ज्ञानदेव म्हणे शंका
927.
ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनी | दृष्टि दुजेपणी न ठेवावी ॥१॥
सुखे सुख घ्यावे अनुभवोनी अनुभवावे | आहे ते आघवे ब्रह्मरूप ॥२॥
तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरूपा | सुख वस्तुच्या दीपा नामदेवा ॥३॥
सुखाचिये ताटी सुखाची वोगरी | तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा ॥४॥
पंढरीरायाचा तू प्रेमभांडारी | आस पूर्ण करी मज याचकाची ॥५॥
विश्रांतीसी पात्र तूंचि विष्णुदासा | हा मज भरंवसा आहे तुझा ॥६॥
म्हणोनी तुझा संग धरिली थोर आस | झणी होसी उदास भक्तराया ॥७॥
सिंधुहुनी सखोल सुरस तुझे बोल | आनंदाची वोल नित्य नवी ॥८॥
ते माझ सादर ऐकवी सत्वर | श्रवण क्षुधातुर जाले माझे ॥९॥
जाणीव शहाणीव तरीच शोभे सर्व | जरी होय आविर्भाव वैराग्याचा ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे तू भक्त अंतरंग | नलगे तुज पांग बहुज्ञतेचा ॥११॥
