वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ९. कुबेराचा पराभव

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088343 · अभंग क्र. ९

9.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय नववा ॥
रावण - कुंभकर्णादिंची उत्पत्ती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम म्हणे मुनिवरा । माल्यवंत सुमाळी पाताळविवरा ।
प्रवेशले तयावरी चतुरा । कथा पुढारा सांगावी ॥१॥
अगस्ति विनवी श्रीरामा । तू अंतर्यामी साक्षी आम्हा ।
ऐसे असोनि हा महिमा । आमचा थोर वाढविसी ॥२॥
पुढे ते रजनीचर । पाताळीं प्रवेशले सहपरिवार ।
लपोनि राहिले धाक थोर । भय दुस्तर देवांचे ॥३॥
कोणे एके समयी । राक्षस विचरती महीं ।
रसातळमृत्यु लोकी पाही । स्व इच्छेने हिंडती ॥४॥
अंगकांति अति सुंदर । शोभा शोभे शशिचक्र ।
सुवर्णकुंडलें मकराकार । विशाल नेत्र आकर्ण ॥५॥
ऐसा सुमाळी राक्षस । मही विचरत सावकाश ।
तंव एके समयी कुबेरास । देखता झाला दुरोनी ॥६॥
कुबेर पुष्पकविमानी । बैसोनि जाता गगनी ।
राक्षसी देखिला नयनी । भय मनी धरियेले ॥७॥
पाताळा गेला पुनरपि जाण । स्वगृहीं असता सावधान ।
तंव कन्या देखिली रुपयौवन । राक्षसांचे मन कळवळिलें ॥८॥

माल्यवंताने आपली कन्या कैकसी हिला पौलस्तीला वरण्यास सांगितले :

माल्यवंत म्हणे कन्येप्रती । ऐक वो एक माझी विनंती ।
तू रुपयौवनें गुणवती । वर निश्चिती तुज पाहिजे ॥९॥
जयाचे घरी कन्यारत्न । तया चिंता अति दारुण ।
कोणे काळी सुस्थिर मन । तया प्राणियाचें पै नाही ॥१०॥
कन्येची होता उत्पत्ती । माता पिता चिंता वाहती ।
तैसी तू नव्हेसी गुणवंती । लक्ष्मीची स्थिती तुजपाशी ॥११॥
माता पिता काय करिती । कन्येसी योग्य वर पाहती ।
विधिपूर्वक लग्न लाविती । तयांच्या पुण्या मिती नाही ॥१२॥
तिन्ही कुळांचे विचारण । शोध करिती ज्ञाते जन ।
घटित गोत्र नसतां ज्ञान । लग्न तेथे न लाविती ॥१३॥
तरी कन्ये तू अवधारी । प्रजापतीचे उदरी ।
पुलस्त्यानामा श्रेष्ठ भारी । पुत्र तयाचा पौलस्ति ॥१४॥
पुलस्यांचा नंदन । पौलस्तिनामा प्रसिद्ध जाण ।
तयासि त्वा वरावें आपण । पुत्र संतान तुज होईल ॥१५॥
त्या पुत्राचें महिमान । तेजे जैसा शोभे भान ।
अथवा अग्निसमान । प्रतापे पूर्ण बळवंत ॥१६॥

कैकसीचे पौलस्तीच्या आश्रमांत आगमन :

पितृआज्ञा वंदोनि शिसी । आनंदे निघाली कैकसी ।
पौलस्ति जेथे तपोराशी । त्या आश्रमासी पै आली ॥१७॥
जोडोनियां दोनी कर । उभी ठेली तयासमोर ।
तंव तो तपस्वी द्विजवर । काय उत्तर बोलिला ॥१८॥
भयभीत होवोनि मानसी । उभी ठेली अधोदृष्टीसी ।
तंव तियेसी देखोनी ऋषी । बहुत मानसी संतोषला ॥१९॥
तो विश्रवा ब्राह्मण । तेजे तपें ज्ञाने पूर्ण ।
मृदु मंजुळ वचन । संतोषोनि बोलिला ॥२०॥
अवो भद्रे तू कोणाची कोण । कोण पिता काय अभिधान ।
तुज येथे यावया काय कारण । समूळ कथन मज सांगे ॥२१॥

तिने आपले मनोगत सांगितले :

