वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 43. देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते २७१

जो साक्षात परब्रह्मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084549 · अभंग क्र. २७१

271.
जो साक्षात परब्रह्मा । करु निघाला चोरीकर्म ।
धरुनी बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥
सवे नवलक्ष संवगडे । पशुपाल वेडे बागडे ।
सुदामा बोले बोबडे । ते आवडे गोविंदा ॥२॥
थोगला अत्यंत वांकुडा । जो निजाचा निजगडा ।
कृष्ण गुज सांगे त्या पुढा । होई गाढा चोरीकार्मा ॥३॥
घ्या रे सामुग्री चोखट । खेडे सराटे निकट ।
माजी बांधारे बळकटा । शब्द कांही करु नका ॥४॥
वस्त्र गाळिव मृत्तिका । घेउनी प्रवेशतं शंकु नका ।
सकळ गृहींचा आवांका । मज ठाउक समाचार ॥५॥
गोपाळ म्हणती चक्रपाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं ।
परी खडे सराटे मृतिका घेउनी । न देखो कोणीही रिगाले ॥६॥
कृष्ण म्हणे एका निवाडे । रचिताती पत्रांचे उतरंडे ।
पाहता न दिसती दृष्टीपुढे । जै अंधार पडे रजनीचा ॥७॥
भीतरी प्रवेशोनी एकीकडे । सव्य अपसव्य टाकावे खडे ।
पात्री नाद उमटती धडाडे । जाउनी रोकडे आणावे ॥८॥
शिंकीं लांबविलीं अंतराळीं । काठी टोंचुनी पाडावी दुळी ।
धार लागेल मोकळी । मिळोनि सकळीं प्राशन करा ॥९॥
साचल एकतील गौळणी । कवाडे धरतील धांवोनी ।
सराटे पसरा आंगणी । पायी चुंबकोनी गुंतती ॥१०॥
तेहि चुकवोनि येती अबला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळा ।
नेत्र चोळतील तंव तुम्ही पळा । नवलकळा सांगितली ॥११॥
हांसें आले कृष्णातरीं । मग प्रवेशलें घरोघरी ।
कवाडे उघडोनि भीतरी । अंतरी प्रवेशलें ॥१२॥
हळुं हळूं ठेविती पाउले । तंव गर्जती वांकीया वाळे ।
जन ऐकतील म्हणोनि गोपाळें । कर्णी अंगोळी घातली ॥१३॥
कृष्ण नायके तंव जग बधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय ।
कृष्ण न चाले तंव पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥
सांचलें दहींपात्रे काढिती । थिजलें घृत करी घेती ।
कांही भक्षिती कांही खाती । तोंडा मखिती निजल्यांच्या ॥१५॥
एकापुढें एक धांवती । एक एकाचें लोणी हिरोनी घेती ।
एक एकातें झोंबती । वाटा मागती चिमटोनी ॥१६॥
देखोनी नवनीताची भांडीं । पेंदा नाचे दुपांडी ।
उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडी लाविला ॥१७॥
शिकें उंच न पावे कर । काठी टोचोनी पाडिलें छिद्र ।
कृष्ण निजमुखीं लावी धार । देखोनी गोपाळ गजबजिलें ॥१८॥
गोपाळ म्हणती कृष्णासी । जाई बा सकळ दुधतुपेंसी ।
येरु म्हणे लागा रे कोपराशी । घ्या रे सावकाशी दोहींकडे ॥१९॥
तंव वाकुंड्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनि पोरें उठविली ।
ती मातेसी बोभाईली॥तंववत्से सोडिलीं वडजानें ॥२०॥
वत्से करिती स्तनपान । बाळके करिती रुदन ।
गोपी उठल्या गजबजोन । तंव नवनीतें वदन माखलें ॥२१॥
वृद्धा सांडोनि शेजेसी । उठता देखिले सुनेसी ।
सासु देखता तोंड पुसीं । येउनी केशी धरियेली ॥२२॥
तुंचि भक्षिणी नवनीत । आणि दुसर्‍याचे नांव सांगत ।
ऐशा सासु सुना भांडत । आपण तेथोनि निघाले॥२३॥
मग पळाले सकळ । दुजे गृहीं प्रवेशलें गोपाळ ।
गौळणी निद्रें व्यापिल्या सकळ । टवाळी नवल मांडियेली ॥२४॥
शिंकी लांबविलीं दुरीं । यत्न करिती परी न येती करी ।
मग वेंघोनी एक एकाच्या खांद्यावरी । उतरती दहींपात्रे ॥२५॥
उतरंडी दुरी लाविल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती ।
पात्री लागता नाद उठती । तेंचि घेउनि येती हरिपाशी ॥२६॥
सुखसेजे गोपी बाळी । निद्रिस्त देखोनि अंबरें फेडिलीं ।
तरुण देखोनी मुली । टवाळी थोर मांडिली ॥२७॥
तंव गजबजोनी सुंदरा । एके करे सांवरी चिरा ।
जाउनी धरी मधलीया द्वारा । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥
तंव पुढे देखोनी वनमाळी । म्हणे भला रे सांपडलासी ये वेळा ।
तंव धरु वेल्हाळी । नयनी गुरळीं घातली ॥२९॥
नेत्र चोळी व्रजकामिनी । आपण तिचा हात धरुनी ।
गोपाळातें खूनवोनी । सकळ तेथोनी पळाले ॥३०॥
येरी धावे पाठोपाठे । तंव पायी चुबकले सराटे ।
वाम करी धरुनि बोटे । बैसे गुतोंनी धरणीवरी॥३१॥
तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनी घातली मृत्तिका ।
नेत्र चोळीत अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे॥३२॥
मग चोरीकर्म सोडिनी । सकळ प्रवेशले सदनीं ।
प्रातःकाळ झालिया गौळनी । गार्‍हाणीं सांगो आलिया॥३३॥
यशोदे म्हणती सकळा । तुझिया पुत्राची नवलकळा ।
कानी न ऐकीली न देखो डोळा । सुना सकळीं विटंबिल्या॥३४॥
एक मह्णती यशोदे सुंदरे । तुझी गांवची वस्ती पुरे ।
उठवितो निजली पोरे । फेडी चिरें करी नग्न॥३५॥
खालीं ठेवोनि नवनीत मांजरामुखी चाटवीत ।
आपण खदखदां हांसत । ऐसे विटबित नानापरी॥३६॥
एक म्हणे गौळणी । माझे भक्षिले क्षीण लोणी ।
उच्छिष्ट मुखासी लावोनी । आपण तेथोनि पळाला॥३७॥
एक म्हणे माझी सोडिलीं वासुरे । उठविली निजली पोरें ।
शिंकी तोडिलीं एकसरें । फोडिल्या त्वरे माथणी॥३८॥
गोपिकांसी बुझविते सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लविती ।
तुमचे खादले किती निश्चिती । संगा तितुके देईन॥३९॥
किती भक्षिलें रे गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा ।
तिचे स्तन धरुन हांसे गदगदा । म्हणे येवढा मुद्धा होता तिच्या॥४०॥
हांसों आलो राधिकेसी । गौळणी गेल्या घरासी ।
यशोदा म्हणे कृष्णासी । सोडी वेगेसी गोधनें॥४१॥
जो वेदासी अगोचरा । श्रुतीसी न कळे ज्याचा पार ।
वर्णिता श्रमाला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण॥४२॥
माथा मुगुट तेजःपुज । नयन श्रवनीं सांगे गुज ।
ललाटी कस्तुरी नोज । तळपे तेज तळवीया॥४३॥
वैजयंती वनमाआळा । सुरंग गुजाहार गळा ।
कंठी मिरवे मेखळा । झलके कळा कौस्तुभाची॥४४॥
मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं ।
मग चालिले तये वळीं । जाळी पृष्ठीवरी टाकिलीं॥४५॥
काळी कांबळी खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी ।
जाला नंदाचा खिललरी । हांकिली झडकरी गोधनें॥४६॥
बळिराम राजीवनयनु । अलंकारमंडित शुद्ध तनु ।
चालिले गोपाळ घेऊनी धेनु । दोघे बाळ नंदाचे॥४७॥
सवे नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेबागडे ।
गोरज उधळले चहुकडें । पावले थंडी यमुनेच्या॥४८॥
गाई सोडिल्या सैरावैरा । भ्रमती सुखे खाती चारा ।
वडज्या म्हणे पेद्यां पोरा । आणी सत्वर पलशपत्रें॥४९॥
मथुरेचे मीष करुनी । हाटा निघालिया गौळणी ।
माथा दही दुध घृत लोणी । त्यामाजीं मुख्य राधा॥५०॥
गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उताविळे ।
मनी इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिले वदज्यानें॥५१॥
टाळी पिटोनी उठे वोजे । म्हणे कृष्ण आले खाजे ।
धावोणी आला गोपीसमाजे । उभ्या थोकविल्या गौळणी॥५२॥
तंव वडज्या करी झगडा । एकसरें धांवला वाकुडा ।
पात्रें फोडिली कडाडा । धरुनी रोकड्या आणिल्या॥५३॥
कृष्णें राधा धरली करी । एका करे लोणी चोरी ।
एका करेकं फेडी निरी । एका करे कंचुकीं॥५४॥
हांसों आले राधिकेसी । सोंडी गोवळ्या सलगीं कायसी ।
भुलली कृष्णरुपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा॥५५॥
ऐस विनोद विचित्र केला । करीतसे घननीळा सावळा ।
घ्या रे आता सामुग्री चला । अति क्षुधा लागली॥५६॥
पाहुनी कल्पतरुची छाया । घडिया घालिती बैसावया ।
बैस म्हणती यदुराया । करु काला आवडीं॥५७॥
पेंदा घाली पत्रावळी । वडज्या सोडी मोटा जाळीं ।
वांकुडा बैसवीं गोपाळमंडळी । वाढिताती पत्रशाखा॥५८॥
नानापरेंची पक्कान्ने । षडरस बहुत अन्नें ।
गोडी सांगता अनन्यें । पसरतीं पदर इंद्रादिकीं॥५९॥
सकळा वाढिलें परिपुर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण ।
संतासीं कळली खुण । घालिती ग्रास कृष्णमुर्खीं॥६०॥
तंव जेवितां केली टवाळी कृष्णापुढे होती गुळपोळी ।
ती उचलोनी पत्रावळी । न राहे जवळी दुरी गेला॥६१॥
वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रा खूणवितसे गाढा ।
वाकुड्यातें हाणोनि थोबाडा । धरुनी रोकडा आणिला॥६२॥
धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छेष्ट घाली तया तोडीं ।
पेंदा नाचे दुपांडी । थोगला गडी सांपडला॥६३॥
सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिले दध्योदन ।
मग पेंदा म्हणे आपण । कृष्नासी पैं॥६४॥
आवड वडज्याची थोरी । पेंदा म्हणे टाका दुरी ।
का टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्रीहारी स्वानंदें॥६५॥
एकांसी दाउनी शेखी । घालिती दुसर्‍याचे मुखी ।
का रे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा॥६६॥
ऐसे खेळती सकळ मिळोनी । तंव देव पाहाती विमानी ।
वंचलो म्हणती अभिमानी । कृष्णशेष न मिळेची॥६७॥
नोहे श्रीकृष्णची शेषप्राप्ती । मग एकमेकंसी बोलती ।
गोपाळ यमुनेतीरीं येती । चला शीघ्र गती जाऊ तेथें॥६८॥
विमाने ठेवोनी अंतराळीं । कृष्ण शेषालागीं ते वेळीं ।
देवीं मत्स्यरुपें धरलों । यमुनेमाजीं रिगती॥६९॥
ब्रह्मादिक मत्स्य जाले । हे श्रीकृष्णासी कळले ।
जाणोनि गोपाळां बोले । म्हणे हात धुवुं नका॥७०॥
सहज उदकाची वाटाळी॥अकर्मकार गोवळी ।
हात पुसिले कांबळी । एक टिरीसी पुसती॥७१॥
उठलें घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत आले वृदांवनी ।
तुळही प्रदक्षणी करुनी । खोविल्या शिरी मंजुरीया॥७२॥
तंव इतक्यांत लोपल्या माध्यान्ह । आस्तमान गेला दिनमान ।
श्रीकृष्णा म्हणे वचन । चला जाऊ घराप्रती॥७३॥
देहुडा उभा राहुनी गायी खुणविल्या वेणुधनी ।
टवकारिल्या चारा विसरुनी । आल्या मुरडोनीं त्वरित॥७४॥
गाई मेळविल्या हरी । गोपाळ घालती हुंबरी ।
डांगा झेलिती अंबरीं । पावे मोहरी वाजविता॥७५॥
सुदामा जाला वेत्रधारी । ऐसे गोपळ गजरीं ।
चालिले मग झदकरी । पेंदा छरीछत्र तरुचें॥७६॥
वडजा घेऊनि अशोक डाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी ।
वाकुंडा फोडी कौतुके आरोळी । ग्रामाजवळी पातलें॥७७॥
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रांगोळ्या नानापरी आंगणी । घालिताती सप्रेमें॥७८॥
नव लक्ष आरत्या करी । घेऊनि उभ्या गोपिका नारी ।
भावे ओवाळिला श्रेहरी । लोण उतरी यशोदा॥७९॥
गाई निघाल्या गोठनी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी ।
आपण प्रवेशले निजभुवनीं । सिंहासनी बैसलें॥८०॥
ऐसा बाळक्रीडेचा सोहळा । आनंद जाहला सकळा ।
एका जनार्दनी देखिला श्रीबाळक्रीडा संपविली॥८१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग