विठ्ठल-अंतरीची साक्ष
150.
विठ्ठल-अंतरीची साक्ष जाणिजे अंतरे ।
माय तू निर्धारे सद्गुरूही ॥१॥
देखियेले स्वप्न कचेश्वरी माये ।
विमान हे पाहे तुज आले ॥२॥
शंख भेरी नाना वाजताती वाद्ये ।
गर्जती आनंदे नामघोषे ॥३॥
शंख चक्र गदा अंकित वैडूर्य ।
करिती उत्छाव नानापरी ॥४॥
मृदंग वाजती टाळघोळ कथा ।
पताका अनंता गरूडटके ॥५॥
ब्राह्मणांचा थाट पुढे मागे लोक ।
माळा गळा देख तुळसीच्या ॥६॥
मिरवत विमान देखियेले स्वप्नी ।
आनंद हा मनी थोर वाटे ॥७॥
उधळती बुका गंधाक्षता हाती ।
ब्राह्मणांच्या पंक्ती नानापरी ॥८॥
देखियेले जना उत्छाव या मना ।
थोर झाला स्वप्नामाजी पाहे ॥९॥
उठोनी प्रातःकाळी आली मना साक्ष ।
स्वप्न हे प्रत्यक्ष नव्हे मिथ्या ॥१०॥
बैसलो समस्त कचेश्वरापासी ।
देखिले पत्रासी अकस्मात ॥११॥
वाचुनी सत्वर निघालो तातडी ।
केली घडामोडी मनामाजी ॥१२॥
आणावी जाऊनी गोदातीरा माय ।
ऐसाची उपाय करू आता ॥१३॥
वंदुनी चरण उभा असे पुढे ।
मनातील गूढ जाणसी तू ॥१४॥
शुक्लेश्वरापासी मागितले स्थळ ।
आज्ञा ते केवळ तुझी आता ॥१५॥