ऐसे ऐकोनि ऋषिवचन । कैकसी दोनी कर जोडून ।
म्हणे स्वामी तू सर्वज्ञ । आत्मप्रभावें गुण जाणसी ॥२२॥
वचन ऐकोनि पितयाचे । मज येणे झाले सांचे ।
कैकसी नाम या देहाचें । तुम्ही सर्वज्ञ जीवींचे जाणतसां ॥२३॥
ऐकोनि तियेचा शब्द । मुनि ध्यानस्त झाला स्तब्ध ।
जाणोनि तियेचा भाव शुद्ध । काय आपण बोलतसे ॥२४॥

तुला राक्षसपुत्र होतील असे ऋषींचे सांगणे :

अवो चंद्राने अवधारी । तुज पुत्र पाहिजे तरी ।
तू आलीस हे वेळा आसुरी । राक्षस पुत्र तुज होती ॥२५॥
ते बळियाढे दुर्वृत्ती । देवा अत्यंत त्रास देती ।
क्रूररुपे उन्मत्त होती । जाण निश्चिती कैकसी ॥२६॥

आपल्यासारखा धर्मनिष्ठ , तपस्वी पुत्र व्हावा म्हणून कैकसीची प्रार्थना :

ऐकोनि द्विजाचें वचन । हात जोडोन करी विनवण ।
स्वामी तुम्हांसारिखे नंदन । माझे उदरी जन्मावे ॥२७॥
तुम्ही शांत दांत संपूर्ण । तपें तेजे अति दारुण ।
सर्व भूतीं दया संपूर्ण । ऐसे संतान मज देई ॥२८॥
दुराचारी पुत्र होती । तेणे पितृगण नरकीं बुडती ।
तयांचे जे पुत्र म्हणती । ते निश्चिती मंदबुद्धि ॥२९॥
ऐकोनि तियेचे वचन । संतोषला तपोधन ।
मजसारिखें धर्मिष्ठ जाण । पुत्रनिधान पावसी ॥३०॥
ऋषिवचन वंदोनि शिरी । तेथेंचि राहिली सुंदरी ।
कायावाचामनेंकरीं । सेवा तिळभरी न सांडी ॥३१॥

तिच्या पोटी रावणाचा जन्म :

सेवा देखोनि दारुण । पुत्र जन्मविता झाला आपण ।
तये काळी झाले जनन । सावधान अवधारा ॥३२॥
दशशीर्ष विंशति भुजा जाण । दाढा विक्राळ विशाळ वदन ।
ओष्ठ वीस आरक्तवर्ण । काया जैसी काजळगिरि ॥३३॥
स्कंधावरी दिसती शिरें । जैसी पर्वतांची शिखरें ।
तीही अत्यंत भयासुरें । अति उग्र तेज पै ॥३४॥
ऐस जन्मता ते क्षणी । माता देखती झाली त्यालागोनी ।
भयानक गजबजोनी । सावधान हो उनी पहातसे ॥३५॥

जातमात्रे ततस्तस्मिन्जज्वाल कठिनः शिवः ।
क्रव्यागाश्चापसव्यानि मंडलानि प्रचक्रिरे ॥१॥
ववर्षू रुधिरं मेघा रटंतो भैरवान्स्वनान् ।
न प्रकाशति खे सूर्यो महोल्काश्चापि खेऽपतन् ॥२॥
अथ नामाकरोत्तस्य पितामहसमः पिता ॥३॥

रावण जन्मताच भयानक अपशकुन :

कैकसी ते प्रसूत झाली । भयानक पुत्र प्रवसली ।
पुढे काय कथा वर्तली । सावधान अवधारा ॥३६॥
जन्म पावतांच राक्षस । तेथे उत्पात झाले बहुवस ।
भालुवा भुंकती अरण्य उद्वस । तैसे नगर दिसते झाले ॥३७॥
दश दिशा ज्वाळाकुळित । गीधमंडळी अपसव्य फिरत ।
पर्जन्य रुधिरें वर्षत । मेघ गर्जत भयानक ॥३८॥
खमंडळीं अद्भुत ध्वनी । सूर्य न प्रकाशे गगनी ।
नक्षत्रे पडती च्यवोनी । कंप मेदिनीं होतसे ॥३९॥
यानंतरें चतुरानन । पहावया तेथे आला जाण ।
देखता दशशीर्ष वीस नयन । जातक आपण वर्तविता झाला ॥४०॥
पेंचद्वय शीर्श दशद्वय नयन । विंशति भुजा तेजस्वी जाण ।
तयाचे दशग्रीव अभिधान । आता कुंभकर्णजनन अवधारा ॥४१॥

