॥ श्रीएकनाथमहाराजकृत
73.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय त्र्याहत्तरावा ॥
सीतेचे पाताळात आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
वानरसेनेसी श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।
अयोध्ये येवोनि कार्यार्थ । पुढे काय वर्तला ॥१॥
मारोनियां कुंभकर्णपुत्र । विजयी झाला श्रीराम जानकीसहित ।
ऐसे ऐकोनि महंत । थोर थोर येते झाले ॥२॥
आले विबुध सुधापानी । आला अगस्ति ज्याची जननी ।
उर्वशी नामे प्रसिद्ध ॥३॥
ऐसिये शरयूतीरपुराभीतरी । सभासदनीं पौलस्त्यारी ।
बंधुपुत्रवेष्टित ऋषीश्वरी । बैसजेल निजस्थानीं ॥४॥
कौसल्यादि माता जाण । पूरवासी नागरिक प्रधान ।
श्रीगुरू वसिष्ठ पावन । यांहीं विराजमान शोभत ॥५॥
जेंवी इंदुमंडळा पुढे मागे । परिवेष्टित तारागणें अनेगें ।
तैसे समस्तांसहित श्रीरंगें । सभासदानीं शोभिजे ॥६॥
जेंवी मानससरोवरी । पक्षिये मुक्ताफळाहारी ।
जेंवी सुधापानियांमाजी शैलारी । तैसा राजेश्वरीं शोभे श्रीराम ॥७॥
कुळाचळामध्ये हिमगिरी । की समुद्रामध्यें पयोधरी ।
समस्त धातूंच्या शिरी । शोभे सुवर्ण पै जैसे ॥८॥
की श्वापदांमाजी शार्दूळ । की लतामृगांमाजी अंजनीबाळ ।
की अवतारांमध्यें विशाळ । त्रिविक्रम पै जैसा ॥९॥
की तापसियांमाजी धूर्जटी । की ऋषींमाजी तपे ज्याची काठी ।
की जापकांमाजी दुजा सृष्टी । कर्ता विश्वामित्र ॥१०॥
की मुनींमाजी नारद । की पांडवांमाजी धर्म अगाध ।
की मुक्तींमाजी सायुज्यपद । तैसा अगाध शोभे श्रीराम ॥११॥
ऐसिये सभामंडळी । मध्ये कैकेयी बोलली ते काळी ।
ते अवधारावे सकळीं । आश्चर्य एक वाटतसे ॥१२॥
जानकीचे रुप यौवनें । भुलली कनकाची हरिणें ।
राज्य त्यागून रावणे । भिक्षुक होवोनि हरूं आला ॥१३॥
एवढे इचें सौंदर्य साजिरे । पक्षी भुललें कंठाक्षरें ।
ती जानकी वल्कांबरे । वेढोनि अशोकीं कैसी होती ॥१४॥
परिवेष्टित विशाळा क्रूरे । रक्षणें ठेविली दशकंधरें ।
तेथे इणें निजसामर्थ्याद्वारें । निजसत्व राखिलें कैसे ॥१५॥
जे तारुण्यें मुसमुसी वनिता । परदेशी दृष्टसंगें असता ।
तिचा पतिव्रताधर्म । हे थोर आश्चर्य होतसे ॥१६॥
कैकेयीच्या वचनानें जानकी दुःखित :
ऐसे कैकेयीचे कुरासवचन । ऐकोनिया समस्त जन ।
विस्मय पावोनि अधोवदन । जानकी पै बैसली ॥१७॥
सापत्न सासूचे वाग्बाणीं । हृदयी खोंचली जनकनंदिनी ।
जेंवी अनिळें कर्पूरजननी । थरारूं लागे निजांगें ॥१८॥
जेंवी कुवायूचेनि प्रसंगें । समुद्री नौका बुडूं लागे ।
नातरी दुर्जनवचनें भंगे । चित्तवृत्ती साधूंची ॥१९॥
हरिकथेचा मांडिला रंग । तेथे कुवार्ता येता रसभंग ।
तैसे कैकेयीवाग्बाणें जग । जानकीसहित भेदिले ॥२०॥
की तापसियावरी कामबाण । की पंडितांपुढें दुर्जन ।
तैसे कैकेयीशब्दें जन । जानकीसहित दुखावले ॥२१॥
उरगमाथां काटा नेहटे । की पालीचें पुच्छ तुटे ।
की पतिवियोगें फुटे । वनितेचें हृदय जैसे ॥२२॥
यापरीच ती राजबाळा । अधोवदन निस्तेजमुखकमळा ।
वहोट पडला सुखकल्लोळा । अमांतीं चंद्र जैसा ॥२३॥
सरोवरीं शोषलिया जीवन । कमळिणीं जाय सुकोन ।
तैसे जानकीचे हृदय गहन । चिंतासर्पिणीनें चाटिलें ॥२४॥
म्हणे आता काय कारणे । किती वेळा दिव्य देणे ।
मी जरी शुद्ध अंतःकरणें । तरी या लोका विपरीत वाटतसे ॥२५॥
सत्यवादी पहा जन । सोपहास मिथ्या वदोन ।
असंभाव्य देवोनिं मान । सत्य भाषण म्हणती त्याते ॥२६॥
तैसिया लोकांची वर्तती स्थिती । त्यासी निंदणें हेचि अयुक्ती ।
आपलें प्रारब्ध भोगती । अवश्यभावे भोगावें ॥२७॥
प्रारब्धें दमयंतीनळां । प्रारब्धें हरिश्चंद्रभूपाळा ।
प्रारब्धे पांडुपुत्रां सकळा । विवरद्वारें पै नेलें ॥२८॥
बंधु जियेचा श्रीहरी । ऐसी ते द्रौपदी सुंदरी ।
वस्त्रे हरोनि दुराचारी । सभेमाजी नग्न करिते झाले ॥२९॥
तरी आता प्रारब्ध प्रमाण । अवश्य भोगणें पडिले जाण ।
कैकेयी बापुडे ते कोण । मजसी कठिण बोलावया ॥३०॥
ऐसे विचारोनि सीता देवी । मनाते विवेकमार्गीं लावी ।
पुढील कथा ते परिसावी । चतुर पंडितादिकीं ॥३१॥
जानकीची पृथ्वीला प्रार्थना :
जानकी म्हणे अवो धरणी माय । पुढे म्या आता काय करावे ।
तुवा मज हावोनि साह्य । ठाव द्यावा निजहृदयीं ॥३२॥
जन्मले मी तुझ्या उदरी । वाढलें विदेहाचे घरी ।
नांदलें निजभाग्येकरीं । श्रीरामाची सेवा करुन ॥३३॥
काया वाचा निजमानसें जाण । आराधिला असेल श्रीरघुनंदन ।
तरी मज देई वस्तीसी स्थान । आपुलिये हृदयकमळीं ॥३४॥
पूर्वी म्या लंकेच्या प्रदेशीं । दिव्य दिधले देखता जगासी ।
तै मिळाले होते महाऋषी । आणि इंद्रादि देवगण ॥३५॥
ब्रह्मा शिव आणि सुधापानी । आणि मिळाली होती कपिवाहिनी ।
या समस्ता देखता प्रवेशोनि अग्नीं । दिव्य दिधले श्रीरामा ॥३६॥
तरी आता तेचि असती समस्त । तयांसी कळेल माझे मनोगत ।
परी न सोडी प्रारब्ध बळवंत । ठाकोनियां पुढे आले ॥३७॥
जैसा दरिद्री आयास करी । उदीम न करी श्रमाचि उरी ।
तैसी मी निष्पाप जरी । तरी प्रारब्धभोग पुढे पावे ॥३८॥
निर्दैवें साधितां निधान । पुढे ठाके एखादें विघ्न ।
तैसे माझे दिव्य दारुण । मिथ्या गेले जनवाणी ॥३९॥
करांडिता नारिकेळासी । चंचु चिरोनि झाली कैसी ।
तो शुक पुन्हा त्या वृक्षासी । कल्पांतीहीं न शिवे ॥४०॥
तरी या समस्ता देखता जाण । माये धरणीचें हृदय प्रवेशून ।
साहिला न वचे निंदापमान । मिथ्यापवाद जनाचा ॥४१॥
ऐसे विचारोनि राघवसुंदरी । करुणावचनीं प्रार्थना करी ।
म्हणे माये अवनिये उदरी । ठाव देई मजलागी ॥४२॥
मी वो तुझे अपत्य तान्हें । कृपा करी मज उदार मनें ।
तुवा धरिली चतुर्दश भुवनें ।अगाधपणें निजहृदयीं ॥४३॥
तुवा हृदयींची परम वाड । उदरी धरिला विरंचिअंड ।
सप्तसागर गिरी प्रचंड । तुझिये कुक्षीमाजी वसती ॥४४॥
अठरा भार वनस्पती । आणि विरंचीची प्रपंचस्थिती ।
या सकळा तू जीवविती । ऐसी तुझी थोरीव ॥४५॥
ऐसे तुझे अगाधपण । तुझे ठायी शांति दया पूर्ण ।
नाही मान्यता मानापमान । हे थोरपण तुज ऐसे साजे ॥४६॥
तुजलागी जाळिती पोळती । चिरोनियां विदारिती ।
तयांतें तू मिष्टान्नदाती । होतेसी उदारपणे ॥४७॥
तुजवरी एकी स्वधर्मचरण । केले त्याचा नाही अभिमान ।
गुजियानें कओर्नि आनेआन । तयाचा खेद न वाहसी ॥४८॥
एक तुजलागीं आर्तै पूजिती । दुजे लातांवरी तुडविती ।
त्यांचा न मानिसी विषमभाव चित्ती । न धरिसी गंगेसारिखा ॥४९॥
तरी मी तुझे हृदयींचे बाळ । तू माता परम दयाळ ।
मज हॄदयीं राख ये वेळ । अपत्य दीन म्हणोनि ॥५०॥
जरी म्या निर्मळ मनें श्रीरघुनाथ । आरधिला असेल सत्य ।
तरी तू ठाव देई कृपायुक्त । निजअपत्य म्हणोनी ॥५१॥
लक्ष्मण ब्रह्मचारी । शेषावतार निर्धारी ।
हे सत्य असेल निश्चये तरी । निजोदरीं मज सांठवीं ॥५२॥
पांचाळी जे द्रुपदतनया । जे का पांचा पांडवांची जाया ।
सत्य पतिव्रता म्हणती तिया । प्रातःस्मरणी योगीश्वर ॥५३॥
पतिव्रता अनसूया इर्धारें । पतिचरण प्रक्षाळॊनि उरलेनि नीरें ।
ब्रह्मा विष्णू माहेश लेकुरें । पायावरीं न्हाणिलीं ॥५४॥
ते अनसूया आदिशक्ती । तिचे पुण्ये मज धरित्री ।
ठाव देईल काकुळती । देखोनि ग्लांती पै माझी ॥५५॥
नैष्ठिक बटु अंजनीतनजु । कपिवाहिनीचा दक्षिणभुज ।
सत्य तरी तू मज । निजहृदयीं राखावे ॥५६॥
ब्रह्मतनया अहल्या जाण । हे का गौतमगृहींचें मंडण ।
इंद्रें भोगिली करोनि छ्ळण । ऋषिशापें पाषाण पै झाली ॥५७॥
ते पविव्रता म्हणती पुराणीं । वदतसे व्यासादिकांची वाणी ।
तियेचे पुण्यें हे धरणी । निजहृदयीं सांठवो माते ॥५८॥
सद्गुरु वसिष्ठ ब्रह्म पूर्ण । ऐसे बोले वेदपुराण ।
जरी म्या केले असेल् भजन । तरी मार्गदान मज दीजे ॥५९॥
गुरु माता गुरु पिता । सद्गुरूवांचोनि नाही दुजा तारिता ।
ऐसी सत्य वाचा असेल तरी आता । पृथ्वी मार्ग देईल ॥६०॥
सीतेचा धरणीत प्रवेश :
ऐसे जानकीमुखीम्चें वचन । ऐकोनि धरा उल्हासोन ।
भाग्यद्वय झाली कारण । देखोनिया सीतेचे ॥६१॥
जेंवी स्वातीचे जळतुषारें । भागद्वय शिंपला अति आदरे ।
होवोनियां उदरी नीरें । समावित वर्षाकाळीं ॥६२॥
जेंवी गौतमभगीरथसामर्थ्ये । भागद्वय गंगा आणिली येथे ।
पुढे पूर्वसमुद्रातें । मिश्रित होवोनि मिनलिया ॥६३॥
तैसी दो ठायी झाली धरणी । ऐसे देखोनि श्रीरामपत्नी ।
नमस्कार करोनि सभासदनीं । श्रीगुरु मनी चिंतिला ॥६४॥
हृदयी धरोनि श्रीरामध्यान । नमस्कारोनि सिंहासन ।
धरणिये करोनि नमन । पुढे काय देखती झालीं ॥६५॥
अवलोकोनि पृथ्वींत पाहे । तो रत्नजडित सिंहासन माथा आहे ।
ऐसा एक पुरुष गमताहे । जानकीस ते समयी ॥६६॥
माथा घेवोनि सिंहासन । तिष्ठत उभा राहोन ।
जेंवी स्वामिकार्यार्थ लक्षोन । सेवेसी भृत्य राहे ॥६७॥
पूजावया कैलासपती । पूजासंभार सेवका हाती ।
घेवोनि निघे सहित पार्वती । पाताळभुवनातें ॥६८॥
पाताळी वसे हाटकेश्वर । तयाचे पूजेलागी विद्याधर ।
सेवकमाथां नाना उपचार । देवोनियां जात जैसे ॥६९॥
किंवा शेष घेवोनि पृथ्वीभार । की कूर्मे पृष्ठ करोनि कठोर ।
तैसे माथा सिंहासन सुंदर । पुरुष एक उभा असे ॥७०॥
ऐसा अवनीच्या जठरी । रत्नसिंहासन घेवोनि शिरी ।
उभा तिष्ठत प्रतीक्षा करी । ते जानकीने देखिले ॥७१॥
संतोष झाला अति मनी । म्हणॆ मज हे तुष्टली अवनी ।
शेषमाथां सिंहासन देवोनी । मज मूळ पाठविले ॥७२॥
ऐसे भावोनि ते समयी । जानकी सिहांसनीं बैसली पाही ।
मग प्रवेशती झाली हृदयी । पृथीचिये ते काळी ॥७३॥
भागद्वय अवनी एक झाली । जैसी स्वातीजळें शिंपीमुखें मिळाली ।
याउपरी कथा वर्तली । ते श्रोती सादर ऐकिजे ॥७४॥
समस्ता झाले आश्चर्य । तटस्थ ठेले ऋषिवर्य ।
स्वर्गवासी देव सर्व । पुष्पवर्शाव करिते झाले ॥७५॥
सीतेच्या गमनामुळॆ सर्वांस दुःख :
वानरा झाले परम क्लेश । हनुमंता खेद बहुवास ।
दुःखे दाटला जगदीश । जानकीच्या गमनें हो ॥७६॥
चिंतातुर समस्त माता । सुख पावली कैकेय दुहिता ।
देव म्हणती चतुर सीता । किती अपवाद सोसील ॥७७॥
ऐसे वर्तले ते समयी । देखोनि श्रीराम शोकार्णवांत पाही ।
शोक करिता झाला वैदेही । हातींची गेली म्हणीनी ॥७८॥
अवो प्रिये तुजकारण । खडतर सेविले अरण्य ।
पादपां पाषाणां आलिंगन । भ्रमोनियां देत होतो ॥७९॥
श्वापदां पुसें सीता कोठे । उल्लंघी खेटे खर्वटे ।
पायी मोडती दीर्घ कांटॆं । पडे उठें मूर्छित ॥८०॥
सीता सीता आक्रंदोनी । दश हिंडें मेदिनीं ।
मार्गीं भेटे तयालागोनी । पुसें जानकी कोणी देखिली ॥८१॥
तुजलागीं वानरासी सख्य केले । तुजलागीं समुद्र शिळीं बुजिले ।
तुजलागीं अराक्षसी केले । रावणा वधोनि लंकेसी ॥८२॥
विराधें हरिले जे काळी । तै अवेक्षितां वनस्थळी ।
राक्षस वधोनिया धुळी । क्षणामाजी मेळविला ॥८३॥
चित्रकूटी काकें शतविक्षत केले । तयावरी म्या ईशिकेतें मोकलिले ।
पुढे काग मागे ईषिका पाताळॆं । हिंडोनियां स्वर्गा गेली ॥८४॥
नारदवचनें तुज शरण । काग म्हणॆ ईषिका निवारीं दारुण ।
ग्लांति देखोनि माझे स्तवन । तयालागीं त्वा केले ॥८५॥
तुझेनि वचनें तया न मारून । वामनेत्रास त्याच्या केले छेदन ।
ऐसी आज्ञा प्रमाण । म्या नाही उल्लंघिली ॥८६॥
ते तू आजि का वो रुसलीस । मज सांडोनि पाताळा गेलीस ।
तरी तुज काय पातले यश । पतिवचनास उल्लंघूनि ॥८७॥
मी काय तुझे चुकलों । कोणे अन्याया आचरलों ।
पूर्वी लोकलाजे भ्यालों । वना पाठाविलें म्हणोनी ॥८८॥
अवो अवनिये अवधारी । माझी सीता तुझे उदरी ।
जन्मलीं तुं माझी सासू खरी । जानकी पाठवीं मजपासीं ॥८९॥
तुझे उदरीम् उत्पन्न । झाली सीता निश्चये जाण ।
तरी आता पुनरपि दान । देई वो तू मजलागी ॥९०॥
ऐसी करुणा करिता राजीवनयनें । दुखावलीं समस्तांची मनें ।
गाईं दांतीं न धरती तृणें । न पीता जीवनें सीताविरहे ॥९१॥
क्रोधा चडला कार्मुकपाणी । अग्निबाण लावोनि गुणी ।
म्हणॆ पूर्वी सांडिली दाहोनी । पुनरपि दग्ध करीन ॥९२॥
माझी प्रिया हरिली इणें । न बोले मजसी धरोनि मौनें ।
नवखंड करीन एक्या बाणॆं । रुद्रावेशें कोपला ॥९३॥
कोपला देखोनि चापशरपाणी । देव चिंतातुर मनी ।
तंव विधाता पुढे होवोनी । बोलता झाला श्रीरामासी ॥९४॥
ब्रह्मा म्हणॆ श्रीरामचंद्रा । अरिदळणी प्रतापरुद्रा ।
कल्याणवंता भुजंगशयना राजेंद्रा । वचन गुणसमुद्रा अवधारी ॥९५॥
अनंतब्रह्मांडांचा नायक । भास्करकुळी कुळदीपक ।
पुण्यश्लोक त्र्यंबक । तुज ध्यात हृदयकमळीं ॥९६॥
तू या चराचराभूतां प्रतिपाळिता । तुं या सकळा भूतां स्रजविता ।
प्रळयांती संहार करिता । कळीकाळा माथा आज्ञां तुझी ॥९७॥
तो तू लीला सूत्रधारी । अवतार धरीसी नानापरी ।
विरंचिअंडांची माळ तुझ्या उदरी । रोमरंथ्रीं भासत ॥९८॥
ऐसा तू कैलोक्यनायक । अवतरोनि मायाकौतुक ।
खेळ खेळसी वाल्मीक । वदला होता पूर्वी जे ॥९९॥
अनागत भाष्य़ ऋषीश्वरें । वाल्मींकें कथिले ब्रह्मवरें ।
शोधोनि पाह्लें विभागद्वारें । तीन अंश पै केले ॥१००॥
ती हे कथा येथपर्यंत । वाल्मीकमुखींची झाली सत्य ।
पुढे आता उरली किंचित । ते अनुपम्य पै असे ॥१०१॥
ते श्रवण करावया अधिकारी । नाहींत जीव पृथ्वीवर ।
श्रीरामकथा अमृतलहरी । ऐकावया पुण्य पाहिजे ॥१०२॥
आकाशवाणी :
ऐसे शब्द चतुरानने । वदत असता मार्गगगनें ।
वाणी झाली ती रघुनंदने परिसिली विधात्यसहित ॥३॥
