ऐसे ऐकोनिया प्रेमा आ
928.
ऐसे ऐकोनिया प्रेमा आला पोटी | म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥1॥
येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ | श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥2॥
ऐसा संत भेटे विरळा भाग्ययोगे | जो आथिला वैराग्ये सप्रेमळू ॥3॥
सर्वभूती दया सर्वभावे करुणा | जेथे मीतूंपणा मावळला ॥4॥
भजन तया नांव वाटे मज गोड | येर ते काबाड वायांविण ॥5॥
नमन ते नम्रता न देखे गुणदोष | अंतरी प्रकाश आनंदाचा ॥6॥
येर ते दांभिक जाणावे मायावी | विश्वास मी जीवी न धरी त्यांचा ॥7॥
ध्यान तया नांव निर्विकार निके | जे विश्वी माझ्या देखे विठोबासी ॥8॥
अखंड हृदयी तेचि आठवण | साजिरे समचरण विटेवरी ॥9॥
नादी लुब्ध जैसे आसक्त हरिण | जाय विसरोन देहभाव ॥10॥
यापरि तल्लीन दृढ राखे मन | या नांवे श्रवण आवडीचे ॥11॥
व्यवसायी चित्त ठेवुनी कृपण | लाभाचे चिंतन सर्वकाळ ॥12॥
यापरि अखंड स्वहित विचारण | करिजे ते मनन सत्वशीळ ॥13॥
परपुरुषी जैसी आसक्त व्यभिचारिणी | न लागे तिच्या मनी कामधाम ॥14॥
कीटकी भृंगुटिये जैसे अनुसंधान | निके निजध्यासन एकविध ॥15॥
सर्वभावे एक विठ्ठलुचि ध्याये | सर्वांभूती पाहे रूप त्याचे ॥16॥
सर्वांहूनि निराळा रजतमावेगळा | भोगी प्रेमकळा तेचि भक्ति ॥17॥
सत्वाचा सुभटु असंग एकटू | वैराग्य उद्भटू एकनिष्ठ ॥18॥
प्रारब्धाचा भोगी नेणे देहस्मृति | अखंड ते धृति निर्विकार ॥19॥
निर्वासना मन निजलाभे संपूर्ण | नेणे स्वरूपज्ञान विकल्पाचे ॥20॥
अनुरागे गोविंद ध्यायिजे एकांती | यापरती विश्रांति आणिक नाही ॥21॥
कायावाचामने हा माझा अनुभव | सांगितला सर्व आवडीचा ॥22॥
नामा म्हणे हेंहि बोलविले तेणे | उदार सर्वज्ञे पांडुरंगे ॥23॥
