आम्हा नरका जाता काय
3213.
आम्हा नरका जाता काय येईल तुझ्या हाता । ऐसा तू अनंता विचारी पा ॥१॥
तुज शरण आलियाचे काय हेचि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥धृपद॥
तुझे पावनपण न चले आम्हासी । ऐसे हृषीकेशी कळो आले ॥२॥
आम्ही दुःख पावो जन्ममरण व्यथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥
तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझे ॥४॥
अर्थ :
हे अनंता आम्ही जर नरकात गेलो तर तुझ्या हातात काय येईल याचा जरा तू विचार कर. देवा तू दयाळू आहेस, कृपानिधी आहेस आणि तुला शरण आलो म्हणून याचे फळ आम्हाला हेच मिळणार आहे काय ? हे ऋषीकेशी तुझे पावनपण आमच्याबाबत चालत नाही हे आता आम्हाला कळून आले आहे. अहो देवा आम्हाला जन्ममरणाच्या व्यथा होतात त्यावेळी आम्हाला अनेक प्रकारचे दु:ख भोगावे लागते असे जर झाले तर मग तुझ्या हातात काय येते ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा परमार्थाचा खेळ खेळताना तुम्ही आता रडी आला आहात परंतू आम्ही आता तुझ्या नामाची शेंडी धरली आहे.
