(निर्याणाचे अभंग)
3621.
(निर्याणाचे अभंग)
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥
काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥धृपद॥
दरदरीट पाण्या । माजी रांधयेल्या कण्या ॥२॥
घरी मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा ॥३॥
मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥४॥
अर्थ :
आज माझ्या घरी ऋषीकेश पाहुणे म्हणून आले आहेत. आता त्यांचा स्वागतोपचार व आदरातिथ्य मी कसे करु माझी झोपडी देखील मोडकी जर्जर आहे. असो तरीपण मी पाण्यामध्ये पातळ कण्या देवासाठी शिजवल्या आहेत माझ्या घरी मोडकी बाज आहे पण तरी देखील मी त्याच्यावर वाकळ टाकून बसण्याची सोय करुन ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला जेवण झाल्यावर मुखशुध्दी करण्यासाठी मी तुळशीचे पान देणार आहे यापेक्षा मी दुसरे वेगळे मुखशुध्दी करण्यासाठी काय उपचार करणार आहे मी तर दुर्बळ आहे.
