(बाळक्रीडा अभंग)
3890.
(बाळक्रीडा अभंग)
झालो स्वये कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोवरी हा देव नाही तयापासी । आला दिसे त्यासि तोचि देव ॥३॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरी तो भयाभीत भेदे ॥४॥
भेदे तुका म्हणे अंतरे गोविंद । साचे विण छंद वाया जाय ॥५॥
अर्थ :
भयभावनेने कंसाने कृष्णाचे सतत चिंतन चालू केले व तो कृष्णरुप झाला केवळ भेदाने त्याच्या ठिकाणी भयवृत्ती राहिली. त्याच्या चित्तामध्ये तर कृष्णाचे चिंतन सारखे चालू होते परंतु भेदभावनेमुळे मी आणि कृष्ण हे वेगवेगळे आहोत हेच सतत तो आठवत होता. असे चिंतन तो करत होता की, मी आणि कृष्ण वेगळा आहे त्यामुळे जोपर्यंत त्याच्याजवळ कोणीही नव्हते तोपर्यंत त्याच्यासाठी देव नव्हताच परंतु जर कोणी त्याच्याजवळ आले तर सतत कृष्णाचे चिंतन चालू असल्यामुळे तो कृष्णच आहे असे त्याला दिसत होते. त्याला आपले शरीर तर वरवर कृष्णरुपच दिसत होते परंतु कृष्णाच्या भयाने तो कृष्णात व आपल्यात भेद पाहात होता त्यामुळे त्याचे अंत:करण भयभीत झाले होते. तुकाराम महाराज म्हणतात, जर भेदभावना अंत:करणामध्ये ठेवली तर गोविंद आपल्यापासून अंतरतो मग आपण कितीही योग, याग, तप, साधना, ध्यान, ज्ञान इत्यादी साधनांचे छंद केले तरी ते वायाच जातात.
