मच्छरुप धरुनी शंखासु
3346.
मच्छरुप धरुनी शंखासुर मारिला । तेव्हा श्रमोनी जघनी कर ठेविले ॥१॥
कूर्मरुप धरुनी पृथ्वी धरलीं पृष्ठीं । तेणे श्रमोनी कर ठेविले कटी ॥२॥
हिरण्याक्ष मर्दुनी दाढेवरी धरली अवनी । तेणे श्रमोनी कर धरिले जघनी ॥३॥
रक्षिला प्रल्हाद भक्त विदारिला क्रूर दैत्य । भागला तेणे कटावर कर मिरवत ॥४॥
बळी पाताळीं घातला दार राखंता श्रम जाला । म्हणोनि कटावरी कर ठेऊनी राहिला ॥५॥
एकवीस वेळा निक्षत्री निवैर धरित्री । तेणे श्रमोनी कर जघनी धरिले ॥६॥
लंकेपुढें वज्रठाण मांडिले रावणातें भंगिले । म्हणोनी कर जघनी धरियेले ॥७॥
लागला काळयवन पाठी पळता जाला कष्टी । म्हणोनी उभा येथे कर ठेउनी कटी ॥८॥
लोक देखोनी उन्मत दारा धनी आसक्त । न बोले बौध्दरुप ठेविले जघनी हात ॥९॥
पुढे म्लेच्छ संहार म्हणोनी कर कटी । एका जनार्दनी पाहता चरणी घातली मिठी ॥१०॥
