वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 43. देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते २७१

गोकुंळींचा कान्हा अव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084550 · अभंग क्र. २७०

270.
गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥
जन्मला वोखट घालु आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥
वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणावर्तु मर्दियेला ॥३॥
पाय होनोनिया मोडिला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥४॥
मृतिका खादली वरिता पै देख । उदरी तिन्ही लोक दाखविले ॥५॥
दही दुध चोरी आली बा मुरारी । माया दावें वरी बांधितसे ॥६॥
नऊ लक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥७॥
दावा दामोदरु बांधिला मायेनें विमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥८॥
वत्साचोनि रुपे आला पै असुर । झाडीं वत्सासुर झाडियेला ॥९॥
ध्यानस्थाचें परी बैसलासे तीरीं । बका दोन्ही चिरी केल्या कृष्णें ॥१०॥
चेंडु वाचे मिसे नाथिला काळिया । फणीरंगी कान्हया नृत्य करी ॥११॥
इंद्रा मान हरी गोवर्धन करी । धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥
ताडाफळासाठीं धेनुक उठिला । कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥
वणवा गिळिला राखिले गोपाळ । संतोषे सकळ नाचताती ॥१४॥
गोपाळ वासुरे अघासुर गिळी । कृष्णें दोन्ही केली पहिल्या ऐसी ॥१५॥
वत्स वत्सपाळ नेले सत्य लोका । अवघी कृष्ण देखा होऊनि ठेला ॥१६॥
वळित गोधनें गोपाळांशी खेळे । पाहता निवतीं डोळे गोपिकांचे ॥१७॥
शरदऋतु शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणु वाहे ॥१८॥
वेणुनादध्वनी वेधिल्या कामिनी । कृष्णादीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥
गोपीप्रती गोपी कृष्ण एक एकु । सहस्त्रघटीं अर्कू नसोनि दिसे ॥२०॥
वेणुनाद ध्वनि वेधिल्या गोपिका । रंगी त्या मायिका नाचविय्ल्या ॥२१॥
अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशिया आघातु केला तेणे ॥२२॥
गोकुळीं दैत्यासी केला आडदरा । थोर कंसासुर धाक पडे॥२३॥
गोकुळा अक्रुर पाठविला रांगे । म्हणे आणी वेगे रामकृष्णा ॥२४॥
भाग्य भाव माझा कंसाचिया काजा । वैकुंठीचा राजा देखेन आजी ॥२५॥
गाईचे रे खुर विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्रुर देखे ॥२६॥
ध्वजवज्राकुम्श कुंकुमांकित पदें । अक्रुर आनंदें डोलतसे ॥२७॥
तृणतरुवरां घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कै देखेन ॥२८॥
पावला गोकूळां तंव वैकुंठ थोकडें । व्रज तेणे पांडे कृष्णमुखें ॥२९॥
देखोनिया कृष्ण विसरलां आपणां । आक्रुर श्रीकृष्ण चरणी लोळे ॥३०॥
जाणोनि त्याचा भावो वेगी निघे देवो । चला मथुरा पाहो आजी आम्हीं॥३१॥
व्रजीच्या अंगना करिताती रुदना । मागुता कैं कान्हा देखो आतां॥३२॥
रथारुढ हरी पाहाती नरनारी । यमुना परतीरीं उतरले॥३३॥
मारुनी रजक घेतलीं लुगडी । गोपाळ आवडी श्रृंगारिले॥३४॥
पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे मनोहर नाना मेचु॥३५॥
अक्रुरें जाउनी कंसा जाणविलें । मथुरेसी आले रामकृष्ण॥३६॥
ऐसे ऐकोनि कंस दचकला मनी । सर्व रुप नयनी कृष्ण देखे॥३७॥
चंदन कचोळी भेटली कुब्जा । वैकुंठीचा राज चर्चियेला॥३८॥
कुब्जा म्हणे हरी चला माझे घरी । सुमनेंही वरी श्रुंगारिली॥३९॥
हाती धरोनी बरी ते केली साजिरी । कंस भेटीवरी येईन घरां॥४०॥
माळीये सुमनें श्रृंगारिला हरी । वैकुंठ पायरीं केली तया॥४१॥
मुक्त मुमुक्ष विषयी हे लोक । पाहाती कौतुक कृष्णलीला॥४२॥
मथुरे चोहाटाचा चालिला राजवाटा । टाकिला दारवंटा धनुर्याग॥४३॥
तेथे अतिबळें कुवलया उन्मत्त । पेली महावुत कृष्णावरी॥४४॥
त्यासी हाणोनिया लात उपडिलें दोन्ही दांत । घाये महावत मुक्त केलें॥४५॥
यागीचें कादडें केले दुखंड । बळी ते प्रचंड रामकृष्ण॥४६॥
घेऊनि गजदंत पावले त्वरित । मारिले अमित वीर कृष्णें॥४७॥
न धरत पै वेगी आला मल्लरंगीं । कंस तो तवकेकें चाकाटला॥४८॥
माल मल्लखडा करीतसे रगडा । कृष्ण तो निधडा एकपणें॥४९॥
मुष्टीकचाणुर घाये केला घातु । कोपला अंनतु कंस पाहें॥५०॥
चाणुर मुष्टिक हातें निवटिले । दैत्य धुमसिलें अनुक्रमें॥५१॥
रणरगडा अशुद्धचा सडा । कृष्ण कंसा कडा उठावला॥५२॥
न लगतां घाये धाके सांडी देहो । मथुरे केला रावो उग्रसेन॥५३॥
सोडिलीं पितरें तोडिलें बंधनें । एका जनार्दने मुक्त केली॥५४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग