आपली मांडी उघडिता ला
591.
आपली मांडी उघडिता लाज ।
शिकवितो राग काय तुज ।
न धरिसी सोय काही विवेकाचे गुज ।
न लाजसी तू होता भावा बापाची भाज ॥१॥
घाल पिंगा ऐसा सांगतसे तैसा ।
काया वाचा मने शरण रिघे जगदीशा॥धृ॥
इच्छेचिया संगे नको फिरू रानोरान ।
सांडी सांडी अभिमान नको वाया करू शीण ।
इंद्रियांच्या वृत्ती अवघ्या धरी सावरून ।
परंपरा हेचि गेले संत आचरून ॥२॥
वासना कुरण इचा नको करू पांग ।
आशा तृष्णा मोह यांचा आधी सांडी संग ।
काम क्रोध लोभ यांचा करी मनोभगं ।
गुणातीत स्वामी माझा ध्याई पांडुरंग ॥३॥
भक्ति आणि ज्ञान येथे धरी शुद्धभाव ।
दया क्षमा शांति हाचि जाण पूर्ण देव ।
अनुताप बरवा मनी असो सावयव ।
मिथ्या द्वेष त्यजुनी पाहे देही देव ॥४॥
ठेवुनिया हात कटी नीट उभी राहे ।
सारूनिया दृश्य बाई एकाएकी पाहे ।
जनवाद लोक बाई सांडी यांचे भय ।
प्रेमे अंतरंगी नाचे सुखाचिया सोये ॥५॥
जाणिवेचा पिंगा वाया नको धरू देही ।
सोंग संपादणी यासी वानिसी तू कायी ।
स्तुति वाद भेद याचा मान नको देही ।
सर्व निरंतर समभाव धरी बाई ॥६॥
बहिणी म्हणे पिंगा याची जाण कला ऐसी ।
साधुनी या वेळी पुढे सिद्धमुनी ऋषी ।
ज्ञानाचे संग हेचि जाण सर्वांविषयी ।
तुकारामकृपे सुखे नांदो अहर्निशी ॥७॥
