आता जावे पंढरीसी । द
3212.
आता जावे पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥
चंद्रभागेचिया तिरी । आम्ही नाचो पंढरपुरी ॥धृपद॥
जेथे संतांची दाटणी । त्याचे घेऊ पायवणी ॥२॥
तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पाया तळी ॥३॥
अर्थ :
आता पंढरीला जावे आणि विठोबाला साष्टांग दंडवत घालावे असे वाटते. आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर हरीनाम घेऊन त्या आनंदात आम्ही नाचू. जेथे संतांची गर्दी आहे तेथे जाऊन त्यांचे चरणतीर्थ आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही एक विठोबावाचून दुसरे काहीही जाणत नाहीत म्हणूनच त्याच्या पायाखाली आम्ही आमचा जीव दिला आहे म्हणजे आम्ही आमचा देह विठ्ठलाला अर्पण केला आहे.
