वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ३७. हनुमंताची स्तुती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088248 · अभंग क्र. ३७

37.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय सदतिसावा ॥
बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

त्यानंतर काही न बोलता शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला :

बिभीषणासी अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।
स्वये श्रीराम स्मरोन । सावधान बैसला ॥१॥
कांही न बोलोनि उपपत्ती । विचारोनि विवेकयुक्ती ।
शरण जावे श्रीरघुपती । निश्चयो चित्ती दृढ केला ॥२॥

बिभीषणाचे विचार :

चौघे घेवोनि प्रधान । स्वये निघाला बिभीषण ।
रावणासी मधुर वचन । काय आपण बोलत ॥३॥
आम्ही तुम्ही सखे बंधु । अणुमात्र नाही विरोधु ।
सांगता तुजला हितानुवादु । वृथा क्रोधूं तुवा केला ॥४॥
निंदोनियां लंकानाथा । श्रीरामा वाणिलें स्वपक्षार्था ।
तरी मी जाईन अधःपाता । जाण तत्वता लंकेशा ॥५॥
हनुमंतापुढें तुझे दळ । तुजदेखतां पळाले सकळ ।
तेंचि म्या करोनि विकळ । तुज प्रांजळ सांगितले ॥६॥
तेणे राग प्रधानचित्ता । तेणे राग सैन्या समस्ता ।
तूंही कोपलासी लंकानाथा । निजस्वार्था नेणोनी ॥७॥
चोरी मारी आणि परव्दारी । हा धर्म तुझे घरी ।
अनुताप रिघावया तुजमाझारी । निजगजरीं बोलिलो ॥८॥
राक्षसांची सभा खोटी । म्या सांगितली स्वहितगोष्टी ।
तेच करोनि उफराटी । धरिला पोटी महाक्रोध ॥९॥
जेंवी ज्वरिताचें मुख । दुग्धा मानी कडु विख ।
तैसे रावणा जाले देख । मानिसी असुख स्वहिताचें ॥१०॥

क्रोधाचा प्रभाव व त्याचे दुष्परिणाम :

अति कोपे लंकानाथा । तुवा मजला हाणितल्या लाथा ।
तरी काय जिंकिले रघुनाथा । किंवा स्वस्थता तुज जाली ॥११॥
कोप जगामाजी अपकारी । त्याची वस्ती तुजमाझारी ।
तेणे विवेकाची केली बोहरी । स्वहित दुरी दुराविलें ॥१२॥
भलताही क्रोधानुकारी । कोपे अल्प अन्यायमात्रीं ।
कोप परम अपकारी । कोणी त्यावरी कापेना ॥१३॥
उन्मत्त गज जिवे मारीं । त्यासी सिंह पाडी धरेवरी ।
परी कोपावरी कोप करी । ऐसा संसारी वीर नाही ॥१४॥
क्रोध एकला एक । चहू पुरूषार्थीं घातक ।
ऐक त्याचाही विवेक । दुष्ट परिपाक क्रोधाचा ॥१५॥
क्रोध येतांच मानसी । स्वधर्मकर्मा क्रोध त्रासी ।
क्रोध अर्थ स्वार्थ विध्वंसी । मोक्ष क्रोधापासीं कदा न घडे ॥१६॥
क्रोध आलिया एकांती । स्त्रीपुरूषां कलहउत्पत्तीं ।
धक्काबुक्कीमध्यें रात्री । कामविघाती समूल क्रोध ॥१७॥
क्रोध आलिया धर्मसंधीं । मुख्य ब्राह्मणातें स्वये निंदी ।
परापवादाच्या अनुवादी । क्रोधे धर्मसिद्धी कदा न घडे ॥१८॥
क्रोध धर्मातें उच्छेदी । क्रोध कर्माते निंदी ।
क्रोध पापी हा दुर्बुद्धी । निंदानुवादीं जल्पोनीं ॥१९॥
क्रोध पित्यातें निर्भर्त्सी । क्रोध मातेतें म्हणे दासी ।
क्रोध स्वधर्मातें नासी । क्रोधापासी अधर्म ॥२०॥
बंधु बंधु अति आप्त । अर्थस्वार्थें क्रोधाभिभूत ।
स्वबंधूसी हाणवी लाथ । अति अनर्थ तो क्रोध ॥२१॥
उत्तम अर्थाचिये प्राप्ती । क्रोध मुख्य विश्वासघाती ।
अर्थापासीं क्रोध अनर्थीं । जाण निश्चिती लंकेशा ॥२२॥
अंधारी जरी सूर्य बुडे । तरी क्रोधापासी मोक्ष जोडें ।
काम क्रोध लोभ जै झडे । तैंच आतुडे निजमोक्ष ॥२३॥
धर्म अर्थ काम मोक्षता । चहू पुरूषार्था क्रोध नागविता ।
तो तुजमाजी वसे लंकानाथा । जेणे मज लाता हाणविल्या ॥२४॥

बिभीषणाचे रावणाला शेवटचे सांगणे :

मज हाणितलिया लाथा । पावलासि कोणा निजस्वार्था ।
किंवा पावलासि परमार्था । जासी अधःपाता श्रीरामद्रोहे ॥२५॥
परम कृपा रघुनाथा । तुवा हाणितल्या लाथा ।
अल्पहीं क्रोध नयें चित्ता । निजशांतता श्रीरामे ॥२६॥
तुवा हाणितांचि लाथा । पावलों परम वैराग्यता ।
सांडोनि स्वराज्यसुह्रदता । शरण रघुनाथा मी जातो ॥२७॥
सापत्नभावें ध्रुवा हाणिल्या लाथा । तेणे तो पावला परम स्वार्था ।
तैशाच तुझ्या रावणा लाथा । श्रीरघुनाथ प्राप्तिकर ॥२८॥
श्रीराम कृपाळु दयाळ । श्रीराम भक्तवत्सळ ।
तू ते नेणसीच बरळ । क्रोधे विव्हळ केलासी ॥२९॥
गर्व सांडोनि लंकानाथा । श्रीरामा अर्पिलिया सीता ।
तू पावशील गा निजस्वार्था । येर्‍हवीं वृथा मरशील ॥३०॥
सुटल्या श्रीरामाचे बाण । तुज येथे राखेल कोण ।
पळतेचि हनुभ्यांभेण । कैंची आंगवण राक्षसा ॥३१॥

त्याचा रावणावर परिणाम :

ऐसे बोलोनि बिभीषण । वचनी खोचिला रावण ।
क्रोधे अंतरला बंधु पूर्ण । कंपायमान स्वये जाला ॥३२॥
माझी अपक्व बुद्धि पूर्ण । लाथा हाणितांचि जाण ।
सखा अंतरला बिभीषण । गेला शरण श्रीरामा ॥३३॥

आईला वंदन करून श्रीरामांकडे जाण्याचा बिभीषणाचा विचार :

आठवलें बिभीषणाच्या चित्ता । आधी अभिवंदोनि माता ।
तीस सांगोनि निजवृत्तांता । शरण रघुनाथा जाईन ॥३४॥
कुळक्षयो देखोनि जाणा । सुबुद्धि सांगावया रावणा ।
मातेने धाडिलें बिभीषणा । हितोपसंज्ञा सांगावया ॥३५॥
रावणासी हित सांगता । कोप आला लंकानाथा ।
बिभीषणा हाणितल्या लाथा । ऐकोनि माता अति दुःखी ॥३६॥
बिभीषणा भाग्यवंता । तू पावलासी बा रघुनाथा ।
कंदन आले लंकानाथा । कुळा समस्ता समवेत ॥३७॥

मातेची प्रतिक्रिया व त्याला शुभाशीर्वाद :

माता तुष्टली बिभीषणासी । तुझेनि धन्य माझी कुशी ।
श्रीरामी तू विनटलासीं । सकळ कुळासी तू भूषण ॥३८॥
तुझेनी सकळ कुळ पुनीत । तुझेनि वंश हा सनाथ ।
तुझेनि मी नित्यमुक्त । श्रीरघुनाथ निजसेवा ॥३९॥