कुंभकर्ण , शूर्पणखा व बिभीषण यांच जन्म :

तदनंतरे जन्मला कुंभकर्ण । जयाच्या बळा न करवे वर्णन ।
आणिक दृष्टांत नाही जाण । पुढे ऐसा न होईल पै ॥४२॥
तयाउपरी एक कुमारी । जन्मली शूर्पणखा विक्राळ भारी ।
जियेच्या मुखाची वर्णू थोरी । तरी ते प्रथमचि भयानक ॥४३॥
तदनंतरे एक पुत्र । धर्मपरायण अति पवित्र ।
सर्वा भूती हितरत । नाम तयाचे बिभीषण ॥४४॥
तयाउपरी ते कैकसी । तिघे पुत्र एक कन्येसी ।
बसवोनियां वनवासी । वाढविती झाली पुत्रांप्रति ॥४५॥
ज्येष्ठ पुत्र रावण । अत्यंत क्रूर कपटी जाण ।
दुसरा तो कुंभकर्ण । त्रैलोक्यी पीडन करिता झाला ॥४६॥
याचेनि भये ऋषी । लपताति दशदिशीं ।
मारुनि तो ब्राह्मणांसी । भक्षि विचरे वनामध्यें ॥४७॥
बिभीषण धर्मात्मा जाण । करिता झाला वेदपठण ।
इंद्रियनेमस्त सज्ञान । पुण्यपावन तो झाला ॥४८॥
कोणे एके काळी धनेश । विचरत आला सावकाश ।
पितया पहावया उद्देश । तया काळी तो आला ॥४९॥
आरुढोनि पुष्पकावरी । कुबेर येत तया अवसरी ।
चालिला जैसा वज्रधारी । चित्रवनीं क्रीडेतें ॥५०॥

कुबेराच्या ऐश्वर्याचे वर्णन कैकसी रावणाजवळ करिते :

तया देखोनि कैकसी । झाली अत्यंत उल्लासी ।
मग म्हणे रावणाशी । हा बंधु कुबेर तुझा ॥५१॥
ऐक गा ये दशग्रीवा । काय सांगू याच्या वैभवा ।
वंशीं पुत्र ऐसा व्हावा । भाग्ये ऐश्वर्यकरोनी ॥५२॥
एक वंशी पुत्र होती । ते पूर्वजांतें तारिती ।
ऐक लेंक म्हणविती । अधःपाता नेती पूर्वजां ॥५३॥

तसे ऐश्वर्य संपादण्याची रावणाची प्रतिज्ञा :

ऐकोनि मातेचे वचन । हृदयी खोचला रावण ।
म्हणे माते मी आपण । कीर्ति करीन अगणित ॥५४॥
वैश्रवणाहूनि विशेषेंसी । ऐश्वर्य भोगीन स्वबळेंसीं ।
तरीच जन्मलो तुझिये कुसीं । संशय धरूं नको ॥५५॥
आपुलेनि जाण वैभवें । स्वर्गींचे देव लावीन सेवे ।
यदर्थी सत्य मानावे । मनी न म्हणावे हे मिथ्या ॥५६॥
कुबेरासारिखें तत्काळ । भोगीन संपत्तीचें फळ ।
हे माझे वाक्य अचळ । अढळ जाण केवळ जननीये ॥५७॥

रावण कुंभकर्ण यांचे गोकर्ण आश्रमास आगमन :

ऐसे वदोनि मातेप्रती । दोघे निघाले शीघ्रगती ।
गोकर्णनाम आश्रमस्थिती । तया स्थळाप्रती पै आले ॥५८॥
गोकर्णनामे आश्रम । परम पवित्र विश्राम ।
जेथे सिद्ध योगीश्वर मनोरम । चारण जेथे वसती ॥५९॥
दोघे बंधु समवेत । तेथे स्वस्थ करोनि चित्त ।
करिते झाले तो कार्यार्थ । सावचित्त अवधारा ॥६०॥
इति श्रीवाल्मीककृत । रामायण उत्तम ग्रंथ ।
ते हे उत्तरकांडकथामृत । सज्जन संत रिझोत ॥६१॥
श्रीरामकथेचा महिमा । जाणे ज्याची स्त्री उमा ।
एका जनार्दना एकनामा । भिन्न भाव मुळींच नाही ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणकुंभकर्णशूर्पणखाबिभीषण उत्पत्तिर्नाम नवमोऽध्यायः ॥९॥
ओंव्या ॥६२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥६५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग