॥ श्रीएकनाथमहाराजकृत
6.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सहावा ॥
राक्षस व विष्णूचे युद्ध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
इल्वलारी म्हणे जामदाग्निजिता । कमलोद्भवजनका ऐके पूर्वकथा ।
वर देता तयांसी सृष्टीकर्ता । त्यासही तत्वता न गणिती ॥१॥
वरदे उन्मत्त होवोन । करिते झाले अन्योन्य ।
ऋषींस दुःख देऊन । यागविध्वंसन पै करिती ॥२॥
राक्षसांच्या उन्मत्तपणामुळे त्रस्त होऊन
ऋषिमंडळी शंकराकडे आली, शंकराची प्रार्थना :
ऐसे राक्षसभयेंकरी । विप्रीं कडे कुमर हाती क्कारी ।
यज्ञपात्रें स्त्रियांचे शिरी । कैलासपुरी ठाकिली ॥३॥
आले वृद्ध थोर थोर । सपत्नीक अपत्नीक विधुर ।
तपें जर्जर झाले शरीर । ब्रह्मचारी थोर तेथे आले ॥४॥
आले मौनी दिगंबर । माथा जटा वल्कलांबर ।
तपोधन थोर थोर । भगवी कापडी येते झाले ॥५॥
राक्षसभयेंकरोनि ऋषी । येते झाले महेशापाशीं ।
विनविती स्वामी शरणागतासी । रक्षी रक्षी म्हणोनिया ॥६॥
कपर्दिना त्रिलोचना । कामारि त्रिपुरदहना ।
गंगाधरा पंचवदना । दीनजना रक्षावें ॥७॥
गजमुखजनका शैलजापती । श्शिशेखरा सर्वांगविभूती ।
नंदिवाहना वासुकी शोभती । भक्तांप्रती कृपाळुवा ॥८॥
हात जोडोनियां तुजप्रती । आम्ही करितसो विनंती ।
ब्रह्मवरदें राक्षस मंदमती । दुःख देती ब्राह्मणां ॥९॥
भक्तपति पारवतीरमण । प्रजांतें करिताती दंडन ।
निरपराध्यांतें अपराध ठेवून । त्यांते ताडन पै करिती ॥१०॥
हिंरोनि इंद्राचे अधिकार । स्वर्गी क्रीडती जैसे इंद्र ।
म्हणती आम्हीच ब्रह्मा विष्णू रूद्र । यम कुबेर पै आम्ही ॥११॥
ऐसे माळी सुमाल्यवंत । वरदे होवूनि उन्मत्त ।
संग्रामी बोलता पुरूषार्थ । अति गर्वित अभिमानें ॥१२॥
तुजवांचोनि गंगाधरा । आम्हा सोयरा नाही दुसरा ।
आमच्या विपत्ति सांगता चतुरा । लज्जा अंतरा येतसे ॥१३॥
आता आम्हा अभय द्यावे । राक्षसभय निवारावे ।
गाई ब्राह्मणां स्वस्थ करावे । यश मिरवावें तिही लोकी ॥१४॥
शंकरांनी सर्वांना विष्णूकडे पाठविले :
ऐकोनिया तयांचें वचन । संतोषला शैलजारमण ।
मृदु मंजुळ शब्देकरुन । काय आपण बोलत ॥१५॥
मी न मारीं तयांसी । माझेनि मृत्यु नाही तयांसी ।
जरी मज पुसतां तुम्ही ऋषी । तरी उपाय यासी सांगेन ॥१६॥
ऐकोनि महादेवाचें वचन । आनंदले तपोधन ।
जी स्वामी कृपा करुन । दिनजन रक्षावे ॥१७॥
शिव म्हणे तयांसी । तुम्ही जावे विष्णूपासी ।
सकळ सांगावे वृत्तांतासी । तो तुम्हांसी रक्षील ॥१८॥
जैसे रोगी रोगें पीडिले । उपरी धन्वंतरीचे दर्शन झाले ।
तेणे शब्दरसायनें हरिले । कुपथ्यभय देहीचें ॥१९॥
शिववचनीं संतोषोन । मिळोनि सकळही ऋषिजन ।
जयजयशब्दें गर्जोन । ऊर्ध्वगमन तिही केले ॥२०॥
जैसा उगवोनि तमारी । निशी पळे भयेंकरीं ।
तैसे ऋषींस भय भारी । ते कामारिवचनें निरसिले ॥२१॥
विष्णूस शरण जाऊन त्याची स्तुती :
आले विष्णूस शरण । करिते झाले साष्टांग नमन ।
स्तवन आदरिले गुणवर्णन । कर जोडून ते काळी ॥२२॥
जयजयाजी जगद्गुरू । जयजयाजी निर्विकल्पतरू ।
जयजयाजी तुझा पारू । नेणे विधाता श्रुतिशास्त्रे ॥२३॥
जयजयाजी गुणातीता । जयजयाजी श्रीअनंता ।
जयजयाजी सद् गुरू अच्युता । देशकाळता तुज नाही ॥२४॥
तू निर्गुण निराकार । तू निष्कर्म निरुपचार ।
तो तू होवोनि साकार । नाना अवतार धरिसी ॥२५॥
निजसामर्थ्ये सृष्टि करी । सृजी पाळी संहारी ।
तो तू मघश्यामरुपेंकरीं । नंदाघरी अवतरसी ॥२६॥
धरोनिया नाना वेष । खेळ खेळसी असमसाहस ।
तू पूर्णब्रह्म अवतारपुरूष । योगिमानसमोहक ॥२७॥
शंख चक्र गदा धरोनि करी । घेवोनि पीतांबराची उत्तरी ।
वैजयंती रुळे वक्षःस्थळावरी । द्विजपाद उरीं वाहसी ॥२८॥
सुंदर सरळ नासापुट । शोभती बाहू बाहूवट ।
चरणी नूपुरांचा बोभाट । अंदू नेटे पै गर्जे ॥२९॥
ऐसी सांवळी सुनीळ मूर्ती । देखोनि ऋषि दंडवत करिती ।
म्हणती स्वामी लक्ष्मीपती । राक्षसी थोर गांजिलें ॥३०॥
राक्षसांविषयी विष्णूंजवळ तक्रार :
रजनीचर म्हणती कोण । सुकेश सुमाळिचें संतान ।
ब्रह्मवरदें उन्मत्त होऊन । अन्योक्त पै करिती ॥३१॥
ऋषींचे आश्रम भंगिले । यज्ञादिक्रिया विध्वंसूं लागले ।
ऋषीश्वर झाले । अतिभयेंकरोनियां ॥३२॥
तेणे भयेंकरीं जाण । आम्ही आलो तुज शरण ।
शरणागतां अभयदान । कृपा करोन पै दीजे ॥३३॥
आणिक एक कमळापती । राक्षस वसती लंकेप्रती ।
दुर्गबळें त्रास देती । उच्छेदिती देवांसी ॥३४॥
लंकादुर्ग अति गूढ । भोंवता समुद्राचा आगड ।
बुरजोबुरजीं यंत्रांचा जोड । परदळा अवघड पै लंका ॥३५॥
ऐसिये लंकेमाझारी । सुकेशपुत्रदुराचारी ।
वरदे उन्मत्त तयांवरी । कणवाचें कांही न चलेचि ॥३६॥
तयांच्या भेणे आम्ही समस्त । महादेवापासी गेलो त्वरित ।
तो म्हणे मी राक्षसा प्रतिपाळित । माझेनि मृत्यु त्या नाही ॥३७॥
मी सांगतो उपायासी । तुम्ही शरण जा विष्णूसी ।
तेणे वचनें आम्ही तुजपासी । यथार्थैसी पै आलो ॥३८॥
तुजवाचोंनि तारिता । आणिक नाही जगन्नाथा ।
तुवा अभय देवोनि आता । राक्षसांतें मारावें ॥३९॥
आपुले चक्रेंकरोनी । राक्षसांची शिरें छेदोनी ।
पाठवावीं यमपुरीलागूनी । रहावया अनुदिनी पै तेथे ॥४०॥
तुझेनि प्रतापलिरणेंकरीं । राक्षसनिशी पळेल दूरी ।
तुजवीण न दिसे कैवारी । शरणागतांवरी कृपा करी ॥४१॥
श्रीविष्णूंचे ऋषींना अभयदान :
ऐकोनि ऋषींचें वचन । संतोषला श्रीजनार्दन ।
तयांप्रति काय आपण । बोलता झाला ते काळी ॥४२॥
ऋषि हो तुम्ही श्रमलेती । राक्षसी बहु गांजिलेती ।
भय सांडोनि आश्रमाप्रती । सुखें वस्ती करावी ॥४३॥
सुकेशपुत्रांतें मी जाणे । तया वर दिधला चतुरानने ।
तिही मरणा दिधले आवंतणें । तपोधन दुःखी करोनि ॥४४॥
स्थानभ्रष्ट केले देवांसी । तिही दंडिलें प्रजांसी ।
विध्वंसिले यागांसी । मोडिलें आश्रमासी ब्राह्मणांच्या ॥४५॥
तयांच्या वधाकरणें । मज अज्न्म्या जन्म घेणे ।
अकर्म्यासी कर्म करणे । निर्गुणासी होणें सगुण पै ॥४६॥
तुम्ही जावे आश्रमाप्रती । स्वधर्मकर्म करा मजप्रीत्यर्थीं ।
सर्वभूती दया शांती । येणे यशकीर्ती होय तुम्ही ॥४७॥
ऐकोनि श्रीविष्णूचें वचन । ऋषि शिरी वंदोनि जाण ।
जयजयशब्दें प्रदक्षिणा । गर्जना करोन निघाले ॥४८॥
राक्षसांच्या हेरांनी ती वार्ता माल्यवंताला सांगितली :
तेथे गुप्त होते राक्षस दूत । ते माल्यवंताप्रती सांगत ।
माल्यवंतें बंधु त्वरित । तयांसी वृत्तांत जाणविला ॥४९॥
ऐका बंधु स्वजन हो । देवऋषींचा मिळोन समुदावो ।
तिही प्रर्थिला कैलासरावो । त्रिनेत्र महादेवो गिरिजापति ॥५०॥
ऋषी म्हणती महादेवासी । राक्षसभये क्षिती झाली क्लेशी ।
तुम्ही वधावें तयांसी । म्हणोनि पायांसी लागले ॥५१॥
महादेव म्हणे तयांप्रती । माझे स्थापित राक्षस असती ।
माझेनि हातें न मरती । शीघ्र विष्णूप्रती तुम्ही जावे ॥५२॥
तुम्ही विष्णूस जावे शरण । तो जाणे भविष्य वर्तमान ।
हे जग तया अधीन । तो स्वामी पूर्ण विश्वाचा ॥५३॥
समस्त मोळोनि आलेति येथ । तैसेंचि तुम्ही जावे तेथ ।
तो भक्तकृपाळु अनंत । उभय देत भक्तांसी ॥५४॥
सकळही मिळोनि ऋषी । ते गेले श्रीविष्णूपासीं ।
म्हणती सुकेशपुत्रीं आम्हांसी । अति त्रासासी दीधलें ॥५५॥
तयांचें वचन ऐकोन । विष्णू बोले हास्यवदन ।
मज ठावे तयांचे उद्धटपण । करीन निर्दळण तयांचें ॥५६॥
तिही मर्यादा सांडिली । ब्रह्मवरदें भुली पडली ।
मी करीन तयांची रांगोळी । तुम्ही सुखसमेळी नांदावे ॥५७॥
विष्णुआज्ञा घेवोनि । देवऋषी समस्त मिळोनि ।
प्रवेशते झाले स्वस्थानीं । ऐसी करणी केली देवी ॥५८॥
विष्णूच्या सामर्थ्याची राक्षसांना धास्ती :
यासी काय कीजे उपाव । जेणे वश्य होतील देव ।
मिळोनि राक्षसमुदाव । विचार स्वयमेव करिते झाले ॥५९॥
आम्हा भय नाही त्रिपुरींचें । ब्रह्मा कांही न करु शके आमुचे ।
एक भय त्या विष्णूचें । त्याप्रति कोणाचे काही न चाले ॥६०॥
पडिले समर्थासी वैर । विष्णु मायालाघवी चतुर ।
तयाते जिंकिजेल ऐसा प्रकार । अणुमात्र दिसेना ॥६१॥
हरी जयाते अंगीकारी । तयाचा घाव यमशिरीं ।
श्रीहरी जयाते अव्हेरी । ते संसारी जीत मेले ॥६२॥
हरिनाम प्रल्हाद स्मरे । तयाते दैत्य पीडी बहु प्रकारें ।
अरिष्टे रचिली महाघोरें । ती नाममात्रें निरसली ॥६३॥
अग्नि विष पर्वतपात । बुडवूं गेले समुद्रांत ।
शस्त्रे मारिता अंगातें । कोठे पुसत श्रीहरि तो ॥६४॥
प्रल्हाद भक्तचूडामणी । म्हणे जळीं स्थळीं काष्ठी पाषाणीं ।
श्रीहरि व्यापक जनी वनी । अवनी गगनी सदोदित ॥६५॥
असुर पुत्राकडे पाहे । ये म्हणे खांबीं आहे ।
येरु म्हणे जेथे जेथे पाहे । तेथे तेथे आहे श्रीहरि ॥६६॥
देत्यें गदा कढोन । खांबा हाणिली क्रोधेंकरुन ।
तंव प्रकटला सिंहवदन । असुराचा प्राण घ्यावया ॥६७॥
असुर धरोनि जानूवरी । रागे उदर तयाचे विदारी ।
अंत्रमाळा कंठी धरी । भक्तकैवारी विष्णू तो ॥६८॥
विष्णूशी युद्ध करण्याचा तिघा राक्षसांचा निर्धार :
ऐसे माल्यवंताचें वचन । सुमाळी माळी ऐकोन ।
करिते झाले विचारण । मुख्य नारायण आम्हा वैरी ॥६९॥
येणे देव घातले पाठीसी । वैर करिते आम्हांसी ।
आम्हा संमुख रहावयासी । पुरुषार्थासी न देखो ॥७०॥
बहुसाल मिळती खद्योत । तरी न जिंकावे रवि एक ।
मार्जार काय व्याघ्रासन्मुख । ठाण मांडोनि राहेल ॥७१॥
पतंग आपुले प्रभेकरुन । काय गिळू शकेल हुताशन ।
पहा हो धेनुचा नंदन । मदगजासीं मिडेल ॥७२॥
कद्रुतनय बहुतेक । विनतातनय तो एक ।
त्याते काय ते मशक । पराभवतील संग्रामी ॥७३॥
आता विबुधांतें पराभविजे । विष्णु भेटला तरी सहजें ।
त्यातेंही रणी जिंकिजे । हेंचि कीजे विचरण ॥७४॥
मग मेळोवोनि समस्त । विचार करोनि निश्चित ।
युद्धा निघावें त्वरित । दूत सांगत घरोघरी ॥७५॥
युद्धा निघती रजनीचर । जैसे वन्हीचे स्फुलिंग अपार ।
यावरी माधव शरतुपार । अति गंभीर वर्षेल ॥७६॥
स्यंदनैर्वारणेंद्रैश्च हयैश्च गिरिसन्निमभैः ।
खरैर्गोभिरथोष्ट्रैश्च शिशुमारैर्भुजंगमैः ॥१॥
मकरैः कच्छपैर्मीनैः विहंगैर्गरुडोपमैः ।
सिहैर्व्याघ्नैर्वराहैश्च चामरैः सामरैरपि ॥२॥
रथोत्तमैरुह्यमानाः शतशोऽथ सहस्त्रशः ।
प्रयाता राक्षसा नूनं देवलोकं जिगीषवः ॥३॥
राक्षससैन्याचे वर्णन :
तेथे राक्षस मिळोनि । सेना असंख्य सज्जूनी ।
विबुध जिंतावे रणमेदिनी । यालागोनी चालिले ॥७७॥
तेथे रथांसी नाही मिती । रत्नजडित ध्वज शोभती ।
कोट्यनुकोटी भद्रजाती । मद गळती उन्मत्तपणॆं ॥७८॥
जैसे महापर्वत । तैसे हस्ती शोभावंत ।
दांती सुवर्णबिंदु रत्नजडित । वरी आरुढ होत रजनीचर ॥७९॥
नाना वर्णांचे उन्मत्त घोडे । त्यांते देखोनि श्यामकर्ण दडे ।
पाखरा झळकती तेणे उजेडें । दश दिशा गाढे तेज फांकलें ॥८०॥
खेचरांसि नाही मिती । बैल कोण जाणे किती ।
उष्ट्रीं आरुढले ते न गणवती । लक्षानुलक्ष राक्षस ॥८१॥
शिशुमारीं एक वळंघोन । एकासि सर्प वाहन ।
एक मगरीं आरुढ जाण । एका वाहन कच्छप ॥८२॥
एकी मीन पालाणिले । एक पक्षियांवरी वळंघले ।
एक सिंहीं सरसावले । एक बैसले वाघांवरी ॥८३॥
एकांचे वाहन सूकर । एका रानबैल अपार ।
एकांचे वाहन सामर । गणनाविचार शतसहस्त्री ॥८४॥
देवांते जिंकावयालागून । त्यजिते झाले लंकाभवन ।
अंगी बळाच अभिमान । राक्षसगण निघाले ॥८५॥
रथांचेनि घडघडाटें । भौममातेचे उदर फुटे ।
नदनायक अंगोळे नेटे । सरिता तडागें शोषली ॥८६॥
गर्वे ते रजनीचर । हाती कात्या त्रिशूळ तोमर ।
एकी घेतले लहुडीचक्र । एकांचे कट्यार पै करी ॥८७॥
एका हाती धनुष्यबाण । एकी पर्वत शिळा पाषाण ।
एकी पादपा पुडोन । एकी गोफणा घेतल्या ॥८८॥
रणोन्मदें ते सुरारी । चालिले लंकेबाहेरी ।
एक उडाले अंबरीं । एक अंतराळीं चालिले ॥८९॥
लंका सांडोनि माघारीं । राक्षस आले नगराबाहेरी ।
गर्जना केली निशाचरीं । नाद अंबरीं न समाये ॥९०॥
लंकेतून बाहेर पडताना राक्षसांना अपशकुन :
हर्षेकरोनि रजनीचर । चालिले पवनवेगाहूनि थोर ।
तंव पुढे अपशकुन घोर । वीर दुर्धर देखते झाले ॥९१॥
लंकेसारिखी दुसरी लंका । माड्या गोपुरे अट्टालिका ।
व्योममार्गी विशाळ देखा । रुप भयानक देखिले ॥९२॥
भूमी अंतरिक्ष व्यापिले दिसे । काळासारिखी मुर्ति उग्र भासे ।
माथा शिर तिये नसे । हातें वेष्टितसे भुजांतें ॥९३॥
उत्पात होती दारुण । तप्त रक्ते पडे पर्जन्य ।
माजी अस्थींचा वर्षाव जाण । मेघ दारुण वोळला ॥९४॥
अर्णव सांडी मर्यादेते । महेंद्र डोलविती माथे ।
भूतळ होईं पाहे उलथेंपालथें । कळिकाळ तेथे चळीं कांपे ॥९५॥
औट कोटी भूतावळी । मिळालिया तया काळी ।
एक आरोळी तये वेळी । मेघासारिख्या पै देती ॥९६॥
एक रणगोंधळीं नाचती । एक विकट मुख पसरिती ।
एक खावें पै म्हणती । एक दाविती वांकुल्या ॥९७॥
दिवाभीतें मस्तकावरी । फिरती चक्राचिये परी ।
ज्वाळा वमिती मुखोद्गारीं । ते निशाचरीं देखिले ॥९८॥
बलोन्मत्तपणाने अपशकुनाचा धिक्कार करून राक्षस पुढे निघाले :
राक्षस बळगर्वेकरीं । अपशकुन लेखिती तृणावरी ।
जो नपुंसक से संसारी । तया भय भारी अपशकुनांचें ॥९९॥
काळपाशेंकरीं विबुधारीं । बांधिले पशु दावणीभीतरीं ।
पतंग जैसा दीपावरी । मरणोन्मत्त होवोनियां ॥१००॥
माल्यवंत सुमाळी माळी । मरण विसरोन ते काळी ।
सेनासमुदायीं राक्षस बळी । गर्जन करिते पै झाले ॥१॥
राक्षसेंद्र झाला पुढे । मागे पुढे दळ गाढे ।
जैसे समर्थाश्रयें भ्याडें । मार्ग पडिपाडे क्रमिती ॥२॥
जसा दाता याच्कें वेष्टित । तैसा राक्षस परिवारसहित ।
मृतप्राणी यमपुरा जात । तन्न्याय राक्षसा ॥३॥
ऐसे उपराउपरीं । मार्गी सिंहनादकरीं ।
क्रमिला मार्ग क्षणामाझारी । विश्वात्मा हरि तेथे आला ॥४॥
श्रीविष्णू युद्धासाठी सिद्ध होऊन निघाले :
दूत सांगती विष्णूसी । राक्षस आले युद्धासी ।
ऐकोनि तोषला ह्र्षीकेशी । आनंद मानसी वोसंडे ॥५॥
श्रीहरि त्वरित उठला । अभेद्य कवच अंगी ल्याला ।
तेजे दिनमणि लोपला । दशदिशां पडिला उजियेड ॥६॥
अचुक घेवोनिया बाण । जैसे काळाचे क्रूरगण ।
भातां भरोनि संपूर्ण । धनुष्य टणत्कारोन सज्जिलें ॥७॥
श्रीविष्णूंचे वर्णन :
वर्णखड्ग घेवोनि हाती । अवलोकिता जाहला लक्ष्मीपती ।
कमळासारिखें नेत्र शोभती । मुखीं दंतपंक्तीं हिरियांच्या ॥८॥
शंख चक्रगदाधर । श्यामसुंदर राजीवनेत्र ।
गळा वैजयंतीचे हार । कांसे पीतांबर विद्युत्प्राय ॥९॥
अंगी अहिप्रियविलेपन । कस्तूरीचा मळवट पूर्ण ।
श्यामसुंदर विराज मान । मनमोहन तो विष्णू ॥११०॥
जैसा कनकाच गिरी । तैसा संमुख सर्पारी ।
वरी आरुढोनि श्रीहरी । त्वरेकरीं चालिला ॥११॥
गरुडपाखांचेनि वातें । पितांबर आंदोळे तेथे ।
जैसे समुद्री लाटांचे भरिते । उपराउपरी येतसे ॥१२॥
राक्षस वधावयाकरणें । अवतार धरिला नारयणे ।
देवांचे भय निवारणें । सुखी करणे त्रैलोक्य ॥१३॥
स्वर्गी देव आनंदत । एक पुष्पवर्षाव करित ।
एक पवाडे गात । एक नाचत स्वानंदे ॥१४॥
ऐसा तो राक्षसारी । निघाला अतित्वरेंकरीं ।
ते रुप देखोनि निशाचरी । रानभरी पै झाले ॥१५॥
एक भयें थरथरां कांपत । एक सरसे सरसावत ।
एक धैर्य धरोनि राहत । शस्त्रे वर्षत अमित पै ॥१६॥
राक्षसांचा आवेश :
राक्षसशस्त्रे अति तीक्ष्ण । मेदमांसे आरक्त जाण ।
जैसे वसंती पलाशपुष्पेंकरुन । तैसे बाण वर्षले ॥१७॥
अगणित सोडोनि बाण । श्रीहरि वेढिला जैसा पर्वत पर्जन्य ।
लागवेग करिता दारूण । वेगे गर्जन करिताती ॥१८॥
सिंहनादे देती आरोळी । हात घांसिती भूताळीं ।
म्हणती बळियेरे बळी । भिडा ये काळी अवघेही ॥१९॥
राक्षसी श्रीहरि वेढिला । एक म्हणती पुरा झाला ।
एक म्हणती अझूनि याला । उरी कोठे असेल ॥१२०॥
पुढे कथानिरूपण परम । श्रीहरींचे चरित्रनाम ।
अगस्ति सांगे ऐके श्रीराम । कथाधर्म अवधारा ॥२१॥
एका जनार्दना शरण । श्रीरामे उत्तरकांड पावन ।
वदनी वक्ता श्रीजनार्दन । कथानुसंधान अतिरम्य ॥१२२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
राक्षसविष्णुयुद्ध नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
ओंव्या ॥१२२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥१२५॥