ते वाणीचें रूप कैसे । तीस देह शिर वाचा नसे ।
अव्यक्त परी व्यक्त जैसे । वदे एखादा आगळें ॥४॥
आप्त एखादे अवस्री । संकटा हितोपदेश करी ।
तैसी ते समयी वाचा अशरीरी । काय म्हणती पै झाली ॥५॥
वाणी नव्हे ती गंधर्वनगरींची देवता । दुःखित देखोनि जामदग्न्यजेता ।
संबोधूं आली आप्तता । निजदुहितेच्या पतीतें ॥६॥
वाणी नव्हे ती कुळस्वामिनी । दुःखित श्रीरघुनाथ देखोनी ।
संबोखोनी हितवचनीं । काय बोलती पै झाली ॥७॥
वाणी नव्हे हे कालरात्री । संबोखावया श्रीरघुपती ।
आश्वासनातें झाली देती । हितोपदेशवचनेंकरोनी ॥८॥
वाणी म्हणे श्रीरघुनंदना । पूर्णब्रह्म सनातना ।
योगियांच्या विश्रामस्थाना । कैलासरमणा प्रियकरा ॥९॥
भक्तजनभयभंगा । महेशाच्या प्राणलिंगा ।
भरतादिबंधुवर्गा । प्रियकरा श्रीरामा ॥११०॥
मदनाचिया तू जनका । वैदेहीच्या प्राणनायका ।
मिथ्या सांडीं या शोका । उरग त्वचा पै जैसी ॥११॥
वाल्मीकमुखीचें हे निरुपण । संपूर्ण कथिले रामयण ।
ते हे झाले सत्य जाण । किंचित शेष उरलेंसें ॥१२॥
ते आकर्णिजे रविकुळभूषणा । अनागत भाष्य़ रामायणा ।
अधिकार नाही ये चराचरी । पुत्रांसमवेत रावणारी ।
एकांती स्रवण पै कीजे ॥१४॥
जानकीच्या वियोगे गहन । दीर्घ दुःख करणे मिथ्या जाण ।
तू परमात्मा श्रीनारायण । लीला दाविसी नानापरी ॥१५॥
लक्ष्मी लागीं ये लोकी । पुनश्चरणें साधकीं ।
करिजेताती ते लक्ष्मीनिकी । वैकुंठीं पै वसताहे ॥१६॥
घेवोनि मायेची बुंथी । बहुरूपी सोंगे संपादिती ।
तैसी तुझी अवतारस्थिती । नाना चरित्रें दाखविसी ॥१७॥
तुझी भार्या हरिली रावणे । हे मिथ्या बोलावयाकारणें ।
लटकें जगी मिरवणें । ऐसा खेळ खेळसी ॥१८॥
वृक्षापासोनियां छाया । हरिली हे बोलणॆं वाया ।
तैसी रावणे हरिली जाया । हे लौकिकी उरलेंसे ॥१९॥
अमृतापासोनि गोडी । कोण चतुर बाहेर दवडी ।
सुवर्णांची कीळा काढी । ऐसे काय घडेल ॥१२०॥
मक्षिका सर्व रस चाखे । अग्नी भक्षितां मरण ठाके ।
उन्मत्त झालेनि जंबुके । सिंहा काय जिंतवेल ॥२१॥
ऐसी लंकेशें तुझी भार्या । हरिली मिथ्या रघुराया ।
आपुलें पूर्णत्व शोधोनिया । निजस्थिती राहे उगा ॥२२॥
आकाशवाणीचीं ऐसी उत्तरें । परसोनियां श्रीरघुवरें ।
सभा विसर्जून दोन्ही पुत्र करे । धरोनी देवगृहीं प्रवेशला ॥२३॥
सद्गुरु वसिष्ठासमवेत । देवगृहीं प्रवेशला रघुनाथ ।
एका जनार्दना विनवीत । सावचित्त परिसावे ॥१२४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
जानकीपातालगमनं नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः ॥७३॥ ओंव्या ॥१२४॥