बिभीषणाचे प्रयाण :

ऐकोनि मातेचे वचन । बिभीषण घाली लोटांगण ।
पुढती वंदोनि तिचे चरण । निघाला शरण श्रीरामा ॥४०॥
बिभीषण उडोनि आकाशी । निराळीं राहोनि सावकासी ।
पुढती बोले रावणासी । सत्य तू होसी सखा माझा ॥४१॥

लाथा मारून श्रीरामाकडे पाठवल्याबद्दल बिभीषण रावणास धन्यवाद देतो :

मोहममतेचे सखेपण । हीन दीन अति गौण ।
कोपामाजी कृपाळु पूर्ण । सखा रावण सत्यत्वे ॥४२॥
हाणोनियां निजलाथा । शरण धाडिलें रघुनाथा ।
ऐसा सखा तुजपरता । नाही तत्वता तिही लोकी ॥४३॥
जन्ममरणांचिया कोडी । लाथा हाणोनि तोडिली बेडी ।
रावणकोपकृपापरवडी । जोडिला जोडी श्रीराम ॥४४॥

ते ऐकून रावणास पश्चात्ताप :

ऐसी रावणाची स्तुती । बिभीषण वदे निजशांती ।
ते ऐकोनि लंकापती । आश्चर्यें चित्ती वचकला ॥४५॥
जाला अनुतापी रावण । माझी अपक्व बुद्धि पूर्ण ।
सखा अंतरला बिभीषण । गेला शरण रघुनाथा ॥४६॥

सर्व लोकांकडून बिभीषणाची स्तुती :

सैन्य सेनानी प्रधान । अवघे वानिती बिभीषण ।
अणुमात्र कोप न येच जाण । व्यर्थ रावण क्षोभला ॥४७॥
धन्य बिभीषणाची शांती । धन्य बिभीषणाची किर्तीं ।
धन्य बिभीषणाची स्थिती । शरण रघुपती तो गेला ॥४८॥
राक्षसांच्या घातका युक्ती । हा सांगेल श्रीरामाप्रती ।
आली राक्षसा समाप्ती । केला समस्ती निश्चयो ॥४९॥

बिभीषणाची रावणाला शेवटची विनंती :

बिभीषण म्हणे रावणासी । जे जे इच्छा तुझे मानसी ।
ते ते सांग मजपासीं । सिद्धी सर्वांशी श्रीराम ॥५०॥
कृपेने हाणोनियां लाथा । शरण धाडिले श्रीरघुनाथा ।
ऐक माझी प्रत्युपकारिता । तुज मी आता सांगेन ॥५१॥
सावध ऐके दशशिरा । मी अंतकाळींचा सोयरा ।
तुवा व्देषितां श्रीरामचंद्रा । नरकव्दारा जावों नेदी ॥५२॥
अंतीं होय परम मुक्ती । ऐसी श्रीरामनामकीर्ति ।
केलिया श्रीरामाची भक्ती । उद्धारगती वंशस्था ॥५३॥
ऐसे बोलोनि बिभीषण । करोनि रावणासी नमन ।
घेवोनिया चौघे प्रधान । निघाला शरण श्रीरामा ॥५४॥

चार प्रधानांसह बिभीषण रामाकडे जातो :

जैसे चारी पुरूषार्थ । जीवास करिती नित्य मुक्त ।
तैसे चारी प्रधान तेथ । साह्य सतत बिभीषणा ॥५५॥
नातरी चारी वेद । उपनिषदी करिती बोध ।
जीवासी पावे परमानंद । तैसे प्रबुद्ध प्रधान ॥५६॥
हो का जैशा चारी मुक्ती । जीवासी देती ब्रह्मप्राप्ती ।
तैसे प्रधान परमार्थी । नित्यानुवर्ती बिभीषणा ॥५७॥
नातरी जैशा वाचा चारी । नित्यानित्यविवेककरी ।
जीवासी नेती साक्षात्कारीं । तैसे चारी प्रधान ॥५८॥
ऐसे घेवोनि चारी प्रधान । मेरूमांदारांसमान ।
येता देखोनि बिभीषण । वानरगण खवळले ॥५९॥

त्याला पाहून वानरसैन्यात गडबड :

बिभीषण राक्षसेश्वर । गगनी मेरूशिखराकार ।
त्याते भूमिस्थ वानर । देखोनि सत्वर उठिले ॥६०॥
बिभीषण शांत दांत । विवेकवैराग्यें विरक्त ।
श्रीरामदर्शनीं अनुरक्त । तेणे आरक्त तो भासे ॥६१॥
रजतमधूम्र जाय निघोनी । लखलखित भासे चैतन्याग्नी ।
तैसा तेजस्वी बिभीषण गगनी । वानरगणी देखिला ॥६२॥
पुढील वीर धीर विराजमान । मागील ते चारी प्रधान ।
आमचे करावया हनन । आले धांवोनि सायुध ॥६३॥
वोडण खांड गदापाणी । धनुष्यबाण पाठीस तूणी ।
आम्हांसी मारावयालागोनि । आले धांवोनि राक्षस ॥६४॥
आमचा करावया घात । पांच जण आले नेमस्त ।
पांचही निर्दळिलिया येथ । रामकार्यार्थ साधेल ॥६५॥
जो यांचा करील घात । तोच पुरूषार्थी समर्थ ।
तोच श्रीरामाचा परम आप्त । युद्धकंदनार्थ मग कैंचा ॥६६॥
पुढिल्या पांचांची मोहर । मारोनि केलिया चकचूर ।
मग मेल्या न येती निशाचर । वानरी विचार दृढ केला ॥६७॥
देखोनि राक्षसांची जाती । वेगे उठिले जुत्पती ।
शाळ ताळ शिळा हाती । हाणावया पर्वती पेटले ॥६८॥
मिळोनिया वानरवीर । अवघी केला भुभुःकार ।
तेणे खळबळिला सेनासागर । नादें अंबर कोंदलें ॥६९॥
पाडीं पाडीं म्हणता जाण । एकापुढें एक उड्डाण ।
करीत आले वानरगण । तेणे बिभीषण दचकला ॥७०॥
शरण जाता श्रीरघुपती । मध्येंच वानर मज मारिती ।
तेव्हा हे गति ना ते गती । आली ग्रहगति मुख्यत्वें ॥७१॥
मुख्य विरोधाचा संबंधु । मी रावणाचा कनिष्ठ बंधु ।
वानरी माझा करिता वधु । रामे विमर्द चुकवावा ॥७२॥
करिता श्रीरामनामस्मरण । दीनाचें चुके जन्ममरण ।
मी तंव श्रीरामी अनन्य शरण । वानरविघ्न का आले ॥७३॥
येथे भेटतां की हनुमंत । तो तंव माझा परम आप्त ।
मज भेटविता श्रीरघुनाथ । कपिकंदनार्थ चुकवोनी ॥७४॥
आता असोत बहुत युक्ती । लोटांगण वानरांप्रती ।
मी अनन्य शरण रघुपती । तुम्ही का युद्धार्थीं धांवतां ॥७५॥
ऐसे बोलोनिया देख । बिभीषणें दिधली हाक ।
तोचि बिभीषणाचा श्लोक । अर्थविशेषे अवधारा ॥७६॥

उवाच स महाप्राज्ञः त्वरेण महता महान्‌ ।
सुग्रीवं वानरान्प्रेक्ष्य खस्थ एव बिभीषणः ॥११॥
भो भो शाखामृगाः सर्वे वचनं मे निबोधत ।
रामायाख्यातुमिच्छामि कोसलेंद्राय धीमते ॥१२॥
रावणास्यानुजो भ्राता बिभीषण इति श्रुतः ।
चतुर्भीं सचिवैः सार्धं शरणार्थी न संशयः ॥१३॥
प्राप्तोहं राघवं द्रष्टुमिति मां वेत्थ वानराः ॥१४॥

ती गडबड पाहून आकाशातूनच बिभीषणाचे भाषण व सुग्रीवाला विनंती :

देखोनि वानरांचा तवक । गगनीहूनि बिभीषण देख ।
दीर्घ देतांचि पै हाक । कपिकटक वचकलें ॥७७॥
काय गर्जतो निशाचर । ऐकों ठेले वानरवीर ।
म्हणे मी शरणागत साचार । श्रीरामचंद्राचे चरणी ॥७८॥
तो म्हणे सुग्रीवा कपिपती । वानरस्वामित्व तुझे हाती ।
शरणागतासीं मारू येती । यांते निश्चिती निवारी ॥७९॥
रावणाचा अनुज बंधु । बिभीषण नामे मी प्रसिद्धु ।
म्हणोनि माझा कराल वधु । मी तंव शुद्ध शरणार्थी ॥८०॥
येथे असता हनुमंत । तो सांगता माझा वृत्तांत ।
मज भेटविता श्रीरघुनाथ । शरणागत म्हणोनि ॥८१॥
श्रीरामाचे सत्य व्रत । मारू नये शरणागत ।
कपि मज मारावया उदित । ते तू समस्त निवारीं ॥८२॥
सुग्रीवा तुझे चरणी माथा । वृत्तांत सांगे श्रीरघुनाथा ।
रावणाचा कनिष्ठ भ्राता । शरण तत्त्वता आला असे ॥८३॥
चौघे प्रधानांसमवेत । बिभीषण शरणागत ।
ऐकोनि सांगेल रघुनाथ । तोचि कार्यार्था करावा ॥८४॥
कौशल्येचा निजसुत । कौसलेंद्र श्रीरघुनाथ ।
त्याचा अनन्य शरणागत । बिभीषण नाम पै माझे ॥८५॥
बिभीषण अनन्य शरणागत । सुग्रीवा मानली हे मात ।
तोचि श्रीरामासी वृत्तांत । वानरनाथ स्वये सांगे ॥८६॥

सुग्रीवाचे श्रीरामांना निवेदन :

ऐकोनि बिभीषणाचे वचन । सुग्रीव येवोनि आपण ।
रामलक्ष्मणां करोनि नमन । सांगे आगमन बिभीषणांचें ॥८७॥
श्रीरामासी अर्पावी सीता । हे हित सांगता लंकानाथा ।
तयासी हाणोनि लाथा । अनाथता दवडिला ॥८८॥
नगरी धेंडे पिटोनि पूर्ण । नगरत्यागें बिभीषण ।
दवडितां बोलला रावण । जाय तू शरण श्रीरामा ॥८९॥
श्रीराम जालिया पक्षपाती । कैसा येईल लंकेप्रती ।
केंवी राक्षस करील ख्याती । ते ही प्रतीति अवधारा ॥९०॥
जो बिभीषण सद्भावता । शरण आला श्रीरघुनाथा ।
काय करावे त्यासी आता । सांग समर्था श्रीरामा ॥९१॥
घेवोनिया चौघे प्रधान । बिभीषण अनन्य शरण ।
काया वाचा उदित मन । तुझे श्रीचरण देखोनि ॥९२॥

ते श्रवण करून श्रीरामांना आनंद :

बिभीषण आला भेटी । तेणे श्रीरामास आनंदकोटी ।
हरिखें सुग्रीवाची पाठ थापटी । आल्हाद पोटी प्रेमाचा ॥९३॥
बिभीषणाचे मनोगत । अनन्य भावे शरणागत ।
जाणे अंतर्यामी श्रीरघुनाथ । ह्रदयस्थ निवासी ॥९४॥
बिभीषण शरणागत परम । स्वये जाणे आत्माराम ।
सुग्रीवाप्रती राजधर्म । अनुक्रमे अनुवादे ॥९५॥

सर्व प्रमुख वानरवीरांचे मत श्रीराम विचारतात :

हनुमंतादि मुख्य प्रधान । पाचारिले वानरगण ।
बिभीषण येतो शरण । त्याचे लक्षण लक्षावया ॥९६॥
बिभीषणाचे मनोगत । सत्य किंवा असत्य ।
निर्धारावया इत्थंभूत । कपी समस्त पाचारिले ॥९७॥
एकोनि श्रीरामाचे वचन । उल्लसले वानरगण ।
बिभीषणाचे लक्षण । अनुवादन ते करिती ॥९८॥
मुख्य सुग्रीवसंवादु । हा रावणाचा बंधु ।
अवश्य याचा करावा वधु । म्हणे कुमुदु मारावा ॥९९॥
नळ नीळ सांगती गोष्टी । तेचि तरळ तरळाचे पोटी ।
रावणानुज हा तंव कपटी । उठाउठी मारावा ॥१००॥
गज गवय सांगाती जाण । शत्रुबंधु हा कपटी शरण ।
यासी न वरावें आपण । द्द्यावा दवडोन लंकेंसीं ॥१०१॥
कपटी रावणाचा बंधु । हा मारावा म्हणे मैंदु ।
तैसाचि अनुवादे व्दिविदु । करावा वधु पै याचा ॥१०२॥
सुषेण पनस दधिमुख । तिघे होवोनि एकमुख ।
यासी राखितां परम दुःख । अवश्यमेव मारावा ॥१०३॥

जांबुवंताच्या मते त्याची अंतर्बाह्य स्थिती पाहून काय ते करावे :

मग बोलिला जांबुवंत । बिभीषणा पाचारा येथ ।
त्याचे लक्षितां चेष्टित । मनोगत कळेल ॥१०४॥
स्थिति गति गमनागमन । नेत्र वक्त्र संभाषण ।
येणे पराचें लक्षण । विचक्षण लक्षिती ॥१०५॥

शरणागताला मरण देऊ नये असे अंगदाचे मत :

अंगद बोले कौतुक । एकला एक बिभीषण रंक ।
त्यासाठीं हरलें कटक । कपि नेटक निजयुद्धे ॥१०६॥
धन्य धन्य या वानरा । शरण आलिया निशाचरा ।
जो तो म्हणे मारा मारा । हा काय खरा पुरूषार्थ ॥१०७॥

हनुमंताला लंकेची सर्व माहिती आहे तेव्हा त्यास विचारणे योग्य :

नेणोनि श्रीरामाची स्थिती । वृथा वानरे जल्पती ।
पैल बैसलासे मारूती । त्याची युक्ती अवधारा ॥१०८॥
सकळ लंकेचें शोधन । हनुमंते केले आपण ।
साधु की दुर्जन बिभीषण । त्याचे लक्षण तो जाणे ॥१०९॥
हनुमंतासी अविदित । नाही उरला लंकेचा अर्थ ।
तो सांगेल इत्थंभूत । ते समस्त आयका ॥११०॥
श्रीराम म्हणे गा हनुमंता । बिभीषणा शरणागता ।
काय करावे त्या आता । ते तत्वता मज सांगे ॥१११॥
ऐकोनि स्वामींचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । युक्त वचन अनुवादे ॥११२॥

मारूती बिभीषणाच्या सत्प्रवृत्तीबद्दल खात्री देतो :

हनुमंत सर्वांगें सज्ञान । सर्वेंद्रियीं पक्व विज्ञान ।
जे बोले ते युक्त वचन । श्रीरघुनंदन सुखकारी ॥११३॥
हनुमान श्रीरामाचे लळिवाड । त्याचा बोल अमृतापरीस गोड ।
पुरतें वेदशास्त्रांचें कोड । श्रवणी चाड श्रीरामा ॥११४॥
हनुमान बोलता आपण । टवकारले वानरगण ।
पाहत ठेले त्याचे वदन । अवघे जण टकमका ॥११५॥
बृहस्पति करिता निरूपण । अति एकाग्र अमरगण ।
तैसे ऐकती हनुमंताचे वचन । अवघे जण टकमकां ॥११६॥
हनुमव्दाक्याची घडमोडी । वानरा टकमक लक्षकोडी ।
वचनी सत्यत्वाचीं प्रौढी । तेणे अति गोडी श्रीरामा ॥११७॥
खिरी तुपावरी साखर । तैसे वचन अति मधुर ।
सत्यवादी रामानुचर । श्रीरामचंद्रसुखकारी ॥११८॥
सावधान ऐके श्रीरघुनाथा । नेणेनि बिभीषणा ह्रदयस्था ।
कपि प्रधान बोलती वृथा । अनुमानता मिथ्यात्व ॥११९॥
न कळोनि बिभीषणाचा बोधु । शरण रिघोनि शत्रुबंधु ।
म्हणती आमचा करील वधु । वानरानुवादु अति मिथ्या ॥१२०॥

बिभीषणाच्या चारित्र्याविषयी :

लंका शोधिता त्रिकूटी । म्या देखिले आपुलें दृष्टी ।
बिभीषण हा नव्हे कपटी । सत्य गोष्टी हे माझी ॥१२१॥
बिभीषण नव्हे हा शठ । बिभीषण नव्हे हा नष्ट ।
बिभीषण नव्हे कपट । वाक्य निर्दुष्ट हे माझे ॥१२२॥
लंका शोधिता समस्त । राक्षसांचें ह्रद्गत ।
जाणोनि वदे हनुमंत । अति समर्थ सत्यत्वे ॥१२३॥
श्रीराम सेवातपोबळे । सर्वा ह्रदयीं हनुमान खेळे ।
तेणे सत्यासत्य आकळे । बोले प्रांजळें सत्य मधुर ॥१२४॥
कपी प्रधान जे बोलती । कपटी बिभीषणाची स्थिती ।
त्यांची मिथ्या हे वदंती । शुद्धभावार्थी बिभीषण ॥१२५॥
बिभीषणाची धर्मस्थिती । बिभीषणाची अगाध किर्ती ।
बिभीषणाची भगवद्भक्ती । शुद्ध भावार्थी बिभीषण ॥१२६॥
बिभीषणा नाही अकर्म । बिभीषणा नाही विकर्म ।
बिभीषणीं नाही अधर्म । सत्यत्वे वचन हे माझे ॥१२७॥
बिभीषणां नित्य निवृत्तीं । बिभीषण धर्ममूर्ती ।
बिभीषणीं नित्य शांतीं । शुद्ध भावार्थी बिभीषण ॥१२८॥
सांडोनि यौवराज्य संपूर्ण । त्यजोनियां बंधु रावण ।
युद्धसमयी आला शरण । त्यासी आपण नये मारू ॥१२९॥
पहिलेंचि श्रीरामी प्रेमता । त्यावरी रावणे हाणिल्या लाता ।
शरण आला श्रीरघुनाथा । भावार्थता स्वानंदे ॥१३०॥
भावार्थी अथवा कपटी पूर्ण । जो का म्हणे मी आलो शरण ।
त्यासी मारिता आपण । लागेल दूषण सूर्यवंशा ॥१३१॥
शिबिहरिश्चंद्र रूक्मांगद । वंशीचें क्षोभती धर्मविद ।
शरणागताचा पै वध । अति विरूद्ध तिही लोकी ॥१३२॥

त्याच्यापासून काही नुकसान न होता, झाला तर फायदाच होईल :

स्वर्गी क्षोभेल दशरथ । अधर्मीं जाला श्रीरघुनाथ ।
मारू नये शरणागत । हा निश्चितार्थ श्रीरामा ॥१३३॥
एकला एक बिभीषण । त्याचे आम्हांसी भय कोण ।
वधावा म्हणती वानरगण । त्यांची आंगवण अति तुच्छ ॥१३४॥
तुटोन पडता गगन । गजबजीना रघुनंदन ।
तेथे बापुडे बिभीषण । त्याचे भय कोण आम्हांसी ॥१३५॥
ऐसे बोलता मारूती । संतोषला श्रीरघुपती ।
सवेंच कपि बोले पुढती । ते उपपत्ती अवधारा ॥१३६॥
बिभीषणाचिये संगती । राक्षसांच्या दुर्गम गती ।
वश्य होतील श्रीरघुपती । विजयप्राप्ति बिभीषणें ॥१३७॥
आभिचारिक विघ्नानुवर्ती । स्वये रामा वश्य होती ।
बिभीषणाचे संगतीं । विजयप्राप्ती श्रीरामा ॥१३८॥
रात्रीं अपरात्रीं निकटवर्ती । घाला घालोनिया मारिती ।
तेथे हे बिभीषणसंगतीं । विजयप्राप्ती श्रीरामा ॥१३९॥
अलक्ष अगम्य अतर्क्य गती । पृथ्वी करोनि धूर चोरिती ।
तेथे ही बिभीषणसंगती । विजयप्राप्ती श्रीरामा ॥१४०॥
संकट विकट अति दुर्घट । जेथे रिघता परम कष्ट ।
बिभीषणा संगतीं होती सपाट । विजयपट श्रीरामा ॥१४१॥
बिभीषणाची शुद्ध मती । बिभीषण केवळ परमार्थी ।
विकल्प न धरावा चित्ती । शुद्ध शरणार्थीं बिभीषण ॥१४२॥
लंका शोधिता संकटी । म्या देखिले आपुले दृष्टी ।
त्रिसत्य सत्य माझी गोष्टी । नव्हे कपटी बिभीषण ॥१४३॥
वाहतो श्रीरामा तुझी आण । भावे शिवतों तुझे चरण ।
कपटी नव्हे हा बिभीषण । सत्य भाषण हे माझे ॥१४४॥

श्रीरामांच्या मनोगताप्रमाणेच मारूतीचें मत पडले :

ऐकता हनुमंताची गोष्टी । श्रीरामासी आनंद पोटी ।
हरिखे खेंवा पडली मिठी । आल्हाद सृष्टी न समाये ॥१४५॥
जैसे श्रीरामाचे मनोगत । तैसेंचि बोलिला हनुमंत ।
तेणे उल्लासें श्रीरघुनाथ । असे गर्जत स्वानंदे ॥१४६॥
मज मारावया जाण । कपटी रावण आलिया शरण ।
त्यासी माझे अभयदान । मग बिभीषण केंवी त्याज्य ॥१४७॥

श्रीरामांना आनंद व बिभीषणाचे स्वागत करून त्याला लंकेचे राज्यदान :

बिभीषण माझा आत्मा जाण । बिभीषण माझा जीवप्राण ।
माझेनि चिरंजीवी बिभीषण । जन्ममरण त्या नाही ॥१४८॥
बिभीषणा शरणागता । वेगी पाचारीं पै आता ।
लंका दिधली तत्वता । निजराज्यतासंकल्पें ॥१४९॥
जा रे म्या मारिला रावण । लंकेसी स्थापिला बिभीषण ।
शरणागती प्रेम पूर्ण । आपणा आपण विसरला ॥१५०॥
ऐसिया श्रीराम उत्तरीं । हनुमान लोळे पायांवरी ।
जे म्या नेमिलें जिव्हारीं । तेंचि निर्धारी श्रीरामवाणीं ॥१५१॥
भेटावया निजभक्ता । बाहु थरकती श्रीरघुनाथा ।
वेगी बोलावी गां हनुमंता । शरणागता बिभीषणा ॥१५२॥
ऐकोनि बिभीषणाचे महिमान । सुग्रीवे खालती घाली मान ।
वानर जाले लज्जायमान । श्रीरघुनंदन उल्लासे ॥१५३॥
बिभीषणाचे भाग्य पूर्ण । श्रीराम तुष्टला संपूर्ण ।
एकाजनार्दना शरण । भेटीचे लक्षण अवधारा ॥१५४॥
कैसी दोघांची दृष्टादृष्टी । कैसी दोघांची होईल भेटी ।
कैसे दोघे करितील गोष्टी । ते कथाकसवटी अनुपम्य ॥१५५॥
देवाभक्तांचें दर्शन । ते कथा तंव अति पावन ।
एक जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥१५६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणागमनं नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३७॥
॥ ओव्या १५६ ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १८० ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग