बहेणाबाई-ऐकोनिया पत्
149.
बहेणाबाई-ऐकोनिया पत्र आलासी तातडी ।
घालोनिया उडी पुत्रराया ॥१॥
तेरावा दिवस केला रूक्मिणीचा ।
सद्गदित वाचा कंठ दाटे ॥२॥
जालासी उत्तीर्ण तूचि रे सर्वांचा ।
मने काय वाचा सर्वभावे ॥३॥
देखोनिया तुज संतोष वाटला ।
प्रेमाने दाटला कंठ माझा ॥४॥
मृत्यूचा संकल्प अश्विन शुद्ध प्रतिपदा ।
ऐक तू प्रसिद्धा सांगितला ॥५॥
खेद तो अंतरी न धरावा कदा ।
सांगता मर्यादा नुल्लंघावी ॥६॥
पुत्रपण तुझे आजी आले फळा ।
माझे अंतकाळा पावलासी ॥७॥
बहेणि म्हणे आता विचारी जे बाळा ।
साशंकता प्रबळा नको ठेवो ॥८॥
