सकळ साधना वरिष्ठ सार
1058.
सकळ साधना वरिष्ठ सार ।
विठ्ठल नामाचा उच्चार ।
आणखी नका वोरबार ।
शीणचि उरेल पुढती ॥१॥
धावा म्हणोनि अवघे वेगी ।
चितचि ठेवा पांडुरंगी ।
संसारचि तुटेल मागी ।
फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥
आवडी नाचता पै गाता ।
पांडुरंग प्रेमदाता ।
अवघी तोडूनिया चिंता ।
करील माथा बैसणे ॥३॥
ऐसे जाणोनियं निरुती ।
करा हरिनामे आवृत्ति ।
मग हा कळिकाळाचे हाती ।
नेदील तुम्हा सर्वथा ॥४॥
निळा म्हणे सुगम ऐसे ।
संती दाविले सौरसे ।
जतन करिती जे मानसे ।
ते तो पावती सर्वथा ॥५॥
