देता आलिंगन नंदाच्या
194.
देता आलिंगन नंदाच्या कुमरा ।
पडेल उतार हे वांचेल सुंदरा ।
नका आड घालू संदेह दुसरा ।
लावा उठवूनि जाऊ दया इतरा वो ॥१॥
ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा ।
झाला विरह गे वांचवा सुभगा ।
आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा ।
दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥
आहे ठाउके हे अंतरी आम्हासी ।
याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी ।
होते आटणी गे जिवा आणि शिवासी ।
तेथे देहबुध्दी नाठवे देहासी वो ॥३॥
हदयी होताचि या कामाचा संचार ।
न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर ।
देईल सुख तोचि नाही ज्यासि पार ।
सांडा चावटी आणिक विचार वो ॥४॥
नाही अनुभव हा ठाउका जयासी ।
त्याचि भोगिती या अनुदिनी दु:खासी ।
येती जाति पुन्हा होति कासाविसी ।
आम्ही न विसंबो या सावळया कृष्णासी वो ॥५॥
नाही जीवी या जीविताचि चाड ।
याच्या संगसुखे घालू वो धुमाड ।
स्वामी निळयाचा पुरवील कोड ।
आणा तोचि आता सांडा बडबड वो ॥६॥
