वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ५. नल-नील यांच्याकडून सेतुबांध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088141 · अभंग क्र. ५

5.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पाचवा ॥
रावण - सुग्रीव यांचे युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुवेळेवरुन सुग्रीव लंकेत उडून गेला :

सुवेळे बैसल्या रघुकुळटिळका । मनोहर दिसताहे लंका ।
संमुख देखोनि दशमुखा । केला आवांका सुग्रीवे ॥१॥

ततो रामः सुवेलाग्रं योजनद्वयमंडलम् ।
आरुरोह ससुग्रीवो हरियूथैः समन्वितः ॥१॥
ददर्श लंका सुव्यक्तां रम्यकाननशोभिताम् ।
तस्यां गोपुरशृंगस्थं राक्षसेंद्रं दुरासदम् ॥२॥
श्वेतचामरपर्यस्तं विजयच्छत्रशोभितम् ।
पश्यतां वानरेंद्राणां राघवस्थापि पश्यतः ॥३॥
दर्शनादाक्षसेंद्रस्य सुग्रीवः सहसोत्थितः ।
अचलाग्रादथोत्थाय पुष्लुवे गोपुरस्थले ॥४॥

श्रीराम चढला सुवेळेवरी । सहित सुग्रीव कपिसंभारीं ।
दोनी योजने सुवेळाग्री । सभा वानरी शोभत ॥२॥
तंव देखिले लंकानगर । वनी काननीं अति सुंदर ।
त्यामाजी रावणाचे गोपुर । दीर्घ मनोहर रमणीय ॥३॥
श्रीरामसेना वानरसंभार । आले देखोनि अपार ।
ते पहावया दशशिर । सवेग गोपुर वळंघला ॥४॥
रावण अंजनाभ काळा । सुवर्णभूषणीं सोज्वळा ।
कांसे आरक्त पाटोळा । आरक्त माळा रत्‍नाढ्य ॥५॥
सवे निशाचरांचा भार । युग्मचामर श्वेतातपत्र ।
ऐसा देखोनि दशशिर । सुग्रीव वीर क्षोभला ॥६॥
माझ्या स्वामीची चोरिली कांता । कायसे छत्र याचिया माथा ।
याच्या करीन मी घाता । साटोपता खवळला ॥७॥
वळिला पुच्छाचा आंकोडा । रोमें थरकती चहूंकडां ।
वेग न धरवे गाढा । अति वेगाढा उडाला ॥८॥
श्रीरामासी न पुसतां । कोणासी न विचार सांगता ।
गेला गोपुराआंतौता । लंकानाथा संमुख ॥९॥

स्थित्वा मुहूर्त संप्रेक्ष्य निर्भयेनांतरात्मना ।
तृणीकृत्य च तद्रक्षः सोब्रवीत्परुषं वचः ॥५॥
लोकनाथस्य रामस्य सखा दासोस्मि राक्षस ।
न मया मोक्ष्यसेऽद्य त्वंपार्थिवेंद्रस्य तेजसा ॥६॥
इत्युक्त्वा सहसोत्पत्य पुप्लुवे तस्य चोपरि ।
आकृष्य मुकुटं चित्रं पातयामास तद् भवि ॥७॥

रावण व सुग्रीवाची झटापटः

पडता सुग्रीवाची उडी । निशाचरें झालीं वेडीं ।
रावणासी शंका गाढी । वळली बोबडी सर्वांची ॥१०॥
खुंटली राक्षसांची युक्ती । सुग्रीव गर्जे रावणाप्रती ।
श्रीरामाचा सखा सांगती । जाण निश्चिती सेवक ॥११॥
सुग्रीव तो मी विख्यात । तुझा करु आलो घात ।
माझेनि हातें लंकानाथ । आजि जिवंत वांचेना ॥१२॥
ऐसे बोलोनि निष्ठुर । निःशंक उभा सुग्रीव वीर ।
कोणा न बोलवे उत्तर । अधोमुख राक्षस ॥१३॥
सुग्रीव उभा मुहूर्त । कांही न बोले लंकानाथ ।
उडोनि उरावरी देत लात । मुकुटा हात घातला ॥१४॥
मुकुट आंसुडिंता तत्काळी । दोघे जण आतुर्बळी ।
आदळते क्षितितळीं । रावण ते काळी मुर्च्छित ॥१५॥
मुकुट घेवोनिया जाण । सुग्रीव निघतां त्वरा करुन ।
सावध होवोनि रावण । काय बोलत ॥१६॥

समीक्ष्य तृर्णमायांतं तं बभाषे निशाचरः ।
सुग्रीव त्वं परोक्षे मे हीनग्रीवो भविष्यसि ॥८॥
इत्युक्त्वोत्थाय तं क्षिप्रं बाहुभ्यामाक्षिपत्तले ।
कंदुवत्स समुत्थाय बाहुभ्यामाक्षिपद्धरिः॥९॥
परस्परं स्वेदविदिग्धगात्रौ
परस्परं श्लिष्टनिरुद्धचेष्टौ ।
परस्परं शोणितरक्तदेहौ
परस्परं शाल्मलिकिंशुकौ यथा ॥१०॥
मुष्टिप्रहारैश्च तलप्रहारैरंघ्रिप्रपातैश्च कराग्रपातैः ।
तौ चक्रतुर्युद्धमसह्यरुपौ महाबलौ वानरराक्षसेंद्रौ ॥११॥

मुकुटेंसीं सुग्रीव जात । त्यासी पाचारी लंकानाथ ।
मी दुश्चित होतो मुर्च्छित । युद्ध न करिता तू केवी जासी ॥१७॥
मजवरी घालोनिया उडी । आता पळतोसी तांतडी ।
कराग्रें हाणोनिया थापडी । ग्रीवा रोकडी पाडीन ॥१८॥
जरी आहे आंगवण । परत करावयासी रण ।
पुढे जासी तै काळे वदन । कोपे रावण अनुवादे ॥१९॥
वेगे उडोनियां लंकानाथ । सुग्रीवातें आंसुडित ।
तेणे तो गदगदा हांसत । तुझा पुरुषार्थ इतकाचि ॥२०॥
सुग्रीवे आंसुडितां रावण । तोंडघसी पडला जाण ।
विसही बाहु स्वये टेंकून । दशानन ऊठिला ॥२१॥
तेणे रागे पै रावण । सांडोनिया शस्त्रास्त्रीं रण ।
आंगी आदळला आपण । विचार आन कल्पूनी ॥२२॥
वानराअंगीं दोनचि हात । विसां हाती मी समर्थ ।
कळा लावोनि सर्वांगांत । कपि निश्चित मारीन ॥२३॥
पालेखाईर वानर किती । याचे अंगी कायसी शक्ती ।
मी सबळ बळे लंकापती । हातोहाती मारीन ॥२४॥
तंव तो वानर आतुर्बळी । विसां हातांचि पै मौळी ।
पुच्छी बांधिली तत्काळी । रावण ते वेळी गजबजिला ॥२५॥
ते काळी दशानन । पुच्छासी डसला आपण ।
तेव्हा सुग्रीवे हांसोन । दिधला सोडून उपेक्षूनी ॥२६॥
मल्लविद्येच्या निर्वडीं । दोघे भिडतां पडिपाडी ।
उलट लोट घाय घडमोडी । गुप्त थापडी करघात ॥२७॥
झोंबी घेता अत्युद्‌भत । स्वेदें न्हाले डवडवित ।
कळा लाविंतां वर्मस्थ । निचेष्टित होती दोघे ॥२८॥
नखक्षतांचे महामार । दोघांही अंगी वाहे रुधिर ।
वसंती फुंलले किंशुक तरुवर । तैसे महावीर भासती ॥२९॥
तळपोनियां मुष्टिघात । परस्परां वंचोनियां देत ।
चुकविता मुष्टिघात । पांपर हणित साटोपे ॥३०॥
पांपर चुकविता तेथ । उठता हाणिती तळाघात ।
तळाघातें तळी पाडित । मग हाणित हुमण्या ॥३१॥
पदाभिघाताची पै थोरी । तडवे हाणिती परस्परीं ।
उलट लोट देती उरी । हाणिती शिरी कराघात ॥३२॥
दोघांचें युद्ध घोरांदर । सुरांसुरा अति दुर्धर ।
वानर आणि निशाचर । करिती विचित्र मंडळें ॥३३॥
गोपुरभूमिका समस्थळ । दोघीं युद्ध केले चिरकाळ ।
युद्ध देखोनि कळिकाळ । धाके चळचळ कांपती ॥३४॥

कृत्वा नियुद्धं भृशमुग्रवेगौ ।
कालं चिरं गोपुखेदिमध्ये ।
उत्क्षिप्य चोत्क्षिप्य विनम्रदेहौ ।
पादक्रमाद्रोपुखेदिलग्नौ ॥१२॥
अन्योन्यमापीड्य विलग्नदेहौ
तौ पेततुः सालनिखातमध्ये ।
उत्पेततुर्भूतलमस्पृशंतौ स्थित्वा
मुहूर्त त्वभिनिःश्वसंतौ ॥१३॥

गोपुरभुमिकेमाझारां । युद्ध तगटल्या दोनी धुरा ।
उपटूं धांवती येरयेरा । मल्लविद्याद्वारा तळपोनी ॥२५॥
येरयेरा निघोनि तळी । उपटितां आतुर्बळी ।
तोही तळपोनि तत्काळी । दुजा आकळी उपटावया ॥३६॥
येरयेरा झोंबी घेती । झोंबल्या युक्ती आकळिती ।
कंटी कंठी कळा लाविती । दोघे राहती निचेष्टित ॥३७॥
खवळोनि दोघे दुर्धर । वाम सव्य चमत्कार ।
उलट टोले देता पांपर । येरयेरा मिसळले ॥३८॥
उरी शिरी खांदां कोपरीं । घाय देती उदरोदरी ।
हुमणी हाणोनि मुखावरी । चक्रकारीं भोंवंडिती ॥३९॥
खचोनिया गोपुरीहूनि अवनी । दोघे पडले सभास्थानीं ।
अंग न लागता धरणी । उडोनि गगनी भीडती ॥४०॥
आकाशगती स्वये वानर । दुजा सहजचि खेचर ।
दोघे भिडती निराधारा । सुरासुर विस्मित ॥४१॥

आलंग्य चालिंग्य च बाहुयोक्तेः सयोजयामासतुराहवे तौ ।
संरंभशिक्षाबलसंप्रयुक्तौ सुचेरतुः संप्रति युद्धमार्गे ॥१४॥
शार्दूलसिंहाविव जातदंष्ट्रौ गजेंद्रपोताविव संप्रयुक्तौ ।
संहत्य संवेद्य च तौ कराभ्यां तौ पेततुर्वै युगपद्धरायाम् ॥१५॥
उद्यम्य चान्योन्यमधिक्षिपंतौ संचक्रमाते बहुयुद्धमार्गे
व्यायामशिक्षाबलसंप्रयुक्तौ क्लमं न तौ जग्मतुराशु वीरौ ॥१६॥
बाहूत्तमैर्वारणवारणाभैर्निवारयन्तौ परवारणाभौ ।
चिरेण कालेन भृशं प्रयुद्धौ संचेरतुर्मंडलमार्गमाशु ॥१७॥

मुहूर्तमात्र राहोनि स्थिर । धांपा जिरवोनि महावीर ।
युद्धा मिसळले दुर्धर । येरयेरा हांकोनी ॥४२॥
बाहुबळें लावूनि वेसणी । आंसडोनि आणितां धरणी ।
येरयेरा नाकळे कोणी । समान दोन्ही संग्रामी ॥४३॥
वीस भुजीं लावितां झडका । सुग्रीवे हाणिल्या थडका ।
दाहीं शिरी उठिल्या तिडका । तेणे दशमुखा आकांत ॥४४॥
वानर नाटोपे पै देखा । ऐसे कळलें लंकानायका ।
तरी युद्धाचा आवाका । स्वये दशमुखा न सांडवे ॥४५॥
साटोपोनिया रावण । पुढती करु आला रण ।
थरक सरक वेगविंदान । रणप्रवीण ते दोघे ॥४६॥
घात पात चपेट आघात । उलट पांपरा प्राणांत ।
ऐसे मल्लविद्यासंकेत । दोघे दावित रणमारे ॥४७॥
दोघे वीर अति दुर्धर । रगडोनि हाडे करावया चूर ।
खेंव देता पै सत्वर । अति विचित्र तेथे झाले ॥४८॥
विसां भुजांचे बंधन । द्विभुजी सांडिलें आकळून ।
कळ लागली दारुण । दशानन कुसमुसी ॥४९॥
कळ लाविता दारुण । न वांचे रावणाचा प्राण ।
सुग्रीवे देतांचि सोडून । पुढती रण करु आला ॥५०॥
उरीं उराड हाणिती देखा । शिरी शिरासी हाणिती थडका ।
दंडी मुंडपीं हाणिती ढका । लाविती सडका पदबंधे ॥५१॥
पदबंधाच्या कुसरी । भिडता गोपुरवेदिकेवरी ।
दोघे जण एकसरी । धरेवरी आदळले ॥५२॥
सवेंचि उठोनिया जाण । वोटवडीचें दाविती रण ।
हिंका दाविती थरकोन । मुष्टिपात न उचाटे ॥५३॥
उलट लोट विकट रण । हेटकीचें युद्ध दारुण ।
विविध बंधांचे निर्वाण । रणविंदान दोघांचें ॥५४॥

रणविद्या व मल्लविद्या :

दोघे राजे व्यमधारी । शिक्षा दीक्षा जाणोनि खरी ।
भवंडिता चक्राकारीं । नये गिरिगिरी भवंडीचे ॥५५॥
रणविद्येचा उद्वोध । युद्ध करिता न बाधी खेद ।
युद्धसमयी परम आल्हाद । दोघा रणमद युद्धाचा ॥५६॥
गजदंती गज जाण । युद्ध करिती खणाण ।
तेंवी हे वीर दोघे जण । करिती रण बाहुबळें ॥५७॥
दोघा दुर्धर रणकल्लोळ । दोघीं युद्ध केले चिरकाळ ।
दोघा श्रम नाही अळुमाळ । दोघे प्रबळ युद्धार्थी ॥५८॥
दाविती क्रौचाकार मंडळ । चक्राकार फिरती प्रबळ ।
रंजकाकार उपटिती सबळ । रण तुंबळ कंदनप्राय ॥५९॥
युद्ध करिता मृगगती । सवेंचि दाविती छागगती ।
निराधारें श्येनगती । दोघे गजगतीं दाविती रण ॥६०॥
कुक्कुटाचिये निजगतीं । युद्धी माघारे न सरती ।
नातरी केसरीच्या स्थितीं । उडी घालिती साटोपे ॥६१॥
दोघा पूर्ण युद्धव्युत्पती । नाना मंडळें नाना गती ।
दोघे जण रणमारार्थी । निजविजयार्थी । निजविजयार्थी उन्मत्त ॥६२॥

तै परस्परमासाद्य यतावन्योन्यसूदने ।
मार्जाराविव भक्षार्थे वितस्थाते मुहुर्मुहुः ॥१८॥
मंडलानि विचित्राणि स्थानानि विविधानि च ।
परिमोक्षं प्रहाराणां वर्जनं परिधावनम् ॥१९॥

मल्लविद्येच्या विंदानीं । दोघे भिडती सर्वांगग्रहणीं ।
येरयेरांतें मारावें रणी । घाय निर्वाणीं हाणिती ॥६३॥
तिरकस तिरकस थरकती । चक्राकृती झोले देती ।
पदाभिघाताच्या व्युत्पत्ती । घाय चुकविती तळपोनी ॥६४॥
बिडाळ बिडाळाच्या परी । गुरगुरती एकएकांवरी ।
तैसेचि हेही परस्परीं । येरयेरांवरी मिसळले ॥६५॥
छागाच्या परी मागे सरती । सवेंचि येऊनि दोघे भिडती ।
नाना परींच्या गति विगती । रणव्युत्पत्ती मारांगी ॥६६॥
स्थान मान विविध गती । नाना मंडळें व्युत्पत्ती ।
गोमूत्रिकावक्र गती । दोघे दाविती थरकोनी ॥६७॥
युद्धामाजील गतागत । येरयेरांवरी उसळत ।
येरयेरांतळी तळपत । पदाभिघात पदबंधे ॥६८॥
एक एकातें पाडोनि अवनी । दिसे जैसा मारिला रणी ।
तंव तो पादाघातें उलथोनी घोळसी धरणीवरी लाते ॥६९॥
भिडती पडती तडकती । तळी तळपोनि उसळती ।
येरयेरांतें आकळिती । कळा लाविती वर्मस्थ ॥७०॥
वर्मी लाविताती कळे । वीर उलथोनि आदळे ।
आदळता तो सवेंचि उसळे । वक्षःस्थळें ताडिती ॥७१॥
अष्टांगे मोकळीं सोडिती । सवेंचि तळाघातें पाडिती ।
येरयेरांतें आंसुडिती । झिंझाडिती सर्वांगें ॥७२॥
धरणे मारणे सोडणें । सवेंचि पदबंधें पाडणें।
अष्टांगेंसी झाडणें । आंसुडणे आक्रोशे ॥७३॥
झाला युद्धाचा शेवट । ऐसे वानिती सुर वरिष्ठ ।
तरी दोघे वीर उद्‌भट । कडकडाट युद्धाचा ॥७४॥

अभिद्रावणमाप्लावमवस्थानं सविग्रहम् ।
परावृत्तमपद्रुतमवप्लुतम् ॥२०॥
उपन्यस्तमपन्यस्तं युद्धमार्गविशारदौ ।
तौ विचेरतुरन्योन्यं वानरेंद्रश्च रावणः ॥२१॥
एतस्मिन्नंतरे रक्षो मायाबलमथात्मनः ।
आरब्धुमुपसंपेदे ज्ञात्वा तं वानराधिपः ॥२२॥
उत्पपात तदाकाशं जितकाशी जितक्लमः ।
रावणः स्थित एवात्र हरिराजेन वंचितः ॥२३॥

दोघे आवेशें धांवती । वोसरोनि आदळिती ।
प्रतिज्ञेच्या ठाया नेती । तेथे बैसविती साटोपे ॥७५॥
बैसलिया ठायाप्रती । उठता नुठवे निजशक्तीं ।
येणे बळे पै दाटती । शौर्यशक्ति साटोपे ॥७६॥
पाठिमोरे तळपती । सवेंचि संमुख भिडती ।
येरयेरांतें कांपाविती । मग पाडिती साटोपे ॥७७॥
पडतपडतांचि क्षिती । दोघे गगना उसळती ।
थरकती सरकती । नाना व्युत्पत्ती युद्धाची ॥७८॥
गुडघा कोंपर मुष्टिघात । मुंडपीं मुंडप मुरडित ।
ते ते घाय शून्य करित । अंग चुकवित लघुविद्या ॥७९॥
दोघे वीर विचक्षण । दोघे युद्धी अति प्रवीण ।
दोघे करिता निर्वाण । सुग्रीवे रावण क्षीण केला ॥८०॥
रावणे आणोनि मायाशक्ती । सुग्रीव धरावा कपटगतीं ।
जाणोनि कपिपतीं । केली युक्ती ते ऐका ॥८१॥
बाहु बाहुसीं कवळित । पदी पदा आकळित ।
शिरी शिरातें आदळत । पुच्छ नाकांत सुदलें ॥८२॥
रावण सटसटां शिंकी । सुग्रीव हाणी बुक्या बुकी ।
तेणे लंकेश अति दुःखी । अधोमुखी पाडिला ॥८३॥
दहाही कंठी तत्काळ । पुच्छे लावोनियां कळ ।
रावण सर्वांगें विकळ । पाडिला तत्काळ सुग्रीवे ॥८४॥

शेवटी रावण मूर्च्छिंत; त्याला ठार करावयाचे नसल्याने सुग्रीव त्याचा मुकुट घेऊन येतो :

रावण पडिला अचेतन । यासी मारिता न लगे क्षण ।
जीवे मारितांचि रावण । राम संपूर्ण क्षोभेल ॥८५॥
श्रीरामे वाहिली असे आण । स्वहस्तें मारावा रावण ।
त्यासी मारिता आपण । श्रीराम दारुण कोपेल ॥८६॥
श्रीरामाची हे पतिज्ञा । मिथ्या करणे हे अवज्ञा ।
हे कळलें सुग्रीव सर्वज्ञा । दशानना न मारीच ॥८७॥
मारितांचि रावणासी । द्रोही व्हावे श्रीरामासी ।
वृथा अंतरणें सेवेसी । यालागी त्यासी न मारीच ॥८८॥
रणी गांजोनि रावण । मुकुट घेवोनिया जाण ।
सुग्रीव जातो मी आपण । केले गर्जन लंकेसी ॥८९॥
इंद्रजित आणि कुंभकर्ण । निधडे वीर प्रधान ।
ज्यांसीं असेल आंगवण । करावया रण तिंही यावे ॥९०॥
कुंभकर्णा निद्रापन्न । इंद्रजित धाके कंपायमान ।
लपाले ससैन्य प्रधान । पडिले मौन राक्षसा ॥९१॥
ऐसे गर्जोनि लंकेसी । घेवोनि रावणाचे मुकुटासी ।
सुग्रीव उडाला आकाशी । श्रीरामापासीं यावया ॥९२॥
सुग्रीव निधडा, वीर परम । नाही संग्रामी स्वेद श्रम ।
अपार क्रमोनियां व्योम । आला श्रीराम ठाकूनी ॥९३॥
मूर्च्छित पाडोनियां रावणासी । मुकुट घेतला न कळतां त्यासी ।
सुग्रीव आला श्रीरामापासीं । विजयभिनिवेशीं डुल्लत ॥९४॥

अथ हरिवरनाथः प्राप्तसंग्रामकीर्त िर्निशिचरपतिमाजौ योजायित्वा श्रमेण ।
गगनमतिविशालं लंघयित्वार्कसूनु र्हरिगणबलमध्ये रामपार्श्वे जगाम ॥२४॥
इति स सवितृसूनुस्तत्र तत्कर्म कृत्वा पवनगतिरनीकं प्राविशत्संप्रहृष्टः ।
रघुवरनृपसूनोर्वर्धयन्युद्धहर्ष मृगतरुगणमुख्यैः पूज्यमानो हरिंद्रः ॥२५॥

सुग्रीवाचा जयजयकार, सर्वांना आनंद :

वानरांचा राज्यधर । जो का सुग्रीव राजेंद्र ।
तेणे संग्रामी दशशिर । स्वये दुर्धर जिंकिला ॥९५॥
जो नाटोपे सुरा असुरां । जो नाटोपे यक्षकिन्नरा ।
जो नाटोपे नृपां नरवरा । जो विखारां नाटोपे ॥९६॥
नाटोपे दानवा घोरांदरा । नाटोपे दैत्या दुर्धरां ।
ज्याचा त्रैलोकीं दरारा । त्या दशशिरा जिंकिले ॥९७॥
सुग्रीवसंग्रामाची कीर्ती । असुर सुर नर वानिती ।
येवढी पावोनि विजयकीर्ती । आला कपिपति रामाजवळी ॥९८॥
उडोनियां सावकाशीं । अपार क्रमोनि आकाशी ।
सुग्रीव आला कपिसेनेसीं । श्रीरामासी वंदावया ॥९९॥
सुग्रीव जो का सूर्यसुत । रावणविजयें अति विख्यात ।
वंदावया श्रीरघुनाथ । आर्तभूत स्वये आला ॥१००॥
रावणाच्या मुकुटासी । ठेवोनि श्रीरामपायांपासीं ।
सुग्रीव लागला पायांसी । अति उल्हासीं स्वानंदे ॥१॥
देखोनि सुग्रीवाची ख्याती । एकांगे जिणोनि लंकापती ।
तेणे वानर उल्लासती । पाया लागती जयशब्दें ॥२॥
विजयी जाला सुग्रीववीर । सुखावला श्रीरामचंद्र ।
वानरांचा जयजयकार । केला गजर हरिनामें ॥३॥
श्रीरामाच्या कृपादृष्टी । सुग्रीवासी विजयपुष्टी ।
एकला न माये सृष्टी । स्वानंदकोटि आल्हादे ॥४॥
रघुवंशींचा रघुनाथ । त्यासी द्यावया सुखार्थ ।
सुग्रीवे जिकिला लंकानाथ । तेणे कपि पूजित कपिनाथा ॥५॥

अथ तस्मिन्निमित्तानि दृष्ट्वा लक्ष्मणपूर्वज ।
सुग्रीवं संपरिष्वज्य रामो वचनमब्रवीत् ॥२६॥
असंमंत्र्य मया सार्द्धं तदिदं साहसं कृतम ।
एवं साहसमत्युग्रं न कुर्वति जनेश्वराः ॥२७॥
संशये स्थाप्य मां चेदं बलं चेमं बिभीषणम् ।
कष्टं कृतमिदं वीर साहसं साहसप्रिय ॥२८॥
इदानीं मा कृथा वीर एवंविधमरिंदम ।
त्वयि किंचित्समापन्ने कि कार्य सीतया मम ॥२९॥
भरतेन महाबाहो लक्ष्मणेन बलीयसा ।
शत्रुघ्नेन च शत्रुघ्न स्वशरीरेण वा पुनः ॥३०॥

परवानगीशिवाय गेल्याबद्दल श्रीराम सुग्रीवाची कान‍उघाडणी करतातः

युद्धाभिघात कपिपती । ते देखोनि रघुपती ।
आलिंगोनि अति प्रीती । काय त्याप्रती बोलत ॥६॥
सुग्रीव राजा तू आपण । मजसी न पुसतांचि जाण ।
एकल्या जावोनि केले रण । धुरेचें लक्षण हे नव्हे ॥७॥
आजि माझे भाग्य समर्थ । जे तू आलासी जीवे जीत ।
जै तुज मारिता लंकानाथ । तै मज प्राणांत ओढवता ॥८॥
भिडतां सुग्रीव लंकानाथ । मज निःसंदेहो पै प्राणांत ।
बिभीषणासी अति कल्पांत । वृथा पुरुषार्थ संग्रामी ॥९॥
एकाकी संग्रामागोष्टी । हे तंव तुझी बुद्धि खोटी ।
असता सैन्य कोट्यानुकोटी । वृथा अटाटी का केली ॥११०॥
सुग्रीवा मारिल्या शरणागता । भरत शत्रुघ्न तिघी माता ।
प्राप्त जालियाही सीता । प्राण सर्वथा राखीना ॥११॥
शरणागताचें जे मरण । तेंचि माझे प्राणोत्क्रमण ।
सखा असतांही लक्ष्मण । प्राण सर्वथा राखितोंना ॥१२॥
मज सांडितांचि प्राण । निमती सीता लक्ष्मण ।
निमते भरत शत्रुघ्न । सूर्यवंशी कंदन सर्वांते ॥१३॥
रावण सुग्रीव करिता घात । तै सूर्यवंशा होता अंत ।
दैवे चुकविला कुळकंदनार्थ । पुढे ऐसे कृत्य न करावे ॥१४॥
सुग्रीव युद्धी अति समर्थ । तुझा जाणे मी पुरुषार्थ ।
जेणे होय कुळकंदनार्थ । तैसा अनर्थ न करावा ॥१५॥

तमेवंवादिनं रामं सुग्रीवः प्रत्यभाषत ।
तव भार्यापहर्तारं दृष्ट्वा राघव रावणम् ॥३१॥
मर्षयामि कथं वीर ज्ञात्वा पौरुषमात्मनः ।
इत्येवंवादिनं वीरमभिनंद्य स राघवः ॥३२॥
लक्ष्मणं लक्ष्मिसंपन्नमिदं वचनमब्रवीत् ॥३३॥

सुग्रीव क्षमा मागतो :

ऐकोनि श्रीरामाचे वचन । सुग्रीवे घातले लोटांगण ।
मस्तकी वंदोनिया चरण । काय आपण बोलत ॥१६॥
तुझी भार्या चोरोनि नेतां । त्या देखोनिं लंकानाथा ।
धीर न धरवेचि पुरुषार्था । करावया घाता खवळलों ॥१७॥
पूर दाटला पुरुषार्था । तुज पुसावे नाठवे चित्ता ।
रणी मारावें लंकानाथा । सवेग या अर्था उडालों ॥१८॥
अंगी असता आंगवण । धीर न धरवे अर्धक्षण ।
हेचि पुरुषार्थाचें लक्षण । सत्य जाण श्रीरामा ॥१९॥
ऐकोनि सुग्रीवभाषण । पुरुषार्थाचे निजलक्षण ।
तेणे संतोषोनि रघुनंदन । दे आलिंगन स्वानंदे ॥१२०॥
लक्ष्मणा लक्ष्मीवंता । सुग्रीवा निजविजयार्था ।
फळे पुष्पें अति उत्तमता । होय अभिषिंचिता श्रीराम ॥२१॥
एका जनार्दना शरण । जाले सुग्रीवरावणरण ।
पुढे करील श्रीरघुनंदन । रणकंदन अवधारा ॥१२२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुग्रीव-रावणयुद्धप्रसंगो नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
ओंव्या ॥१२२॥ श्लोक ॥३३॥ एवं ॥१५५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग