॥ श्रीएकनाथमहाराजकृत
17.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सतरावा ॥
वेदवतीचे आख्यान
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अगस्ति जो महामुनी । कथा सांगे श्रीरामा लागूनी ।
ते कथा सुरस भवनाशिनी । सावधान श्रवणीं ऐकावी ॥१॥
रावण विचरता महीतळीं । हिमाद्रीच्या वनस्थळी ।
समवेत प्रधान बळी । राक्षस न्याहाळी भूमंडळ ॥२॥
लंकेला जाताना रावणाला सुकुमार कन्येचे दर्शन :
प्रधानांसमवेत दशानन । पुष्पकावरी आरूढोन ।
उल्लंघितां वनोपवन । हिमवंतासमीप आला ॥३॥
पुढे देखिले कन्यारत्न । सुरस सुकुमार कमलनयन ।
मस्तकी जटा कृष्णाजिन । तापसवेषे शोभली ॥४॥
विधिपूर्वक अनुष्ठान । जैसे करिती ऋषि देवगण ।
तैसी ते सुंदरी पूर्ण । तपें दारूण तपतसे ॥५॥
रावणे देखता कन्यारत्न । सुशील सुव्रत गूनसंपन्न ।
काममोहित भ्रांत होऊन । हास्यवदने पुसता झाला ॥६॥
अवो भद्रें अवधारी । तू एकली या वनांतरी ।
रूप तरी देवांगना तुज सरी । न पावती पाहता ॥७॥
कोण कोणाची काय कारण । तुज योग्य तप नव्हे जाण ।
तू का करिसी अनुष्ठान । याचे कार्य काही नाही ॥८॥
कासयाकारणें सुंदरी । तू एकली या वनांतरीं ।
तुझा भ्रतार या विजनामाझारी । आहे की नाही हे सांगे ॥९॥
तुझे रूपयौवन । जो भोगी तो भाग्याचा गहन ।
त्याच्या पुण्या मर्यादा जाण । केली व वचे राजबळ ॥१०॥
रावणाने विचारल्यावरुन वेदवतीने आपली माहिती त्याला सांगितली :
ऐकोनि रावणाचे वचन । मग ते वेदवती आदरेंकरून ।
रावणाचे अतिथ्य जाण । करोनि कथन सांगतसे ॥११॥
देवगुरू जयाते म्हणती । तयाचा सुत कुशध्वज नृपती ।
बुद्धिवंत दुसरा बृहस्पती । तपे तेजे आगळा ॥१२॥
वेदाभ्यास शास्त्रव्याख्यान । आणि अग्निहोत्र पंचमहायज्ञ ।
देवतार्चन पितृतर्पण । भगवद्भजन सर्वभूती ॥१३॥
कुशध्वज वेदाभ्यास करी । तो माझा पिता निर्धारी ।
मी वाढिलें तयांचे घरी । नाम वेदवती प्रसिद्ध ॥१४॥
माझा देखोनि यौवनभर । पिता वरविचारणीं तत्पर ।
तै आले यक्षविद्याधर । आणि दैत्य राक्षस ॥१५॥
आले सिद्ध ऋषीश्वर । आले पृथ्वीचें नृपवर ।
आले पाताळीचें विखार । गंधर्व किन्नर येते झाले ॥१६॥
सभा दाटली राजभवनीं । माझा पिता पाहे न्याहाळूनी ।
कोणी वर न बैसे मनी । विष्णूवांचोनि तयाचे ॥१७॥
समस्ता अभिप्राय कळला । म्हणती कोणा नेदी हे बाळा ।
आता वधूं या भूपाळा । कन्या तत्काळा घेवोनि जावूं ॥१८॥
ऐसे एकमेक संवादले । संग्रामातें प्रवर्तले ।
युद्ध करिता परस्पर मेले । सांगों काय राजेंद्रा ॥१९॥
श्ंभनामें दैत्यें काय केले । माझिया पित्या निद्रित देखिले ।
रात्रीं येवोनि चांडाळें । रायातें भक्षिलें ते काळी ॥२०॥
पिता निमाला ऐकोन । माझे मातेने केले सहगमन ।
मी उत्कंठा पित्याची जाणून । विष्णूचिंतन करीतसें ॥२१॥
पितयाच्या मनी होते । जे कन्या द्यावी विष्णूतें ।
हे जाणोनि मी येथे । अनुष्ठान करीतसें ॥२२॥
इतुके सायास विष्णुप्रीत्यर्थीं । मी करीतसे अतिथी ।
हा देह विष्णुभाग निश्चिती । त्याचे त्यास समर्पण ॥२३॥
जनकप्रतिज्ञा जाणोन । मी करितें अनुष्ठान ।
कायावाचामनेंकरून । श्रीरमारमण पावावया ॥२४॥
व्रतनेम उपवासी । वनी विचरतें मी ऐसी ।
पितयाची उत्कंठा पावावयासी । ये पर्णकुटीसीं राहिले ॥२५॥
हे माझे कथन । तुजप्रती केले निवेदन ।
अगा पौलस्त्यामजा शीघ्र गमन । येथोनिया तू करी ॥२६॥
रावणाने विवाहासाठी तिलाच मागणी घातली :
रावण म्हणे कन्येसी । म्या जाणितलें तुझिया स्वधर्मसी ।
एकली तू वनवासी । रहावयासी योग्य नव्हे ॥२७॥
जयाकारणें करिसी तप । तो विष्णू अति अल्प ।
तया नाही नांवरूप । सत्य संकल्प हा माझा ॥२८॥
विष्णु काय बापुडे दीन । तयागांठीं नाही धन ।
आणि असे पराशीन । सत्य जाण सुंदरी ॥२९॥
अवो भद्रे अवधारी । मी जाणतो तुझ्या तपाची थोरी ।
तुजसारिखी आणिक नारी । नाही दुसरी कनकप्रभे ॥३०॥
आता तू वो झडकरीं । वेगी आरूढें विमानावरी ।
कंदर्प मज पीडितो भारी । तुझे रूप देखोनी ॥३१॥
तुझिया रूपाची पदवी । तेजे लोपला चंद्र माधवी ।
आणिक उपमा तुज द्यावी । वृथा वाणी श्रम होय ॥३२॥
तुझे अंगी तरूणपण । तुज तप अयोग्य जाण ।
जयांची इंद्रियें विकळ वार्धक्यपण । तिही अनुष्ठान करावे ॥३३॥
रावण स्वतःचे सामर्थ्य वर्णितो :
मी लंकेचा आहें राजा । तू माझी होत भाजा ।
विविध भोग भोगी माझा । सुखसंतोष पावू दोघें ॥३४॥
तू अत्यंत सुकुमार । अंगी खुपती चंद्रकर ।
तू मृगनयना सत्वर । विमानावर आरूढें ॥३५॥
आधींच तू राजबाळ । त्याहीवरी सुकुमार वेल्हाळ ।
तुझिया तपाचा हा काळ । नव्हे प्रबळ यौवन तुझे ॥३६॥
या त्रैलोक्यामाझारी । रूपयौवनकटाक्षकरीं ।
पाहता नाही दूसरी । म्या आपुले नयनी देखिलीसे ॥३७॥
तुझिया रुपाचें लावण्य । त्यापुढे विष्णु बापुडे दीन ।
तू करी वो माझे वरण । समपाड जाण तुज मज असे ॥३८॥
मी तंव ब्रह्मयाचा नातू । पौलस्तिमुनीचा सुतू ।
आणि लंकेचा नाथू । सेवेसी रतू शिवाचे ॥३९॥
ऐकोनि रावणाचे वचना । वेदवती बोले झणें या वचना ।
बोलता तुज उरी दशानना । नुरे जाण शीघ्रकाळें ॥४०॥
वेदवतीने केलेल्या अपमानामुळे रावणाने संतापून
बलात्काराने तिला पकडून विमानात बसविले :
ऐसे वदली वेदवती । ऐकोनी रावणा क्रोध चित्ती ।
वेणी धरोनि ते सती । बळे आसुडिता जाहला ॥४१॥
ऐसे करोनि लंकापती । करी धरिली वेदवती ।
बलात्कारें पुष्पकाप्रती । वाहता झाला ते समयी ॥४२॥
रावणे हाती धरिता जाण । वेदवती क्रोधायमान ।
नेत्रींहूनि निघतां हुताशन । काय वचन बोलिली ॥४३॥
शब्दे करू पाहे दहन । रागे रावणाकडे पाहोन ।
बोलती झाली कोपायमान । सावधान अवधारा ॥४४॥
वेदवतीची शापवाणी :
अरे नष्टा चांडाळा । त्वा बोल लाविला ब्रह्मकुळा ।
मज धरिले त्वा बरळा । मरण कुळा आणिले ॥४५॥
मी तप करित होते । तुवा पापदृष्टीं पाहिले माते ।
माझेनि शापे वंशातें । नाश होईल रावणा ॥४६॥
ये वनी मी तप करीत होते । तुवा विघ्न केले माते ।
तरी मी भस्म करितें तपःसामर्थ्ये । परी पुढे जन्म घेईन मी ॥४७॥
आता मी अग्निभीतरीं । उडी घालितें निर्धारी ।
आपुलेनि सामर्थेकरीं । राक्षसबोहरी करीन मी ॥४८॥
यालागी रे रावणा । तुझिया वधालागीं जाण ।
अवतरेन मी पुन्हा । राक्षसगणा वधावया ॥४९॥
तुज वधावया झडकरी । मी का वेंचूं तपाची थोरी ।
पुढे जन्मोनि तुझी बोहरी । जाण निर्धारी करीन ॥५०॥
मी अयोनिजा कुमारी । त्वा मज पापदृष्टीकरी ।
धरिले त्याचे फळ पुढारी । जाणवेल लंकेशा ॥५१॥
पुढे धर्मिकाचे घरी । अवतरेन जाण निर्धारी ।
तो कोण म्हणसी जाण तरी । मिथिलापुरीचा नृपवर ॥५२॥
जो राज्य करोनि विदेही । जो ज्ञानाचा सागर पाही ।
जो प्रतिपाळी ब्राह्मण गाई । तयाच्या गृहीं अवतरेन ॥५३॥
वेदवतीचा अग्निप्रवेश :
ऐसे बोलोनि वेदवती । प्रवेशली जातवेदाप्रती ।
स्वर्गी देवविमान - पंक्ती । पुष्पवर्षाव तिही केला ॥५४॥
ते वेदवती कुमारी । विदेही जनकाचे घरी ।
पुढती जन्मली सुंदरी । जानकी नाम जियेचें ॥५५॥
वेदवतीच जनकघरी अवतीर्ण होऊन रामभार्या सीता झाली :
ते तुझी भार्या श्रीरघुपती । श्रीरामा तू जाण निश्चिती ।
ते जनकाघरीं वाढली सती । जानकी ऐसे नाम जिचें ॥५६॥
ऐकोनि जानकीचे कथन । श्रीरामे आश्चर्य पावोन ।
म्हणे आपली प्रिया धन्य धन्य । कष्ट दारूण देखिले ॥५७॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । तूंचि केवळ विष्णु सर्वोत्तमा ।
पूर्वक्रोधें राक्षसधमां । वैरभावें मारिले ॥५८॥
पुढे ते वेदवती कुमारी । दुसरा जन्म धरिला निर्धारी ।
सापडेल शेताभीतरीं । सीता नाम म्हणतील ॥५९॥
कृतयुगीचें कुशध्वज उदरी । ते वेदवती प्रसिद्ध थोरी ।
पुढे तेचि त्रेतायुगाभीतरीं । शेतामाजि सांपडेल ॥६०॥
इतुके झाले जनकपुरीं । विदेही जनकाचिये घरी ।
नाम पावली जानकी सुंदरी । ते तुझी नारी श्रीरामा ॥६१॥
त्रेतायुगी विदेहघरी । अजन्में जन्मोनि सुंदरी ।
राक्षसा मारील पूर्ववैरेंकरीं । जाण निर्धारी श्रीरामा ॥६२॥
हे जानकीची उत्पत्ती । बोलिला वाल्मिक महामती ।
हेचि कथा आणिके ग्रंथीं । विपरीतार्थें पै असे ॥६३॥
जयानें जैसे देखिले । तयानें तेंचि निरूपिलें ।
आपण अवधारिजे भावबळें । कल्मपावेगळे वहावया ॥६५॥
एका जनार्दना शरण । म्हणता गेले एकपण ।
एका आणि जनार्दन । नामे भिन्न स्वरूप एक ॥६५॥
जनार्दन तोचि एक । एक तोचि होय व्यापक ।
व्यापकत्वें पाहता एक । एकाहूनि देख दुसरे नाही ॥६६॥
यालागी एका आणि जनार्दन । मुळींच पाहता अभिन्न जाण ।
म्हणोनिया नावे अनन्य शरण । संतसज्ञान पै होती ॥६७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वेदवत्याख्यानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥ ओंव्या ॥६७॥
