा वीरराज । सावध असे रणभूमी ॥८५॥
लक्ष्मण सचिंत :
येरीकडे शक्रारिहंता । म्हणे काय करावे वायुसुता ।
अपकीर्ति बैसली माथा । उपाय पुढा न दिसेचि ॥८६॥
आमचे महाकपि वीर । संग्रामी जिही जिंकिले निशाचर ।
तयांतें बांधोनि हे कुमर । नेती द्वादश वर्षांचें बलाढ्य ॥८७॥
काय हे स्रष्ट्याने रचिले । किंवा अवनीपासाव झाले ।
की अकरा रुद्र एकवटले । द्वैतरुप धरोनी ॥८८॥
किंवा दोन रुपे हे कळिकाळ । की दोघेही श्रीराम प्रबळ गर्वहरण निर्मिले ॥८९॥
की ग्रहांत केतु राही । किंवा विष्णु महादेवो ।
किंवा शशिसूर्य पहा हो । रिपुरुप अवतरले ॥९०॥
किंवा रावणारीच्या हत्या । एकीभूत होवोनि समस्ता ।
द्वैतरुपें अंजनीसुता । आम्हांवरी चालिल्या ॥९१॥
की जानकीहृदयींचा कोपाग्नी । प्रकटला धरोनि रुपे दोनी ।
पुढरला शोषावयालागूनी । तैसे दोघे दिसताती ॥९२॥
किंवा अवनिजा म्या सांडिली वनी । ते होती गा तै मासत्रयगुर्विणी ।
तिचे हे आत्मज दोनी । असित गौर दिसती ॥९३॥
लहु रावणारीसारिखा । कुशा धरणिजे सादृश्य देखा ।
हनुमंता तुज असे ठाऊका । हा वृत्तांत गुप्त करी ॥९४॥
जरी हे धाटुके म्हणावे कुमर । तरी शक्ति सुरेशाहूनि थोर ।
धरोनि आमुचे वीरे वीर । लाज थोर लाविली इही ॥९५॥
पुढे काय युद्ध करावे । युद्ध करिता घेतील जीवे ।
फिरोनि जाता हांसिजेल राघवें । नपुंसक म्हणोनी ॥९६॥
इतुके ऐकोनि वायुसुत । सौमित्राप्रति झाला बोलत ।
जैसा श्रीराम तैसे तुम्ही आम्हा येथ । माझा पुरुषार्थ पहावा ॥९७॥
मारुतीची वल्गना; कुशाकडून पराभव :
रुद्रावेशें रुद्र जाणा । पुच्छ वाहोनिया गगना ।
आरक्त करोनिया नयना । केली गर्जना विटंक ॥९८॥
हनुमान म्हणे अरे वीरा । मागे सरु नको धरी धीरा ।
तुज म्हणो ती एकसरा । सावध पै व्हावे ॥९९॥
कुश बोले ते समयी । अरे मर्कटा मुख आपुलें दर्पणीं पाही ।
काळे झाले ये समयी । काय दाविसी पामरा ॥१००॥
लंका जाळिली तये वेळें । मुख तुझे झाले काळे ।
सिंतरोनि राक्षसे निर्बळें । रणरंगी मारिलीं ॥१॥
कुश म्हणे अंजनीसुता । ऐक तुझ्या स्वामीची कथा ।
जेणे घरचीं दवडिलीं कांता । तयाची कथा कायसी ॥२॥
नांदती स्त्री दवडिली । तयाची विरश्री काय चांगली ।
आता तुम्हा भुली पडली । युद्ध करु आलेती ॥३॥
ऐसे वर्तले तुमचे घरी । ज्याची शक्ति झाली रानभरी ।
तो पुरुष यशवंत या संसारी । कोणे समयी होईल ॥४॥
उणें स्वामीचें ऐकोन । खवळाला अंजनीनंदन ।
जया शैलावरी बहु वन । घेवोनि गगनी उडाला ॥५॥
सवेंचि आणिक पर्वत चारी । घेता झाला अशोकवनारी ।
एक उरी एक शिरी । की दोनी दो कांखे ॥६॥
पंच पर्वतेसीं वायुसुत । येता जयाचा पिता रघुनाथ ।
मग तेणे वीरे वज्रास्त्र । जपोनि गुणीं लाविले ॥७॥
पुरती कानाडी ओढून । अभिमंत्रोनि सोडिला बाण ।
वरिचेवरी शैलखंडण । हृदयी बाण भेदला ॥८॥
पंचकद्वय अयुतें दुरी । हनुमान पिटिला ते अवसरी ।
सप्तसमुद्रांच्या पारी । अवनीवरी आफळला ॥९॥
देहाची वळली मुरकुंडी । मान झालीसे वांकडी ।
अशुद्ध वाहों सरलें तोंडीं । गतप्राण ऐसे झाले ॥११०॥
मग सावध होवोनि हनुमंत । तटस्थ राहिला निवांत ।
तंव वायु आल्से धांवत । बुझावीत निजपुत्रा ॥११॥
वायुकडून मारुतीला कुमारांची माहिती :
वायु म्हणे गा हनुमंता । तू नेणसी त्याच्या वृत्तांता ।
ते राघवाचे पुत्र तत्वता । पितयासारखे पुरुषार्थी ॥१२॥
लहु कुश दोघे कुमर । बळाचे दोघे गिरिवर ।
तयांत कनिष्ठे हे थोर । युद्धी प्रौढी दाखविली ॥१३॥
हे वचन प्रकट न करावे । हृदयी गुप्त असों द्यावे ।
पुढील कर्तव्य लक्षावें । वेगी जावे रामकार्या ॥१४॥
ऐकोनि पित्याचे वचन । हनुमान खालती घाली मान ।
हृदयी स्मरे श्रीरामचरण । माझे स्मरण असो द्यावे ॥१५॥
ऐसा तो श्रीहनुमंत । हृदसी स्मरोनि श्रीरघुनाथ ।
हळु हळु निजकटकांत । येता झाला लाजेने ॥१६॥
वज्रदेही बळियाढा । एवढे भोगिलें दुर्वाडा ।
तेथे कायसे इतरांच्या पाडा । वानरा मूढां कोण पुसे ॥१७॥
ऐसियापरी श्रीराम स्मरण । देखे हनुमान आपुलें सैन्य ।
लाजा प्राण जाय तंव लक्ष्मणे । दुरोनि येता देखिला ॥१८॥
लक्ष्मणाचा आवेश व कुशाकडून त्याचा उपहास :
सौमित्र म्हणे गा कपिवीरा । थोर कष्टलासी परम शूरा ।
आता स्थिर राहे मी या कुमरां । सीक लावीन रणमारे ॥१९॥
मग चालिला रामानुज । जयाचा रथ दिव्य तेजःपुंज ।
वारुवा सांट देवोनि विज । निजभारेंसी लोटला ॥१२०॥
धनुष्यी चढवोनियां गुण । बोलता झाला लक्ष्मण ।
अरे वीर हो श्रीरामा शरण । येता प्राण राखीन तुमचे ॥२१॥
ऐसे न माने तुमच्या चित्ता । तरी प्राण घेईन आता ।
पळूं नका धीर धरा पुरता । सोडा संग्रामाचा साटोप ॥२२॥
तुम्ही वारु आमुचा धरिला । हाचि अन्याय मोठा केला ।
दुसरा अपराध वीरे वीर धरिला । शत्रुघ्नभरतादिकरोनि ॥२३॥
तयांचा सूड मी घेईन । तुम्हा दोघा धरुन नेईन ।
वारु आपुला सोडवीन । निजवीरांसमवेत ॥२४॥
ऐसे शक्रारीचें वचन । ऐकोनि कुश बोलिला आपण ।
तुमचा ठाउका अभिमान । पूर्वीच आम्ही आयकिला ॥२५॥
तुमची कीर्ति तुम्हांप्रती । सांगतो ऐका एकाग्रचित्तीं ।
जै रावणे घातली शक्ती । तै भूमिशयन तुम्ही केले ॥२६॥
तेथे निवडला पुरुषार्थ । दैवे होता हनुमंत ।
घेवोनि आला वल्लीचा पर्वत । उपचारार्थ योजिला ॥२७॥
तू पूर्वीच रावणभगिनी । शूर्पणखा नामे जनस्थानी ।
तियेचे नासिकाकानीं । पुरुषार्थ थोर मिरविला ॥२८॥
विटंबोनियां तियेतें । थोर मिरविलें पुरुषार्थातें ।
कहाणी सांगता माते । ते अनुभवा येईल ॥२९॥
स्त्रियेते जे विटंबती । तयांची थोर उपतिष्ठे कीर्ति ।
तेचि तुम्ही येथे मुख्य पुरुषार्थी । युद्धालागीं आले असां ॥१३०॥
ब्रह्मचर्य धरोनि व्रत । वधिला रणी इंद्रजित ।
ते काही न चले येथ । आता आपणा सांभळीं ॥३१॥
या लतामृगांचे बळे । बंधु सोडवूं आलेति सबळे ।
भरत शत्रुघ्न वानरपाळें । पहा दशा भोगिताती ॥३२॥
आता तुम्हा तेचि गती । विमुख झाला श्रीरघुपती ।
अवघी तुमची गेली शक्ती । हे निश्चिती जाणा पा ॥३३॥
लक्ष्मण-कुशाचे द्वंद्वयुद्ध :
ऐसी कुशाची ऐकोनि वचनें । रथ प्रेरिला लक्ष्मणे ।
दृढ कार्मुक सत्राणे । कर्णापर्यंत ओढिलें ॥३४॥
सौमित्रकरींचा बाण । सुटका करित गर्जन ।
तयाचे पोटी लक्षकोटी बाण । बाणां बाण प्रसवले ॥३५॥
जैशीं मुखांतुनि अक्षरे । निघती नानावर्णउच्चारें ।
तैसे सौमित्राचेनि शरें । शरांते शर प्रसवत ॥३६॥
जैशा पर्जन्याचा धारा । अच्छादिती गिरिवरा ।
तैशा सौमित्राच्या शरधारा । गगन बाणी व्यापिले ॥३७॥
संधान सौमित्राचें अद्भूत । देखोनि काय करी जानकीसुत ।
नवमुख बाण घेवोनि त्वरित । परदळावरी मोकलिला ॥३८॥
शरें शरा खंडणा झाली । जैशी पंडितें मूर्खपृच्छा खंडिली ।
हे देखोनि म्हणे ज्याची माउली । सुमित्रादेवी ॥३९॥
लक्ष्मण म्हणे अरे वीरा । धन्य धन्य तुझा गुरु पुरा ।
कोणे जननीचे उदरा । येवोनि वंशीं कीर्ति केली ॥१४०॥
धन्य तुझे जननीजनक । व्ंशीं जन्मलासी कुळटिळक ।
संधान करितं अचुक । हे अपूर्व देखिले ॥४१॥
माझे जे शरसंधान । वरिच्यावरी केले खंडन ।
कायसे आता रणकंदन । आश्चर्य लक्ष्मण करिता झाला ॥४२॥
पुनरपि सुमित्रेचा बाळ । सोडिता झाला शरकल्लोळ ।
वरिचेवरी छेदि कुश कुशल । परम कोपा चढलासे ॥४३॥
कुश पेटला महामारी । बोहरी करी वरिच्यावरी ।
गजा मारीं गजे करी । अश्वें अश्व ठोकित ॥४४॥
एक सौमित्रासी भिडत । एक सैन्यासी मार देत ।
दोघीं केला प्रळयअंत । देव कौतुक पाहती ॥४५॥
कुशवीरे तये वेळे । भैरवास्त्र मोकलिले ।
अष्ट भैरव पातले । ते अपूर्व परियेसा ॥४६॥
अष्टभुज करी डौर । अवनी लागती जटाभार ।
हाती त्रिशूळ करी तोमर । अश्व कुंजर पळताती ॥४७॥
अद्भूत देखोनि संधाना । त्रिशूळा लागती लक्ष्मणा ।
न निवारे देखोनि वायुनंदना । स्फुरणा आले ते समयी ॥४८॥
आवेंशें करित गर्जना । धाके भैरव घेवोनि प्राणा ।
पळाले लंघोनि दिशा नाना । दिग्गजांआड लपाले ॥४९॥
ऐसे देखोनि कुशवीरे । मोहनास्त्र जपोनि बीजाक्षरें ।
प्रेरिलें तेणे प्रतापकरें । पडे अंधारे लक्ष्मणासी ॥१५०॥
धूमी दाटली समस्त वीरां । हातींचीं गळालीं शत्रें झरारां ।
चाकाटलें पाहती अंबरा । एक नेत्र झांकिती ॥५१॥
एकी दीर्घ शयन केले । एक विस्मयातें पावले ।
संग्राम करु विसरले । मौन पडले समस्ता ॥५२॥
हनुमंताला अटक :
ऐसे वर्तले रणमंडळी । मग दोघे बंधु तये वेळीं ।
काय करिते झाले ते काळी । सुरवरी पाहू आदरिलें ॥५३॥
पुच्छी धरोनि हनुमंत । कुश फरफरां ओढोनि नेत ।
लहूनें धरोनि सुमित्रासुत । विनोदें वनांत आणिला ॥५४॥
तयांसी बंधन पै केले । हनुमंतासी पुच्छी बांधिलें ।
मग दोघे निघते झाले । गुरुदर्शनालागोनी ॥५५॥
सद्गुरुंसीं करोनि नमन । सांगितला वृत्तांत संपूर्ण ।
ऐकोनि हांसे मुनिगण । समस्त ऋषिजन सुखावले ॥५६॥
सीतेसि करोनि नमस्कार । आनंदे दोघे झाले निर्भर ।
टाळिया पिटिती द्विजवर । म्हणती अपूर्व वर्तले ॥५७॥
पुढे पित्या पुत्रासीं । युद्ध होईल परमावेशीं ।
ऐक्य होवोनि समरसीं । चवघे जण मिळतील ॥५८॥
एका जनार्दना शरण । पुढील रसाळ निरुपण ।
श्रोते होवोनि सावधान । परिसा रामायण अति गोड ॥५९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणहनुमंतजुत्पतीबंधनं नाम अष्टषष्टितमोऽध्यायः ॥६८॥ ओंव्या ॥१५९॥
