मी मज माझीयाचा तुटला
200.
मी मज माझीयाचा तुटला संबंध ।
ऐसा लाविला वो येणे मज वेध ।
जिविं जीवाचा हा मोडिल कंद ।
नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥
सखिये साजणी वो ऐके माझे गुज ।
याति पाहता वो बोलता सहज ।
नेले हरुनिया अंतरीचे निज ।
पुढे नाचवि हा आपलेचि भोज वो ॥२॥
करिता कामधाम विसरुचि पडे ।
ध्यानिं आठवे हो याचेचि रुपडे ।
राहे वेष्टूनिया हाचि मागे पुढे ।
याविण न दिसेचि केले मज वेडे वो ॥३॥
करिता भोजन वो निजता शयनी ।
जागृतिं जागता वो बोलता वदनिं ।
हाचि जडोनिया ठेला माझे मनी ।
नेदि हा पारिखेचि दिसो जनिंवनिं वो ॥४॥
नेदि उमजो हा येऊ देहावरि ।
केलि माझिया संसारा बोहरी ।
हाचि व्यापुनिया ठेला घरीदारी ।
ऐसा नाटक हा नंदाचा खिल्लारि वो ॥५॥
येणे ऐशाचि वो मोहिल्या सुंदरा ।
नेल्या भुलउनि आपुल्या मंदिरा ।
हे मी नेणोनिया गेले याच्या दारा ।
तव निळा म्हणे वेधिले अंतरा वो ॥६॥
