वाहातसे नेत्री इंद्र
139.
वाहातसे नेत्री इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया ॥१॥
क्षमा करी आता अच्युता अनंता । अगा कृष्ण-नाथा दीनबंधू ॥२॥
तुझिया दासासी दु:ख म्या दिधले । भ्रांतीने मोहिले मन माझे ॥३॥
दावी तुज थोरी न करींच सेवा । करा दंड देवा मजलागी ॥४॥
तूंचि माझा बाप तूंचि माझी आई । क्षमा कृष्णा-बाई करी आता ॥५॥
दैत्य मारावया भूतळी आलासी । भक्तांला रक्षिसी निरंतर ॥६॥
जगद्नुरु माझा धनी वनमाळी । जोडोनि आंजुली उभा असे ॥७॥
चतुर्भुज गळा वैजयंती माळा । पाहातसे डोळा नामा ह्मणे ॥८॥
