माझे मजचि वो आतुडले
201.
माझे मजचि वो आतुडले गुज ।
नाही आणिकांचे कामा आले काज ।
सांडिली लौकिकाची बरे झाले लाज ।
तेणे लाधलीये निजाचेही निज वो ॥१॥
पडिली गाठी या गुणसवे ।
एकनिष्ठ वो शरण जाता भावे ।
मनीचे राखता वो आर्त नित्य नवे ।
झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥
याचिलागी म्या सोशिले गर्भवास ।
घेतले जन्म वो याचीच केली आस ।
नाही देखिले वो कोणाचे गुणदोष ।
म्हणेनि कृपावंत झाला हा परेश वो ॥३॥
जे जे अर्चिले ते सुकृत याचिसाठी ।
नाही वेचिले वो जतन केले गाठी ।
भोगी त्यागी वो याचि वरी दिठी ।
म्हणोनि आजि हा लाधले जगजेठी वो ॥४॥
धरिले जन्म ते सार्थक झाले माय ।
भेटवूनी याशी वो फळले उपाय ।
चुकले अवघेचि अघात अपाय ।
म्हणोनि आलिंगन देती यादवराय वो ॥५॥
केले ब्रीद वो साच येणे काळे ।
अनाथबंधु हे दीनाच्या दयाळे ।
केली कृपा वो पुरविले सोहळे ।
म्हणोनि निळा नित्य चरणावरी लोळे वो ॥६॥
