(बाळक्रीडा अभंग)
3889.
(बाळक्रीडा अभंग)
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हासे कंसा ॥१॥
सावध करिता नये देहावरी । देखोनिया दुरि पळे जन ॥२॥
जन वन हरी झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकुनि लोचन मौन्येंचि राहिला । नाही आता बोलायाचे काम ॥४॥
बोलायासि दुजे नाही हे उरले । जन कृष्ण झाले स्वये रूप ॥५॥
रूप पालटले गुण नाम याति । तुका म्हणे भूती देव झाला ॥६॥
अर्थ :
भयापोटी कंस कृष्णाचे ध्यान करु लागला व कृष्ण कृष्ण करु लागला त्यामुळे त्याचा जीवभाव व देहाभिमान नाहीशा झाला व याच कारणामुळे लोक त्याला हसत होते. तो भय भावनेने का होईना कृष्णाचे इतके ध्यान करु लागला की, त्याला देहभावच राहिला नाही त्याला जर सावध करण्यासाठी लोक गेले तर तो देहभावनेवर येत नव्हता जर कोणी सावध करण्यासाठी त्याच्याजवळ गेले तर तो त्यांना पाहून दूर पळायचा कारण हा कृष्णच आहे व हा मला मारण्यासाठीच आला आहे असे त्याला वाटत होते. त्याला सर्वत्र सर्व लोक, जन, वन व स्वत:चे शरीर देखील हरीरुप दिसू लागले त्यावेळी त्याने निश्चिंत होऊन भयापोटी डोळे झाकून घेतले. त्याची अवस्था अशी झाली होती की, त्याने डोळे झाकून मौन धारण केले आता काही बोलायचेच काम राहिले नाही असे त्याने ठरवले. आता त्याला बोलण्यासाठी दुसरे काहीही तेथे राहिले नव्हते सर्व लोक आणि स्वत:चे शरीर देखील त्याला कृष्णासारखेच दिसत होते. तुकाराम महाराज म्हणतात, रुप नाम, गुण आणि जात या सर्वाचा नाश कंसाच्या ठिकाणी झाला व सर्व भूतमात्रा त्याला देवास्वरुपच झाले होते.
