कोणाचे चिंतन करू ऐशा
2855.
कोणाचे चिंतन करू ऐशा काळे । पायाचिया बळे कंठीतसे ॥१॥
पाहातसे वाट येई गा विठ्ठला । मज का हा केला परदेश ॥धृपद॥
बहुतांचे सत्ते झालो कासावीस । जाय रात्रंदिवस वैरियांचा ॥२॥
तुका म्हणे बैसे मनाचिये मुळी । तरीच ही जाळी उगवती ॥३॥
अर्थ :
देवा संकटकाळामध्ये मी कोणाचे चिंतन करु कोणाला आठवू त्या संकटकाळामध्ये मी तुझ्या पायाच्याच आधाराने काळ कंठीत करीत आहे. हे विठ्ठला मी तुझी वाट पाहात आहे तू माझ्याकडे लवकर ये मला हा देश तू परदेश का केला आहेस ? देवा काम क्रोध आणि विविध प्रकारच्या विकाराच्या सत्तेने मी कासावीस झालो आहे आणि रात्रंदिवस मला वैऱ्यासारखा जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझ्या मनाच्या मूळापर्यंत जाऊन बस तरच या भवसागराच्या जाळयातून मी सुटू शकेल.
