वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ३४. श्रीरामांना सीतेचा संदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088246 · अभंग क्र. ३४

34.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय चौतिसावा ॥
श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन

ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली अल्पकीर्ती ।
त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥१॥
श्रीरामा तुझे हे वानर । लंके आले पालेखाइर ।
त्याची कीर्ति अति दुर्धर । मज साचार लिहवेना ॥२॥
अठरा लक्ष दीपिका पूर्ण । कपीने पुच्छे विझवोन ।
रावणसभा करोनि नग्न । दशानन गांजिला ॥३॥
रिघोन रावण शयनस्थाना । परिसोनि मंदोदरीचे स्वप्ना ।
सीता शुद्धी आणी मना । अशोकवना कपि आला ॥४॥
देवोनियां श्रीराममुद्रा । सुखी करोनि सीता सुंदरा ।
गांजावया राक्षसेंद्रा । केला तरूवरा नवभंग ॥५॥
मारिले वनकरा किंकरां । पंच सेनानी प्रधानपुत्रां ।
जंबुमाळी करोनि पुरा । निशाचरा निर्दळिले ॥६॥
मुख्य मारावया धुरा । प्रथम बोहणी अखया कुमरा ।
इंद्रजितासी लावोनि भेदरा । अदटा वीरां मारिले ॥७॥
राक्षससैन्याचिया श्रेणीं । अर्बुदांत पाडिल्या रणी ।
रूधिरप्रवाहो धरणी । भूतां पारणीं मेदमांसे ॥८॥
रणनदी रूधिरस्नान । मेदमासें आतृप्ति भोजन ।
भूते प्रेते पिशाचगण । रणनर्तन ते करिती ॥९॥
दशमुखाची दाढी जाळिली । लंकापुराची करोनि होळी ।
हनुमान आला तुजजवळी । आतुर्बळी महावीर ॥१०॥
ब्रह्मा म्हणे माझे युक्ती । धरविली ते लिहिली कीर्ती ।
मजही न कळे कपीची ख्याती । मी लिखितीं केंवी लिहूं ॥११॥
जैसा अवतार श्रीरामचंद्र । तैसाच हनुमंत साचार ।
वीर धीर महाशूर । गुणगंभीर गांभीर्यें ॥१२॥
श्रीराम देव हनुमंत भक्त । दोहींच्या स्वरूपाचा इत्यर्थ ।
करू नेणती श्रुतिशास्त्र । इत्थंभूत केंवी मी जाणे ॥१३॥
श्रीराम जीव हनुमान प्राण । श्रीराम शिव हनुमान ज्ञान ।
श्रीराम ब्रह्म हनुमान पूर्ण । दोघे परिपूर्ण परब्रह्म ॥१४॥

ब्रह्मलिखित पत्रश्रवणाने श्रीरामांस आनंद व मारूतीस आलिंगन

ब्रह्मयाने लिहिलें ब्रह्मलिखितीं । ऐकोनि हनुमंताची ख्याती ।
संतोषोनि रघुपती । अति प्रीती आलिंगीं ॥१५॥
ह्रदया ह्रदय लागता देख । दोन्ही ह्रदयीं श्रीराम एक ।
एक तोचिं पै अनेक । अनेकीं एक श्रीराम ॥१६॥
हनुमान अवघाचि रामाआंत । हनुमान सबाह्य श्रीरघुनाथ ।
लवण समुद्री एक होत । तैसा हनुमंत श्रीरामी ॥१७॥
देवाभक्ताची जाली भेटी । निर्विकल्पें पडली मिठी ।
परमानंदे कोंदली सृष्टी । आनंदकोटी सुग्रीवा ॥१८॥
विजयी आमुचा हनुमान वीर । वानर करिती भुभुःकार ।
अवघी केला जयजयकार । श्रीरामचंद्र स्मरोनी ॥१९॥
अगाध हनुमंताती ख्याती । ऐकोनिया श्रीरघुपती ।
स्वमुखें आदरिली स्तुती । अति प्रीती हनुमंता ॥२०॥
वानितां हनुमंताची कीर्ती । करिता हनुमंताची स्तुती ।
धणी न पुरे श्रीरघुपती । तेचि श्लोकार्थी अनुवादो ॥२१॥

श्रुत्वा हनूमतः कीर्ति यथावदभिभाषितम् ।
रामः प्रीतिसमायुक्तं वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥१॥
नूनं हनूमतः कृत्यं सुमहद्‌भुवि दुष्करम् ।
मनसापि यदन्येन न शक्यं धरणीतलें ॥२॥
नहि तं प्रति पश्यामि यस्तरेत महार्णवम् ।
अन्यत्र गरूडाद्वायोरन्यत्र च हनूमतः ॥३॥
देवदानवयक्षाणां गन्धर्वोरगरक्षसाम् ।
अप्रवेश्या पुरी लंका रावणेनाभिपालिता ॥४॥
गुप्ता दुर्गगिरेर्मूर्न्घि वीरेणैकेन धर्षिता ॥५॥

श्रीरामांनी केलेली हनुमंताची प्रशंसा :

उल्लंघोनि अपांपती । लंके जावोनिया मारूतीं ।
अतर्क्य श्रुतिशास्त्रप्रयुक्ती । ते ते ख्याती येणे केली ॥२२॥
एके उड्डाणे समुद्रलंघन । करी ऐसा आहे कोण ।
गरूड वायु की वायुनंदन । अन्यत्रा गमन न करवे ॥२३॥
गरूडागमन पक्षगतीं । वायूसी सर्वत्र गमनशक्ती ।
एके उड्डाणे हा मारुती । समुद्री ख्याती करोनि गेला ॥२४॥
सुरसा सिंहिका मैनाकगिरीं । कपीचा मार्ग रोधला सागरी ।
एका सोडी एका मारी । एकाचा गर्व हरी स्पर्शमात्रें ॥२५॥
अगाध उड्डाणाची थोरी । लंका सांडोनि माघारी ।
जावोनि पडलंकेभीतरीं । कौंचा सहपरीवारीं वधियेली ॥२६॥
लंकादुर्ग सागरोदरीं । रावण रक्षी सहपरिवारी ।
अति दुर्गम गिरिशिखरीं । दुर्धर थोरी गर्वाची ॥२७॥
जया दुर्गाची निरवडी । देव बंदी तेहतीस कोडी ।
नवग्रहांचे पायी बेडी । येरा बापुडीया कोण पुसे ॥२८॥
देव दैत्य गुह्यक दानव । यक्ष रक्ष सिद्ध गंधर्व ।
पन्नग ऋषीश्वर मानव । कांपती सर्व लंकेशा ॥२९॥
ऐसिया दुर्धर लंकेप्रती । नाही साह्य ना सांगाती ।
एकला रिघोनियां मारूती । अभिनव ख्याती येणे केली ॥३०॥
इंद्रजिते दांती धरिले तृण । ऐसे दुर्धर केले रण ।
रावणाचे मुख जाळोन । केले दहन लंकेचें ॥३१॥
सीतेची सावकाश घेवोन भेटी । तिच्या पुसोनि गुह्य गोष्टी ।
मणि घेवोनि जग जेठी । उठाउठी येथे आला ॥३२॥
रणकंदन सीताशुद्ध्यर्थ । सुखी सुग्रीव कपिनाथ ।
ऐकोनि सीतानिजगुह्यार्थ । श्रीरघुनाथ सुखी जाला ॥३३॥
ऐकोनि सीताअनुतापवचनें । लक्ष्मण सुखावें जीवे प्राणें ।
वानरा होतसे सुखपारणें । कपींचें बोलणे ऐकोनी ॥३४॥
लघुत्व न येता वानरजाती । कपीनें केली रणख्याती ।
तेणे सुग्रीव वानरपती । सुखसंवित्ती पावला ॥३५॥
करोनि राक्षसकंदनार्थ । कपीनें आणिला सीताशुद्ध्यर्थ ।
आम्हा अवघियां पुरूषार्थ । संरक्षित हनुमंत ॥३६॥

हनुमंताकडून श्रीरामनामास्तवन

श्रीरामे करिता स्तुती । हनुमान अति विनतवृत्ती ।
लोटांगणें घालोनि क्षिती । स्वये रघुपतीतें विनवी ॥३७॥
श्रीरामा तुझी नामशक्ती । तेणे म्या केली लंकेची ख्याती ।
त्या मज रंकाची स्तुती । केंवी रघुपति तू करिसी ॥३८॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । संतोषोनि श्रीरघुनंदन ।
पुढतीं पुसतसे आपण । दुर्गलक्षण लंकेचें ॥३९॥

श्रीरामांना लंकादुर्गाविषयी माहिती

लंकादुर्ग हे कैसे काये । कोणाची कैसे आहे ।
दुर्गींचें बळ दळसमुदाय । साभिप्राय मज सांगे ॥४०॥
दुर्गद्वारीं क्रियास्थिती । दुर्गाचीं यंत्रें गुप्तगती ।
द्वाररक्षण सैन्यसंपत्ती । रिघूं निघूं युक्ती मज सांगे ॥४१॥
दुर्ग शोधिलें तुवा समूळी । घेतली लंकेची घरधांडोळी ।
किती सैन्य रावणाजवळी । आतुर्बळी वीर किती ॥४२॥
आम्हांसी मांडिलिया रण । संमुख येती कोण कोण ।
तू तंव तेथींचा रणप्रवीण । रणलक्षण मज सांगे ॥४३॥
श्रीराम राजपुत्र सज्ञान । हनुमंत अनुलक्षोन ।
पुसिला लंकादुर्गप्रश्न । तेंवी आपण कपि सांगे ॥४४॥
लंका दुर्गीं समुद्र आगड । तेणे करिता अति अवघड ।
न कळे सुरासुरांची घडमोड । परम गूढ समुद्री ॥४५॥
मत्त गजांचिया हारी । मद स्त्रवती लंकानगरीं ।
मदगंध न माये अंबरीं । मत्त भ्रमरीं झंकार ॥४६॥
अश्वरथांचियां थाटी । पदरज न माये अंबुटीं ।
सैन्य असंख्य कोट्यनुकोटी । वीर जगजेठी राक्षस ॥४७॥
लंकादुर्ग अतिशय दुर्धर । खंदकीं जळ अपरंपार ।
माजी मीन नक्र मगर । जळीं जळचरें असंख्य ॥४८॥
उभवोनि यंत्रावरी यंत्र । परसैन्याचें देखोनि भार ।
दुरोनि करिती चकचूर । यंत्रभार महागोळा ॥४९॥
नावानिगिया अति मर्दनी । ज्या शतघ्नी सहस्त्रघ्नी ।
दुर्ग चौफेर चहू कोनीं । यंत्रश्रेणीं मारका ॥५०॥
चोरद्वारांची व्युत्पत्ती । इंद्रजित कपटी गुप्तगती ।
घाला घालोनी रातोराती । धुरा मारिती अस्त्रबंधें ॥५१॥
दुर्गीं शतानुशत दारवंटे । मुख्य वागणें चहू वाटे ।
आगळा सांखळा घडघडाटें । दृढ कपाटें लोहबंधें ॥५२॥
श्रीरामासी करावया युद्ध । रावणासी अति आल्हाद ।
सैन्य सन्नद्ध बद्ध । द्वंद्वयुद्ध धुरेसीं ॥५३॥

लंकेची निर्मिती व संरक्षणाची व्यवस्था :

समुद्रमध्यगिरीचे माथा । वसावया लंकानाथा ।
लंका करवी विधाता । दुर्गकर्ता विश्वकर्मा ॥५४॥
विश्वकर्मा निजव्युत्पत्ती । लंका निर्मीं दुर्गम गती ।
ते लंकेची दुर्गम ख्याती । म्या तुजप्रती सांगितली ॥५५॥
चहू द्वारी संरक्षण । भट सुभट वीर दारूण ।
रावणे ठेविले आपण । रक्षोगण ते ऐका ॥५६॥
पूर्वद्वारी दहा सहस्त्र । निधडे निःशंक निशाचर ।
शूळहस्ती खड्गधर । अति दुर्धर ते द्वारी ॥५७॥
पश्चिमद्वारीं महाशूर । अर्बुदांत महावीर ।
शस्त्रास्त्रीं प्रवीण निशाचर । ते द्वारी द्वार रक्षिती ॥५८॥
लक्षानुलक्ष निधडे वीर । रथ गज वाजी महाशूर ।
ते रक्षिरी दक्षिणद्वार । अहोरात्र गर्जोनी ॥५९॥
उत्तरद्वाराचा पै धाक । स्वये वाहे दशमुख ।
येणे द्वारे रघुकुळटिळक । आवश्यक येईल ॥६०॥
शतानुशतें शतानुसहस्त्रीं । गुल्मागुल्मीं हारोहारीं ।
स्वये रावण सहपरिवारी । उत्तरद्वारीं संरक्षी ॥६१॥
लंकासमुद्राचे बेटीं । वसताहे गिरि त्रिकूटी ।
भोंवतीं राक्षसांची घरटी । पारखें दृष्टी केंवी देखे ॥६२॥
लंकादुर्ग अति गूढं । ऐकता वाटे अवघड ।
तोही केला म्या निवाड । कडेफोड दुर्गाची ॥६३॥

मारूतीच्या लंका दहनामुळे दुर्ग घेणे सोपे झाले

लंकादुर्ग श्रीरघुपती । म्या पाहिले जाण निश्चिती ।
म्हणसी चोरोनि रातीं बितीं । वीरां रणख्याती लावोनी ॥६४॥
रावणे पुच्छा लावितां आगीं । लंका जाळिता उभयभागीं ।
वीर मारिले ते प्रसंगी । रणरंगी भिडोनी ॥६५॥
उपर्या धवलारें गोपुरे । सप्तखणी दामोदरें ।
लंका जाळिली घरोनघरें । राजमंदिरं मुख्यत्वें ॥६६॥
आगळा सांखळा दुर्गांचे ओटे । लोहनिबद्धें कपाटें ।
जाळिले दुर्गांचे दारवंटे । श्रीराममर्कटें हनुम्यानें ॥६७॥
मत्स्यमगरकुळीं । खंदक भरले होते जळीं ।
ते म्या बुजिले समूळी । दुर्गाच्या पौळी पाडोनी ॥६८॥
दुर्ग जाळिता नानापरी । मुख्य दुर्गवस्तीचा जो गिरी ।
तो म्या जाळिला पुच्छेंकरीं । करोनि महामारी राक्षसा ॥६९॥
रावण करोनिया दीन । म्या जाळिलें लंकाभुवन ।
राखिलें बिभीषणाचे सदन । तो भक्त पूर्ण परमार्थी ॥७०॥
जो जो श्रीरामाचा भक्त । तो तो आमचा परम आप्त ।
रावणाच्या राण्या समस्त । त्याच्या घरांत वांचविल्या ॥७१॥
श्रीराम रिघावया समदळीं । सदुर्ग लंका केली होळी ।
समुद्र तरलिया गोळांगूळी । लंका तत्काळी घेतील ॥७२॥

समुद्रापलीकडे जाण्याच्या योजना :

समुद्रपारीं निश्चिती । लंकादुर्गी रावणा वसती ।
नावांची तेथे न चले गती । मत्स्य गिळिती महामीन ॥७३॥
मत्स्य मीन आणि मगर । नावा गिळिती महानक्र ।
समुद्र अतिशयेंसीं दुर्धर । केंवी परपार पावाल ॥७४॥
समुद्र तरावया आता । उपाव चिंतावा सर्वथा ।
दुस्तर सांगता हनुमंता । आले रघुनाथा स्फुरण ॥७५॥
सोडोनियां अग्निबाण । करीन समुद्राचे शोषण ।
जळजंतूंचे जातील प्राण । तरी मी आन न करीन ॥७६॥
तीव्र तप सत्वनिष्ठ । समुद्री करोनि पायवाट ।
वानरवीर सुखे संतुष्ट । परतट पावती ॥७७॥
समुद्रलंघन ते किती । त्यास का वेंचूं तप : संपत्ती ।
सेतु बांधोनि सिंधूप्रती । नेईन जुत्पती परतटा ॥७८॥

विजयादशमीच्या मुहूर्तावर मध्यान्ही प्रयाण करण्याचा सुग्रीवाचा आदेश

सुग्रीवास पाचारोन । गर्जोनि सांगे श्रीराम पूर्ण ।
आजचि करावे प्रयाण । रणी रावण मारावया ॥७९॥
विजयादशमी सुमुहूर्ती । जयो पावला रघु चक्रवर्तीं ।
प्रपितामह तो आम्हांप्रती । त्याची ख्याती तू ऐके ॥८०॥
शमीतळीं प्रथमवस्तीं । धनेश्वर तेचि रातीं ।
अपार वर्षला संपत्ती । विखुतलें क्षिती बहुधन ॥८१॥
तैपांसोनि अद्यापि जाण । आणावया बहुसाल धन ।
विजयादशमीस सीमोल्लंघन । शमीपूजन जन करिती ॥८२॥
पूर्वजांचे सुमुहूर्त । आजि मज जाले प्राप्त ।
लंकेसी जावया त्वरित । सेना समस्त सिद्ध करी ॥८३॥
रणी दंडावया लंकापती । शुभ लोचन माझे लवती ।
आलिंगावया सीता सती । बाहुस्फुरती स्वानंदे ॥८४॥
मध्यान्हीं येतांचि आदित्य । रणविजयीं अभिजित ।
प्रयाण करावे निश्चित । ऐसे रघुनाथ बोलिला ॥८५॥

सुग्रीव अंगद वगैरे वीरांना आनंद व प्रयाणा करिता सैन्यरचना

ऐकोनि श्रीरामाचे वचन । सुग्रीवा आले अति स्फुरण ।
भेरी त्राहाटिल्या निशाण । लंकाप्रयाण गडगर्जे ॥८६॥
अंगद हर्षला तत्काळी । वानरसेनेंत पिटिली टाळीं ।
रावण मारोनि महाबळी । जनकबाळी आणावया ॥८७॥
सुग्रीवराजाज्ञेची नीती । वानरांची निघती स्थिती ।
ज्यासी जैसी नेमिली गती । तिही त्या रीती चालावें ॥८८॥
वानरसेना आज्ञावर्तीं । नीळ महावीर सेनापती ।
तेणे चालावे ऐसिया रीती । मार्गगती शोधोनि ॥८९॥
धाडोनि तरस्वी तराळ । फळ मूळ जळ स्थळ ।
सेना चालवावी सुखसमेळ । यावे तत्काळ पाहोनि ॥९०॥
जिकडे नाही फळ मूळ जळ । तिकडे चालवितां दळ ।
वानर कष्टतील सकळ । सेना विकळ होवो नेदी ॥९१॥
यालागी शोधोनि मार्गस्थिती । वानरा पदोपदीं विश्रांती ।
सेना चालवावी ऐसिया रीती । सेनापती सज्ञानें ॥९२॥
एकोनि श्रीरामाचा वचनार्थ । वानर हर्षले समस्त ।
बाप कृपाळु श्रीरघुनाथ । आम्ही सनाथ श्रीरामे ॥९३॥
जरी आम्ही वानरे उद्धत । तरी म्हणती रामदूत ।
हरिखें रामनामे गर्जत । आम्ही सनाथ श्रीरामे ॥९४॥
मार्गगतीचें लक्षण । श्रीराम वदला आपण ।
नीळे घालोनि लोटांगण । मस्तकी चरण वंदिलें ॥९५॥
नीळासवें निजपरिवार । शतसहस्त्र वानरवीर ।
अवघ्यांपुढे चाले भार । जयजयकार करोनी ॥९६॥
गज गवाक्ष शरभ वीर । नीळामागें सहपरिवार ।
चालिला तिघांचा संभार । जयजयकार करोनी ॥९७॥
गाईंमागें जैसे गोर्हें । नीळामागे तेणे प्रकारे ।
वानर चालिलें निजभारें । जयजयकारें गर्जती ॥९८॥
ऋषभवीर वानरवोधीं । तेणे चालावे दक्षिण भागीं ।
गंधहस्तीं गंधमदान दोघीं । वामभागी चालावें ॥९९॥
कोट्यनुकोटी वानरभार । युवराज राजकुमर ।
अंगदे घेवोनि सहपरिवार । केला नमस्कार श्रीरामा ॥१००॥
निशाणे त्राहाटिल्या भेरी । तडक फुटला एकसरी ।
काहाळा चिनका हाळा थोरी । रणमोहरी गर्जतीं ॥१०१॥
जाला तुरांचा गजर । सुग्रीवराजा सहपरिवार ।
वानरी केला जयजयकार । संख्यासंभार अवधारा ॥१०२॥
शतानुशत श्याममुख वानर । गोळांगूळें शतसहस्त्र ।
कोट्यनुकोटी केवळ शुभ्र । असंख्य वानर हेमवर्णीं ॥१०३॥
एक ते डाळिंबीकुसुमाकार । शेंदुरवर्णी वीर अपार ।
सुनीळ निळे वानरभार । अंजनाकार असंख्य ॥१०४॥
एक बालार्कसम तांबडे । एक ते चंद्रबिंबसम चोखडे ।
इंद्रचापा समान वेगाढे । एक रोकडे स्फटिकाचें ॥१०५॥
कोट्यनुकोटी अयुतें प्रयतुतं । अर्बुदे अर्बुदांतशतानुशतं ।
वानरवीर असंख्यात । हरि गर्जत रामनामे ॥१०६॥
ऐसे वानरराजभार । शशाकच्छत्र युग्मचामर ।
सुग्रीव निघाला राज्यधर । जाला गजर वाद्यांचा ॥१०७॥
वृक्ष फळित पुष्पित । किंशुकफुलें झेलित ।
टकेपताका त्या सैन्यांत । वीर गर्जत रामनामे ॥१०८॥
वानरवीरां अत्यंत हरिख । मारोनिया दशमुख ।
सीता आणावी आवश्यक । देती हाक श्रीरामे ॥१०९॥
एक रामनामे उपरमत । एक ते आनंदें नाचत ।
वानरसैन्य उल्लासत । अभिषेकार्थ रामसीता ॥११०॥
श्रीरामांकित आम्ही जुत्पती । रावण बापुडे ते किती ।
आणोनिया सीता सती । श्रीरघुपती अभिषेकूं ॥१११॥
ऐसा देखोनि सुग्रीवभार । संतोषला श्रीरामचंद्र ।
निघावया अति सत्वर । केले विचित्र ते ऐका ॥११२॥

हनुमंतावर श्रीराम व अंगदावर लक्ष्मण आरूढ होऊन त्यांचे प्रयाण

इंद्र चढे ऐरावता । तैसा श्रीराम पुढे हनुमंता ।
अंगद अति उल्लासता । होय उचलिता सौमित्रा ॥११३॥
जैसा भूतारूढ भूतनाथ । तैसा अंगदीं ऊर्मिळाकांत ।
देखोनि उल्लासे श्रीरघुनाथ । अति उल्लासित सुग्रीव ॥११४॥

दक्षिण दिशेला गमन

श्रीरामलक्ष्मण वीर वरिष्ठ । सुग्रीवराजा तयांनिकट ।
दक्षिणपंथे घडघडाट । वीर उद्‌भट चालिले ॥११५॥
सुषेण आणि जांबुवंत । जांबुवंताचा ज्येष्ठ भ्रात ।
जो का ऋक्षाराज विख्यात । नामसंकेत धूम्राक्ष ॥११६॥
सुषेण वीर जगजेठी । जांबुवंत वीर निकटी ।
श्रीराम लक्षोनिया दृष्टी । सुखसंतुष्टी चालिले ॥११७॥
श्रीरामाचे पाठी जाण । जांबुवंत आणि सुषेण ।
हेही चालती सावधान । यांसी हे स्थान नेमस्त ॥११८॥
वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ । त्यासी वांटोनि देती वाट ।
ऐका सांगेन ते स्पष्ट । वीर वरिष्ठ मार्गभागीं ॥११९॥
शतबळीं नामे कपीश्वर । सेना दशकोटी परिवार ।
श्रीरामाचा दक्षिणपार । राखें वानर उल्लासें ॥१२०॥
केशरी हनुमंताचा पिता सावत्र । अंजनीचा पूर्व भ्रतार ।
सेना शतकोटिसंभार । वीर वानर आतुर्बळीं ॥१२१॥
त्याहीसवें वीर प्रबळ । गज गवाक्ष वीर अतिबळ ।
गवय वानर अति विक्राळ । सकळ दळ संरक्षी ॥१२२॥
उल्कामुखनामें महावीर । प्रभवनामा अति दुर्धर ।
इंद्रजानु त्याहूनि थोर । आला सत्वर रामकाजा ॥१२३॥
दधिमुख प्रजंघ जंघ । शरभ क्षुरभ कपी अनेग ।
श्रीरामाचे सैन्य सांग । अष्टदिग्भाग रक्षिती ॥१२४॥
रामाज्ञा दुर्धर गाढी । नेमिल्या मार्गाच्या परवडी ।
चालती वानरांच्या कोडी । समुद्रथडी लक्षोनी ॥१२५॥

मार्ग शोधण्यासाठी व रस्ते करण्यासाठी पुढे सैनिक पाठविले

समस्तही सीताप्राप्त्यर्थ । वानरा उल्लास अत्यद्‌भुत ।
येरयेरांपुढे उडत । उपरमत उल्लासें ॥१२६॥
येरयेरांवरी चडती । येरयेरांवरी उडती ।
येरयेरांते पाडिती । आसुडती येरयेरा ॥१२७॥
येरयेरा तिरस्कारिती । येरयेरा निखंदिती ।
येरयेरा कुस्ती घेती । नोकोचिती येरयेरा ॥१२८॥
येरयेरा दाविती वांकुली । येरयेरा करिती गुदगुली ।
रामनामेंगर्जती महाबळी । गगनी आरोळी न समाये ॥१२९॥
वांकुल्या दाविती सुग्रीवाकडे । पिलंगतीं वाडेंकोडें ।
अवघे नाचती रामापुढें । मातलीं माकडें रामनामे ॥१३०॥
सैरां जाता वानरपंक्ती । निशाचरां शिंतरती ।
मार्ग शोधावयाचे अर्थीं । पुढे जुत्पती पाठविले ॥१३१॥
राक्षस मारोनि उद्‌भट । पुढील शोधावया वाट ।
नळ वीर अति उद्‌भट । वीरवरिष्ठ पै पनस ॥१३२॥
राक्षसांची गती अगती । पनस जाणे अतर्क्यवृत्ती ।
कुमुद वीर महामती । राक्षसजातिघातक ॥१३३॥
मार्ग शोधावया जाण । स्वये श्रीरामे आपण ।
तिघे धाडिलें वीर दारूण । वानरसैन्यसमवेत ॥१३४॥
वानरसेनासमुद्रजळा । नीळ सेनानीं तोचि वेळा ।
आंवरोनि सकळ दळा । वीरार्गळा प्रतापी ॥१३५॥
नीळाची निग्रहआज्ञावृत्ती । ऋक्ष वानर आणि जुत्पती ।
कोणी उल्लंघूं न शकती । प्रतापमूर्ति सेनानी ॥१३६॥

मध्ये न थांबता नीट जाण्याचा आदेश :

नेमूनि बोलिलो श्रीरघुपती । मध्ये न करोनि वस्ती ।
आजिचे आजि लंकेगती । शीघ्रगती स्वये जाणे ॥१३७॥
ऐकोनि श्रीरामउत्तर । पृथ्वी कवळोनि समग्र ।
चालिले वानरांचे भार । हातेरें नखदंष्ट्रा ॥१३८॥
श्रीरामनामाचा गुणगुणाचार । चालिले रीस अपार ।
नामे गर्जती वानर । असंख्यभार चालिलें ॥१३९॥
नदनदिया देशोदेशीं । गिरिकंदरी विवरासीं ।
वानर आले रामकाजासीं । मही चौपासी कवळोनी ॥१४०॥
चारी बोटे रिती क्षिती । नाही उरली वानरांहातीं ।
सोडवावया सीता सती । शीघ्रगती चालिले ॥१४१॥
वानर वीर चालता धरणी । रज : कण कोंदले गगनी ।
सूर्य लोपला मध्यान्हीं । काळाच्या मनी चळकांप ॥१४२॥
सूर्य लोपतां माध्यान्हीं । गाई परतल्या गोठणीं ।
पक्षी कळकळती गगनी । देवाविमानीं कांपती ॥१४३॥
वानरवीर अहोरात्री । वाटे न घेवोनि विश्रांती ।
सोडवावया सीता सती । शीघ्रगती निघाले ॥१४४॥
श्रीरामकार्याचे निजसुख । वानरा नाठवे तहानभूक ।
निद्रा विसरोनि निःशेष । दक्षिणामुख चालिले ॥१४५॥

विंध्याद्री, मध्याद्री व विविध वने-उपवने उल्लंघून समुद्रतीरावर आगमन

उल्लंघोनि विंध्याद्री । उल्लंघोनि मलयाद्री ।
नाना वने वानरी । क्षणामाझारीं लंघिली ॥१४६॥
नदी नद थोरथोर । क्षणे उतरोनि वानर ।
तंव पुढे देखिला सागर । गर्जत घोर गडगर्जे ॥१४७॥
ऐकोनि समुद्राचा गजर । श्रीरामनामें घेती वानर ।
अवघी केला भुभुःकार । नादें अंबर कोंदलें ॥१४८॥
नामे कोंदलें अंबर । नामे कोंदला सागर ।
नामे कोंदलें चराचर । नामे वानर गर्जती ॥१४९॥
गिळोनि समुद्राचा ध्वनी । नाम कोंदलें जीवनीं ।
नामे कोंदली अवनी । नाम त्रिभुवनी कोंदलें ॥१५०॥

रामसेना व सागर यांची तुलना

पुढे जलाब्धि महासागर । पाठीसी वानरसेनासमुद्र ।
मध्ये शोभे श्रीरामचंद्र । मर्यादामेरू धैर्याचा ॥१५१॥
गंगायमुनासंगमांत । शोभे प्रयागवाट मध्यस्थ ।
तेंवी सैन्यजलसिंधूआंत । शोभे रघुनाथ प्रतापें ॥१५२॥
पावोनिया समुद्रतीर । कटक उतरले समग्र ।
उल्लंघावया सागर । वानरवीर उल्लासी ॥१५३॥
समुद्री महामीन चवकत । तैसेचि वानर तळपत ।
समुद्री मत्स्य उल्लाळें देत । कपि उपरमत आकाशी ॥१५४॥
अतिशये निबरा पाठी । कमठ देखोनिया दृष्टी ।
शिळा बांधोनियां पाठी । वानरकोटीं नाचती ॥१५५॥
तीक्ष्णदंत देखोनि मगर । दांत विचकोनि वानर ।
स्वये धांवती त्यांसमोर । कपिपुच्छाग्र तोचि फडा ॥१५६॥
समुद्री मत्स्यांचीं चळवळ । तैसी वानरा कळवळ ।
आणावया जनकबाळ । उतावीळ अवघेही ॥१५७॥
समुद्री येती दुर्धर लाटा । तैसा वानरी प्रताप लाठा ।
वेगी जावोनि परतटा । दशकंठा मारावया ॥१५८॥
जेंवी रेखा नुल्लंघवे सागरा । तेंवी श्रीरामाआज्ञा वानरा ।
अवघे आले समुद्रतीरा । लंकापुरा जावया ॥१५९॥
एकाजनार्दना शरण । पुढे गोड निरूपण ।
श्रीरामा भेटेल बिभीषण । सेतुबंधन अवधारा ॥१६०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसमुद्रतीरागमनं नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३४॥
॥ ओव्या १६० ॥ श्लोक ४८ ॥ एवं संख्या २०८ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग