स्वर्गीचे अमर इच्छित
3356.
स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥१॥
नारायणा नामे होऊ जिवन्मुक्त । कीर्तिनी अनंत गाऊ गीती ॥धृपद॥
वैकुंठीचे जन सदा इच्छीतात । कइ येथे येती हरीचे दास ॥२॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनिया कर तिष्ठतसे ॥३॥
तुका म्हणे पावावया पैल पार । नाममंत्र सार भाविकासि ॥४॥
अर्थ :
स्वर्गातील अमर देवता अशी इच्छा धरत असतात की मृत्यूलोकी आमचा जन्म व्हावा व नारायण नाम घेऊन जीवन मुक्त होऊ आणि कीर्तनातून आनंताचे गीत गाऊ. वैकुंठा मध्ये नेहमी राहणारे लोक अशी इच्छा धरतात की हरीचे दास येथे केव्हा येतील? यमधर्म आपले दोन्ही हात जोडून हरिदास केव्हा येतील अशी तिष्ठत वाट पहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात भाविकांसाठी सर्व सार म्हणजे नाम आहे आणि नाममंत्र भाविकांना पैलंतिराच्या पार पोहोचवत असते.
