वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › २८. विभीषणाचा हितोपदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088247 · अभंग क्र. २८

28.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पुढील वृत्तांत वाचन

मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।
लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा । घेवोनि उडता हनुमंत ॥१॥
हनुमंताची परम कीर्ती । गगनी सुरवर वानिती ।
भूतळी वाखाणिती जुत्पती । वानीं कपिकिर्तीं श्रीराम ॥२॥
आवडी म्हणे श्रीरघुनाथ । सौमित्रां वाची ब्रह्मलिखित ।
मुद्रिका देवोनि हनुमंत । करी एकांत सीतेसी ॥३॥
धन्य ब्रह्मयाचे ब्रह्मपत्र । धन्य श्रवणार्थी श्रीरामचंद्र ।
धन्य वाचक सौमित्र । धन्य कपींद्र कपिकुळी ॥४॥

श्रीराममुद्रेमुळे झालेली सीतेची अवस्था

मुद्रिकातेजदेदीप्यता । श्रीराम आला मानी सीता ।
तेणे होवोनि सलज्जता । सप्रेमता घाबरी ॥५॥
सावधान पाहता देखा । पुढे देखे आंगोळिका ।
जाणोनि श्रीराममुद्रिका । सुखोन्मुखा जानकी ॥६॥

सीतेचे भाषण :

पहिलें वंदिली निढळीं । मग आलिंगिली ह्रदयकमळी ।
स्वानंदे चुंबी जनकबाळी । सुखें वेल्हाळी आलीसी ॥७॥
म्हणोनि घाली लोटांगण । भागलीस दूराभिगमन ।
तुझे करीन चरणक्षाळण । तीर्थसेवन हितार्थ ॥८॥
तुझे सेविता तीर्थचरण । लक्ष्मणासी केले म्या छळण ।
त्या पापाचें निर्दाळण । प्राप्ती संपूर्ण श्रीरामी ॥९॥
तू तंव सखी श्रीराममुद्रा । घालूं शेज करिसी निद्रा ।
श्रमलीस उतरतां समुद्रा । मार्गीं गिरिवरां लंघिता ॥१०॥
मी वामांगी तू दक्षिणांगीं साजणीं । आम्ही दोघी स्वानंदभगिनी ।
श्रीरामाची समूळ कहाणी । कृपा करोनी मज सांगे ॥११॥
नाठवे सचेतन अचेतन । सद्‌गुरूभक्तिप्रेम पूर्ण ।
तेणे हनुमंता आले रुदन । धन्य भजन सीतेचे ॥१२॥
आम्ही म्हणवितों श्रीरामभक्त । हे प्रेम नाही आम्हांआंत ।
जानकी सप्रेम सदोदित । हीस रघुनाथ तुष्टला ॥१३॥
सगुण निर्गुण श्रीरामभक्त । जो वंदी तो नित्यमुक्त ।
जो निंदी त्यासी नरकपात । वदे हनुमंत वेदार्थ ॥१४॥
मुद्रिका देखतांचि दृष्टी । अत्यादरे मानी गोरटी ।
तिसी पुसे सप्रेम गोष्टी । राम जगजेठी काय करितो ॥१५॥
स्वस्थ श्रीरामलक्ष्मण । तरी का माझी सोडवण ।
करावया न करिती आंगवण । दुर्धर बाण असतांही ॥१६॥
श्रीरामभातां दुर्धर शर । समुद्र शोषोनि समग्र ।
निवटोनियां दशशिर । सीता सत्वर सोडविता ॥१७॥
त्यांही दोघीं त्यजिली सृष्टी । हे न सांगवे दुःखकोटी ।
म्हणोनि सुचली मौननिष्ठी । सज्ञान मोठी राममुद्रा ॥१८॥
श्रीराम गेला परलोकता । मौनमुद्रा सांगे वार्ता ।
तो जरी येथे स्वस्थ असता । मज सोडवितां निमेषार्धे ॥१९॥
श्रीरामचा एकैक बाण । करील त्रैलोक्याचें कंदन ।
त्यापुढे कायसे दशानन । गेला त्यजोन परलोका ॥२०॥
सखा छळिला म्या लक्ष्मण । तेणे क्षोभला रघुनंदन ।
मज उदधींत सांडोन । गेले दोघे जण परलोका ॥२१॥
मुद्रिके सांग सत्य गोष्टी । मज रावणे हरिल्यापाठीं ।
दोघे येवोनि पंचवटीं । अति संकटी काय केले ॥२२॥
मुद्रिका नेदी प्रतिवचन । तुझ्या मौनाचें हेंचि कारण ।
माझेनि विरहे दोघे जण । रामलक्ष्मण निमाले ॥२३॥
किंवा लोकलज्जे भ्याले । दोघे विष घेवोनि निमाले ।
माझेनि दुःखे दुखावले । मूर्च्छेसवें गेले प्राण त्यांचे ॥२४॥
माझेनि दुःखे दुःख प्रबळ । त्यजिला आहार फळमूळ जळ ।
दोघा भरोनियां तरळ । प्रबळ तत्काळ सोडिले ॥२५॥
सीता सीता आक्रंदोनी । प्राण सांडिला दोघीं जणीं ।
नातरीं मागतां पाणीं पाणीं । ताहना फुटोनी निमाले ॥२६॥
मज न देखता पर्णकुटीं । दोघे जाले कडेलोटी ।
अथवा शस्त्रे घातली पोटी । केला कंठी गळफांस ॥२७॥
पर्वतकड प्रचंड धोंडीं । दोघी घातल्या मुरकुंडी ।
तेथे वाळोनि जाल्या कर्वडी । दुःखा निर्वडी निमाले ॥२८॥
की विजनी मूर्च्छित पडिले । वृकव्याघ्रीं ते फाडिले ।
सिंहशार्दूळीं विभांडिले । किंवा रगडिले वनगजीं ॥२९॥
ते तंव वीर दोघें निधडे । सिंह शार्दूळ ते बापुडे ।
अथवा रावणे केले कुडे । छळोनि रोकडे मारिले ॥३०॥
विश्वामित्रायागाप्रती । श्रीराम सावध अहोरात्री ।
करिता सुबाहु छळणोक्ती । त्यासी रघुपतीनें मारिले ॥३१॥
छळावया श्रीरामलक्ष्मण । शूर्पणखा सुंदर पूर्ण ।
तिचे केले विटंबण । न चले छळण श्रीरामी ॥३२॥
श्रीराम सहजेंचि उदासी । रावणे हरिता सीतेसी ।
न्यस्तशस्त्र जाला सन्यासी । वनवासी वनस्थ ॥३३॥
अथवा आणिक आहे गुज । श्रीराम आत्माराम सहज ।
रावणे हरितांचि मज । समाधिशेजे प्रवेशला ॥३४॥
जन्म मरण आधि व्याधी । जेथे शमती त्रिशुद्धी ।
श्रीराम सेवी ते समाधी । देहउपाधि जेथे नाही ॥३५॥
देहबुद्धीचिया माथा । मी राम सीता कांता ।
हेंही नाठवे रघुनाथा । समाधिअवस्था समपदीं ॥३६॥
समाधिसुखी स्वभावतां । कैंचा राम कैंची सीता ।
रावणे हरिली माझी कांता । हेंही रघुनाथा नाठवे ॥३७॥
समाधिसेजे सुखसंपन्न । मिथ्या देहादि प्रपंचभान ।
मिथ्या राम मिथ्या रावण । धांवण्या कोण धांवेल ॥३८॥
ऐसे ऐकता ब्रह्मलिखित । श्रीराम जाला समाधिस्थ ।
सर्वेंद्रियें उपरमत । कर्तव्यार्थ नाठवे ॥३९॥

त्याचे वचनाचा राम व सर्व श्रोत्यांवर झालेला परिणाम

जे लिहिलें ब्रह्मलिखितीं । जे बोलिली सीता सती ।
तेंचि जाला रघुपती । स्वरूपस्थिती स्वभावे ॥४०॥
श्रीराम परब्रह्ममूर्ती । ब्रह्मा लिखित ऐकोनि स्थिती ।
स्वये पावला उपरती । स्वरूपस्थिती स्वभावे ॥४१॥
नेत्र जाले अर्धोन्मीलित । प्राण पांगुळला जेथींचा तेथ ।
चित्त चैतन्यीं समरसित । जाला सदोदित परब्रह्म ॥४२॥
ब्रह्मस्थितीचें लक्षण । जेथे नाही मीतूंपण ।
कैंचा राम सीता रावण । आपणा आपण विसरला ॥४३॥
लक्ष्मणा खुंटली वाचाशक्ती । स्वरूपीं सुलीन रघुपती ।
सुग्रीव कळवळिला कपिपती । तळमळती वानर ॥४४॥
लक्ष्मणा खुंटली वाचासिद्धी । श्रीराम पावला समाधी ।
सीता ना सुटे लंकावबंदी । कार्य त्रिशुद्धी नासलें ॥४५॥
हनुमंते धरिले दृढ मौन । कथा ऐके कर जोडून ।
देखोनि समाधिविंदान । हनुमान संपूर्ण खवळला ॥४६॥
श्रीरामा समाधि ते उपाधी । मज कळलेंसे त्रिशुद्धी ।
हनुमंते कैसी केली बुद्धि । विंदानविधी अवधारा ॥४७॥
म्या आणिली सीताशुद्धी । मिथ्या होऊं पाहे त्रिशुद्धी ।
पुढील खुंटली कार्यसिद्धी । रामसमाधि भली नव्हे ॥४८॥
म्या सीतेसी दिधली भाक । की येथे आणीन रघुकुळटिळक ।
कायसे बापुडे समाधिसुख । माझी भाक नव्हे मिथ्या ॥४९॥
समाधिव्युत्थापनापरता । श्रीराम स्वये स्वभावता ।
त्यासी कायसी समाधिअवस्था । सावध आता मी करीन ॥५०॥
श्रीरामस्वरूप स्थिती । सकळ जाणे स्वये मारूती ।
प्रबोधावया रघुपती । केली युक्ती ते ऐका ॥५१॥
स्थूळ लिंग आणि कारण । तिही वेगळा होऊन ।
जेथे नाही मीतूंपण । तेथे आपण प्रवेशे ॥५२॥
महाकारणीं प्रवेशोन । प्रबोधावया रघुनंदन ।
वाचेवीण अनुवादोन । गुरूवचन प्ररिपादी ॥५३॥
श्लोक श्रीसद्‌गुरू वशिष्ठाचा । हनुमान वदे पांचव्या वाचा ।
तोडावया बंध समाधीचा । अर्थ तेथींचा अवधारा ॥५४॥
हातींचें हाती घेता वस्तु । शब्देंवीण अर्थ प्राप्तु ।
पांचवे वाचेचा हा अर्थु । श्रोता समर्थु हा राम ॥५५॥
अंतरी अद्वैत एक । बाह्य स्वधर्मे पाळी लोक ।
अंतरी निजबोध चोख । वेदविवेक बाह्य पाळीं ॥५६॥
अंतरी सर्वस्वाचा त्याग । बाह्यावतार भोगी भोग ।
सांडोनि समाधिनिजयोग । उद्धरी जग निजकीर्ती ॥५७॥
सांडोनि समाधिसांकडी । तोडीं नवग्रहांची बेडी ।
सोडी देवांची बांधवडी । उभारीं गुढी रामराजा ॥५८॥
सद्‌गुरू वसिष्ठाचे वचन । ऐकोनिया रघुनंदन ।
स्वये होवोनि सावधान । दिधले आलिंगना हनुमंता ॥५९॥
श्रीरामचें जे ह्रद्गत । हनुमान जाणे भगवद्‌भक्त ।
हनुमंताचा भावार्थ । जाणे रघुनाथ ह्रदयस्थ ॥६०॥
कपीसी दिधले आलिंगन । श्रीराम जाला सावधान ।
देवा भक्तांचें अनन्यपण । अगम्य जाण श्रुतिशास्त्रां ॥६१॥
श्रीराम अनन्यभक्त सीता । अनन्य भक्ति हनुमंता ।
दोहींची ऐकावया कथा । श्रीरघुनाथा आल्हाद ॥६२॥

सीतेचा मुद्रिकेशी संवाद

ब्रह्मलिखिताच्या अर्था । ऐकावया आवडी रघुनाथा ।
अशोकवनी वदली सीता । ते कथा अति गोड ॥६३॥
श्रीराममुद्रा अचेतन । तिसी देवोनि अति सन्मान ।
घालोनिया लोटांगण । सीता आपण पुसत ॥६४॥
कैसेनि चालवलें वाटा । कैसेनि उल्लंघिलें घाटा ।
समुद्र तरणीं दुस्तर मोठा । केंवी परतटा आलीस ॥६५॥
तुज आणिले रघुपती । किंवा आणिकाचे संगती ।
ते ते सांगे मजप्रती । सीता सती पूसत ॥६६॥
रामनाम तुजवरी । अटक नाही चराचरी ।
सुखें तरसीं भवसागरीं । धन्य संसारी तू राममुद्रें ॥६७॥
श्रीराममुद्रा ज्यासी लागे । तो संसारी तरे सर्वांगें ।
हे तुज पुसणेंचि नलगे । कृपानुरागें आलीसी ॥६८॥
मी वामांगी तू दक्षिणांगिनी । आम्ही तुम्ही दोघी बहिणी ।
लगबगेसीं मजलागोनी । कृपानुरागिणी आलीसी ॥६९॥
माझी कृपा तुझे पोटी । तरी सांग पा गुह्य गोष्टी ।
मजमागे पंचवटीं । रामे संकटीं काय केले ॥७०॥

सीतेची मूर्च्छा पाहून हनुमंतावर परिणाम

मुद्रिका नेदी प्रतिवचन । तुझे मौनाचें कारण ।
निमाले रामलक्ष्मण । न सांगोन सांगसी ॥७१॥
श्रीराम गेला निजधामासी । तुज धाडिले सांगावयासी ।
मीही त्यजीन या देहासी । कांस सरसी तिणें केली ॥७२॥
साक्ष करूनि मुद्रिकेसी । मुद्रा धरोनि ह्रदयासीं ।
आठवितां श्रीरामासी । पडे भूमीसीं मूर्च्छित ॥७३॥
सीता पडतांचि मूर्च्छित । गजबजिला हनुमंत ।
श्रीरामविरहे सीता संतप्त । प्राण निश्चित त्यागील ॥७४॥
देखता श्रीराममुद्रेसीं । राम निमाला वनवासी ।
धरोनि निश्चयो मानसी । निजदेहासीं त्यागील ॥७५॥
येथे निमालिया सीता । काय मुख दाखवू रघुनाथा ।
तुझी मरोनियां कांता । आलो मी आता पुरूषार्थी ॥७६॥
करोनि समुद्रोल्लंघन । मीचि सीतेसी झालो विघ्न ।
श्रीराममुद्रा स्वये टाकोन । घेतला प्राण सीतेचा ॥७७॥
श्रीरामे मुद्रा दिधली खूण । ते म्या आणोनि आपण ।
घेतला सीतेचा प्राण । अति उद्विग्न हनुमंत ॥७८॥
खूण दावोनि आणावी सीता । शेखी खुणेनें मारिली तत्वता ।
कैसेनि भेटो श्रीरघुनाथा । प्राणांतावस्था हनुमंती ॥७९॥
मुद्रिका टाकिली उठाउठी । हेचि बुद्धी म्या केली खोटीं ।
श्रीराममुद्राविरहासाठीं । सीता गोरटी निमाली ॥८०॥
मज येवोनि लंकेआंत । ना सीता ना रघुनाथ ।
ऐसा ओढवला अनर्थ । तेणे हनुमंत अति दुःखी ॥८१॥
माझेनि निमाली पै सीता । अपेश बैसलें माझे माथा ।
काय करू रे रघुनाथा । बुद्धिदाता मज होई ॥८२॥
श्रीरामा मी तुझे अति दीन । माझे माथा बैसलें विघ्न ।
तू कृपाळू रघुनंदन । नित्य निर्विघ्न मज करी ॥८३॥
आदरे स्मरतां रघुनंदन । बुद्धि आठवली अति निर्विघ्न ।
सीता व्हावया सावधान । श्रीरामकीर्तन करावे ॥८४॥
श्रीरामकीर्ती हनुमंत । आदरे गाय वृक्षाआंत ।
जेणे जोडे स्वार्थ परमार्थ । तैसा अर्थ अनुवादे ॥८५॥

हनुमंताचे रामचरित्र संकीर्तन

ऐकता श्रीराम कीर्तन । सीता होय सावधान ।
तैसे हनुमंते आपण । हरिकीर्तन मांडिलें ॥८६॥
कौसल्यागर्भी गर्भातीत । दाशरथि श्रीरघुनाथ ।
परब्रह्म मूर्तिमंत । सूर्यवंशांत अवतरला ॥८७॥
श्रीराम पुरूष सीता प्रकृती । राम चैतन्य सीता चिच्छक्ती ।
श्रीराम धैर्य सीता धृती । धन्य जगतीं अवतार ॥८८॥
गोडी आणि साखर पाहता । दो नामी एकचि वस्तुता ।
तेंवी श्रीराम आणि सीता । एकात्मता अवतार ॥८९॥
श्रीरामाचे आचरित । गुरूपितृआज्ञे नित्य विक्रीत ।
ब्राह्मणांचा अनन्य भक्त । सुरसाह्यार्थ अवतार ॥९०॥
कैकेयीवरदें श्रीदशरथें । श्रीरामा धाडिलें दंडकारण्याते ।
सखा लक्ष्मण सांगाते । निघे रघुनाथ वनवासा ॥९१॥
वनवास गंगातटीं । वसतिस्थान पंचवटीं ।
राम राहिला जगजेठी । सीता गोरटी समवेत ॥९२॥
शूर्पणखा विटंबून । मारिले त्रिशिरा खर दूषण ।
श्रीरामे घेवोनि जनस्थान । दिधले दान द्विजांसीं ॥९३॥
मृगकंचुकीस लोभतां । मृगामागे पाठविले रघुनाथा ।
छळोनि सौमित्रा दवडितां । हरिली सीता रावणे ॥९४॥
श्रीराम आणि लक्ष्मण । करिता सीतेचे गवेषण ।
जटायुरावणाचें रण । दोघे जण तेथे आले ॥९५॥
श्रीराम कृपाळु पूर्ण । करोनि जटायुउद्धरण ।
कबंधातें मारोन । आले आपण किष्किंधें ॥९६॥
रामे निर्दाळोनि वाळीसी । राज्य दिधले सुग्रीवासी ।
यौवराज्य अंगदासी । वानरांसी निजसख्य ॥९७॥
तुझे शुद्धीलागोनि येथे । मज धाडिलें श्रीरघुनाथें ।
तुझे भेटीलागीं सीते । व्रत रघुनाथे धरियेले ॥९८॥
विश्वासावें मनी ह्या वानरा । म्हणोनि रामे दिधली मुद्रा ।
सांडोनिया निद्रा तंद्रा । भेटें कपींद्रा रामदूता ॥९९॥
ऐकोनि रामकथामृत । सीता उठली हर्षयुक्त ।
कथानुवाद वृक्षाआंत । तेणे विस्मित जानकी ॥१००॥

श्रीरामकथा ऐकून सीतेचे आवाहन

कृपेनें कळवळला श्रीरघुनाथ । मज आश्वासावया येथ ।
वृक्ष कथा अनुवादत । आला निश्चित श्रीराम ॥१०१॥
वृक्षांसीं पुसे करोन नमन । कोण करितो रामकीर्तन ।
त्याचे पाहीन मी वदन । लोटांगण त्या माझे ॥१०२॥
ज्यासी श्रीरामकथाशैली । त्याचे चरणींची रजधुळी ।
मी वंदीन सुखसमेळी । मुख मजजवळी दावावें ॥१०३॥
ज्याचे मुखीं रामकीर्तन । त्याचे मज देखता वदन ।
परम सुख समाधान । कृपा करोन भेटावे ॥१०४॥
सीता सप्रेम निजचित्तें । आंत उत्कंठित भावार्थे ।
जेणे खूण मुद्रा आणिली येथे । कृपावंतें मज भेटावे ॥१०५॥

हनुमंताचे सीतेस वंदन :

ऐकोनि सीतेचे वचन । हनुमंते स्वये उतरोन ।
सीतेसी घालोनि लोटांगण । मस्तकी चरण वंदिले ॥१०६॥
महानिधीचा लाभ जाला । सुधाब्धि चूळोदकें प्राशिला ।
किंवा कळिकाळ जिंकोनि आला । तो पाहु जाला हनुमंता ॥१०७॥
तेणे हरिखाचेनि मेळे । गडबडा पायांवरी लोळे ।
आनंदाश्रू स्त्रवती डोळे । सुखसमेळे डुल्लत ॥१०८॥
धांवधांवोनि पाया पडे । सस्वेद सद्गद सप्रेम रडे ।
पुच्छ नाचवोनि पुढे । हर्षे उडे वानर ॥१०९॥
येथे सांपडली सीता । जाली कार्यसिद्धि रघुनाथा ।
यश आले मज हनुमंता । उल्हासता नाचत ॥११०॥

सीतेकडून हनुमंतास प्रश्न :

सीता विचारी पोटाआंत । हा म्हणवितो रामदूत ।
रामासवें कैंचा हनुमंत । पंचवटिकेंत हा नव्हता ॥१११॥
राम लक्ष्मण दोघे वीर । त्यांसवें नाही वानर ।
कैंचें नेणो हे वनचर । नानाविकार करिताहे ॥११२॥
पूर्वी जटायु देखिला होता । नाही देखिले हनुमंता ।
येथे आलासे अवचिता । सीताछळणार्थ रावण ॥११३॥
पूर्वी होवोनि आला संन्यासीं । आता आला वानरवेषीं ।
केंवी विश्वासूं मी यासी । सीता मानसी विचारी ॥११४॥
श्रीरामकथा अनुवादत । धन्य धन्या हा श्रीरामभक्त ।
कपटी नव्हे हा हनुमंत । मज निश्चित मानले ॥११५॥
मिथ्या म्हणो नये हनुमंता । सत्य सांगितली श्रीरामकथा ।
याच्या पूर्वापरवृत्तांता । यासी मी आता पुसेन ॥११६॥
सीता पुसेल वृत्तांत । सत्य सांगेल हनुमंत ।
तेचि कथेचा कथार्थ । मुख्य मोक्षार्थ अवधारा ॥११७॥
एकाएकी अशोकवनांत । आला देखुनी हनुमंत ।
त्याचा समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥११८॥
मी वनवासी असता । तू नव्हतासि हनुमंता ।
कैंचा आलासी तू आता । निजवृत्तांता मज सांगे ॥११९॥
कैसेनि श्रीराम देखिला दृष्टी । तुम्हा श्रीरामा कैसेनि भेटी ।
कैशा कैशा केल्या गोष्टी । जेणे का पोटी अति प्रीती ॥१२०॥
कैसा बाणला वचनार्थ । साधावया श्रीरामकार्यार्थ ।
हनुमान सर्वांगी उल्लासत् । तो गुह्यार्थ मज सांगे ॥१२१॥
श्रीराम भेटल्या कैसे सुख । श्रीरामवचनीं कैसे पीयूख ।
श्रीरामसंगे कैसा हरिख । योगपरिपाकें मग सांगे ॥१२२॥
श्रीरामाचे ठाणमाण । रूप रेखा गुणलक्षण ।
कैसा आहे सखा लक्ष्मण । दोहींची खूण मज सांगे ॥१२३॥

मारूतीवर रामकथेचा परिणाम

ऐकता श्रीरामाची कथा । दुःख शोक नाठवे चित्ता ।
निमे भवभयाची वार्ता । कथा ऐकता आनंद ॥१२४॥
याचिलागी पुढतपुढती । तुज मी पुसें अति प्रीती ।
कथेमाजीं अति विश्रांती । जाण मारूती हरिभक्ता ॥१२५॥
केलिया कथेचे श्रवण । नाही मनन निदिध्यासन ।
तरी ते कथा होय शून्य । जेंवी मैथुन वंध्येचे ॥१२६॥
श्रद्धा श्रीरामकथाश्रवण । ऐकती त्यांचे महिमान ।
अहं सोहं कोहं विरोन । ब्रह्मपूर्ण स्वये होती ॥१२७॥
चित्त तेंचि होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधिधन ।
कर्म होय ब्रह्म परिपूर्ण । इंद्रियाचरण चिन्मात्र ॥१२८॥
ऐसी श्रीरामस्वरूपसंस्था । सादरें पुसतां पै सीता ।
टक पडली हनुमंता । कथा वार्ता विसरला ॥१२९॥
श्रीरामस्वरूप वदे सुंदरा । तेणे अवस्था अति वानरा ।
नेत्री अश्रूंचिया धारा । अंग थरथरा कांपत ॥१३०॥
अंग जाले रोमांचित । स्वेद आला डवडवित ।
मूर्च्छापन्न पडे हनुमंत । तेणे विस्मित जानकी ॥१३१॥
वानर वनचर पालेखाईर । त्यासी श्रीरामी प्रेमपडिभार ।
लंघोनि आले हे सागर । भक्त साचार हनुमंत ॥१३२॥
ऐसे जाणोनि तत्वता । आवडी आश्वासी त्या सीता ।
सावधान करी हनुमंता । श्रीरामवार्ता पुसावया ॥१३३॥
एकाजनार्दना शरण । सीताहनुमंतसंवाद कथन ।
गोड गोड निरूपण । सावधान अवधारा ॥१३४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितजानकीहनुमंतसंवादकथनं नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः ॥२८॥
॥ ओव्या १३४ ॥ श्लोक ६ ॥ एवं संख्या १४० ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग