का जी तुम्ही ऐसे नव्
2856.
का जी तुम्ही ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझे चित्त ठायीच्या ठायी ॥१॥
काही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥धृपद॥
दुःखी होतो पंचभूताच्या विकारे । जडत्वे दातारे राखावी ती ॥२॥
तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितो चरण म्हणऊनि ॥३॥
अर्थ :
देवा माझे चित्त जागच्या जागी निवांत राहील शांत होईल अशी माझ्यावर तुम्ही कृपा करुन कृपावंत का होत नाही. देवा माझ्या अंत:करणामध्ये सर्वत्र समानता तर विषमता कोठेही निर्माण होऊ नये आणि माझ्या अंत:करणात शांतीच नांदेल असा योग तुम्ही जुळवा. हे दातारा पंचभूताच्या विकाराने मी सारखा दु:खी होत आहे माझे स्वरुप आनंदस्वरुप आहे तरी देखील मी जडजीव आहे असेच मला ते पंचभूते दाखवित आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदाची त्या अहंकाराची मान मोडून टाका म्हणूनच मी तुमचे चरण धरीत आहे.
