वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 34. संत नवनाथ - नवनारायण › 1. नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध › 1. पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे › 13. नाथसंप्रदाया बद्दल भाग १ व २

नाथसंप्रदाया बद्दल

🙏 34. संत नवनाथ - नवनारायण · ABH-081062 · अभंग क्र. १३

13.
13. नाथसंप्रदाया बद्दल

नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती भाग 1

navnath - नवनाथ, अवतार, श्री दत्त / श्री दत्तांचे साहित्य, श्री नवनाथांचे चरित्र

नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती व तीर्थक्षेत्र पुढीलप्रमाणे :-
श्रीनवनाथ नावे:-
जालिंदरनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ, हे नऊ नाथ आहेत.

इतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे.

“नाथ” या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला “नाथ संप्रदाय” असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर “नाथ” हा शब्द जोडता येतो. तांत्रिकदृष्टय़ा दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते.

मध्ययुगीन भारतामध्ये अनेक नव्या संप्रदायांचा उदय झाला. त्यापैकी नाथ संप्रदाय हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा संप्रदाय होय. या संप्रदायाचा उद्गम नेमका कसा, कोठे आणि कधी झाला याविषयी अनेक संशोधकांनी विविध मते मांडली आहेत. त्याविषयी माहिती घेण्यापूर्वी नाथांच्या संप्रदायाची पाश्र्वभूमी पाहणे आवश्यक आहे. इसवी सनाच्या प्रारंभापासून नवव्या-दहाव्या शतकापर्यंतच्या सुमारे हजार वर्षांच्या काळात शैव, वैष्णव, बौद्ध, जैन असे अनेक संप्रदाय भारतामध्ये नांदत होते.

पाचव्या शतकानंतरचा इतिहास पाहता असे दिसते की, शैवांच्या श्रीकुल आणि कालीकुल या दोन्ही शाखांमध्ये आणि बौद्धांच्या महायान पंथातून पुढे आलेल्या वज्रयान अथवा तंत्रयान परंपरेमध्ये अनेक वाममार्गी साधना पद्धतींचा अंतर्भावही हळूहळू होऊ लागला. श्रीशैल हे अशा तांत्रिक साधनांचे ख्यातकीर्त केंद्र असल्याचे रा. चिं. ढेरेंसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. या पंथांमधूनच स्वतंत्र होत होत सिद्ध परंपरेचा जन्म झाला, ज्यामध्ये अशा तांत्रिक आणि वामाचारी उपासना पद्धतींना फाटा देऊन, बाह्य़ाचारावर भर न देता तत्त्वानुभूती, भक्ती, योग इत्यादी साधनांवर भिस्त ठेवून मोक्षमार्गाची वाट चोखाळणारा सिद्ध संप्रदाय विकसित झाला.

सिद्धांच्या या संप्रदायामध्ये जे दीक्षित असत, त्यांना मुख्यत्वेकरून ‘नाथ’ या विशेषणाने संबोधले जात असल्याचे आढळते. महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश हा प्रांत जरी या संप्रदायाची उदयभूमी मानला, तरी नाथ संप्रदायाचे अनुयायी संपूर्ण भारतभरातच नव्हे, तर भारताच्या आधुनिक सीमांच्या बाहेर असणाऱ्या प्रदेशातही पसरले होते असे म्हणावे लागेल. नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे.

नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे.

नाथांची परंपरा – नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती

नाथांच्या तीर्थक्षेत्रापैकी एक महत्त्वाचे स्थान – गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर. नवनाथांना परंपरेने नवनारायणांचे अवतारस्वरूप मानण्यात येते. पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहरेत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नऊ नारायणांनीच कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने अवतार घेतला.

नाथपरंपरेतील एका सांप्रदायिक श्लोकामध्ये नऊ नाथांची नावे पुढीलप्रमाणे सापडतात-
गोरक्ष – जालंदर – चर्पटाश्च अडबंग – कानिफ – मच्छिन्दराद्य:।
चौरंगी – रेवाणक – भत्र्रीसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा:।।

मात्र या श्लोकामध्ये ग्रथित नसलेली अशी नागनाथ, गहिनीनाथ, शिवनाथ, मीननाथ, सत्यनाथ इत्यादी अनेक नावे नवनाथांपैकी असल्याचे नाथ परंपरेतील ग्रंथ सांगतात. नाथांच्या मूळ परंपरेत एकदा नऊ ही संख्या महत्त्वाची म्हणून रूढ झाल्यानंतर मग वेगवेगळ्या ग्रंथकाराने त्याला महत्त्वाचे वाटले ते नऊ नाथ नवनाथ म्हणून वर्णिले असावेत, एवढेच स्पष्टीकरण या नामभिन्नतेकरिता देणे शक्य आहे.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. या दोहोंचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित अनेक कथाही जनमानसात प्रचलित आहेत. मत्स्येन्द्रनाथांनी त्यांच्या मासळी- आईच्या पोटात असतानाच शिव-पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ज्ञान, गाईच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मत्स्येन्द्रांना खाव्याशा वाटलेल्या वडय़ाकरिता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत.

नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो. ही ८४ सिद्धांची कल्पना मूलत: वज्रयान परंपरेतील आहे. संशोधकांचे असे मत आहे की, बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्धानुयायी ज्या वेळी नाथपंथात सामील झाले, त्या वेळी त्यांच्याकडील ८४ सिद्धांची ही संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी. या सिद्धांची देखील विस्तृत नामावली उपलब्ध असून त्यापैकी ८४ सिद्ध नेमके कोणते, याबद्दल मितभिन्नता आढळते.

ढोबळमानाने असे म्हणता येईल की, नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले. या सिद्धांकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु-शिष्य परंपरांचा जन्म झाला. यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्र-तंत्रविषयक ज्ञान आहे. काही परंपरा तत्त्वज्ञानप्रधान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रातील भक्तीमार्गातही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरूपदिष्ट मार्गाने नामसंकीर्तन, गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याची मनीषा बाळगतात.

सांप्रदायिक सिद्धांत, आचार आणि महत्त्वाची स्थळे

आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे सिद्धमत अथवा अवधूतमत या नावानेही प्रसिद्ध असलेल्या नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ शिवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काश्मीर शैव परंपरेतून आलेल्या सिद्धांताशी मिळतीजुळती मांडणी आपल्याला नाथ संप्रदायामध्ये पाहावयास मिळते. योगमार्गाचा अवलंब प्रधान असल्याने योगशास्त्रातील अनेक संकल्पनाही या संप्रदायात रूढ झाल्या आहेत. नाथांच्या सांप्रदायिक सिद्धांतांची माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गुरू गोरक्षनाथ विरचित सिद्धसिद्धांत पद्धती.

या संस्कृत भाषेतील ग्रंथाच्या प्रारंभीच ग्रंथकर्त्यांने शक्तीसह विद्यमान शिवास वंदन केले आहे – आदिनाथं नमस्कृत्य शक्तियुक्तं जगद्गुरुम्। वक्ष्ये गोरक्षनाथोऽहं सिद्धसिद्धान्तपद्धतिम्।। या सिद्धांतामध्ये शक्ती जरी स्वतंत्र नसून शिवातच अंतर्भूत आहे. किंबहुना शिवातील इकार म्हणजेच शक्ती होय. असे असले तरी तिचे महत्त्व मात्र पुष्कळ आहे. कारण शिव या शक्तीमुळेच या ब्रह्माण्डाची उत्पत्ति-स्थिति-विलय नियन्त्रित करतो. शक्तिविना शिव म्हणजे शव होय.

चंद्रचंद्रिकान्यायाने शिव आणि शक्ती एकमेकांपासून अभिन्न असतात. शक्ती व्यक्त स्वरूपात असताना शिव सृष्टीच्या निर्मिती, स्थिती अथवा लयाचे कार्य करतो. ती जेव्हा अव्यक्त असते, तेव्हा त्या दोहोंमध्ये मात्र कोणताही भेद दिसून येत नाही. म्हणजेच त्याचे स्वरूप एकमेव, अद्वय असे असते. मराठी भाषेतील पिण्डी ते ब्रह्माण्डी या न्यायासारखाच जे जे ब्रह्माण्डात (जगतात) आहे, ते ते सर्व पिण्डात (देहात) देखील आहे, असा सिद्धांत गुरू गोरक्षनाथ सांगतात.

मानवी देहामध्ये कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध असणारी ही शक्ती साडेतीन वेटोळी घालून अधोमुखी होऊन बसलेल्या नागिणीच्या रूपाने मेरुदण्डाच्या मुळाशी सुप्तावस्थेत विद्यमान असते. तिचे मस्तकातील सहस्ररचक्रात निवास करणाऱ्या शिवाशी मीलन व्हावे याकरिता गुरुकृपेची आणि साधनेची आवश्यकता असते. शरीरात लहान-मोठय़ा अशा बहात्तर हजार नाडय़ा आहेत. त्यापैकी श्वासोच्छ्वास मार्गाशी आणि मेरुदण्डाशी संबंधित तीन महत्त्वाच्या नाडय़ा इडा, पिंगला आणि सुषुम्ना या होत. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर यांतील सुषुम्नेमधून वर धाव घेते. मुळात जन्मोजन्मीच्या कर्मबंधनांमुळे शरीर मलिन झालेले असते, आणि या नाडय़ा मलाने भरल्याने संचारास उपयुक्त नसतात.

योगमार्गात वर्णन केलेल्या बस्ती, धौती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या षट्क्रियांद्वारे ज्या वेळी मनुष्य शरीरातील नाडय़ांना मलापासून मुक्त करून घेतो, त्या वेळी कुंडलिनी जागी होते. मूलाधारचक्रापासून वर जात जात शेवटी आज्ञाचक्र पार करून ती सहस्ररचक्रात पोहोचते, त्या वेळी साधकास आत्मानुभूती प्राप्त होते आणि कैवल्याचा अनुभव येतो. या सर्व गोष्टी घडत असताना योग्य दिशेने प्रगती करण्याकरिता साधकास गुरूच्या देखरेखीची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे यामध्ये साहजिकच गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

नाथ संप्रदायातील गुरू-शिष्याला उपदेश करताना त्यास कर्णमुद्रा धारण करायला लावतो आणि त्याचा कान उघडतो-फाडतो, त्यावरून कानफाटा असे नांव या संप्रदायातील लोकांना पडले आहे. अनुयायांनी विशिष्ट प्रकारची वेशभूषा करणे अपेक्षित असते. कर्णमुद्रा, शैली, शृंगी, झोळी, कंथा, एकतारी, पुंगी इत्यादी वस्तू हे गुरू धारण करतात. नियमित स्नान करून अंगास विभूती फासणे आवश्यक असते. ‘अलख निरंजन’चा गजर करून भिक्षा मागणे आणि ‘आदेश’ शब्दाने इतरांशी अभिवादनादी क्रिया करणे असे प्रघात यांच्यामध्ये आढळतात. असे असले, तरी केवळ बाहय़ वेश महत्त्वाचा नाही, असे नाथपंथातील ग्रंथांमधून अनेक वार सांगितलेले आढळते. या धारण करावयाच्या वस्तूंमागेसुद्धा काही विशिष्ट तत्त्वज्ञान असून, ते समजून त्याचे आचरण करणे हे सर्वात महत्त्वाचे होय.

यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे शिव आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्राय: आपापली दैवतेही सोबत आणली असावीत. त्यामुळेच बहुधा, इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथपरंपरेत झाल्याचे आढळते. दुर्गा, भैरव, नरसिंह, राम, हनुमान अशा अभिजनांच्या दैवतांसोबतच लोकधर्मातील म्हसोबा, वेताळ यासारख्या दैवतांचा, तसेच मुस्लीम पीर आणि फकिरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथपरंपरेत सापडतात.

ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली अगर त्यांनी मठ स्थापिले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथपरंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, द्वारका, पुष्कर, रामेश्वर, हिंगळजा, गिरनार, गोरखपूर, पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेमध्ये एकूण १२ पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथाने प्रवर्तित केले तर काही गोरक्षनाथांनी, अशी मान्यता आहे.

महत्त्वाचे सिद्ध

नाथांच्या परंपरेत असंख्य सिद्ध आणि साधक होऊन गेले आहेत. त्यातील काही सिद्धांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊ. मत्स्येन्द्रनाथ अथवा मच्छिन्द्रनाथ हे परंपरेनुसार नाथसंप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. मासळीच्या पोटात असतानाच त्यांनी शिवाने पार्वतीला केलेला उपदेश ऐकल्याचे मानले जाते. शाक्तसंप्रदायातील एक महत्त्वाचा पंथ जो कौलमार्ग या नांवाने विख्यात होता, त्याचे अनुयायी मच्छिन्द्रनाथ होते, असे विद्वानांचे मत आहे.

त्यांच्या नांवावर कौलनिर्णय नांवाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. या ग्रंथातून असे दिसते की, सिद्धांत म्हणून जरी शिव-शक्तीवर आधारित विचार मान्य असला तरी हठयोगावर आधारित आसन- प्राणायाम- चक्रध्यान इत्यादी मार्गाने जाऊन कुंडलिनी जागृती साधणे सर्वसामान्यांकरिता आवाक्याबाहेरचे ठरते. त्यामुळे आचरण्यास सोप्या अशा सहजयोगाची कास धरणे योग्य होय. नामस्मरण आणि ध्यानसाधना या दोहोंच्या साहाय्यानेही कुंडलिनीजागृती करून घेता येते, असे सहजयोग सूचित करतो.

चौरंगीनाथ हे असेच प्रसिद्ध नाथ होत. नवनाथभक्तिसार या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांचे चरित्र सांगितले आहे. विदर्भ देशाचा राजकुमार म्हणून जन्माला आला असूनही सावत्र आईच्या दुष्कृत्यामुळे त्यास वडिलांकडून हातपाय तोडून टाकण्याची शिक्षा मिळाली. गोरक्ष आणि मच्छिन्द्रनाथांनी त्यास उचलून आणले आणि त्याच्याकडून तपाचरण करवून घेऊन त्यास गुरुपदेश दिला. चौरंगीनाथांचा उल्लेख तिबेटी परंपरेतही केला जातो.

चर्पटीनाथ हे असेच एक प्रसिद्ध सिद्ध होत. त्यांच्या काही रचनांमध्ये त्यांनी स्वत:स गोपीचंदाचा बंधू म्हटले आहे. ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथामध्ये मात्र चर्पटीनाथ ब्रह्मदेवाचे पुत्र असून त्यास प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी उपदेश केल्याची कथा सापडते. जालंदरनाथ हे मच्छिन्द्रनाथांचे गुरुबंधू आणि थोर सिद्ध होते. नवनाथांची कोणतीही नामावली पाहिली तरी त्यामध्ये यांचा उल्लेख निश्चित असतो. वज्रयान परंपरेतील ग्रंथ, शिवदिनमठसंग्रह, तत्त्वसार, हठयोगप्रदीपिका, योगवासिष्ठ अशा इतरही अनेक ग्रंथांमध्ये यांचे नाव आदराने घेतल्याचे दिसून येते. ते मूळचे जालंदरचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावरून त्यांचा जन्म यज्ञातून झाल्याची कथा प्रसृत झाली, असेही काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंपरेप्रमाणे कानिफनाथांना जालिंदरनाथांनी अनुग्रह दिला होता.

नवनाथांमधील सर्वात प्रसिद्ध सत्पुरुष म्हणजे गोरक्षनाथ. गोरक्षनाथांशी संबंधित कथा आणि स्थाने भारतभरात, तसेच आसपासच्या नेपाळ आणि तिबेटसारख्या देशांतही आढळतात. त्यांनी नाथपंथाची धुरा वाहत भारतभर भ्रमण करून हा संप्रदाय सर्वदूर पोहोचविला. इतकेच नव्हे, तर त्यांचे गुरू मच्छिन्द्रनाथ ज्या वेळी वाममार्गीय साधनेकडे वळले, तेव्हा त्यांना सावध करून पुन्हा मूळ मार्गावर आणले. संस्कृत आणि हिन्दी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या असून त्यांचे सिद्धसिद्धान्त पद्धति, योगमरतड, अमरौघप्रबोध इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील परंपरा आणि वाङ्मय

नवनाथ आणि सिद्ध नामावलीतील अनेक सिद्धांचा महाराष्ट्राशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. नागार्जुनाचा शिष्य कणेरीचे समाधिस्थान नेवाशाजवळ दाखविले जाते. हे रसेश्वर संप्रदायातील एक महत्त्वाचे आचार्य होते. नाथसिद्धांच्या परंपरेतील आनंदभैरव, मंथानभैरव, काकचंडी, सूरानंद हे शैव कापालिक होते असे दिसून येते. वीरशैवसंप्रदायाशी जवळून संबंध असलेले अल्लमप्रभू आणि रेवणसिद्ध हे नाथसिद्धांच्या परंपरेशीदेखील संबंधित होते.

महाराष्ट्रातील नाथपरंपरेत सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागतो, तो निवृत्तिनाथ आणि ज्ञानेश्वरांचा. मच्छिन्द्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि त्यांच्याकडून ज्यांना उपदेश मिळाला ते (मातीच्या गोळ्यापासून अजाणतेपणी निर्माण झालेले) गहिनीनाथ होते. या गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना गुरुपदेश केला आणि पुढे ज्ञानेश्वरांना हाच नाथपरंपरेचा वारसा निवृत्तिनाथांकडून प्राप्त झाला. सहजयोगाचा वारसा पुढे चालू ठेवताना या परंपरेत प्रामुख्याने नामस्मरण, आणि भक्तिमार्गावर भर दिलेला आढळतो.

ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिका’, ‘अमृतानुभव’ यांसारख्या ग्रंथांचे डोळसपणे वाचन केल्यास त्यांनी नाथसंप्रदायाचे गुहय़ तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत उकलून दाखविल्याचे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी एक प्रकारे नाथ संप्रदायाला भागवत भक्तीशी एकरूप केले आणि सहजयोगास उज्ज्वल स्थान प्राप्त करून दिले. अगदी नजीकच्या भूतळातील पावसाचे स्वामी स्वरूपानंद हे देखील याच परंपरेतील असून त्यांनीही ‘स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय। अवघे हरिमय योगबळे।।’ इत्यादी उक्तींद्वारे आपली परंपरा स्पष्ट केली आहे.

गोरक्ष आणि इतर प्राचीन नाथांच्या संस्कृत आणि हिंदी रचना आणि ज्ञानेश्वरांनी निर्मिलेले विशाल ग्रंथभांडार यांसोबतच चिन्तामणिनाथांचा ज्ञानकैवल्य, आदिनाथभैरवाचा नाथलीलामृत, धुंडिसुत मालुकवीचा नवनाथभक्तिसार, गोपाळनाथ आणि त्यांच्या शिष्यपरंपरेतील ‘श्रीनाथलीलाविलास’, ‘गुरुगीता’, ‘समाधिबोध’, ‘निजरत्नकर’ इत्यादी ग्रंथ नवनाथ परंपरेचा अभ्यास करण्याकरिता विशेष महत्त्वाचे ठरतात.

संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले. नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत.

ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते.

ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे.

उगमस्थान

त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे.

अनुपम शिळा महत्त्व

ब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा अशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी “हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात.

नागपंचमी महत्त्व

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच संगमावर स्नान करतात. साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा.

अलख निरंजन…..

नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती भाग 2

नाथ संप्रदाय हा शिवाचा उपासक असून शिव हाच सर्वांचा गुरु आहे अशी या पंथाची श्रद्धा आहे. हा शिवच मानवी गुरूत प्रवेश करून जगदुद्धाराचे कार्य करतो असे ते म्हणतात. हा आदिनाथ शिव 'शक्तियुक्त शिव' आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले आहे. म्हणजेच शक्ती ही शिवाहून भिन्न नाही, ती तदन्तर्गतच आहे व तीच विश्वाच्या उत्पत्ति-स्थिती व लयाला कारणीभूत आहे. या शक्तीने युक्त असा शिवच पिण्ड-ब्रह्माण्डाचा आधार आहे आणि शक्तीविना शिव हा केवळ 'शव' आहे, म्हणजेच, 'शिवा'तील इकार हा शक्तिवाचक आहे. चंद्र चंद्रिकेप्रमाणे त्यांचा अन्योन्यसंबंध आहे.
'सिद्धसिद्धांतपद्धति' या गुरु गोरक्षनाथांच्या ग्रंथात याविषयी पुढील श्लोक आढळतोः
शिवस्याभ्यन्तरे शक्तिः शक्तेभ्यन्तरे शिवः ॥
अन्तर नैव जानीयात्‌ चन्द्रचन्द्रिकयोरिव ॥

यासाठीच 'सिद्धसिद्धान्तपद्धति' या आपल्या ग्रंथाच्या सुरवातीलाच श्रीगोरक्षनाथ म्हणतात-
आदिनाथ नमस्कृत्य शक्तियुक्त जगद्‌गुरूम्‌ ।
वक्ष्ये गोरक्षनाथोऽह सिद्धसिद्धान्तपद्धतिम्‌ ॥

ज्याप्रमाणे दोन टिपर्‍यांचा नाद एकच, दोन फुलांचा गंध एकच, दोन ज्योतींचा प्रकाश एकच, दोन नेत्रांतील दृष्टी एकच त्याचप्रमाणे या विश्वपसार्‍यात 'शिवशक्ति' या नामद्वयाने नटलेले तत्त्व एकच आहे.

हा पंथ शिवाचा उपासक असल्याने नाथपंथीय योगी 'जयशंकर भोलेनाथ' किंवा 'अलख निरंजन' अशी गर्जना करीत भिक्षा मागतात. त्यांचे अनेक आखाडे भारतभर असून त्याठिकाणी अंगाला भस्म लावून धुनीसमोर चिलीम ओढत बसलेले साधू आपल्याला पुष्कळदा दिसतात. यातील कानात कुण्डले असलेले साधू 'कानफाटे' म्हणून ओळखले जातात. हे कानफाटे हातात किनरी किंवा कोक्यासारखे वा घेऊन गोपीचंद, मैनावतीची गाणीही गातात. अर्थात्‌ या साधूत खडतर साधना व अलक्ष्याचे चिंतन करणारे साधू अपवादानेच दिसतात, हे तितकेच खरे!

असो. 'नाथसंप्रदाय' या शब्दातील 'नाथ' म्हणजे स्वामी किंवा धनी. हा धनी कोण? तर या चराचरसृष्टीचा निर्माता व पालनकर्ता असा ईश्वर किंवा नाथपंथीयांच्या भाषेत सांगायचे तर 'शिव'. 'गोरखबानी' या गुरुगोरक्षांच्या प्रसिद्ध ग्रंथात हा शब्द 'ब्रह्म' किंवा 'परमतत्त्व' या अर्थाने वापरला आहे. तर संस्कृत टीकाकार मुनिदत्त हा शब्द 'सदगुरु' या अर्थाने वापरताना दिसतो. थोडक्यात, 'अध्यात्ममार्गातील श्रेष्ठ किंवा आदरणीय व्यक्ती' असा 'नाथ' या शब्दाचा अर्थ सांगता येईल.
नाथसंप्रदायात ज्ञान, धर्म, कर्म आणि भक्ती या चारही वाटा एकत्र येऊन मिळतात व साधक सिद्ध बनून पावलोपावली मोक्षाची खाण उघडते आणि आपणास ज्या गावास जावयाचे ते गावच आपण होऊन जातो, असा हा 'पंथराज' आहे. (श्रीज्ञानेश्वरी ६-१५२-१६०) संत ज्ञानेश्वरांनी या पंथाचे माहात्म्य लोकांना समजावून दिले; म्हणूनच संत निळोबाराय म्हणतात-
* नाथ संप्रदायाची थोरी । प्रकट केली ज्ञानेश्वरी ॥

या पंथाचा उल्लेख संत रामदास व संत तुकाराम यांनीही मोठ्या आदराने केलेला आढळतो.
जाईन सिद्धपंथे अवघ्या चुकतील खेपा ॥

अशी त्यांची थोरवी तुकोबा गातात, तर आपल्या 'सकल संतांच्या' आरतीत समर्थ नाथसिद्धांचा अंतर्भाव मोठ्या आदराने करतात. अशा या सिद्धपंथात शैव, बौद्ध तसेच तांत्रिक पंथांतील अनेक सिद्ध समाविष्ट झाले व त्यांना 'सिद्धयोगी' किंवा 'नाथसिद्ध' असे नाव मिळाले, त्याचप्रमाणे हा पंथ 'अवधूतपंथ' किंवा 'अवधूतमार्ग' अशा वेगवेगळ्या नावांनीही प्रसिद्धीस आला.

'सिद्धसिद्धान्तपद्धती', 'गोरखबानी' तसेच कबीरांच्या अनेक पदात ही नावे आलेली दिसतात. भगवान्‌ दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना जो उपदेश केला तो देखील 'अवधूतगीता' या नावानेच प्रसिद्ध आहे.

या नाथपंथाचा उदय नेमका केव्हा झाला हा प्रश्नही महत्वाचा आहे. महाराष्ट्रात नाथसंप्रदाय कानाकोपर्‍यात पोचला तो निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांमुळे. निवृत्तीनाथ १२७३ साली व ज्ञानदेव १२७५ साली जन्मास आले. यापैकी निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश होता आणि हे गहिनीनाथ गोरक्षनाथांचे शिष्य होते. याचाच अर्थ, गोरक्षनाथांचा काल अकराव्या शतकातील असला पाहिजे. तसेच गोरक्षांचे गुरू व नाथसंप्रदायातील आद्य मानवी गुरू श्रीमच्छिंद्रनाथ यांचा काल हा नवव्या किंवा दहाव्या शतकातील मानावयास हरकत नाही. (मात्र, नेहमीप्रमाणेच याबाबतही विद्वानात मतभेद आहेतच!)

राहुल सांकृत्यायन यांच्यासारखे काही संशोधक ही सिद्ध परंपरा थोडी वेगळ्या प्रकारे मानतात व त्यानुसार नाथपंथाचे संस्थापक श्रीमच्छिंद्रनाथांऐवजी सरहपाद हे ठरतात. (ही सहजयानी सिद्धांची तिबेटी परंपरा होय. )

हे झाले ऐतिहासिक दाखले. परंतु या परंपरेला दुसरी पौराणिक बाजूही आहे. तीत शिवाने पार्वतीला केलेला उपदेश मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून ऐकतात अशी एक कथा प्रचलित आहे. ती खरी मानली तर नाथांचा उदय ऐतिहासिक कालाऐवजी पुराणकालात जाऊन पोचतो.
अशा या पंथात मूर्तिपूजा, वेद, स्मृति यांना महत्व नसून जातिभेद व धर्मभेद यांनाही स्थान नाही. अलक्षाचे चिंतन करीत मोक्षमार्गाची वाटचाल करणार्‍या कुणालाही इथे प्रवेश आहे.

'जे जे ब्रह्माण्डात आहे ते ते सारे पिण्डात आहे' असे हा पंथ मानतो. तसेच कुण्डलिनी जागृतीला येथे फार महत्व आहे. अग्रिचक्रांत सुप्तावस्थेत पडलेली ही कुण्डलिनी शक्ती ज्यावेळी सहस्रारचक्रातील शिवाशी समरस होते तेव्हा योग्यांना कैवल्यावस्था किंवा सहजसमाधि प्राप्त होते. या कुण्डलिनीचे तेज 'बालार्ककोटिसदृश' आहे असे गोरक्षनाथ 'सिद्धसिद्धान्दपद्धती'त सांगतात. हठयोगाच्या द्वारे ही कुण्डलिनी जागृत होते व सहस्रारचक्रात पोचते असेही ते सांगतात.

या पंथातील योग्याने म्हणजेच नाथयोग्याने आपला आचार (ज्याला गोरक्षनाथ 'रहनी' म्हणतात) कसा ठेवावा याबाबत ते म्हणतात- 'कठोर ब्रह्मचर्य, वाक्‌संयम, शारीरिक व मानसिक शुद्धी, ज्ञाननिष्ठा, बाह्यावडंबराविषयी अनादर, मद्यामांसाविषयी आत्यंतिक तिरस्कार हे नियम नाथयोग्यांनी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. '
या पंथात गुरूचे महत्व अपरंपार आहे, म्हणूनच 'निगुरा न रहिबा' (गुरुशिवाय राहू नये) असे ते सांगतात.

नाथपंथ कर्मकाण्ड, सगुणपूजा, वर्णाश्रमपद्धती, होमहवन, संन्यासाश्रम, अग्रिहोत्र इ. हिंदुधर्मातील परंपरागत विषयांना भ्रामक मानतो. मात्र प्रत्येक धर्मातील वा संप्रदायातील चांगल्या गोष्टींचा स्वीकारही तितक्याच सहजतेने करतो.

नाथपंथातील महत्वाच्या गोष्टींबाबत एवढी माहिती पुरेशी आहे. पुढे श्रीगुरुगोरक्षनाथांचे तत्त्वज्ञान सांगताना हीच माहिती काहीशा विस्ताराने आली असल्याने हा विषय इथेच थांबवून आपण आता नाथपंथाच्या वेशभूषेकडे वळू, कारण एका विशिष्य प्रकारची वेशभूषा हे नाथपंथाचे आगळे वैशिष्ट्य आहे.

नाथपंथीयांची वेशभूषा
नाथपंथाचे उपास्य दैवत भगवान्‌ शिव असल्याने त्यांच्या वेशभूषेची छाप नाथपंथीयांवर पडणे स्वाभाविक आहे
. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन 'नवनाथ भक्तिसार', 'सिद्धसिद्धान्तपद्धती', महानुभवांचा प्रसिद्ध ग्रंथ 'लीळाचरित्र', तसेच चिंतामणिनाथ विरचित 'नाथकैवल्य' या सर्वमान्य ग्रंथात वर्णिलेली आढळते. त्यावरून त्यांच्या वेशभूषेत, भस्म, रुद्राक्ष, मुद्रा, मेखला, कंथा, शिंगी, त्रिशूळ, धंधारी, दण्डा, किंगरी, खापर, अधारी, कमण्डलू, जानवे, चिमटा व शंख या गोष्टी प्रामुख्याने असतात असे दिसते. याशिवाय खडावा, डमरू, कुका अथवा कोका नावाचे वाद्य अशासारख्या वस्तूही आढळून येतात.
आता या वस्तूंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया-

भस्म -
भस्माला 'बभूत' असेही एक नाव आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख 'क्षार' असाही आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. 'पद्मावत' आणि 'चित्रावली' या दोन ग्रंथात भस्म सर्वांगाला लावण्याबाबत उल्लेख आहे, परंतु'चंद्रायन' आणि 'मधुमालती' या ग्रंथात ते फक्त तोंडाला लावावे अशा प्रकारचा उल्लेख आढळून येतो. ते काहीही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावलेच पाहिजे. 'सर्व देहाचे अखेर असे भस्मच होणार आहे, यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा' असा संदेशच जणू हे भस्म देते. शिवाय, भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्ति-केंद्रही जागृत होतात. थंडीपासूनही हे भस्म संरक्षण करते, भस्माचे असे माहात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याचे स्वीकार केल्याचे दिसते.

रुद्राक्ष-
रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून रुद्र+अक्ष म्हणजे शिवाचा नेत्र असा या शब्दाचा अर्थ आहे. साधनामार्गात रुद्राक्षाचे महत्व अपार आहे. तो अत्यंत पवित्र मानला जातो. तंत्रशास्त्राच्या दृष्टीनेही रुद्राक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. हे रुद्राक्ष विविध मुखांचे असतात, त्यांना १ पासून १४ मुखे असतात. एक एकवीसमुखी रुद्राक्षही प्रस्तुत लेखकाच्या संग्रही असून तो आकाराने मोठ्या आवळ्याइतका आहे. ही मुखे त्याच्या अंगावर असलेल्या खोलगट रेषांवरून मोजली जातात. सर्वसामान्यतः पाचमुखी रुद्राक्ष विपुल संख्येने आढळतात, तर एकमुखी रुद्राक्ष बराचसा दुर्मिळ आहे. नाथपंथी लोक या रुद्राक्षांची माला बनवितात, ही २८, ३२, ६४ वा १०८ मण्यांचीअसते. मुद्रा - मुद्रा हे नाथपंथी योग्यांचे एक आवश्यक अंग आहे. ही मुद्रा कानाला भोक पाडून तीत घातली जाते व बहुधा वसंतपंचमीच्या शुभ दिवशीच ती धारण करतात, अशा मुद्राधारक योग्यांनाच 'कानफाटे योगी' असेही म्हणतात. कारण ते कान फाडून (कानाला भोक पाडून) ती धारण करतात. ही मुद्रा धातूची किंवा हरणाच्या शिंगाची असते. काही धनिक महंत सोन्याची, हस्तिदंताची वा स्फटिकाची मुद्राही धारण करतात.

मुद्रा (कुण्डल)-
कोणत्या धातूची असावी यासंबंधी नाथपंथीय वाङ्‌मयात स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाही. भगवान्‌ शंकरांच्या कानातील कुण्डले पाहून मच्छिंद्रनाथांनी ती प्रथा आपला संप्रदायात सुरू केली असावी असे म्हणतात, तर काहींच्या मते नाथपंथाचे इतर पंथांपेक्षा काही वेगळेपण असावे अशी गोपीचंदाने इच्छा व्यक्त केल्यावरून जालंदरनाथांनी कान फाडून कुंडले घालण्याची प्रथा सुरू केली, तरी काही ठिकाणी गोरक्षनाथांनी राजा भर्तृहरीचे कान फाडून त्यात ही कुण्डले घातली असाही उल्लेख आढळतो.

मेखला-
मेखला ही कमरेला बांधतात. ही २२ ते २७ हात लांबीची, दोरखंडासारखी दोरी असून ती कमरेपासून छातीपर्यंत एका विशिष्य पद्धतीने बांधतात. ही मोळाच्या दोरीची वा लोकरीची असते. तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू बांधलेले असते. मेखला 'नागीण' म्हणूनही ओळखली जाते. 'हाल मटंगा' हा मेखलेचाच एक प्रकार आहे.
कंथा -
कंथा म्हणजे फाटलेली वस्त्रे जोडून बनविलेला चोळणा. हा गळ्यातून घातला की सर्व शरीरालाच झाकून टाकतो. याला 'गुदरी' असेही दुसरे नाव आहे. याचा रंग भगवा किंवा लाल असतो व तो गेरूने रंगविण्याची पद्धत आहे. हा रंग ब्रह्मचर्याला पोषक आहे. कारण त्यायोगे वीर्यस्तंभन होते. असे म्हणतात की पार्वतीने आपल्या रक्ताचा रंग लावून असा चोळणा प्रथम गोरक्षनाथांना दिला व तेव्हापासून नाथपंथात त्याचा वापर सुरू झाला.

शिंगी (शृंगी)-
ही हरणाच्या शिंगापासून बनवतात. ही तोडांने वाजवितात, व योगीजन ती जानव्याला बांधतात. विशेषतः संध्याकाळी उपासनेच्या वेळी वा भोजनापूर्वी ही शिंगी वाजविण्याची प्रथा आहे. काहीजण भिक्षा घेतल्यानंतर शृंगी वाजवितात.

त्रिशूळ-
भगवान्‌ शिव त्रिशूळ वापरतात हे सर्वप्रसिद्धच आहे, आणि शिव हेच नाथपंथीयांचे आद्य दैवत असल्याने या नाथपंथातील योगी त्याचाही वापर करतात, त्रिशूलाच्या योगे दुष्ट शक्ती जवळ फिरकत नाहीत असे म्हणतात.

धंधारी -
यालाच धण्डोर किंवा धंधोरा अशीही नावे आहेत. हे एक प्रकारचे चक्र असून ते लाकडाचे वा लोखंडाचे बनविलेले असते व त्याला एक छिद्र असते. या छिद्रात कवडी अथवा मालाकार धागा घालतात व मंत्र म्हणून तो बाहेर काढतात. लोकभाषेत यालाच 'गोरखधंधा' असे नाव आहे. गोरखपंथी लोकांचा असा विश्वास आहे की मंत्र म्हणून धागा बाहेर काढला की गोरक्षनाथांच्या कृपेने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भवसागरात अडकलेल्या प्राण्याला मुक्त करतो.
दण्डा - यालाच दण्ड असेही नाव आहे. याचा उल्लेख 'वैशाखी' असाही काही ठिकाणी करण्यात आला आहे. हा दण्डा गोल आणि काळ्या रंगाचा असून तो हात-दीड हात लांबीचा असतो. योगी लोक याला 'भैरवनाथाचा दण्डा' किंवा 'गोरथनाथांचा सोटा' असे म्हणतात.
किंगरी- यालाच सारंगी असेही नाव आहे. हे एक प्रकारचे तंतुवाद्य असून त्यातून धनुष्याच्या साहाय्याने आवाज काढला जातो. आजही भर्तृहरीचे गीत गाणारे योगी ही सारंगी घेऊन हिंडताना दिसतात.

खापर-
खापर म्हणजे सामान्यतः फुटलेल्या मातीच्या घड्याचा तुकडा. याचा उपयोग नाथपंथातले योगी भिक्षापात्र म्हणून करतात. काही योगी लोक हे भिक्षापात्र
नारळीच्या करवंटीचेसुद्धा बनवितात. काही वेळा काशाची वाटीची यासाठी वापरली जाते.

अधारी-
अधारी म्हणजे आसन. योगी लोक यावर बसतात किंवा झोपतात. हे आकाराने छोटे असते.

कमण्डलू -
याचा उपयोग पाणी पिण्यासाठी जलपात्र म्हणून होतो.

जानवे-
हे सुताचे असते व ते गळ्यात सरळपणे घातलेले असते. हे लोकरीच्या पाचसात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकविलेली असते. चकतीच्या भोकात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसविलेला असतो.
चिमटा -
अग्रिदीक्षा घेतलेला साधक आपल्या जवळ चिमटा बाळगतो. याची लांबी २७, ३२ वा ५४ इंच इतकी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात आणखी नऊ कड्या असतात. नाथपंथी लोक या चिमट्याच्या विशिष्य नादात वा धुंदीत आपले मार्गक्रमण करतात. धुनीतील अग्री फिरवून प्रज्वलित करण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो.

शंख-
भिक्षा मागताना व शिवाचे दर्शन घेताना नाथपंथी लोक शंख वाजवितात. शंखनाद हे ओंकाराचे प्रतीक मानले जाते. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन नाथपंथीय योग्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यास पुरेसे आहे. आता आपण नाथसंप्रदायातील श्रीगुरु मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्रीगुरुगोरक्षनाथ या दोन महासिद्धांचा परिचय करून घेऊ. कारण नाथसंप्रदायाचे ते आधारस्तंभच आहेत.

श्रीगुरुमच्छिंद्रनाथ
नाथसंप्रदायाचे आद्य दैवत आदिनाथ म्हणजेच शिवशंकर हे असून त्यांच्याकडूनच मच्छिंद्रनाथांना अनुग्रह मिळाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवनाथांपैकी मानवी रूपातील हे पहिले नाथ होत. (काहींच्या मते मात्र नाथसंप्रदायाची परंपरा वज्रयानी परंपरेतील सरहपाद यांच्यापासून सुरू होते. ) नाथसंप्रदायाला आकार देऊन त्याला जोपासण्याचे व फुलविण्याचे महान्‌ कार्य मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्रीगोरक्षनाथ यांनीच नेटाने केले. त्यामुळे या दोघांचा परिचय थोड्याशा विस्तारानेच आपण करून घेऊ या.

मच्छिंद्रनाथांना मत्स्येंद्र, मच्छेंद्रपाद, मच्छंदर, मच्छिंदर इ. वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते व त्यांचा अवतार साधारणतः दहाव्या शतकाच्या आरंभी झाला असावा असे विद्वानांचे मत आहे.
मच्छिंद्रनाथांच्या संदर्भात पुढील श्लोक प्रसिद्ध आहे. :
आदिनाथो गुरुर्यंस्य गोरक्षस्य च यो गुरु ।
मत्स्येन्द्र तमह वन्दे महासिद्ध जगद्‌गुरुम्‌ ॥
भाषा सोपी असल्याने वेगळा अर्थ देण्याची आवश्यकता नाही.

अशा या मच्छिंद्रांचा जन्म मच्छीच्या पोटातून झाला व मच्छीच्या पोटात असतानाच त्यांनी भगवान्‌ शिवांनी पार्वतीला केलेला उपदेश ऐकला अशी एक आख्यायिका प्रचलित आहे.

मच्छिंद्रनाथांच्या कथा 'श्रीनवनाथ भक्तिसार', 'नाथलीलांमृत', 'भक्तिविजय', 'सिद्धचरित्र' इ. ग्रंथातून वाचावयास मिळतात. त्यातील माहितीवरून ते भृगुवंशी ब्राह्मण असावेत असे वाटते, परंतु काहींच्या मते ते कैवर्तक. म्हणजे कोळी जातीचे असावेत.

लहान वयातच स्वतःच्या तपःसिद्धीच्या जोरावर त्यांनी हनुमान, वेताळ, वीरभद्र, भद्रकाली व चामुण्डा इ. देवदेवतांचा पराभव केला असे म्हणतात.
मच्छिंद्रनाथ हे कविनारायणाचे अवतार समजले जातात. बालपणी कामिक नावाच्या एका कोळ्याने त्यांचे पालनपोषण केले. परंतु कोळ्याचा मासे पकडण्याचा उद्योग त्यांना न आवडल्याने ते तेथून पळून जाऊन थेट बद्रिकाश्रमी आले व तेथे त्यांनी बारा वर्षे घोर तप केले. त्यांचे ते विलक्षण तप पाहून अत्रिसुत भगवान दत्तात्रेय व भगवान शिव तेथे प्रकट झाले. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्यांच्या कानात मंत्र सांगून त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्यायोगे त्यांना सर्वत्र एक ब्रह्मच दिसू लागले. पुढे मच्छिंद्रांनी शाबरी विद्या प्राप्त करून घेतली व या विद्येला अनेक देवदेवतांकडून वरदाने मिळवली. वेताळाकडूनही त्यांनी असेच वर मिळविले. पुढे मारुतीच्या विनंतीवरून ते मैनाकिनीसह स्त्रीराज्यात सुखविलासात राहू लागले. अर्थात्‌ त्यामागे कामवासना नव्हती तर मारुतीला दिलेल्या वचनाची पूर्तीकरण्याचाच उद्देश होता. पुढे गोरक्षांनी त्यांना तेथून आपल्याबरोबर परत नेले. परंतु जाताना मैनावतीने एक सोन्याची वीट मच्छिंद्रांच्या झोळीत टाकली. ती गोष्ट लक्षात आल्यावर गोरक्षांनी ती वीट रस्त्यातच फेकून दिली. वीट गेल्यामुळे मच्छिंद्रनाथ अतिशय दुःखी झाले, तेव्हा गोरक्षांनी सिद्धमंत्र जपून सगळा पर्वतच सोन्याचा करून दाखविला. ही कथा वाचल्यावर मच्छिंद्रांना सर्वसामान्य माणसाप्रमाणेच सुवर्णाचा मोह पडला की काय अशी शंका कुणाच्या मनात निर्माण होईल, परंतु या संदर्भात गोरक्षांनी विचारल्यावर त्यांनी असा खुलासा केली आहे की, सिद्धयोग्यांना भोजन देण्यासाठीच त्यांनी ती वीट जपून ठेवली होती. नि हा खुलासा सहज पटण्यासारखा आहे. कारण ज्यांचा शिष्य संपूर्ण पर्वत सोन्याचा बनवू शकतो त्या महासिद्ध मच्छिंद्रांना एका यःकश्चित विटेचा मोह कसा पडेल? ही गोष्ट असंभवच वाटते.

असो. नाथसंप्रदायात मच्छिंद्रनाथांना फार मानाचे स्थान असून त्यांना प्रत्यक्ष शिवाचाच अवतार समजण्यात येते.

'सिद्धचरित्र' व 'नाथलीलामृंत' अशा ग्रंथातून आलेल्या मच्छिंद्रनाथांबद्दलच्या कथा सर्वसाधारणतः 'नवनाथ भक्तिसार' ग्रंथातील कथांप्रमाणेच आहेत. फक्त, काही ठिकाणी पात्रांची नावे थोडी वेगळी आहेत. नेपाळ, बंगाल, मारवाड इ. अन्य प्रांतातील सांप्रदायिक ग्रंथात मात्र त्यांच्यासंबंधी आलेल्या कथा थोड्या वेगळ्या आहेत. परंतु परकायाप्रवेश, सिद्धींचे चमत्कार, विविध अस्त्रांचा वापर यासारख्या गोष्टी या कथांतही आढळून येतात. असे हे नाथसंप्रदायाचे पहिले मानवी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले मच्छिंद्रनाथ हे कौलमार्गाचे प्रवर्तक मानले जातात. हा कौलमार्ग भोगातून त्यागाकडे जाण्याचा संदेश देतो. काही विद्वान मच्छिंद्रनाथांना शैव मानतात, तर काही वैष्णव समजतात. काहींच्या मते ते बौद्ध तांत्रिक होते तर काही त्यांना कौलमार्गी म्हणूनही ओळखतात. परंतु खरे सांगायचे तर ते या सर्वांत असूनही या सर्वांच्या पलीकडचे होते!

श्रीगुरु गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथांबद्दल असे म्हटले जाते की, 'आद्य शंकराचार्यांनंतर इतका महान्‌ व प्रभावशाली पुरुष भारतवर्षांत दुसरा झाला नाही' आणि या विधानात कसलीही अतिशयोक्ती वाटत नाही. त्यांची महान्‌ गुरुभक्ती, घोर तप, उज्ज्वल चारित्र्य आणि धगधगीत वैराग्य सारेच कसे अतुलनीय होते!
श्रीगोरक्षनाथांचा जन्म ब्राह्मणकुळात झाला याविषयी बहुतेक सर्वच विद्वानांचे एकमत आहे. तथापि, ते अयोनिसंभव होते असेहीकाही कथांवरून दिसते. या संदर्भात, 'हा अजन्म अयोनिसंभ । विष्णु अवतार स्वयमेव । तो मानवगर्भ नव्हे की'
असे 'नाथलीलामृतकार' म्हणतात. (३. १८७) काहीजण त्यांना साक्षात्‌ विष्णूचा अवतार मानतात. या संदर्भात आदिनाथ भैरवाच्याच नाथलीलामृतात एक-दोन ठिकाणी असे उल्लेख आहेत. (अध्याय २-४५, अ. ३/१८७) तर ते शिवाचा अवतार होते असे शिवपुराणात सांगितले आहे. ते अयोनि संभवही समजले जातात. कारण त्यांचा जन्म उकिरड्यातून झाला होता.

श्रीगोरक्षनाथ हे अत्यंत देखणे होते. त्यांचा वर्ण गौर होता व ते भरपूर उंच होते असे त्यांचे वर्णन वाचावयास मिळते. परंतु देखणे असूनही ते कधी मायामोहात फसले नाहीत नि म्हणूनच त्यांना 'विषयविध्वंसक वीर' असे म्हटले आहे. त्यांना नाना सिद्धी अवगत होत्या, परंतु त्यांचा उपयोग त्यांनी सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याकडेच केला.

त्यांना योगमार्गाची दीक्षा त्यांचे गुरु श्रीमच्छिंद्रनाथ यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी हाटकेश्वरी घोर तपश्चर्या केली व ते सिद्ध बनले. पुढे त्यांनी नाना तीर्थयात्रा केल्या व अनेक सच्छिष्यांना नाथपंथाची दीक्षा देऊन भारतभर पाथपंथाचा प्रसार केला. त्यांनी कापालिक, शाक्त, कौल, गाणपत्य इ. अनेकांना नाथपंथात सामावून घेतले. ते ज्ञानाचे पूजक होते. गरीबांबद्दल त्यांच्या मनात अपार कणव होती. आसेतुहिमाचल संचार करून त्यांनी सतत लाकोद्धाराचे कार्य केले. त्यांनी अखेरपर्यंत आपले चारित्र्य स्फटिकाप्रमाणे धवल ठेवले व प्रत्येक स्त्रीकडे केवळ माता म्हणूनच पाहिले. महापुरुषाची सर्व बत्तीस लक्षण त्यांच्यामध्ये होती. भांग, मद्य, मांस इ. च्या सेवनापासून ते सतत अलिप्त राहिले.

श्रीगोरक्षनाथांचा निश्चित काल कोणता याविषयी विद्वानांत मतभेद आहेत, त्यामुळे त्यांचा काल आठ ते चौदा या शतकापर्यंत मागेपुढे खेचला जातो. त्यांच्या जन्मस्थानाविषयीही विद्वानांत एकमत नाही. त्यांचा जन्म पेशावर, गोरखपूर, हरगंज यापैकी कुठेतरी झाला असावा एवढाच निष्कर्ष आपल्याला काढता येतो.
केवळ भारतातच नव्हे, तर तिकडे दूर नेपाळातही त्यांना 'देवत्व' प्राप्त झाले होते, म्हणूनच नेपाळात काठमांडू येथे गोरक्षमंदीर आहे. भारतात त्यांचे आश्रम, मठ, गुंफा व मंदिरे अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.

त्यांचा शिष्यवर्ग फार मोठा होता. प्रसिद्ध अशा ८४ सिद्धांमध्ये त्यांचे बरेच शिष्य आहेत.
आजही गुप्तरूपाने ते खर्‍या साधकांना मदत करतात व त्यावरून ते चिरंजीव असावेत असे वाटते.
आता गुरु गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या वाङ्‌मयसंपदेचा कानोसा घेऊ.

गोरक्षनाथांची वाङ्‌मयसंपदा
आज गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या २८ संस्कृत व ४० हिंदी ग्रंथांचा शोध लागला असून ते वाचल्यानंतर गोरक्षांच्या तत्त्वज्ञानाचा सहज परिचय होतो. या ग्रंथात सिद्धसिद्धांतपद्धती, गोरखबानी, महार्थमंजरी, अवधूतगीता, योगमार्तंड, अमरौघप्रबोध, गोरक्षशतक इ. ग्रंथ प्रमुख मानले जातात.
यापैकी 'सिद्धसिद्धान्तपद्धती' हा गोरक्षांचा सर्वांत महत्वाचा असा संस्कृत ग्रंथ समजला जातो. यात नाथांनी लोकल्याणासाठी योगमार्गातील गुह्य ज्ञान प्रकटकरून सांगितले असून बद्ध जीवांना मोक्ष मिळवून देणारा असा हा अत्यंत श्रेष्ठग्रंथ आहे. तर 'गोरखबानी' मध्ये योग्याने सदासर्वदा आत्म्याचेच चिंतन करायला हवे व त्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे. अशाच साधकाला अलख निरंजन परब्रह्माचा साक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होईल असे ते सांगतात.

त्यांच्या 'अमनस्कयोग' या ग्रंथात जीवन्मुक्तीचे रहस्य विशद करून सांगितले असून हा योग मंत्रयोग, ध्यानयोग, जपयोग यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हा योग जाणणारा योगी सुख-दुःख, शीत-उष्ण, स्पर्श, रस, रूप गंध यांच्या पलीकडे गेलेला असतो. पाण्यात टाकलेले मीठ ज्याप्रमाणे विरघळून जाते त्याचप्रमाणे या लययोगाने मन ब्रह्मतत्त्वामध्ये लीन होते व योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. परंतु योगाने या सिद्धींच्या लोभात न अडकता आपली पुढची प्रगती साधायला हवी. हा अमनस्क योग केवळ 'गुरुमुखैकगम्य' म्हणजे केवळ गुरुच्या मुखातूनच प्राप्त होणारा आहे.

नाथांचा 'अवधूतगीता' हा ग्रंथ नाथपंथीयांमध्ये प्रमाणग्रंथ मानला जातो इतकी त्याची योग्यता मोठी आहे. ह्या गीतेत श्रोता आहे कार्तिकेय आणि उपदेशक आहे भगवान्‌ श्रीदत्तात्रेय. या ग्रंथात सर्वव्यापक असा केवळ आत्माच असून तेथे कसल्याही प्रकारचा भेदाभेद असू शकत नाही हे वेदान्ताचे सार सांगितले आहे. ('आत्मैव केवल सर्व भेदाभेदो न विते । ') आत्मा हा शुद्ध, निर्मळ, अव्यय, अनंत, शुद्ध ज्ञानस्वरूप आणि सुखदुःखातीत असा आहे. तो आतून व बाहेरून चैतन्यरूपाने नटलेला आहे. साकार व सगुण हे सर्व खोटे असून निराकार, शुद्ध, नाशरहित व जन्मरहित असा एक आत्माच सत्य आहे. त्याला आदि, मध्य व अंत अशा अवस्था नाहीत. तो पुरूष नाही की स्त्री वा नपुंसकही नाही. तो षडंगयोगाने वा मनोनाशाने शुद्ध होत नाही. कारण तो स्वभावतःच शुद्ध आणि निर्मळ आहे. अशाप्रकारे या 'अवधूतगीते'त आत्मतत्त्वाचा ऊहापोह असून सर्व नाथसिद्धांना गुरुस्थानी असलेल्या भगवान्‌ दत्तात्रेयांच्या मुखातूनच या गीतेचा उदय झालेला असल्यामुळे समस्त नाथपंथात या 'अवधूतगीते'ला फार महत्वाचे व मानाचे स्थान प्राप्त झाले असल्यास नवल नाही.

गोरक्षनाथांच्या ६८ उपलब्ध ग्रंथांपैकी सर्वच ग्रंथांचा असा परिचय स्थलाभावी करून देणे केवळ अशक्यच आहे. मात्र या सर्वच ग्रंथात गोरक्षनाथांनी योग, आत्मा, पिण्डब्रह्माण्ड, अजपा जप, जीव आणि परमात्मा यासारख्या महत्वाच्या विषयांची मौलिक चर्चा केलेली दिसून येते.

गोरक्षनाथांचा उपदेश व तत्त्वज्ञान
गोरक्षनाथांनी हिंदी, संस्कृत भाषेत हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून त्यांनी साधकांना जो मौलिक उपदेश केला आहे त्या उपदेशाचे सार किंवा तत्त्वज्ञान साधारणतः
पुढीलप्रमाणे सांगता येईल-
ते म्हणतात, 'ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे, तर मृत्यूवरही मात करतो. मांस, मदिरा भक्षण करण्यापासून जोआनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योगसाधना करून मिळतो. जीवाची हत्या कधीच करू नका. त्यांच्यावर दया करा. कारण सर्व योगसाधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार-विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग करायला हवा. हसा, खेळा परंतु ब्रह्माला विसरू नका. रात्रंदिवसस ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी. अल्प-स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्यायोगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होऊन नाड्यांमध्ये होईल, व चक्रांचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणेच साधकाने कमी बोलायला हवे. योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये. तसेच मूर्खांशी मैत्री करू नये. योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मारंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी. तसेच, शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा, इत्यादी.

श्रीगोरक्षनाथांच्या ग्रंथांवरून त्यांच्या अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला ओळख होते. हा विषय फार मोठा असला तरी वाचकांना त्याची येथे थोडक्यात ओळख करून दिली आहे.

गोरक्षनाथांच्या काळात भारतातील बौद्धादी धर्मसंप्रदायांमध्ये वामाचार सुरू झाला होता आणि पंचमकरांना (मांस, मद्य, मैथुन इ. ) प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त झाले होते. स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते. याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्व आपल्या ग्रंथाद्वारे व उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले, व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला.

त्यांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला, व त्यात नीतिमान, सदाचारी व संयमी साधक निर्माण केले. तसेच, त्यांनी या पंथात जातिभेद वा धर्मभेद कधीही मानला नाही. त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला.
आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले तसेच गोरक्षनाथांनी त्याच ध्येयपूर्तीसाठी योगमार्गाला महत्व दिले.
त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार 'सांख्यमत' हा असून 'पिण्डी ते ब्रह्माण्डी' या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर आहे. आपल्या शरीरात सारे ब्रह्माण्डसूक्ष्म रूपाने वसत आहे असे त्यांच्या 'सिद्धसिद्धान्तपद्धती' या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे.

मृत्यूनंतरची मुक्ती ही गोरक्षांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग यांच्या साहाय्याने नाथयोगी आपल्या देहालाच शिवस्वरूप बनवून याच देही मुक्त होऊ शकतो नि यासाठीच षट्‌चक्रे, पंचआकाश, नवद्वारे इ. चे सम्यक्‌ ज्ञान नाथयोग्याला असणे आवश्यक आहे.
कुण्डलिनी जागृतीलाही नाथसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे. कारण या कुण्डलिनीशक्तीच्या द्वारेच जीवशिव सामरस्याचा अनुभव नाथयोग्याला येतो.
मात्र हा अनुभव गुरुकृपेवाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्व आहे. अशा गुरुच्या ठिकाणी ३६ लक्षणे वा गुण असावयास पाहिजेत. एवढेच नव्हे, तर शिष्यातही ३२ लक्षणे वा गुण असल्यावाचून त्यास शिष्य होता येत नाही.

या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही. आमच्या उपनिषदांतही याचसाठी शरीररक्षणाला महत्व दिलेले आढळून येते. हठयोगाच्या साहाय्याने साधकाला याचि देही याचि डोळा हा मुक्तीचा सोहंळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्त्वज्ञान सांगते.
नाथांचे हे तत्त्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे. एकच अद्वितीयय असे परमतत्त्व शिव आणि शक्ती अशा दोन अवस्थांमधून प्रकट होते व शिव हाच शक्तिरूप बनून सर्व दृश्यसृष्टीमध्ये प्रकटतो असे हे तत्त्वज्ञान सांगते.

गोरक्षनाथांनी सांगितलेला योगमार्ग हा 'हठयोग' आहे. ह=सूर्य आणि ठ-चंद्र. म्हणजेच हा सूर्यचंद्रांचा योग आहे. सूर्य प्राणवायू आणि चंद्र अपानवायू. या दोहोंचा योग तो हठयोग.

श्रीगोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखेच महत्व असून शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि विष्णूकडून भक्ती यांची प्राप्ती होते असे हा संप्रदाय मानतो. तसेच, ह्या तिन्ही दैवतांच्या शक्ती श्रीदत्तात्रेयांमध्ये एकवटल्या आहेत असेही या संप्रदायात सांगितले आहे.

श्रीगोरक्षनाथांच्या महान तत्त्वज्ञानाची ही एक ओझरती ओळख असून ज्यांना त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे 'सिद्धसिद्धान्तपद्धति', 'गोरखबानी' इ. ग्रंथ मुळातून अभ्यासणेच योग्य ठरेल.

श्रीगोरक्षनाथांची थोरवी वर्णन करताना एका अभ्यासकाने लिहिलेले एक वाक्य खरोखरच लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणतो,
'आंतरिक शुद्धीवर भर, अनुभूतीला प्रमाणमानणारे मुक्तचिंन, तपःपुनीत तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि प्रखर आत्मविश्वास या गुणांमुळे गोरक्षनाथांनी औपनिषदिक ऋषींचा वारसा समृद्ध बनविला. '

त्यांच्या एकंदर कार्याची थोडक्यात ओळख पुढीलप्रकारे करून देता येईल.
'गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम, आगम, मंत्र-तंत्र, वज्रयान, हनियान, सिद्धयोगी इ. चा समावेश होत असला तरी तिचे शुद्धीकरण करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न त्यांनी केला. वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकाण्ड त्यांनी वगळले. तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला. जारण, मारण, उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी, ध्यानयोग, कुंडलिनीजागृती यांनी त्यांनी आपला साधनेत महत्वाचे स्थान दिले. वैदिक कर्मकाण्डाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजाभिमुख केली. इंद्रियनिग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली.

एका चिंतनशील अभ्यासकाने गोरक्षनाथांच्या संपन्न वारशाबद्दल असे म्हटले आहे की, 'आद्य शंकराचार्यानंतर त्यांच्याइतका प्रभावशाली महापुरुष भारतवर्षात दुसरा झाला नाही. ते आपल्या युगातील सर्वात थोरनेते होते'

गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते!

  ॥नवनाथांचा श्लोक ॥
गोरक्षजालंदरचर्पटाश्च अडबंगकानीफमछिंदराद्याः ।
चौरंगिरेवाणकभर्तिसंज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथसिद्धाः ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग