वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४४. श्रीराम-रावण महासंग्राम

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088174 · अभंग क्र. ४४

44.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चव्वेचाळिसावा ॥
औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रणी दंडोनि रावणासी । सावध करावे सौ‍मित्रासी ।
राम आला अति स्नेहेंसी । जीवी जीवासीं जीवन ॥१॥
राम जगाचें जीवन । राम जीवाचे चिद्धन ।
सखा आत्माराम आपण । राम परिपूर्ण परब्रह्म ॥२॥
तोचि राम स्वये आपण । वांचवावया लक्ष्मण ।
कृपाळु संतुष्टला संपूर्ण । त्यासी कल्पांती मरण असेना ॥३॥
राम निजज्ञानें अति समर्थ । तोही वानरांचे विचारांत ।
अनुसरला स्वये वर्तत । अनुचरित लक्षूनी ॥४॥

विश्रम्य स्वस्थमालोक्य सुषेणं राघवोऽब्रवीत् ।
एष रावणवेगेन लक्ष्मणः पतितो भुवि ॥१॥
सर्पवच्चेष्टते वीरो मम शोकमुदिरयन् ॥२॥

लक्ष्मणाला मूर्च्छा आणि रामांचा शोक :

भूत भविष्य वर्तमान । सर्वही जाणे रघुनंदन ।
तरी मनुष्यनट्यविडंबन । स्वये आपण दावित ॥५॥
विकळ देखोनि लक्ष्मण । जाणोनि भविष्याचें चिन्ह ।
वृथा करी विलपन । तेंही लक्षण अवधारा ॥६॥
लक्ष्मण देखोनी रुधिरोक्षित । धरोनी सुषेणाचा हात ।
बंधुस्नेहें कळवळीत । काय बोलत श्रीराम ॥७॥
प्राणापरीस अधिक जाण । सखा बंधु लक्ष्मण ।
मज एकले सांडून । स्वये प्रयाण मांडिलें ॥८॥
सखे बंधु दोघे जण । येरयेरांचा आश्रम धरोन ।
वना निघलों आपण । पितृवचन पाळावया ॥९॥
वचन एके सुषेणा । लक्ष्मणे वेंचलिया प्राणां ।
मज चाड नाही निजप्राणां । येरा जणा काय चाड ॥१०॥
बुडाले धैर्य वीर्य । बुडाले माझे परम शौर्य ।
बुडाले यश सर्व । बंधु स्वयमेव अंतरला ॥११॥
बुडाली माझी धृति कीर्ती । बुडाली माझी शौर्यशक्ती ।
बुडाली माझी परम ख्याती । बंधु निश्चिती अंतरला ॥१२॥
नेत्रा येतसे अंधारी । गात्रें कापती थरथरीं ।
धनुष्य न धरवे करी । धीर निर्धारी न धरवे ॥१३॥
प्राण जाती विकळ । मति न स्मरे अळुमाळ ।
वाचा जातसे बरळ । शरीर चळचळ कांपत ॥१४॥
आता मज युद्धाचे कार्य कोण । यश कोण घे आपण ।
कोण कार्य बधून रावण । बंधु लक्ष्मण अंतरला ॥१५॥
चाड नाही विजय वृत्ती । चाड नाही धृतिगती ।
चाड नाही यशकीर्ती । बंधु निश्चिती अंतरला ॥१६॥
जीविताची चाड कोण । उभ्याच मी सांडीन प्राण ।
या जिण्याचे सुख कोण । बंधु लक्ष्मण अंतरला ॥१७॥
धांव पाव रे लक्ष्मणा । का करितोसी प्रयाणा ।
मज सोडोनि दीनवदना । कोण्या स्थान जातोसी ॥१८॥
वनी मी पिडलासी रे उपवासी । म्हणोनिया रुसून जातोसी ।
की युद्ध करिता भागलासी । म्हणोनि जासी विसांवया ॥१९॥
इंद्रजितासारिखा रणयोद्धा । रणी श्रमलासी तू करिता द्वंद्वा ।
की सीता बोलली अपवादा । त्या विषादा मानिलें ॥२०॥
लक्ष्मणा ये रे ये रे । परतोनि मज भेटी दे रे ।
मजवरी रुसलासी का रे । दोघेही वनींचे सांगती ॥२१॥
तुजवीण न घे जीवन । सर्वथा न सेवीं अन्न ।
न करी अयोध्यागमन । उभ्यां प्राण सांडीन ॥२२॥
सीता न लगे मज सर्वथा । काय तोंड दाखवू त्या भरता ।
काय उत्तर देऊं तिघी मातां । बंधु सर्वथा अंतरला ॥२३॥
शत्रुघ्न मज पुसेल जेव्हा । काय मी मुख दावूं तेव्हा ।
गेला सर्व सुखाचा ओलावा । जीवी जीवा आकांत ॥२४॥
म्हणवोनि घातली लोळणी । अंग टाकिलें धरणी ।
लक्ष्मणे मोकलिले रणी । कोण शिराणी जिण्याची ॥२५॥
वक्षःस्थळ पिटी हातें । डोयी पिटी धरणीतें ।
विकळ जाता सर्व सामर्थ्ये । सुषणें तेथे धरियेले ॥२६॥
महामेरु कडाडितां । की धैर्याचा स्तंभ पडता ।
की तारूं समुद्री बुडता । झाला राखता सुषेण ॥२७॥
मरतया अमृतपान । की दुकाळिया मिष्टान्न ।
की अवर्षणीं वर्षे घन । तेंवी वचन सुषेणाचें ॥२८॥

राममेवं ब्रुवाणं तु शोकविह्वलितेंद्रियम् ।
आश्वासयत्‍नुवाचेदं सुषेणः परमं वचः ॥३॥
त्यजेमां नरशार्दूल बुद्धिवैक्लव्यकारिणीम् ।
शोकसंजीविनी चिंता बाणैस्तुल्या चमूमुखे ॥४॥
नैव पंचत्वमापन्नो लक्ष्मणो लक्ष्मिवर्धनः ।
न ह्यस्य विकलं वक्त्रं नैव श्यामत्वमागतम् ॥५॥
सुप्रभं च प्रसन्नं च सुखमस्य निरीक्ष्यताम् ।
पद्मपत्रातिभौ हस्तौ सुप्रसन्ने च लोचने ॥६॥
नेहशं दृश्यते रुपं गतासूनां विशांपते ।
विषादं मा कृथाः शूर सप्राणोऽयमरिंदम ॥७॥
पश्य चास्य प्रसुप्तस्य स्वस्थगात्रस्य भूतले ।
सोल्लासं हृदयं वीर कंपमानं मुहुर्महुः ॥८॥

सुषेणाचे श्रीरामांना आश्वासन :

ऐके स्वामी रघुनंदन । तुं सर्वदा पै सावधान ।
बंधुवैकल्यवासना जाण । झणी मना धरितोसी ॥२९॥
उभा राहोनि चमूमुखासीं । चिंतेचें बाण हृदयी घेसी ।
तेणे अत्यंत दुःखी होसी । ऐसे मानसी न धरावें ॥३०॥
नाही पंचत्व पावला । नाही याचा प्राण गेला ।
जीवनश्रियेने असे भरला । नाही निमाला सर्वथा ॥३१॥
विशीर्ण न दिसे याचे वदन । नाही पालटले देहचिन्ह ।
नाही काळिमा चढली जाण । जीवे लक्ष्मण जीत असे ॥३२॥
श्रीरामा पाहे सावधान । सुप्रसन्न याचे वदन ।
पद्मदळासारिखें जाण । मुखचिन्ह दिसताहे ॥३३॥
सुकुमार याचे करकमळ । शीतळ न लागती चरणतळ ।
टवटवीत नेत्रयुगळ । लक्ष्मण विकळ नाही रामा ॥३४॥
प्राणहीन पै शरीर । याचे न देखो साचार ।
सावधान याचीं गात्रें वक्त्र । शेषावतार हा होय ॥३५॥
सावध ऐके रघुनंदना । अरिगजसैन्यपंचानना ।
राक्षसकुळनिभंजना । बंधुरत्‍ना भय नाही ॥३६॥
शक्ति भेदें लक्ष्मण । पडला असतांही जाण ।
सर्वथा नाही विसंज्ञ । तेंही चिन्ह अवधारी ॥३७॥
जरी दिसताहे विकळ । तरी पाटव्य असे प्रबळ ।
धुकधुकीत नेत्रकमळ । अळुमाळ दिसताहे ॥३८॥
सर्वथा यासी भय नाही । हे मी जाणतसें पाही ।
प्रतिज्ञा करितो तुझे पायी । भय नाही लक्ष्मणा ॥३९॥
मी जाणतसें वैद्यक् । प्रेतचिन्ह आवश्य ।
सौ‍मित्रा भय नाही देख । प्रतिज्ञा सुटंक वदतसें ॥४०॥
शक्ति भेदली हृदयसंधीं । त्यासी उपाय ऐक कृपानिधी ।
एक वेळां आणोनि दिव्यौषधी । बंधु सुबुद्धि वाचवीं ॥४१॥
म्हणसी ओषधि येते कैसेन । त्या उपायासी सांगेन ।
एक वेळां प्रार्थून वायुनंदन । औषधि जाण आणाव्या ॥४२॥
जंव नव्हे सूर्योदयो । तंव ओषधि आणाव्या पहाहो ।
उदया येता कश्यपतयो । कार्यान्वयो साधेना ॥४३॥
उदया येता गभस्ती । ओषधि प्राप्त नव्हती ।
आणी अनावर ब्रह्मशक्ती । ऊर्मिळापती न वांचे ॥४४॥
साधावया या कर्यासी । सामर्थ्य एक हनुमंतासी ।
इतरांची गति कायसी । लक्ष्मणासी वांचवावया ॥४५॥
इतुके सांगोनि श्रीरामासी । सवेंची सांगे हनुमंतासी ।
आजि सौ‍मित्र वांचवावयासी । तूंचि होती प्राणदाता ॥४६॥

एवमुक्त्वा महाप्राज्ञः सुषेणो राघवं वचः ।
समीपस्थमुवाचेदं हनूमंतं प्लवंगमम् ॥९॥
सौ‍म्य शिघ्रमितो गत्वा शैलं तं तु महोदयम् ।
पूर्वं वै कथितो योसौ वीरजाम्बवता तव ॥१०॥
दक्षिणे शिखरे जातामोषधिं तामिहानय ॥११॥

सुषेणाची हनुमंताला औषधी आणण्याची विनंती :

जवळी बोलावोनी वायुनंदन । गुज सांगे सुषेण ।
लक्ष्मण पडिला विसंज्ञ । त्यासी जीवदान त्वा द्यावे ॥४७॥
वांचविलिया लक्ष्मण । रामासीं सुखसमाधान ।
सुख सुग्रीवा अंगदा जाण । सुखसंपन्न वानर ॥४८॥
तू श्रीरामाचा निजभक्त । तुज सबाह्य श्रीरघुनाथ ।
श्रीरामप्रेमें सदा डुल्लत । राम स्मरत सर्वदा ॥४९॥
तुज सर्वा भूतीं समसमान । अखंडता रामानुसंधान ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । राम चिद्धन देखसी ॥५०॥
सुग्रीव अंगद जांबवंत । नळनीळादि वानर समस्त ।
तुझेनि आम्ही रामभक्त । श्रीराम सेवित सर्वदा ॥५१॥
तुझेनि आम्हा श्रीरामभेटी । तुझेनि आम्हा श्रीरामी गोष्टी ।
तुझेनि राम देखिला दृष्टी । धन्य सृष्टी तुझेनि आम्ही ॥५२॥
तुझेनि वानर वनचर । झाले श्रीरामसेवेचे किंकर ।
तुझेनि भवसमुद्र दुस्तर । झाला समग्र कोरडा ॥५३॥
जन्ममरणाचे आवर्ती । बुडत होतो मारुती ।
ते तुवा लावोनि श्रीरामभक्ती । वानरपंक्ती उद्धरिल्या ॥५४॥
हेंचि नवल सांगों किती । तुवा उद्धरिली त्रिजगती ।
तुझेनि पापी उद्धरती । पापनिर्मुक्ती तुझेनि ॥५५॥
वानरमांदीसमवेत । पीडितां उपवासी समस्त ।
तुवा नेवोनि विवरांत । केले तृप्त फळे जळे ॥५६॥
विविरेंसहित हेमा । तुवा उद्धरिली वीरोत्तमा ।
समुद्रतीरी प्लवंगमा । मरणधर्मा चुकविलें ॥५७॥
पाखेंवीण मांसाचा गोळा । संपाती उद्धरिला की हेळा ।
सुद्धि लावोनि त्या काळा । समुद्रजळा आक्रमिले ॥५८॥
छायाग्रह राक्षसी । तिणें सगळाचि गिळिलासी ।
काळीज उपटोनि वेगेंसी । दुष्ट राक्षसी मारिली ॥५९॥
सुरसा दानवांची माता । न मारोनि गेलासी परता ।
पाय देवोनि पर्वतमाथां । तोही तत्वता उद्धरिला ॥६०॥
अति दुस्तर समुद्रतीरा । तुझा पराक्रम कपींद्रा ।
जावोनिया परतीरा । केले चरित्रा ते ऐके ॥६१॥
झाडा घेवोनी मध्यरात्रीं । लंका शोधिली मारुती ।
करोनि रावणासभा पालथी । सीता निश्चिती शोधिली ॥६२॥
चौदा सहस्र वनचर । तुवा मारिले एकसर ।
झाडे झोडोनि समग्र । वन चौफेर विध्वंसिले ॥६३॥
जंबुमाळी प्रधानपुत्र । तुवा मारिला अखयाकुमर ।
इंद्रजितासी करोनि क्षात्र । रणी गांजिला ॥६४॥
देखोनि संमुख रावण । तुवा करोनि पुच्छासन ।
तिखट वाग्बाणीं करुन । हृदयी दशानन विंधिला ॥६५॥
आगी लावोनि पुच्छासी । जाळिलें दाही मुखांसी ।
भस्म करोनि लंकेसी । सीताशुद्धीसी आणिले ॥६६॥
एकल्या एके आपण । अर्धरात्रीं तुवा जाण ।
आणोनि महापाषाण । सेतुबंधन संपविले ॥६७॥
अति संकटींहि रिगम करुन । खांदीं वाहून लक्ष्मण ।
वीर इंद्रजित दारुण । तुवा एकलेन मारविला ॥६८॥
मनी न धरवती धरिता । ती ती कर्मे केलीं हनुमंता ।
भक्तोत्तमा कपिनाथा । श्रीरामसुखार्था बंधु उठवी ॥६९॥
शिघ्र् जावोनि आपण । उदया न येता भास्वान ।
वेगी दिव्यौधींतें आणून । बंधु लक्ष्मण वांचवीं ॥७०॥
पूर्वी वीरे जांबवंते । तुजलागी सांगितले होते ।
त्याचि जावोनि द्रोणाद्रीतें । दिव्यौषधींतें आणावें ॥७१॥
त्या पर्वताच्या दक्षिणशिखरीं । दिव्यौषधि थोरथोरी ।
ऐक त्यांच्या नामांची कुसरी । सविस्तरीं सांगेन ॥७२॥
शल्यें विशल्य होती पूर्ण । विशल्यकरणीं तीस अभिधान ।
अति युक्तीनें आपण । वेगे शोधून आणावी ॥७३॥

विशल्यकरणी नाम सुवर्णकरणी शुभा ।
संजीवनार्थं वीरस्य लक्ष्मणस्य महात्मनः॥१२॥

औषधीचे गुणवर्णन :

स्वये घाय जाती बुजोन । क्षतें कानपती आपण ।
अंगी राहों न शके वण । सुवर्णा जाण तीस नांव ॥७४॥
पाने शीतळ सुकुमार । खुपों न शकती चंद्रकर ।
फलें हिरवी सुंदर । रक्तांबर फुलें तिचीं ॥७५॥
वांचवावया लक्ष्मण । करावे सवेग गमन ।
म्हणोनि धरिले दोन्ही चरण । वेगी प्रयाण करावे ॥७६॥
तू आमुचा जीवदाता । तुवा चुकविली भवव्यथा ।
बहु बोलणें न घडे सर्वथा । सद्‌गुरु तत्वता तू आम्हा ॥७७॥
तुझेनि चुकलों भवभ्रमा । तुझेनि आम्हा श्रीरामी प्रेमा ।
प्रिय व्हावया वानरा आम्हा । प्लवंगमा ऊठ वेगी ॥७८॥
चित्ती धरोनि रघुनंदन । करावे सवेग प्रयाण ।
तेणे सकळार्थ संपादून । विजयी होऊन येशील ॥७९॥
माझेनि स्वामी श्रीराम यांसी । माझेनि भक्तिसुख वानरांसी ।
ते मज सांगसी स्मरणासी । ऐसे मानसी न मानवे ॥८०॥
प्रेमाची जाति ऐसीच आहे । बोलता मागे पुढे न पाहे ।
ऐसी कोणी एक स्थिती आहे । जाणता होयें तू एक ॥८१॥
स्मरणी नाही द्वंद्वबाधा । स्मरणे नाशे सकळापदा ।
छेचोनि द्वंद्वाचिया कंदा । परमानंद पाविजे ॥८२॥
ते करोंनि रामस्मरण । वेगी करावे उड्डाण ।
मार्गीं जावे सावधान । मार्गचिन्ह जाणोनी ॥८३॥

समुद्रं समतिक्राम्य लवणोदं महोदधिम् ।
कुशद्विपमतिक्रम्य क्षीरोदं च महार्णवम् ॥१३॥

औषधीचे ठिकाण, ती आणण्याची कालमर्यादा :

लवणादि सकळ समुद्र । सांडून कुशद्वीप सुंदर ।
ओलांडोनि क्षीरसागर । पर्वतेंद्र आणावा ॥८४॥
पर्वताच्या उत्तरभागीं । दिव्यौषधि अनेगी ।
सर्वथा न लक्षिती जगी । त्याही वेगी परिसे पा ॥८५॥
अम्लानपुष्पें देदीप्यमान । प्रभा सूर्यतेजासमान ।
पर्णें सदा नित्यनूतन । समूळ जाण सुस्वादा ॥८६॥
समुद्रमंथनीं अमृत । निघता दैत्य भांडत ।
पर्वती सांडले त्वरित । औषधि तेथ झालिया ॥८७॥
तेथे गंधर्व राज्य करिती । दुर्धर तयांची स्थिती ।
ओषधि अति यत्‍ने राखिती । अहोरात्री सावध ॥८८॥
तुझ आणितां ओषधींसी । गंधर्व मिसळती युद्धासी ।
चुकवोनिया अपायांसी । दिव्यौषधींसी आणावे ॥८९॥

बहुमायाश्च मार्गेषु राक्षसाः कामरुपिण ।
अप्रमत्तेन गंतव्यं त्वया वीर महाबल ॥१४॥
लक्षत्रयं योजनानां शतानां विशतिर्दश ।
गंतव्यं धीयतां ध्याने द्विगुणं तु गतागतम् ॥१५॥
यावन्न क्षीयते रात्रिर्यावन्नोत्तिष्ठते रविः ।
तावत्वया महाबाहो आगंतव्यं महाबल ॥१६॥
लक्ष्मणोऽपि विनश्येत नियतं शर्वरीक्षये ॥१७॥

राक्षस नष्ट मायावी । कपटें छळिती महालाघवी ।
मार्गीं घालिती महागोंवी । ते चुकवावी अति यत्‍ने ॥९०॥
नानापरींच्या छळणोक्ती । राक्षस छळिती अतर्क्ययुक्ती ।
ते सांडून मारुती । शीघ्रगती परतावें ॥९१॥
दूरपंथ अति अध्वान । निमेषार्धैसीं क्रमून ।
मनोवेगे तुज गमन । आम्ही संपूर्ण जाणतो ॥९२॥
तथापि मार्गाचिया गणिता । तुज सांगेन कपिनाथा ।
गमन करावया आता । संख्या तत्वता अवधारी ॥९३॥
तीन लक्ष दहा शते । दहा योजने अधिक तेथे ।
येता जाता द्विगुणितें । पंथ निश्चिते क्रमावा ॥९४॥
जंव रात्र आहे मध्यान्ह । सूर्योदय न होता जाण ।
ओषधि घेवोनि संपूर्ण । शीघ्र आगमन करावे ॥९५॥
रात्रि अवघी अतिक्रमितां । सूर्य उदयाते न पावतां ।
ओषधि येती हाता । कपिनाथा अवधारी ॥९६॥
उदया येता दिवाकर । ओषधि मंदतेजा समग्र ।
होताती न लागता क्षणमात्र । न होती गोचर सर्वांर्थीं ॥९७॥
आणीक बीझ एक कपिनाथा । तुज मी सांगेन तत्वता ।
दिवाकर उदया येता कार्य सर्वथा नासेल ॥९८॥
ब्रह्मशक्तीसीं वरद पूर्ण । उदया येता सहस्रकिरण ।
ज्यावरी घालिजे आपण । त्याचा प्राण वांचेना ॥९९॥
यालागी कपिनाथा । सवेग गमन करी आता ।
सौ‍मित्रा वांचवोनि सर्वथा । श्रीरघुनाथा सुख देई ॥१००॥

गच्छ वीर महाबोहो प्रर्थिंतं मंत्रयस्व नः॥१८॥

राजा सुगीवाची हनुमंताला विनंती :

राजा सुग्रीव आपण । प्रार्थिता झाला वायुनंदन ।
शीघ्र करोनि प्रयाण । बंधु लक्ष्मण उठवावा ॥१॥
बिभीषण लागे पायांसी । सत्वर करावे गमनासी ।
वेगे आणोनि औषधींसी । सौ‍मित्रासी उठवावें ॥२॥
वडील सकळ वानरांस । तो जांबवंत बोले सुरस ।
आणोनियां द्रोणाद्रीस । सुबंधूस वांचवीं ॥३॥
अंगद युवराजा जो का । बोलोनिया अति नेटका ।
तोही विनवीतसे देखा । कपिनायका आदरे ॥४॥
तुझेनि सकळ दुस्तर । तरलों आम्ही वानर ।
तो तुझा उपकार । केवी सागूं समग्र हनुमंता ॥५॥
अति संकटीं दुर्गमी । तुवा वांचविलों आम्ही ।
आम्हा सकळा तूंचि स्वामी । बहू वाचा मी किती बोलू ॥६॥
आता सकळार्थातें सार । ऐके कपीद्रा साचार ।
प्राण त्यागितां सौ‍मित्र । सर्व संहार होईल ॥७॥
न देखता लक्ष्मण । राम तत्काळ सोडील प्राण ।
त्यासवेंचि सुग्रीव जाण । देईल प्राण तत्वरां ॥८॥
रामसुग्रीवांपाठीं । बिभीषण न राहे सृष्टी ।
येरा वानरा काय गोष्टी । सकळ सृष्टी आकांत ॥९॥
ऐकतांचि सीता सुंदर । न लागता निमेषमात्र ।
सवेग त्यागील शरीर । अनर्थ थोर होईल ॥११०॥
भरत शत्रुघ्न ऐकता । प्राण सांडितील सर्वथा ।
ऐकतांचि तिघी माता । प्राण तत्वता न राखिती ॥११॥
आकांत होईल अयोध्येसीं । आकांत सकळ लोकांसीं ।
आकांत देवदानवांसीं । सकळ सृष्टीसीं आकांत ॥१२॥
बांधवडी सोडील कोण । वधील कोण रावण ।
देवकार्य न साधे पूर्ण । येवढें विघ्न मांडेल ॥१३॥
यालागी गा कपिनंदना । वीर शूर सर्वज्ञा ।
ओषधि आणोनि लक्ष्मणा । जीवदाना होई दाता ॥१४॥
इतकें बोलता अंगद वीर । सकळ वानरांचा भार ।
ऐकोनिया श्रीरामचंद्र । काय उत्तर बोलत ॥१५॥
कपिकुळपंचानना । ऐके हनुमंता सर्वज्ञा ।
भ्रातृभिक्षेचिया दाना । यालागी शरण जाण तुज आलो ॥१६॥
लक्ष्मणाचे जीवदान । तुज भिक्षा मागो आलो जाण ।
सर्वथा पराङ्मुख न होणें । बंधुजीवदान मज देई ॥१७॥
वनी एकला एक अनाथ । लक्ष्मणेंवीण जालो येथ ।
आम्हा जीवदाता कपिनाथ । तुवा सनाथ करावे ॥१८॥
वांचलिया लक्ष्मण । आम्ही बंधु चौघे जण ।
पांचवा हनुमंत आपण । निश्चये जाण भाक माझी ॥१९॥
पांच मिळतां एके ठायी । रणी युद्धाचा पाड कायी ।
रावणाचे भय नाही । घायीं ठायी निमेल ॥२०॥
हेंचि नवल सांगू काये । पांचही एक जाले हो पाहे ।
साधों शके महत्कार्य । सहजान्वयें सांगेन ॥१२१॥
होता पांचांचा एक मेळ । विरे पांचां भूतांचा गोळा ।
पांचा इंद्रियांचा पाळा । एकहेळां भस्म होय ॥२२॥
हे पांचां विषयांची विषयस्थिती । एके निमेषार्धे भस्म होती ।
विषयी शोभे चिच्छत्ती । जै पांचही मिळती एकत्र ॥२३॥
इतस्ततां विचरती जाण । ते साम्या येती पंचप्राण ।
चळण सांडोनि आपण । निश्चल जाण स्वये होत ॥२४॥
एके आंवरिल्या चौघांस । होय पांचांची एक मूस ।
अहंकार चित्त बुद्धि मान । शज समरस स्वये होती ॥२५॥
पांचांचिया एकात्मता । कळिकाळाते हाणो लाता ।
कायसा काळ नियंता ब्रह्मसायुज्यता हाता चढे ॥२६॥
जिणोनि जीवशिवपदी । स्वस्वरुप स्वये अनुभवी ।
पूर्णब्रह्मत्व ठसावे जीवी । पंचाऐक्यभावीं पद ऐसे ॥२७॥
यालागी गा कपिनंदना । शीघ्र करोनि प्रयाणा ।
वांचवीं बंधु लक्ष्मणा । बहु प्रतारणा काय बोलू ॥२८॥
ऐसे श्रीरामाचे उत्तर । तैसेच जुत्पती समग्र ।
ऐकोनि आल्हादे कपींद्र । काय उत्तर बोलत ॥२९॥
समुद्र ओलांडोनि आसका । जेणे पालथी केली लंका ।
भेदरा लाविला दशमुखा । तो हनुमान देखा सरसावला ॥१३०॥
हनुमान साटोपतां जीवी । सुरदुंदुभी त्राहाटिल्या देवीं ।
पुष्पवृष्टि केली अवघी । निजवैभवीं कपींद्रा ॥३१॥
सत्वर जावोनि कपिपती । ओषधी आणील निश्चिती ।
सौ‍मित्र उठवील मारुती । उदया गभस्ती न येता ॥३२॥
लक्ष्मण उठलिया जाण । श्रीराम स्वये आपण ।
निमेषार्धे वधील रावण । राज्यी बिभीण स्थापील ॥३३॥
फिटेल सकळांची सांकडी । सुटेल देवांची बांधवडी ।
आणोनियां अमरकोडी । स्वर्गी गुढी उभारिती ॥३४॥

हनुमंताचे श्रीरामांना वंदन व आश्वासन :

ऐसा सरसावला वानर । करोनि रामनामे भुभःकार ।
काय बोलिला उत्तर । श्रीरघुवीर परिसत ॥३५॥
लोटांगण श्रीरामचरणा । करुन अनुवादला जाणा ।
सावध ऐक रघुनंदना । विज्ञापना हे माझी ॥३६॥
स्वामीस येवढी कोण चिंता । दिव्यौषधी समर्था ।
मजसारिखा दूत असता । क्षणार्धता आणीन ॥३७॥
ऐके नरवीरपंचानना । झणी विकळ करिसी मना ।
तुझेनि नामे दीनजनां । आंगवण जाणा धैर्याची ॥३८॥
तुझेनि नामे यश कीर्ती । तुझेनि नामे धृति विरक्ती ।
तुझेनि नामे अगाध शांती । प्राणी पावती रघुराया ॥३९॥
नामी नाही जन्ममरण । नामी नाही निजपतन ।
नामी सदा स्वानंदघन पूर्ण । नाम चिद्धन रघुवीरा ॥१४०॥
अत्यंत जड मूढ पाषाण । नामे उद्धरले संपूर्ण ।
तेथे बापुडे मरण कोण । श्रीलक्ष्मण जिंतावया ॥४१॥
मुख्य ओषधी सकळ जनीं । नाम अमृतसंजीवनी ।
नामेंनिर्मुक्त भवबंधनी । चूडामणी नरवीरा ॥४२॥
कायसे ब्रह्मशस्त्राचें बळ । कायसे बापुडे काळ ।
मृत्युचें मारक सबळ । नाम केवळ रघुनाथा ॥४३॥ऐ
सें असोनिया स्वामी । मज आज्ञा दिधली तुम्ही ।
तरी दिव्यौषधी आणीन मी । ज्या दुर्गम तिही लोकी ॥४४॥
चिंता न करी रघुनाथा । चित्ता दुःख नेदीं सर्वाथा ।
चिंतेचे बाण हृदयी घेता । दुःखावस्था अनिवार ॥४५॥
चिंता संचरल्या शरीरी । सुख नेदी तिळभरी ।
लागता चिंतेची लहरी । सुरासुरी कांपिजे ॥४६॥
सुख नेदी राजभवन । सुख नेदी भोगायतन ।
दारापुत्रादि जन । सुख जाण न देती ॥४७॥
सुख नेदी धनसंपत्ती । सुख नेदी सकळ संपत्ती ।
सुख नेदी यश कीर्ती । चिंता चित्ती प्रवेशतां ॥४८॥
चिंतेनें न साधे योगसुख । चिंतादाह देख भला नव्हे ॥४९॥
परमानंदाचें वन समग्र । चिंतेनें जाळिलें चौफेर ।
चिंतेनें परमार्थाचें घर । निरंतर उद्वसे ॥१५०॥
परमात्मा श्रीरामचंद्र । चिंतेनें केलासी किंकर ।
इतरांचा कायसा विचार । चिंता दुस्तर् श्रीरामा ॥५१॥
ते चिंतेचा समूळ दाहो । करितें तुझेंनाम पहाहो ।
एवढा तुझा नामनिर्वाहो । महाबाहो श्रीरामा ॥५२॥
ते समूळ चिंता सांडूनि पाही । स्वस्वरुपीं सावध होयीं ।
सौ‍मित्रासी भय नाही । प्रतिज्ञा पाही हे माझी ॥५३॥
आतांचि जावोनि सत्वर । अणोनि ओषधिसंभार ।
क्षणे उठवीन सौ‍मित्र । प्रतिज्ञा साचार हे माझी ॥५४॥
ऐसे बोलोनी गोळांगूळ । त्राहाटिले भूमीसीं लांगूळ ।
पुढील कथा अति रसाळ । श्रोते सकळ परिसोत ॥५५॥
एका जनार्दनाचें तान्हें । भुकाळु परी मागो नेणे ।
यालागी मजकारणें । मुखीं घांस देणे जननिये ॥५६॥
जे गोड लागे माउलीसी । तोंडींचें काढी ते वेगेंसीं ।
ओपी बाळकाच्या मुखासी । निजमानसीं स्नेहाळ ॥५७॥
एका जनार्दना शरण । श्रोती द्यावे अवधान ।
हनुमान जावोनीआपण । ओषधींसीं आगमन करील ॥१५८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
ओषध्यर्थहनुमंतप्रार्थनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥४४॥
ओंव्या ॥१५८॥ श्लोक ॥१८॥ एवं ॥१७६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग