गोपीचंदन मुद्रा धारण
3247.
गोपीचंदन मुद्रा धारणे । आम्हा लेणे वैष्णवा ॥१॥
मिरवू अळंकार लेणे । ही भूषणे स्वामीची ॥धृपद॥
विकलो ते सेवा जीवे । एक्याभावे एकविध ॥२॥
तुका म्हणे शूर झालो । बाहेर आलो संसारा ॥३॥
अर्थ :
गोपीचंदन टिळे मुद्रा धारण करणे हे आम्हा वैष्णवांचे लेणे म्हणजे अलंकार आहेत. आमच्या स्वामींची ही भूषणे आहेत ते आम्ही आमच्या अंगावर परिधान करु आणि सर्वत्र मिरवू. आम्ही आमचा जीव स्वामीला एकनिष्ठतेने ऐक्यभावाने विकला आहे कारण आम्हाला स्वामीची सेवा करता यावी म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसारातून बाहेर पडलो त्यामुळे आम्ही शूर झालो आहोत.
