मनींचा माझिया वो संद
199.
मनींचा माझिया वो संदेह फिटला ।
देव पाहो जाता जवळींच भेटला ।
अवघा मागे पुढे तोचि वो ठाकला ।
जनी जनार्दन भरोनिया दाटला वो ॥१॥
पुरले जीवीचे आर्त साजणी ।
पाहे जेथे तेथे दिसे चक्रपाणी ।
लोकलोकातरी त्याचीचि भरणी ।
भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥
झाला सुकाळ हा सुखाचा मानसा ।
पडिला त्रिभुवनी एकरुप ठसा ।
धरा व्यापूनिया अंबर दशदिशा ।
आता भोगीन मी सर्वकाळ ऐसा वो ॥३॥
नाना भूताकृति एकचि आभासे ।
नाना नामे आळविता वो देतसे ।
नाना अळंकार एकचि लेतसे ।
नागिवा उघडाही बरवाची दिसे वो ॥४॥
नाना वस्त्रे हा नेसला पांघुरला ।
जेथील तेथेचि हा बहुरंगे नटला ।
शस्त्रे अशस्त्रे हा हाते मिरवला ।
सौम्य क्रूर ऐसा होऊनिया राहिला वो ॥५॥
एका निववी भोगवी नाना भोग ।
एका खाववी जेववी दावी जग ।
एका विचरे देऊनि अंगसंग ।
निळा म्हणे हा एकलाचि अनंग वो ॥६॥
